Skip to main content

उक्षुम्बाई !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 04/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रभर पावसाची रिपरिप चाललेली..टिनपत्र्याच्या खोलीच्या छतावर होणार टनटन आवाज..खोली कसली? झोपडीच ती..आसपास पडलेले भंगारातले टिनपत्रे उचलून कापडी भिंतीना आधार दिलेला, म्हणून तिला खोली म्हणायचं..टनटन आवाजामुळे लक्ष्मीचा रात्रभर डोळा लागला नव्हता..सकाळी कसल्याश्या आवाजाने तिला जाग आली..त्यातला एक आवाज तिच्या ओळखीचा होता..दुसराही ओळखीचा असला तरी अनपेक्षित होता.आसपासच्या उकीरड्यात फिरणाऱ्या डुकरांचे आवाज तिच्यासाठी नेहमीचे होते..आज त्यातलंच एक डुक्कर खोलीच्या बाहेरील माती खणून कापडातून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतं..लक्ष्मी एका दमातच उठली..कापडातूनच एक लाथ घालून डुकराला पळवून लावलं तिने..तसा तर तिला आता त्या डुकरांचाही लळा लागला होता..कधीमधी शिळी भाकर घालायची ती डुकरांना..कालची अर्धी भाकर खोलीच्या कोपऱ्यात एका कागदावर तिने ठेवली होती..पावसाने जमीन ओली झालेली..ते डुक्कर बहुतेक त्या भाकरीसाठीच धडपड करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असावं..सगळं आवरल्यावर लक्ष्मीने तोंडावर पाणी मारलं.. ती ओलसर शिळी भाकर खाऊन लगेच तिला कामावर निघायचं होतं.. निघताना लक्ष्मीने तिची नेहमीची वेताची टोपली घेतली..टोपलीच्या अर्ध्या भागातील कालचे उरलेले शेण फेकून दिले..मधात एक कापड टाकून तिने टोपलीच्या दोन भाग केले होते..दुसऱ्या भागातला कागद थोडा झटकून परत तिथेच ठेवला..खोलीत एक नजर फिरवून कामावर निघाली..काम कसलं? भाकरी मिळवण्याची धडपड नुसती ! गावाच्या दुसरया टोकाला म्हशीचे दोन तीन गोठे होते. संध्याकाळी गोठ्यात परतताना म्हशी रस्त्यावर शेण टाकत... लक्ष्मी सकाळी जाऊन ते शेण टोपलीत गोळा करायची..गावातल्या तीन-चार घरात जाऊन शिळ्या पोळी-भाकरीच्या बदल्यात आंगण सारवण्यासाठी शेण टाकायची..जगाच्या भाषेत ह्याला खरेदी-विक्रीचा व्यवहार म्हणतात..पण लक्ष्मीचा व्यवहार वेगळा होता..कारण एवढ्या शेणाच्या बदल्यात एवढ्या भाकऱ्या असा काही नियम नव्हता..हातभर शेणाच्या बदल्यात, घरात जे आणि जेवढं उरलेलं असेल तेवढंच तिला मिळायचं..कधीकधी शेणाच्या क्वालिटीविषयी टोमणेसुद्धा मिळायचे..पण लक्ष्मी या सगळ्याला सरावली होती..शेणही रोज गोळा व्हायचंच असं काही नाही..कारण म्हशी कधी रस्त्यात शेण टाकायच्या तर कधी गोठ्यात गेल्यावर..! असं जेंव्हा जेंव्हा घडायचं त्यापुढचा दिवस लक्ष्मीसाठी "एकादशीचा" असायचा...