तात्या तुमी कसं हायसा?
तुमची लय आठवण यिती मला. लहानपणापासन तुमी मला कायबी कमी नाय केलं. ज्ये मागितलं त्ये दिलं. तवाचं तुमी मला शिकिवल आसत का नाय सम्द्या गोष्टी नाय मिळत, कवा कवा हराया बी लागतंय तर आज ह्यो दिसचं नसता दिसला. तुमची तरी काय चुक म्हणा. तात्या ह्या पाटलांच्या रक्तातच हाय ओ जिगर. त्ये प्रिन्सदादा बगा. कशात काय न्हाय तरी तुमच्या जिवावर उधळतय कडू. तेला म्हणाव जरा फाटक्या खिशान दोन दिस जगून तरी दाकीव. तात्या परश्या गरीब हाये पर मनान लय चांगला हाये तो. तेच्या ग्वाड मिट्ट सोभवान आमची सारखी भांडणं हूत्यात. पर तो लय खरा हाये ओ. आपल्या घरात कोण सुदीक नाय तेच्या एवढं चांगल आई सोडली तर.
तात्या ऊसाला दर बरा मिळाला न्हव यंदा? आन् आबा, भाऊ सम्दे कसे हायेत? तात्या हिकड आलू न आधी परश्या न मी पत्र्याच्या खोपट्यात राहिलू. किडामुंगीवानी. परश्यान लय कष्ट केलेत तात्या. पैल्यांदा तर घरात केर पण तोच काडायचा, चा सैपाक बनवायचा, आणि बाहेर काम करून येयाचा. आणि एवढं करून का नाय त्यो कदीच कुणाशी चिडून बोलत नाय. कधी चुकीच काम करत नाय. मला तेच्याकड बगुन लय वाईट वाटायचं आन् घरातल काम करायला बी आवडायच नाय.
मग हिथ एक सुमनताई हाये, तिच्याच खोपट्यात राहतू आमी. तिनं मला कंपनीत कामाला लावलं. चिडू नका तात्या. मला म्हायते तुमाला मी असं दुसऱ्याच्या दारात खपलेल आवडायच नाय. माझ लगीन लावून देणार हुता ना त्या दिग्विजयशी. त्यो मला रानीवाणी ठेवील, हिकडची काडी तिकडं करू देणार न्हाय म्हणालावता तुमी. पर खर सांगू तात्या त्याच्याशी लगीन करून ना म्या खरंच किडामुंगीचच आयुष्य जगली आसती. तेंच्या घरात डोक्यावन पदर बी ढळलेला चालत नाय. मला काचेच्या कपाटातल्या बाहुलीगत नव्हत राहायचं तात्या.
तुमी म्हणता मला तिकीट दिलं असत इलेक्शनला पर सगळा कारभार प्रिन्सदादाला दिला असता का नाय? मला नुसती नमस्कारापूरती उभी केली असती.
तेच्यापरास लय ब्येस हाये आता मी. आमी गरीब असून बी आमी आमच्या जिवाव जगतो. कष्टाची भाकरी खातो. मला तर लय भारी वाटतं काम करायला. आमचे सर पण मला लय मानतात. आता मला सूपरव्हायजर करणार हायेत. नुसतं बसून लक्ष ठिवायच कोण कामं करतय. वेळेत कामं पूर्ण करून घ्यायचं. आमचे सर मला म्हणतात
"अर्चना वरी सिटूल्लो बलम कलीगीना ओका अत्यंत शक्तीवांतमेना उन्दि"
नाय कळल ना कायच. मला पण आधी काय कळायची नाय ही भाषा. पण आता जमत हळू हळू. चुकत चुकतच शिकले. म्हणजे ते म्हणतात
"ज्याच्या मनगटात बळ आहे तो खरा पॉवरवाला."
खरं सांगू का तात्या, मला ना तुमचीच आठवण आली ते ऐकून. तुमी कसं एकदा शेतात फिरत फिरत मला सगळं सांगत हुता, आज्ज्यान लावल्याली घराची वाट. मग तुमी तुकडा तुकडा करून जमिवल्याल रान. रात्रीचा दिस करून शेतात गाळलेला घाम. तात्या मला तर घशात कायतरी अडकल्यावानीच झालं ओ. माज्या मैत्रिणीला मग म्या समद सांगत हुती कसं आपलं मोठं रान हाये, केळीच्या बागा हायेत आन् तुमी माजे किती लाड करता सगळ सगळ. तात्या तुम्ही हुता म्हणून मला कवा दुःख न अपमान म्हाईत नाय झाला. पर दुनिया लय येगळी हाये. तुमी तुमच्या पंखाखाली आमाला काय कळू दिलं नाय. आता बाहेर आल्याव सगळ्याची किंमत कळतीया. माणसांची तर जास्तच. तात्या लय प्रॉब्लेममधे जगतात ओ लोक. माझं तर कवा कवा काळीज हलत काय काय लोकांचे हाल बगून. तात्या तुमी म्हणाल म्या असं का बोलाय लागली आता. तुमीच म्हणायचा ना तात्या ताई आता मोठ्या व्हा! झाले बगा.
