Skip to main content

दोन मनिष

लेखक सनईचौघडा यांनी बुधवार, 06/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ही कहांणी आहे माझ्या समोर घडलेल्या समान नावे असणार्‍या दोन मुलांची. त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. या कुटंबाची घडी कधी नीट बसलीच नाही. सारखे काही ना काही संकट त्यांच्यावर येत गेले. मी जेव्हा ७ वीत होतो तेव्हा तो चौथीत होता. त्यामुळे तो तसा आम्हाला लिंबुटिंबु होता. तब्येतीने बारिक, सडपातळ, खाण्यापिण्याचा कंटाळा. जेवताना अन्न चिवडत बसायचा आई बाजुला बसुन भरवायची त्याला. लहानपणी त्याला जावळं येत नव्हते तेव्हा त्याच्या माऊलीने हरतर्‍हेचे उपाय योजले. त्याच्या डोक्यावर केशकर्तनालयातुन दुसर्‍याचे कापलेले केसांचे पुंजेके ठेवले की तो वैतागायचा. वर त्याची चाललेली रडारडी धुडगुस आम्हाला खाली ऐकु येत असे. कारण तेव्हा आम्ही तेव्हा २ मजली आडव्या चाळीत रहात होतो , चार घरे खाली तळमजल्यावर व चार घरे वरती. एकाबाजुला जिना. तो खाली यायचा नाही आपल्या बहिणींबरोबर वरच खेळायचा. पाचजणांचं ते अस्सल मालवणी कुटुंब. बाबा माझ्याच वडीलांच्या कंपनीत कळव्याच्या पुर्वेला असलेल्या मफतलालमध्ये कामाला जी १९८३ साली बंद पडली ती कायमची. त्याची आई शिवणकाम करायची. एक मोठी व एक लहान बहिण. अभ्यासात मात्र हा हुशार. जेव्हा १९८४ साली चाळ पाडली तेव्हा आम्ही सगळे भाडेकरु विखुरले गेलो. ते ४ वर्षांनी पुन्हा बिल्डींग उभी झाल्यावर हळुहळु एक एक करत परत जुन्या जागी पण नविन बिल्डींग मध्ये परतलो. आता मात्र सगळी पोरे बिल्डींगच्या मागे असलेल्या पटांगणात एकत्र खेळायला जमु लागलो. बहुतेक सगळी मिसरुड फुटण्याच्या वयाची. अगदी सातवी पासुन बारवी पर्यंतची. सगळ्या खेळात आता तोही असायचा. पण ह्याला क्रिकेटचे भारी वेड. पण दहावी पासुन याचे मित्रांचा गोतावळा वाढला. आई बिचारी सकाळी पाच वाजल्या पासुन शिवणकाम करायला मशिनवर बसायची बाबांना कुठेच नोकरी मिळत नव्हती. ( माझ्या बाबांची पण तीच हालत होती. मग मी आणि भावाने हरतर्हेची कामे केली. तर आईने पाळणाघर चालु केले.) एकंदर काळ कठीण होता. त्यातच याच्या बाबांना एक दिवस ताप आला तो घरी सांगितला नाही म्हणुन दोन दिवस अंगावर काढला तो डोक्यात चढला. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर १० दिवसांनी घरी आले ते आपली ऐकण्याची क्षमता गमावुनच. पुढे हा दहावी झाला. दहवीला चांगले मार्क्स पडले. आता तो लहाणपणीचा मनिष राहिला नव्हता. कॉलेजकुमार झाला होता. चुणचुणीत हुशार. बोलण्यात चतुर. ज्या कॉम्पुटर क्लासमध्ये तो शिकत होता तिथल्या सरांनीच नोकरी त्याच क्लास मध्ये शिकवण्याची अर्धवेळ नोकरी दिली. वापरयला मित्राची गाडी (स्कुटर) होती. तर ठाणे ते वाशी MIDC एरियात कधी तरी रात्रीची रिक्षा चालवु लागला. आता हातात पैसा खुळखुळु लागला. एकंदर बरं चालले होते. मोठीचे लग्न झालं. हा आणि ह्याची पाठची बहिण ग्राज्युएट झाले. बहिण नोकरीला लागली. आईला वाटत असे की आता सगळं मार्गी लागेल. पण आता त्याला बाहेरच्या जगाची खरी ओळख होत होती. कधी बिल्डींगमधल्या तर कधी नाक्यावरच्या मुलांबरोबर राहुन सिगारेट आणि दारुला कधी स्पर्श झाला ते कळलेच नाही. त्यातुन नाक्यावरच्या गणपती मंडाळाचा कार्यकर्त्यांबरोबर १० दिवसात वाईट संगतीला जोड