एके दिवशी शेण नाही मिळालं म्हणून लक्ष्मी गोठ्यात मागायला गेली होती…नंतर तसा प्रयत्न तिने कधीच केला नाही !! आज चार घरी पुरेल एवढं शेण मिळालं म्हणून लक्ष्मी खुशीत होती. पहिल्याघरी आज तिला बाजरीच्या भाकरीला लोण्याचं बोट लावून मिळालं होतं..दुसऱ्याघरीसुद्धा बऱ्यापैकी अन्न मिळालं. वेताच्या टोपलीत शेणाच्या बाजूला कापड टाकून केलेल्या जागेत तिने सगळे अन्न ठेवले आणि ती तिसऱ्या घराकडे निघाली...आता थोडंफार जरी मिळालं तरी तिचे दोन दिवस पोटभरल्या सुखात जाणार होते.. "भाकर दे वो माय...शेण टाकतीया", लक्ष्मीने आरोळी ठोकली.. त्या घरातली लक्ष्मी बाहेर येऊन म्हणाली," थोडं जास्त शेण दे गं लक्ष्मी.आज परसाकडचं सारवायचंय..एक पोळी जास्त देते तुला." "नाही वं माय..थोडंच उरलंय आता..अजून पाटलाच्या घरी टाकायचंय..पोळी दे जास्तीची..उद्या टाकते जास्त शेण" "मग जास्तीची पोळी उद्याच घेऊन जा", फणकाऱ्यात उत्तर आलं. लक्ष्मी माघारी फिरली आणि पाटलाच्या वाड्याकडे निघाली.. परत तीच आरोळी... "उक्षुम्बाई आली....उक्षुम्बाई आली", पाटलाचा नातू धावत बाहेर आला. दोन वर्षाच्या त्या चिमुरड्याला तिचं नावही घेता येत नव्हतं...लक्ष्मीला त्याने फरक पडत नव्हता..तिला त्या चिमुरड्याचा लळा लागला होता. रोज त्याला कडेवर घेऊन मुका घ्यावा असं तिला वाटायचं...पण शेणाच्या हाताने !!!! लक्ष्मीने नेहमीच्या ठिकाणी शेण टाकलं तेव्हढ्यात पाटलीणबाई बाहेर आल्या. "लक्ष्मी काल रात्रीच काहीच उरलेलं नाही आता..शेण टाकून जा..उद्या देईल." लक्ष्मी शून्यात बघत उभी राहिली... "थोडं काय असेल तर बघ माय." "सांगितलं ना काही नाहीये ते..उद्या देईल..जा आता" चिमुरड्याकडे बघत बघत लक्ष्मी वाड्याबाहेर आली. शेवटी तिने विचार केला, जाऊदे आजच्यापुरतं तर मिळालंय ना.. खोलीवर पोहोचेपर्यंत अंधार होत आला होता. आतमध्ये आल्यावर तिने टोपली नेहमीच्या जागेवर ठेवली. आणि अंधारात दिवा लावण्यासाठी तेल हुडकू लागली..काही वेळात दिवा लागला आणि मिनिटभरात वाऱ्यामुळे विझून गेला..पण तेवढ्या वेळात लक्ष्मीला सगळं काही दिसलं ..
कापडी भिंतीच्या खालची माती उकरल्या गेली होती. आणि एक डुक्कर आतमध्ये येऊन लक्ष्मीने ठेवलेल्या टोपलीत तोंड घालून बसलं होतं.....!!!
बाहेर पावसाची रिपरिप परत चालू झाली ...यावेळी पाऊस मात्र लक्ष्मीच्या डोळ्यातूनही बरसत होता....!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8079
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