तात्या आमी आता नवीन घर घेणार हाये. लय मस्त हाये. हवेशीर. परश्या म्हणत हुता आपण खालच घिऊ. पण मीच म्हणलं नाय सगळ्यात वरच्या मजल्यावरचच घ्यायच. आपल्या गावाला कस घराभोवती मोकळ रान हाये. गच्चीवर गेलं की कसं सगळं हिरव हिरव गार दिसायच तसं आता मला हितं कधी बघाय मिळणार. मग मीच म्हणलं रान नाय तर नाय आपण आता उंच उंच आकाशाकड बगु. आमच्या बाळाच नाव आमी आकाशच ठेवलंय. त्याला आमी तात्याच म्हणतो. तुमच्यावरच गेलाय तो पण. तात्या तुमी याल का माज्या घरी. नाय म्हणू नका तात्या आता. तात्या एवढं कसं रागावला तुमी माज्यावर. म्या तुमची लाडकी लेक हाये ना. तात्या एकडाव फक्त तुमी आकाशला बगा. फक्त एकडाव त्याला कडेवर घिऊन फिरवून आणा. म्या तुमाला परत कद्दीसुद्दा त्रास देणार नाय. तुमाला नाय बगायच ना माझं तोंड नका बगु. पर माज्या लेकराचा राग करू नका. माजा जीव तुटतो तात्या तुमची अन आईची आठवण आली की. तात्या याल ना माज्याकड, तात्या हो म्हणा तात्या...तात्या
आर्चि कशी काय हाक मारती म्हणून तात्या अंथरुणावर उठून बसले. घामाने भिजलेले हात चेहऱ्यावरून केसातून फिरवत ते उठले. आर्चीच्या रूम मधे जाऊन लाईट लावून पाहिला. तिच्या पुस्तकांवरून हात फिरवता फिरवता तात्यांचे डोळे भरून आले. तसेच मागं फिरुन ते पुन्हा बेडरूममधे आले आणि लास्ट डायलड़ नंबर लावला.
पलीकडुन फोन उचलताच घसा खाकरून तात्या म्हणाले,
"माघारी फिरा, लगच्या लगी"
"पर तात्या..."
"सांगतोय तेवढं करायच. उलटा सवाल नाय पायजे"
एवढं बोलून तात्यांनी फोन ठेवला. पुढच्या एक तासात प्रिन्स, भाऊ आणि आबा बंगल्यात परत आले होते. असं मधूनच प्लान फिसकटला म्हणून प्रिन्स तणतण करत होता. आर्चीची आई नातवाला घेतलेले स्वेटर पिशवीतून काढून त्यांचे मुके घेत होती, कुरवाळत होती. सगळ्यांना घरी परत जायला सांगून तात्या सोप्यामधल्या झोपाळ्यावर शांत बसले होते. जणू काहीच घडलं नव्हतं. प्रिन्सला वर जाऊन झोप असं सांगून तात्या दिवाण खान्यात आले. पदरात हुंदका दाबून धरलेल्या आपल्या बायकोशेजारी खाली बसत त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. एवढे दिवस दोघा मायबापानी अश्रूंना घातलेला बांध कोसळला.
कसेबसे सावरत तात्या म्हणाले,
" काळजी करू नका, आपण सकाळच्या गाडीन जाऊ आर्चीकड. शेवटी कायबी झालं तरी बाप हाये मी..."
वाचने
5864
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
....
सैराट चा शेवट
सहमत. जेव्हा प्रत्येक कहानीचा
In reply to सैराट चा शेवट by सिरुसेरि
आवडला
सुरेख!
एक नंबर
भारी...कस्स जम्तं हो तुम्हाला
भारी.
पण खरं सांगू का
छान लिहिलंय.
पर्फेक्ट उतारा !
ब्येस्ट, एकच लंबर. जमलीय
बरोबर आहे ! गल्तीसे मिस्टुक
In reply to ब्येस्ट, एकच लंबर. जमलीय by अभ्या..
छान आलंय...
लै म्हंजे लैच स्वप्नीय झालंय
सर्व वाचकांची आणि
भाग -२ आवडला. आता परश्यावर
ताई!
तुमचं मशीन देतांव का परश्या
In reply to ताई! by जव्हेरगंज
हे भारीच. जव्हेरभाउ हे घ्या
In reply to तुमचं मशीन देतांव का परश्या by अभ्या..
...
In reply to हे भारीच. जव्हेरभाउ हे घ्या by प्रीत-मोहर
हे आहेच पण क्लिककथा आवडेल
In reply to ... by आनंद कांबीकर
राहू दया जव्हेरदादा. आज एका
In reply to ताई! by जव्हेरगंज
नक्की कुठे कामाला हाहात
In reply to राहू दया जव्हेरदादा. आज एका by रातराणी
सध्या अंडर कवर एजंट आहे. पण
In reply to नक्की कुठे कामाला हाहात by टवाळ कार्टा
=))
In reply to सध्या अंडर कवर एजंट आहे. पण by रातराणी
असं दावाया पायजे हुतं खरं, पर
ग्रामीण भाषा खूप छान जमली आहे
ग्रामीण भाषा खूप छान जमली आहे
मस्त. आवडला हा भाग पण.
आवडलं पण पटलं नाही.
स्वप्नात राहायला चांगलं लिखाण
चांगला शेवट
चांगलं लिहिलंय रे रातराणी ;)
झकास
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद :)
खरच खूप छान लिहिल आहे
ये बाssssत!