व्यवसाय आणि छंद यांचा आनंददायी समतोल

कल्पक जनातलं, मनातलं
"तुम्हाला कोणतीही आर्थिक जबाबदारी नसेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्हाला केवळ आवड म्हणून आयुष्यात काय करायला आवडेल?" असा प्रश्न मी अनेक मित्रांना विचारतो आणि जी उत्तरं मिळतात ती आणि उत्तरं देणाऱ्या लोकांचा सध्याचा व्यवसाय/नोकरी यात बरेचदा ताफावत आढळते. अर्थात आर्थिक/कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपलब्ध होऊ शकलेल्या संधी या चौकटीत प्रत्येक जण काहीना काही धडपड करत असतो, प्रगतीच्य दिशेनी वाटचाल करत असतो. सातत्यानी नवीन गोष्टी शिकत राहणं आणि प्रगतीसाठी सकारात्मक धडपड चालू ठेवणं अशा वृत्तीतूनच अनेक माणसं मोठी झालेली आपण पाहतो. लहानपणी वाचन, लेखन, संगीत आणि चित्रकलेची आवड होती. चित्रकलेविषयी विशेष ओढा होता. व्यंगचित्र असलेल्या मासिकांचं खास आकर्षण होतं. आजूबाजूला सुंदर हस्ताक्षर असणारी आणि चित्रकला आत्मसात असणारी माणसं होती. त्यातच शाळेत चित्रकलेचे खूप चांगले शिक्षक लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक स्पर्धेत भाग घेता आला. खास शालेय मुलांसाठी जपानला भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात भारतातल्या विविध शाळातून मागवलेल्या चित्रांमध्ये माझ्या चित्राची निवड झाली. पुढे फाईन आर्ट कॉलेजमध्ये कमर्शिअल आर्ट (applied art) ची डिग्री घेतल्यामुळे व्यावसायिकता आणि निर्मिती आधीच विक्रीचा विचार हे विचार मनावर ठसले. कलेच्या माध्यमापेक्षा संकल्पना (Concept) महत्वाची हे जाणवलं. जाहिरात संस्थेत करिअरची सुरुवात करून कालांतरानी आयटी/सॉफ्टवेअर उद्योगात प्रामुख्यानी वापरल्या जाणाऱ्या सर्जनशील (Creative) अशा युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन (User Experience Design) या क्षेत्रात स्थिरावलो. ज्या माणसाला विविध लोकांशी संवाद साधायला आवडतो आणि त्या अनुषंगानी 'उपयुक्त' (Usable) असे डिजाईन (मराठीत डिजाईनला 'अभिकल्प' म्हणतात! यापेक्षा सोपा शब्द अजून मलातरी सापडायचाय!) निर्माण करायला आवडतं अशा व्यक्तीसाठी हे क्षेत्र खूपच सर्जनशील आणि समाधान देणारं आहे. त्यामुळे माझ्यासारखा बडबड्या माणूस या क्षेत्रात नाही आला तरच नवल! युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन म्हणजे वापरकर्त्यांना (Users) काय हवंय त्याचा अभ्यास करून, त्या अनुरूप डिजाईन तयार करून, अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सर्जनशील आणि 'उपयुक्त' उत्पादनाची निर्मिती! विविध देशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन करताना, त्यासाठी विविध देशातल्या ५०० पेक्षा जास्त लोकांशी संवाद साधून त्यांच्यासाठी उपयुक्त असे डिजाईन निर्माण करताना विलक्षण मजा आली, समाधान मिळालं. प्रचंड गोष्टी शिकता आल्या आणि खूप शिकायच्या आहेत! युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन या व्यावसायिक आणि सर्जनशील समाधान देणाऱ्या क्षेत्रात काम करतानाच चित्रकला, संगीत, वाचन, लेखन हे लहानपणीचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सर्जनशील कामाचं समाधान आणि निखळ आनंद देणारे छंद यांचा आनंददायी समतोल महत्वाचा, नाही का? - निखिल वेलणकर माझी काही चित्रं इथे पाहता येतील Ditigal painting created on iPad Digital Painting Acrylic painting on canvas Acrylic Painting Oil painting on canvas Oil Painting Oil painting on canvas "सुराज्य" Oil Painting Met Hon'ble Chief Minister of Maharashtra Shri. Devendra Fadnavis last year and dedicated my painting "Surajya" ("सुराज्य") to him. Humbled, honored and inspired by his appreciation. Oil Painting
वर्गीकरण
लेखनप्रकार

40 टिप्पण्या 6,573 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

अभ्या.. नवीन

In reply to by कल्पक

मस्त काम कल्पकराव. भारी वाटले. संदीपरावानंतर मिपावर भेटलेले तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट. मस्त मस्त. मी कलानिकेतन कोल्हापुरचा.

बाबा योगिराज नवीन

सर्वच चित्र सुन्दर आहेत. शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर नवीन

सुंदर चित्रं. सगळीच आवडली.

