Skip to main content

"शतकोटी" सैराट

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 09/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
काही मित्र सैराटच्या गल्ल्याबद्दल चर्चा करत होते. एकाचं मत पडलं की सैराट १०० कोट कमावणारच!(ग्रॉस) दुसरा म्हणाला की १०० नाही, पण ५० कमावेल आणि मराठी चित्रपटांचा आवाका आणि अडचणी बघता ५० म्हणजेच ५०० कोटी! पण एकंदर सगळ्यांच्या मते लवकरच मराठी सिनेमा शतकोटी उड्डाणे भरू लागेल ह्यावर सार्‍यांचे एकमत होते. माझ्याही मते हे अशक्य नाहीच, पण त्याआधी बरेच बदल घडावे/घडवावे लागतील. काही आकडेवारी सादर आहे. विदर्भ:- लोकसंख्या(२०११) २.३ कोटी सिंगल स्क्रीन थिएटर्स:- १०६ सुमारे २ लक्ष १७ हजार लोकसंख्येला एक पडदा उर्वरित महाराष्ट्र:- लोकसंख्या:- ९.१२ कोटी सिंगल स्क्रीन थिएटर्स:- ५०४ सुमारे १ लक्ष ८१ हजार लोकसंख्येला एक पडदा तमिळनाडू:- लोकसंख्या:- ६.७८ कोटी सिंगल स्क्रीन थिएटर्स:- १५४६ सुमारे ४३,९०० लोकांसाठी एक पडदा केरळ:- लोकसंख्या:- ३.४८ कोटी सिंगल स्क्रीन थिएटर्स:- १०१५ सुमारे ३४,३०० लोकांसाठी एक पडदा आंध्र+तेलंगण:- लोकसंख्या:- ८.४६ कोटी सिंगल स्क्रीन थिएटर्स:- २८०९ सुमारे ३०,१२० लोकांसाठी एक पडदा मल्टिप्लेक्स पडद्यांची आणि थिएटर्सची आकडेवारी सापडली नाही. तरी त्यांची संख्या फार नसावी. मुंबई आणि पुणे या दोन शहरांत फक्त जाणवण्याइतके मल्टिप्लेक्स आहेत. इकडे नागपुरातही आहेत, पण पुण्याच्या तुलनेत कमीच. चंद्रपूर महापालिका असून एकही मल्टिप्लेक्स नाही. मोजून पाच थेटर आहेत. अमरावती अकोला बहुधा १ किंवा २ मल्टिप्लेक्स असतील. बाकी विदर्भात आनंदी आनंद आहे. माझे गाव नगरपरिषद आणि तालुक्याचे गाव असून एकच थेटर आहे ते पण प्यासी जवानी आणि जिस्म की प्यास वगैरेच दाखवते.जिल्ह्याच्या गावी म्हणजे भंडार्‍याला ३ थेटर आहेत, त्यातही कामाचे बहुधा दोनच आहेत. थोडक्यात संपूर्ण जिल्ह्याची ताज्या चित्रपटांची भू़क भागवायला २ थेटर आहेत, बाकी सगळे रेश्मा की प्यास मिटवत राहतात. शेजारी गोंदिया जिल्ह्यात पण हीच स्थिती आहे. तिथे पण बहुतेक ३च थेटर आहेत. चौथे आले असेल तर कल्पना नाही. लोकसंख्या चांगली दोन लाखावर आहे. उर्वरित जिल्ह्यात उजेड आहे.माझ्या माहितीत नसलेले थेटर असतीलही २-३, पण नवा किंवा चांगला चित्रपट फक्त जिल्ह्याच्या गावीच लागतो एवढे पक्के माहीत आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत इकडे थिएटर नाहीत. सर्वाधिक पडदे नागपुरातच आहेत. नागपुर नसते तर आकडा अजून छोटा असता. उर्वरित महाराष्ट्राची पण आकडेवारी पाहिली आणि त्यातून महानगरे वजा केली तर म्हणता येईल की एकंदरीत महाराष्ट्रातच महानगरे सोडली तर चांगले सिनेमागृह नाहीत. अनेक तालुक्यांच्या शहरी पण नाहीत. लाखभर लोकसंख्या असलेल्या शहरात एखाद-दुसरे असते, तेसुद्धा पडद्यावर काय दाखवतात माहीत आहेच आपल्याला. सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये तिकिटांचे दरसुद्धा कमी असतात. खरा नफ़ा असतो मल्टिप्लेक्समधून. जुने थिएटर आधुनिक केले तरी पण तिकीट दर वाढवता येईल. मोडक्या खुर्च्यांच्या आणि खर्रा-तंबाखूचा वास मारण्यार्‍या थिएटरात बसायचे कोणी १०० रुपये कशाला देईल? हिंदी, इंग्रजी सिनेमा काही पडद्यांवर तरी रिलिज केलाच जातो. सीमालगत कदाचित त्या त्या भाषेतला एखादा सिनेमा लागत असेलच.( गोंदियात छत्तीसगढ़ी सिनेमा लागलेला मी पाहिलाय.नागपूर, चंद्रपूरात तेलुगु सिनेमा हाउसफुल जातो.) आताच्या मराठी सिनेमाच्या कमाईतपण भलामोठा वाटा महानगरांचाच आहे. दक्षिणेकडे मात्र उलट दृष्य आहे. तिकडेही भरपूर सबस्टॅण्डर्ड थेटर्स आहेत, तिकीट कमी असणारे आहेत, पण संख्या भरपूर आहे. दुसरे म्हणजे तिकडे बव्हंशी थेटर स्थानिक सिनेमाच दाखवतात.त्यामुळे सिनेमांना पडदे भरपूर मिळतात. सैराट सगळे, जगभरचे पडदे मोजून ४०० पडद्यांवर दाखवला गेला म्हणे. तेलुगु सिनेमा फक्त आंध्र+तेलंगणातच १०००-१५०० पडद्यांवर दाखवला जातो,कदाचित जास्तच! भरीस भर म्हणजे त्यांच्या सुपरस्टारचा सिनेमा असेल तर लोक मोठी रकम मोजायला पण तयार असतात. आपल्याकडे अजून असा बँकेबल स्टार निर्माण झाला आहे असे मला वाटत नाही. तिकडे पहिल्या आठवड्यातच एखादा सिनेमा शतकोटी कमावू शकतो, आपल्याकडे नटसम्राटने पूर्ण आठवडे मोजून(संपूर्ण थिएटर रन) ४० कोटी कमावले बहुतेक. थोडक्यात काय तर, एवढ्यातच १०० कोटीची स्वप्ने पाहू नका.
लेखनविषय:

