राजाच्या रंगम्हाली
राजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंग
रुप्याचा खांब, तेला मोत्याची झालर
राजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादी
जरीचा चांदवा, रेशमी शिणगार
गडनी, सजनी, गडनी सजनी गं
राजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसली
बोलना, हसना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली, राजानं पुशिलं
डोळयाची कमळं उघडा, व्हठाची डाळिंबं
गडनी, सजनी, गडनी सजनी गं
राजाच्या रंगम्हाली, रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल, कशाला बडिवार
मायेच्या पूतापायी, रानी गं रडीते
असवांची गंगा व्हाते, भिजीला पदोर
गडनी, सजनी, गडनी सजनी गंs
गडनी-- गढनी..मैत्रीण
कवी योगेश यांची ही निनांत सुंदर रचना "साधी माणसे" या १९६५ सालच्या सिनेमात लता व उषा मंगेशकर यांनी गायिली आहे. संगीत रचना आनंदघन यांची. दोन्ही भगिनींचा गोड आवाज, मोजक्या वाद्यांचा उपयोग, साधी चाल यांच्या विषयी मला काही बोलावयाचे नाही. काय बोलणार ? असा सुरेख संगम एखादे वेळीच जमून येतो. आनंदघन यांनी इतर अनेक गाण्यांना चाली दिल्या असल्या तरी आपली त्यांची ओळख एक स्वर्गीय गायिका म्हणूनच. असो. आपण सिनेमातील गाण्याची "सिच्युएशन’ काय ते सोडून द्या. एक कविता म्हणूनच आज ह्या भावगीताकडे पहावयाचे आहे. एखादी भावकविता तीला चांगली चाल लावून ती तुमच्या मनात रुजली की तुम्ही गायिकेने/गायकाने व संगीतकाराने कवितेला न्याय दिला आहे की नाही याची चर्चा करू शकता. आप पहिले ! मी फक्त कविताच बघणार आहे.
खेडेगावातील एका गरीब कुटुंबातील गृहिणीला एकदम राजवाड्यातील राणीची आठवण आली. तिने तर राजवाड्यात कधी पाउलच टाकलेले नाही. तेव्हा ती कल्पनेनेच तेथल्या संमृद्धीचे वर्णन करत आहे. आपल्या अंगावरील एखादा सोन्याचा छोटासा दागिना, रुप्याची जोडवी, नवारीचा पलंग, दुकानात किंवा मालदारांच्या घरातील बायकाच्या अंगावरील रेशमी, जरतारी कपडे पाहून तिने एकदम भन्नाट कल्पनेची उडी मारून हे सगळे वैभव म्हालातील पलंगाला देऊ केले. पराची मऊ गादी, जरीचा चांदवा, सगळे एकदंम "फ़ाइव्ह स्टार"
पण ती म्हालातील माण्सांकडे वळते तेव्हा एकदम निराळे चित्रच समोर उभे राहते. राणी, ती तर काहीच बोलत नाही, हसत नाही जिथे बघत आहे तिथे लक्ष नाही, नजर एकदम उदास. इथे खिन्न, दु:खी, केविलवाणी अशी निरनिराळी विशेषणे :नजरे"ला लाऊन पहा. पहिल्या कडव्या नंतर "उदास" कसे चपखल आहे, नाही ? राणीला या वैभवात आता "रस" उरलेला नाही हे "उदास" जास्त प्रभावी पणाने सांगतो. राजाचे दुसर्या स्त्रीकडे लक्ष गेले असेल तर तीला वैभवातले सुख टोचणारे होईल, नजर दु:खी, नाइलाज असेल तर केविलवाणीही होईल. पण तसे दिसत नाही त्याचे तिच्याकडे लक्ष आहे, तिचा सल त्याने जाणला आहे, तो समजून घेण्याची त्याची इच्छा आहे तो अतिशय लडिवाळपणे, प्रेमाने तिची कळी खुलवण्याचा प्रयत्न करत आहे. डोळ्याची कंमळे व व्हटाची डालिंबे उघडा असे तो स्वत:कडे लहानपणा घेऊन विनवत आहे. गृहिणीच्या स्वत:च्या संसारातील खोल प्रेम इथे स्वाभाविकपणे प्रकट झाले आहे. कविता वाचतांना एक सवय लावून घ्या. एखादा शब्द, ते विशेषण असेल क्रीयापद असेल, कवीने का वापरले असावे ? मला दुसरे एखादे सुचते कां ? बदलाने कवितेत काय फरक पडतो ? स्वत: कवी बनण्याचा प्रयत्न करा. वाचताय ती कविता "आपली": करावयाचा प्रयत्न करा. मग कविता "तुमची" होईल , जास्त आनंद देईल.
नवर्याने एव्हड्या प्रेमाने विचारल्यावर राणीचा बांध फुटला. ती एका वाक्यात तिचे दु:ख प्रकट करते. ’ कशाला हा बडिवार ? हा म्हाल त्या "सोन्या" शिवाय सुनासुनाच आहे" बस. आता आसवांची "गंगा", व्हाते, पदोर भिजितो !
कुठे खेडेगावातील साधी बाई. कुठे राजाच्या रंगम्हालातील राणी ! पण एकीचे दु:ख दुसरीच्या काळजापर्यंत पोचले आहे. मातृत्वाची आस दोहींना एका घट्ट विणीने गडनी, सजनी करून टाकते. आता लक्षात आले, गडनी, सजनी ग तली आपुलकी, सख्य कुठून आले ?
कवितेतील ग्रामिण बाज योगेश यांनी समर्थपणे पेलला आहे.तेला, रंगम्हाल, सोन्याईन. पदोर, भिजिते, रडिते, असवांची गंगा. सगळे कसे चपखल बसले आहेत..एक छान भावकविता !
शरद .
वर्गीकरण
गाण्याची लिन्क
मस्तच रसग्रहण
खूपच सुरेख.
छान लेख
In reply to छान लेख by सिरुसेरि
कवी योगेश हे भालजींचेच कवी म्हणुन टोपण नाव होते
मस्त लिहिलंय शरदकाका...
उत्तम रसग्रहण .
अप्रतीम काव्य आणि सुरेख
खूपच छान लिहिलंय.
क्या बात है सर
सुंदर रसग्रहण!
कालच ऐकत होतो हे..अगदी दोन
आजवर हे गाणं अशा अॅन्गलने
सुंदर रसग्रहण
काव्य सुरेखरीत्या उलगडले आहे.
कवितेच्या महालातल्या एकेका
सुरेख रसग्रहण.
मस्तं रसग्रहण! हे गाणं खूप
अतिशय आवडते गाणे
छान!