गोष्ट आवडली असे तरी कसे म्हणु? पैजारबुवा,

..

तू पण ..... जाऊ दे ......... वाचलेच नाही म्हणून वाचलो असंही म्हणवत नाही.

:(

:(

.

.

:( कथाशैली आवडली, कथेबद्दल बोलायला काही शब्द नाहीत.

In reply to by स्रुजा

खरंच.. :(

In reply to by यशोधरा

नि:शब्द करणारी कथा..

:(

:(

खुपच प्रत्ययकरि वर्णन. वामनराव चोरघड्यान्च्या 'सान्गावा' नावाच्या कथेचि आठवण झालि.

तुम्ही असे (चटका लावणारे) लिहीत जावु नका हो ते चटपटीत / खुमासदार / शालजोडीतले देणारे लेखच लिहा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जेंव्हा जेंव्हा ताटातलं अन्न वाया जातं तेंव्हा लक्ष्मीबाई आठवते.. आमच्या घरी येणारी लक्ष्मीबाई आजही डोळ्यासमोर आहे..तीच नाव लक्ष्मी नव्हतं, काय होतं ते आठवत नाही..आणि ते महत्त्वाचं नाही..

In reply to by चिनार

आम्ही मुळात काहीही झाले तरी वाया जाऊ देत नाही, अगदी आग्रह करणारे नातलग पण टाळतो :), खाऊन माजा टाकून माजू नका हा पिताजींचा दंडक घालुन दिलेला आहे, त्यामागची कारणे ह्या दोनशे शब्दांत वाचा

:(

प्रतिसाद देणार नव्हतो; पण... मनाला फार टोचली ही कथा. पूर्वीपासून हे असं आणि अशासारखं पाहात आलोय. एकीकडे शिळ्या भाकरीच्या चतकोर तुकड्याचाही हिशेब मांडणारी आणि दुसरीकडे मनाच्या अपार श्रीमंतीने कोडगेपणाला लाजवणारी; दोन्हीही माणसेच. आपण माणसे म्हणजे विरोधाभासाचा कळस असतो. माणुसकीचा दहावा घालणाराही समाजच आणि माणुसकीला अपार दयार्द्रतेने उरात वागवणाराही समाजच. आणि अर्थात, हा समाज बनवणारी व उद्ध्वस्त करणारी माणसेच... जगात गरिबी का आहे या प्रश्नाचे उत्तर आपण गरीब आहोत हे समजल्यापासून शोधतोय. अजूनही ठामपणे म्हणू शकत नाही उत्तर सापडलंय की नाही ते. ललित आवडले. शैली टोकदार आहे, जी अशा लेखनासाठी आवश्यक असते.

भाकरीच्या चतकोरासाठी मोताद व्हावं माणसाने यासारखं दुर्दैव नाही. कथा फार म्हणजे फारच टोचली. प्रत्यक्ष अनुभवातून आलेली असल्याने शब्द थेट आतूनच आलेत :((... काय म्हणावं तुमच्या लेखणीला चिनारभौ!! (पानात आधी वाढलेलं असेल ते सगळं विनातक्रार, अगदी कितीही आवडलं नाही, खारट, तिखट कसंही असलं तरी संपवायचंच तेही चकार शब्द न काढता, असा आजोबांचा दंडक असल्याने लहानपणापासूनच पानात टाकलेलं घरी चालत नसे. त्यानंतर ती सवय अंगवळणी पडली ती पडलीच. आजही कोणी पानात टाकले की माझा अक्षरशः तीळपापड होतो. त्या माणसाला बोलण्यापासून कसेबसे आवरावे लागते....)

In reply to by चतुरंग

फक्त एका दुरुस्तीसह माझ्या बाबत पानात आधी वाढलेलं असेल ते सगळं विनातक्रार, अगदी कितीही आवडलं नाही, खारट, तिखट कसंही असलं तरी संपवायचंच तेही चकार शब्द न काढता, असा आजोबांचा परिस्थीतीचाच दंडक असल्याने लहानपणापासूनच पानात टाकलेलं वसतीगृहात्/गुरुकुलात चालत नसे. त्यानंतर ती सवय अंगवळणी पडली ती पडलीच. आजही कोणी पानात टाकले की माझा अक्षरशः तीळपापड होतो. त्या माणसाला बोलण्यापासून कसेबसे आवरावे लागते.... आजही घरी त्याचा आग्रह धरतो आणि दोन्ही मुलांना तीच सवय ठेवली आहे... अन्न हे पुर्ण ब्रह्म जाणणारा नाखु

In reply to by नाखु

आजोबांचा दंडक हा त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीनेच होता. सगळे शिक्षण वार लावून मगच झालेले. त्यामुळे प्रत्येक घासाची किंमत चुकती केल्याशिवाय पुढे जाता येतच नव्हते. गरीबीचे चटके हे आयुष्यातली सगळ्यात मोठी शाळा असते! __/\__

लहानपणापासून खात्यापित्या घरात वाढलो. अर्थात पानात काहीही टाकायचे नाही हि घरची शिकवण होतीच. परंतु त्याचे मूळ माहिती नव्हते. लष्करात असताना दिवस दिवस मिळेल ते अन्न खाल्ले आहे. उदा. मिल्कमेड बरोबर पाव. परंतु ओडिसा मध्ये गरीब लोक उंदीर शिजवून खाताना पाहिले आणि अंगावर काटा आला. बिहारमध्ये शेतमजुरांची मुले लष्कर भरती साठी आलेली. बापाला पगार दोन वेळचं जेवण आणि १८०० रुपये "वर्षाला" पाहून कुठेतरी आतड्यात तुटलं. आपण अन्न वाया घालवतो याची लाज वाटायला लागली. आजही केवळ अन्नच नव्हे तर कोणतीही वस्तू वाया घालवायची नाही हा दंडक स्वतः लाच नव्हे तर बायको आणि मुलाना घालून दिला आहे.