विवेक ठाकूर नवीन

स्वतःच व्यक्तिमत्व आणि व्यावसाय याची सुरेख सांगड घातली आहे.

आनंदराव नवीन

वा वा मस्तच हो चित्रकला आणि चित्रकार यांच्याबद्दल नेहमीच अप्रूप वटत आले आहे.

खेडूत नवीन

वाह! एका नव्या विषयाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...! अजून वाचायला आवडेल. 'अभिकल्प' हा नवा शब्द समजला!

तुषार काळभोर नवीन

In reply to by खेडूत

वरच्या ४ ओळींसाठी.

कल्पक नवीन

In reply to by बोका-ए-आझम

नक्की विचार करीन. पण पारंपारिक कमर्शिअल आर्टचं (जाहिरात) क्षेत्र सोडून User Experience Design या नाविन्यपूर्ण क्षेत्रात येउन १० वर्ष झाली. त्यामुळे User Experience Design विषयी नवीन लेख लिहिण्याचा विचार आहे. या विषयावर माझ्या एका लेखाचा दुवा खाली एका प्रतिक्रियेत दिला आहे. नक्की वाचा. धन्यवाद.

हेमन्त वाघे नवीन

आपण भारतात आहेत काय ? आपण नौकरी करता कि आपली सेवा फ्रीलान्स पद्धतीने मिळू शकेल ? हेमंत संस्थापक HiFiHunt.com

कल्पक नवीन

In reply to by हेमन्त वाघे

मी अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातल्या अल्फारेट्टा या गावात राहतो. एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नोकरी करतो. अधिक माहितीसाठी कृपया व्यनि करावा.

राही नवीन

In reply to by कल्पक

आपली चित्रे बघून आपले राहाण्याचे ठिकाण अमेरिकेत असावे असेच वाटले होते. लेख आवडला. वेगळे अनुभव आणि वेगळे क्षेत्र म्हणून नावीन्यपूर्ण वाटला. चित्रेही आवडली.

संदीप डांगे नवीन

काही संज्ञा व्याख्यांविषयी स्पष्ट करतो. माझ्या माहीतीप्रमाने 'डीझाइन'ला मराठीत 'संकल्प' म्हणतात. 'कंसेप्ट' ला 'संकल्पना'. 'डीझाईन' म्हणजे' सौंदर्य' नाही. 'काही' गोष्टींची उपयुक्त मांडणी/रचना म्हणजे डीझाईन. त्याचे काही शास्त्रीय नियमही आहेत. ह्यात सौंदर्य निर्मिती हा एक आनुषांगिक भाग आहे. पण 'सौंदर्य निर्मिती' म्हणजेच डीझाईन हा सर्वसामान्यांचा गैरसमज असतो. क्रियेटीव म्हणजे सर्जनशील की सृजनात्मक की सृजन? सृजन म्हणजे निर्मिती. सर्जनशील म्हणजे निर्मितीक्षम. ज्यात निर्माण करण्याची कुवत, क्षमता आहे असे. प्रत्यक्षात 'क्रियेटीवीटी' म्हणजे नवनिर्माण, नविन विचार किंवा नेहमीच्या समस्येवरचे नव्याने सुचलेले/वेगळ्यामार्गावरचे समाधान. युजर एक्पीरीयंस डीझाइनः इथे तीन शब्द आहेत आणि इंग्रजीच्या नेहमीच्या घोळामुळे नेमका कशाचे डीझाइन होतंय हे लक्षात येत नाही. इथे 'युजर एक्स्पीरीयंस' चे डीझाईन असे अभिप्रेत आहे. सर्वप्रथम युजर एक्पीरीयंस म्हणजे काय ते समजून घेऊ. एक्स्पीरीयंस म्हणजे अनुभव, प्रचिती. घटना-भावनांची जाणीव, त्यायोगे होणार्‍या प्रतिक्षिप्त क्रिया, विचारपूर्वक क्रिया ह्यांचा एकत्रित परिणाम व त्याची नोंद म्हणजे अनुभव. हा अनुभव 'युजर' म्हणजे 'उपभोक्त्याला' येतच असतो. आपले डीझाईन कसेही असले तरी अनुभव हा प्रवाही आहे. उदा: साधे एखादा दरवाजा उघडून आत जाणे वा बाहेर येणे हाही एक उपभोक्ता अनुभव असतो. आपण ह्या असंख्य अनुभवांमधे कायम संचारत असतो. आता ह्यात नेमके काय डीझाईन करायचे? दरवाजाचेच उदाहरण घेतले तर आत येणे वा बाहेर येणे ह्या क्रिया सुलभतेने घडण्याला प्राधान्य देण्याचा विचारच युजर एक्पीरीयंस च्या डीझाइनला चालना देतो. मग दरवाजा कोण उघडणार, त्यांचे वय, हुशारी, शारिरिक ठेवण, कारण, वेळ, या सर्वांचा विचार करून अधिकाधिक सुलभतेने दरवाजा कसा उघडेल ह्याचा विचार व संकल्प म्हणजेच युजर एक्पीरीयंस डीझाईन. ह्यात 'युजरला काय हवंय?' हा विचार न होता युजरला एखादी गोष्ट सुलभतेने कशी वापरता येईल याचा विचार जास्त केला जातो. 'आपल्याला युजरकडून काय अपेक्षित आहे व मानसशास्त्रानुसार युजर काय कृती करतो' ह्या दोन गोष्टींचा सविस्तर अभ्यास करून जे रचना मांडली जाते व त्याने युजरचा अनुभव सुलभ-सोपा-कटकटविहिन केला जातो. तो अनुभव 'आपल्या फायद्याबरहुकूम रचणे' म्हणजे 'युजर एक्स्पीरीयंस डीझाईन'. टेम्पल रन, कँडी क्रश, इत्यादी गेम्स चांगली उदाहरणं आहेत युएक्स ची. मॉलमधले आपोआप उघडणारे दरवाजे, लिफ्टची बटणे, रीमोट कंट्रोल, मॉल्स च्या वस्तूंच्या रचना-मार्गिका, इत्यादी युएक्सची उदाहरणे आहेत. युएक्सचे एक क्रूशल उदाहरण म्हणजे विमानात वा जहाजात संकटकाळी यात्रेकरूंनी करण्याच्या जीवरक्षक कृती ह्याही आहेत. जाणकारांनी अधिक सुचवावे...