मिळाली. रात्रीची जागरंणं, पार्ट्या. हा दारु पिऊन यायचा तेव्हा घरी बाबांचे आणि याचे मोठे भांडण व्हायचे. शेजारी तरी किती लक्ष घालणार. मध्यंतरी धाकट्या बहिणीचे लग्न झाले. तेव्हा ती मिळकत पण कमी झाली. मी त्या बिल्डींग मध्ये दर रविवारी माझ्या आईवडीलांना भेटायला जातो तेव्हा तेव्हा त्या बिल्डींग मधिल शेजार्‍याचं काय काय चाललंय ते मला कळते. (कारण मी २००६ साली स्वतःची वेगळी खोली घेतली.) पुन्हा घर खर्च कसा चालवायचा ह्याची आईला चिंता. बिल्डींगचे मेंटनन्सची थकबाकी वाढत चाललेली. मग एकेदिवशी याचे बाबा गेले. आता आई आणि तो एवढेच विश्व. ती मशिनवर काम करुन करुन बिचारी थकली होती. पाठीला इतके वर्षे काम करुन पोक आल्यासारखे झाले होते. कमरेत वाकली होती बिचारी. आणि अशातच याला क्षयरोगाने धरले. सरकारी दवाखान्याच्या फेर्‍या चालु झाल्या. मग जेव्हा आजार बळावला तेव्हा खाजगी दवाखान्यात दाखल झाला. तेव्हा कळले की सरकारी दवाखान्याच्या डॉ. ना निदान झाले नाही की याला क्षयरोग झाला आहे ते. आता पाठीत पाणी झाले होते. दिवसेंदिवस हा खंगावत चालला. इकडे सप्टेंबरमध्ये आई कुठेतरी मंडळाचा गणपती बघायला गेली ती तिथे कशाला तरी पाय अडकुन पडली आणि तिचे कमरेचे हाड मोडले. तिथपासुन ती मोठ्या बहिणीकडे रहायला गेली आणि आजपर्यंत खाटेवरच आहे. इकडे हा एकटाच राहु लागला. सगळा वेळ २ र्‍या मजल्यावरच्या खिडकीत बसुन रस्यावरची रहदारी न्याहाळायचा. मला कधी जिन्यात भेटायचा तेव्हा त्याच्याकडे पाहुन कसंसंच व्हायचं मनात. म्हंटले की अरे चांगल्या डॉक्टरांना दाखवना मग तु बरा होशील. तेव्हा माझी गोळ्या औषधे चालु आहेत असे सांगायचा. तर कधी बिल्डिंगखाली कट्ट्यावर येवुन बसायचा. एकटाच. त्याच्या जवळ कोणी जायला धजावत नव्हते. मग दिवसेंदिवस त्याचे खोलीबाहेर येणे बंद झाले स्वतःला त्या खोलीतच बंद करुन घेतले जणु त्याने. खिडकीत बसुन असायचा. डोळे खोल गेलेले. हातापायाच्या काड्या झालेल्या. दुपारी आणि रात्री त्याला बहिणीकडुन जेवणाचा डबा यायचा तो सुध्दा तो बाहेरुनच ठेवुन कोणीतरी जायचे. आणि आता मागच्या डिसेंबरच्या ३ तारखेला रात्री तो खाटेवरुन पडला. डोक्याला मार लागला. लादीवर बरंच रक्त पडले होते. त्याला तसेच चादरीत लपेटुन दवाखान्यात नेले तेव्हा २ दिवस हॉस्पिटलमध्ये होता आणि मग तिथेच अवघ्या ३४ व्या वर्षी त्याचे निधन झाले. आताशा ते घर बंद आहे. आई तिच्या मुलीकडे खाटेवर पडुन आहे. मी आईकडे जाताना त्या बंद घराकडे बघतो तेव्हा मागचा भुतकाळ त्याच्या बरोबरचे कॅरेम , पत्ते, डबा ऐसपैस, इस्टॉप इस्टॉप, गोट्या खेळणे, त्याची अभ्यासातली हुशारी हे सगळे पुन्हा आठवते. एक चांगला शेजारी मित्र गमावला याचे दु:ख होते. एक मात्र खरं , की जर चांगली संगत मिळाली असती तर त्याने यशाची सगळी शिखरे नक्कीच पार केली असती. दुसर्‍या मनिषविषयी पुन्हा केव्हातरी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2193
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. आता तो लहाणपणीचा मंदार राहिला नव्हता. >>>> नावं बदलली आहेत ती संपादित करून घ्या.

In reply to by जगप्रवासी

मंदार माहीत नाही का ? कमालच आहे ! रच्याकने लेखन आवडलं . दुसऱ्या मनिषविषयी वाचायला आवडेल . (स्वगत:आजकाल मिपावर मंदार , मंदाकिनी जरा जास्तच दिसतायेत . लोल)