वाचने 3298
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मला वाटलं सैराटवर परीक्षण आलं की काय , झोपण्यापूर्वी वाचून घ्यावं म्हटलं तर पैशाचा हिशेब दिसला. १०० कोटी होऊन जाऊ दे, हाय काय अन नाय काय ! :) शूरा. -दिलीप बिरुटे

विदर्भ मराठवाड्यामधल्या दुष्काळाचा फटका बसेल काय

सैराट उतरवणार आहेत. सैराटमुळे कुसंस्कार होतात या तक्रारीमुळे दोन संस्कारक्षम सिनेमे आणण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी सैराट उतरवण्यात येणार आहेत. पहिला सिनेमा सनीताई लहाने यांचा वन नाईट स्टँड आणि दुसरा संस्कारपटू विक्रम भट्ट यांचा १९२० इन लंडन. बोल्ड संस्कारांच्या प्रतिक्षेत.

ह्म्म...चांगलंय. रत्नागिरीत काय परीस्थिती आहे कुणी सांगेल काय?

In reply to by असंका

रत्नागिरीत दोन्ही थियेटर ला हाउसफुल्ल सुरु आहे तिसरा आठवडा रत्नागिरी सैराटमय पायरसी मुळे बरेच जण मोबाइल वर देखिल बघतायत

विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र :- लोळ... :) वेगळा विदर्भ घेतला का कराले ?

In reply to by ब़जरबट्टू

फिल्म फेडरेशन ऑफ इन्डिया विदर्भाची यादी वेगळी देते आणि उर्वरित महाराष्ट्राची वेगळी. मला तुलना करायला ही आकडेवारी महत्वाची वाटली म्हणून मी आकडेवारी एकत्र न करता वेगळीच ठेवली. मला खरेतर विभागवार आकडे पाहिजे होते पण ते सापडले नाहीत.