Skip to main content

'ओ.एस.भौ'

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 12/06/2016 या दिवशी प्रकाशित केले.
"हे बघ तोह्याचनी हूत आसन त् नीट कर नै त् दी सोडून" "तुमिच सांगा आता काय हुकलं बरं भौ मह्याकडून?" "काय हुकलं मंजी? एक घंटा झालाय साधी पाच पानं छापणं होया ना तुह्याकडनं" "आता म्या तरी काय करणार भौ? एक त् माही रॉम है उलशिक अण त्याच्यात तुम्ही देता भाराभर फायली सोडून. मंग म्या माह्याचनि होईन तेवढं करतु अण लैच गळ्याच्यावर गेल्यार देतु हात टेकुन" "जवा तवा नुसतं त्या रॉम चं सांगत बसतु. नीट पानं भाईर काढाय कशाला रॉम लागतिरं तुला? पाच पाच मिंटाला निसती पानं गळ्यात अड़कुन घेतु अण मंग बसतु केकलत" "हे बघा भौ, लै उनं दुनं नगा काढत बसु. ज़रा त्या मावस्याकड़ं ध्यान द्या. तुमचं कै महत्वाचं काम चालु असलं तरी बी ते इथं तिथं टिचक्या मारत बसतं. त्याच्यामुळं तुमाला हँग हुतं. उगाच वड्याचं तेल वांग्यावर नगं काढुसा" "ये प्रींटऱ्या नीट नांव घ्याचं! एक त् भौ चं अण आपलं काम चालु असतं तुहा मंदी मंदी बोलाचा कै संबंध् नै. अण दुसरं मंजी भौ ला इच्चारल्या बगैर आपुन एक बी काम करत नै. भौ एकदा नई मनले की कुणी किती बी आदळ अपट केली तरी बी आपुण आपल्या पॉइंटरला जागचा हलु देत नै" "हे बघ! तु मला याचं त्याचं सांगत बसु नकु. 'कोण काय कर'तं अण 'कोण कसं हे' ते मला चांगलं ठाव हे. पयलं तु मला त्या तेवढ़या प्रिंटा काढुन दी" "भौ, लै गरम नका होउ. एकदा ठंड डोक्यानी मला पाठिल्याल्या सगळ्या फायली कैंसल करा अण जरा टप्प्या टप्प्या नी पाठा. म्या देतु काढुन" "नै! नै! आपल्याला नै जमणार कॅन्सल बिन्सल करायला. एक त् तोह्यामुळं ते 'माउसराव' बी हँग झालेत, त्याहिला त् पॉइंटर बी जागचा हालिता येइना" "मंग जा उखाड़ा काय उखाड़ाचं ते! आपुण त् रोलर बी जागचा फिरिणार नै" "ये त्वांड सांभाळून बोल नैतर......" "काय नैतर?...अं?..बोल ना? .. काय करणार तु? लै त् लै अनइंस्टाल करशिन्...त्याच्यावर काय करणार हेस?" "आरं काय झगडे करताय कवाधरणं! कामं कराचं लैच जीवावर ईत असल त् मला सांगा ना! कशाला सारखं सारखं हँग हुता अण झगड़े करत बसता! एका सेकंदात 'कंट्रोल-अल्ट-डिलीट' मारते अण लोड कमी करतो" "हा.. हा.. मारा बरं तेवढं 'कंट्रोल-अल्ट-डिलीट' अण पयलं मला बंद करुन टाका. गाणं म्हणुन म्हणुन पार तोंड दुखाय लागलं. कवाधरणं बघतुया! कुणाचं ध्यान बी नै अण कुणी ऐकत बी नै तरी एवढा मोठा आवाज करुन ठुलाय" "ये स्पिकऱ्या, तोहा कुठुन मंदिच घोडा उधळला? तु असला काय अण नसला काय, कुणाला कै फरक पडत नै" "बघा भौ, हेव मावस्या कसा चभर चभर करतोय ते! तुमिच तेला डोक्यावर बसुन ठिवलाय! अण तुमी जर तेला असंच कानात मुतु देला तर एक बी काम धड़ हुनार नै" "भौ, मारू का 'कंट्रोल-अल्ट-डिलीट'?" "तुमी गप रहा ओ.. तसं त् मंग म्या बी एक एक इंडो काढुन अण एक एक टिचकि मारून बंद करू शकत हाय.. पर बॅगरौंडाला भौ ची कामं चालु असत्यात म्हणुन गप बसतु... तव्हा तुमी बी गप ऱ्हा" "कह्याची कामं? दोन पेंड्रायवं लावुन घेतलित अण बसलाय हिकडचि गाणं तिकड़ं करत. अंगात एवढुसि रैम अण सतरा चाळे... वरुन परत एकाधा कागुद गुतला त् म्हणायचं 'ह्याच्यामुळच् हँग झालू'.." "लए बोलला बर् का प्रिंटया तु... ह्याचे परिणाम लय बेक्कार हुतील.." "चल रे भौ.. कर काय कराचं ते.. बघु तुह्यात काय दम है ते.." "जाऊ दया नं प्रिंटरराव! कह्याला वाकड्यात शिरता? शेवटी कई झालं तरी ते आपले मॅनेजर हैत.." "कै नै कीबोर्डतई, भौ पयल्यावाणी नैय रायला... ह्या मावस्याचं ऐकून ऐकून त्याचं डोस्क भंगलय" तेवढ्यात स्पीकर च्या थोबाडातून जोरात 'टिंग' असा आवाज आला अण डिसप्लेवर एका चौकटित छापुन आलं; 'कार्टरेज मिसिंग' कुणीतरी प्रिंटर चं थोबाड़ उघडलं. जोरात खट्ट असा आवाज आला. एक हात त्याच्या उघडलेल्या तोंडात शिरला अण तोंडातुन हात घालुन किडनी उपसुन काढावी तसं कार्टरेज उपसलं. प्रिंटरला धस्स झालं. तो थरथरला. कार्टरेज झटकुन वापस बसवलं तसं तो आणखी जास्त थरथरला. मोठ्याने घुर्र घुर्र असा आवाज झाला. परत घुर्र घुर्र आवाज झाला अण क्षणार्धात छपलेली पानं भाईर यायला सुरुवात झाली. पानं भाईर यायला लागली तसा माउस किंचाळला; "हा! हा! हा!... बघितलंत्? .. भौ चा नाद करायचा नाय... सगळी दुनिया एकीकड अण आपले भौ एकीकड... भौ जिंदाबाद!"
लेखनविषय:

वाचने 3059
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

:)

मस्त