खोलवर पोचली कथा.

लक्ष्मी दिल में सोचती होंगी .. मेरे घर की मुफलिसी को देख कर बदनसीबी सर पटकती रह गई और एक दिन की मुख़्तसर बारिश के बाद छत कई दिन तक टपकती रही... लेकीन आंखोंकी बारीश के बारेमें क्या कहुं... क्या कहुं के अल्फाज हि नहीं रहे ...चुभेगी बारीश अब तो ..

शुक्रिया इस बात के लिए के मैं अब कभी भी किसी रोटी मांगने वालेको बिना रोटी का टुकडा दिएं अपने दहेलिज से नहीं लौटाउंगी

:( मी लहान असताना पोटभर अन्न न मिळणाऱ्या माझ्या वर्गातल्या एका मुलाची परिस्थिती आठवली. त्या विषयी कधीतरी लेख लिहिणार आहेच.

च्यायला, कथा अनेक वाचल्या आहेत. फार कमी वेळा डोळ्यात टचकन पाणी येतं. सावरता आलं नाही. कथा थेट पोहोचली. :( -दिलीप बिरुटे

कथा मनाला भिडली, स्वाती

फार वाईट वाटलं.. ताटात टाकलं की खुप राग येतो. काही काही घरात ताटातलं सगळं संपवलं (खास करुन लोकांकडे जेवायला गेल्यावर) तर आपल्याला घरी मिळत नाही असं लोकांना वाटेल म्हणुन टाकुन देण्याची पद्धत आहे. आपल्या घरी असे लोक आले की शेवटी उगाच थोडी भाजी घेऊन टाकुन देतात ते पाहुन भयानक राग येतो. काही ठिकाणी जावाई वगैरे लोकांना अघोरी आग्रह करुन ताटात तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या फेकुन देताना पाहिलय. ह्या सगळ्यांना तुमच्या लेखाची प्रिंट काढुन दिली पाहिजे...

चटका लावणारी कथा. मिरासदारांच्या अश्याच एका कथेची आठवण झाली.

अरेरे... ! कथा काळजाला भिडली.... आणि लेखनशैली फारच आवडली....

:(

मी लहान असताना दारावर एक भिकारी महीला यायची.तेंव्हा मी खाण्याचे फार नखरे करायचे. आजीने एक दिवस मुद्दाम तीला विचारले. आमचे नेतेस ते तुझ्या मुलांनी खाल्ले नाही तर काय करतेस. ती बोलली पोळ्या वाळवते.काही नाही मिळत तेंव्हा पाण्यात शिजवते त्या. वर भगवती (तिखट)टाकून गरम करुन देते पोरांना. ..हे सांगताना तिच्याआडून मी टाकलेल्या अन्नाकडे बघणारी तीच्या मुलाची नजर मला आजही बोचते... मी पानात टाकूच शकत नाही. माझी नाकारलेली गोष्ट माझ्याहूनही लहान मुलासाठी चैन आहे. आणि मी. ...लाज वाटली मला माझी तेंव्हा. .त्यानंतर जेंव्हा लोकांकडे राहताना वास येणार्या शिळ्या पोळ्यांवर तांब्याभर पाणी पिऊन भूक भागवली तेंव्हा त्या अन्नाचे महत्व जास्तच चांगल्या रितीने कळले. असो. कथा फार भावली.

या कथेवर एक शॉर्ट फिल्म बनावी अशी इच्छा आहे. मिपाकरांचे यावरील मत जाणून घ्यायला आवडेल. कोणाच्या माहितीतील शॉर्ट फिल्म मेकर असेल तर कळवावे. धन्यवाद !