कल्पक नवीन

In reply to by संदीप डांगे

छान मुद्दे मांडलेत आपण. 'अभिकल्प' या शब्दाची ओळख मी आयआयटी मधील इंडस्ट्रीअल डिजाईन सेंटरमध्ये (http://www.idc.iitb.ac.in/index.html) सहायक संशोधक असताना झाली. User Experience Design या विषयावर मी लिहिलेला लेख इथे वाचता येईल: http://misalpav.com/node/27069 मूळ लेख (लोकसत्ता- करिअर वृत्तांत पुरवणी, १० फेब्रुवारी २०१४)(http://www.loksatta.com/career-vrutant-news/usage-of-technology-367435/?...)

सस्नेह नवीन

In reply to by संदीप डांगे

संकल्प याचा अर्थ डिझाईन होत नाही, तर काही एक कृती ठरवणे, नियोजित करणे. डिझाईन ला रेखाटन हा प्रतिशब्द वापरता येईल. अभिकल्प सुद्धा ठीक वाटतो.

राही नवीन

In reply to by सस्नेह

सम् हा उपसर्ग संस्कृतात धातुला लावल्यानंतर मूळ धातूचा अर्थ तीव्र, सूक्ष्म, व्यापक होतो. जसे, वेदना, संवेदना, भाषण, संभाषण, संघर्ष इ. त्यात एक साकल्य, सामूहिकतासुद्धा कधीकधी येते. 'कल्प्' म्हणजे इमॅजिन करणे, मनात उभारणे, ठरवणे, विचारांना आकारात पाहाणे. संकल्प म्हणजे हीच क्रिया ठोसपणे, सुनिश्चित आणि सुनियोजित अशी ठरवणे. पूजेतला संकल्प हाच. 'मी अमुक अमुक करीन' असे ठाम ठरवणे. डिझाइनला कित्येक ठिकाणी रचना म्हटले गेल्याचे वाचले आहे. अर्थात ते तितकेसे समर्पक वाटत नाही. क्रिएटिविटी म्हणजे निर्माणशीलता. ही एक क्वालिटी, भाव आहे. भाववाचक नाम. क्रिएट-क्रिएटिव-क्रिएटिविटी. सर्ज्-सर्जनशील/निर्माणशील-सर्जनशीलता/निर्माणशीलता.

भंकस बाबा नवीन

छान चित्रे आहेत. तुम्ही ज्या शाखेचे ज्ञान घेतले त्याच शाखेत काम करत आहात व जे तुमच्या आवडीचे आहे. त्यासाठी अभिनंदन.

म्हसोबा नवीन

चित्रं आवडली. मात्र चित्रांवर स्वाक्षरी चितारलेली असताना बटबटीत जलशिक्क्यांची आवश्यकता नसावी असे वाटते. आपली कला चोरीला जाण्याची एव्ह्ढीच जर भीती वाटत असेल तर सार्वजनिक वाचनमंचावर टाकूच नयेत अशी चित्रे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

सर्वच चित्रं छान. लेखन आवडले. -दिलीप बिरुटे

कल्पक नवीन

अभिकल्प : डिझाइन म्हणजे काय? शास्त्र आणि कलांचा मेळ घालून जगणं सुसह्य़ करणाऱ्या ‘डिझाइन’विषयीचं नवं पाक्षिक सदर..(http://www.loksatta.com/vishesh-news/design-is-the-creation-of-a-plan-or-convention-for-the-construction-of-an-object-or-a-system-1183079/)