Skip to main content

पाणी-प (गद्यविडंबन)

लेखक सुधीरन यांनी बुधवार, 13/04/2016 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसांपूर्वी मी सुभाष अवचटांचं "खिडकी" या नावाचं पुस्तक वाचलं. त्यातिल काही कथा मला आवडल्या. पैकी 'बर्फ-ब' या कथेचे हे विडंबन.) हे पाणी आहे: हजारो मैल पसरलेलं. या प्रचंड पाण्यातून वाट काढत माझी कार धवतेय. या पाण्यातच जन्मलो; पाण्यातच मरणार. मेल्यावर देहाचं पाणी होणार. तोवर मी हा असा; पाण्याने भरलेला. थोडंसं काहीतरी खरचटलं: थेंबभर लाल पाणी हातावर उमटलं: रुमालाने पुसलं: रुमाल खिशात ठेवला. खिशातून लाल पाण्याचा समुद्र फवा-याने बाहेर पडला. मी आणखी चिंब झालो. घर आलं: कार थांबवली: दार खोललं. कारमधील पाणी खाली ओसंडलं: मी ही पाण्यासोबतच जमिनीवर आदळलो. सावरून उठलो: पॅंट झाड़ली. पॅंटवरचे पाण्याचे थेंब उडून बाजूच्या पाण्यात मिसळले. मी खूश होवून शिट्टी मारली: तोंडातून पाण्याचा फवारा बाहेर पडला: मी बावरलो. पाणी तुडवीत चालू लागलो. दरवाजा उघडला: पाण्याचा मोठा लोट मला भिजवित बाहेर पडला. मी अचल: गोठलेला: खिशातला लायटर पेटवून बर्फ वितळवलं. पण......पाणी फार गरम झालं: उकळलं. फ्रिज उघडून आत बसलो: गोठून. बर्फ फोडून बाहेर पडलो. किचनच्या दारात गीता उभी होती: गोठलेली: मी हातोडीने बर्फ फोडला. तिच्याकडे झेपावलो: ती वितळून, फरशीवरून वाहत घराबाहेर पडू लागली. एका भांड्यात तिला जमा केलं: भिंतीवरल्या फ्रेमवर फेकून दिलं. फ्रेममध्ये तिची पाणावलेली आकृती उमटली. मी स्वतःशिच हसलो. वॉशबेसिनकडे तोंड धुवायला गेलो: वॉशबेसिनच्या कडेवर बसलेल्या संजूने एकदम पाण्यात उडी मारली. मी चपळाईने त्याची तंगड़ी धरून त्याला दुस-या फ्रेममध्ये थापलं: त्याचीही छबी उमटली. मी हसतच सिगरेट पेटवली. एक झुरका मारला: तोंडातून धूर सोडला: पांढरट पाण्याची वर्तुळे आकाशात भिरकावली गेली. समाधानाने गीता आणि संजूच्या छब्यांकडे पाहिलं: त्यांच्या स्मितातून पाणी ओसंडत होतं. मी बादली लावली: दूसरी.....तिसरी..... पिंपे भरली.... तरीही पाणी ओसंडतयंच. हळूहळू रूम पाण्याने भरतेय. मी गुदमरतोय: पाणी ओसंडतयंच.
लेखनविषय:

वाचने 1814
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

समाधानाने गीता आणि संजूच्या छब्यांकडे पाहिलं: त्यांच्या स्मितातून पाणी ओसंडत होतं. मी बादली लावली: दूसरी.....तिसरी..... पिंपे भरली.... तरीही पाणी ओसंडतयंच. कृपया गिता आणि संजु ला मराठवाड्यात पाठवा न ! अहो एक दिवस आड मिरजेहुन रेल्वेने पाणि आणाव लागतय.

संजय चोप्रा आणि गीता चोप्रा यांचा संदर्भ आहे का हा? त्यांची रंगा आणि बिल्ला या दोघा गुन्हेगारांनी हत्या केली होती.