"The Debt" च्या निमित्ताने
लेखनप्रकार
सन १९९७, इजरायलमधील तेल अवीव्ह हे शहर. सारा गोल्ड नामक एका लेखिकेच्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमाने चित्रपटाला सुरूवात होते. साराची आई 'रेचेल सिंगर' हिच्या पुर्वायुष्यातील एक थरारक मिशनवर हे पुस्तक आधारलेले आहे. थरारक मिशन? तर रेचेल ही एक भुतपूर्व गुप्तहेर आहे, इजरायलच्या कुख्यात की ख्यातनाम 'मोस्साद'ची. 'सर्जन ऑफ बिर्कनौ' या नावाने कुख्यात असलेल्या एका नाझी डॉक्टरचे पुर्व बर्लिनमधून अपहरण करून त्याला इजरायलमध्ये आणायचे आणि योग्य त्या शिक्षेसाठी त्याला न्यायासनासमोर उभे करायचे ही कामगिरी मोस्सादच्या इतर दोन गुप्तहेरांसोबत मिळुन रेचेलला पार पाडायची असते. खरेतर त्याला तिथेच बर्लिनमध्येच संपवता आले असते की पण ही मोस्सादची पद्धत नव्हेच. त्याला न्यायासनासमोर उभे करुन, त्याच्या पापांचा सर्व पाढा वाचून मगच त्याला देहदंड द्यायचा ही मोस्सादची पद्धत. म्हणजे देहदंड पक्का पण.....
तर या डॉक्टरचे नाव (चित्रपटातील) आहे डिटर वोगेल. साराच्या पुस्तकाच्या पुरस्कारप्रदान कार्यक्रमात रेचेलला पुस्तकातील एक प्रकरण वाचून दाखवण्याची विनंती केली जाते.
हेलेन मिरेन (दुसर्या टप्प्यातली रेचेल सिंगर)
ते प्रकरण, ज्यात या गुप्तहेरांच्या ताब्यातील तो कृरकर्मा एकट्या रेचेलला बघून तिच्यावर हल्ला करतो आणि पळून जायचा प्रयत्न करतो. या झटापटीत रेचेलला तिच्या चेहर्यावर आयुष्यभर साथ देइल अशी एक निशाणी मिळते. तशा जखमी अवस्थेतही रेचेल पळुन जाणार्या वोगेलला पाठीमागून एक गोळी घालून संपवते. बस्स संपली कथा !
नाही हो, संपते कसली, इथेच तर कथेला खरी सुरूवात होते. आपल्या लेकीच्या पुस्तकातील ते प्रकरण वाचता वाचता रेचेल अलगद भुतकाळात, त्या काळात जाऊन पोहोचते आणि दिग्दर्शक एक विलक्षण गुंतागुंतीच्या खेळाला सुरूवात करतो. तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? नेहमीचच तर आहे सगळं. पण सगळं दिसतं तसं नसतं हो..... मुळात त्या डॉक्टरने..., हो चक्क बर्लिनमध्ये सद्ध्या वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणारा डॉक्टर म्हणून सुविख्यात असलेल्या डॉक्टरने असे काय केलेय की त्याची गरज थेट मोस्सादला पडावी?
कट टू भुत़काळ....
साल १९६५, पुर्व बर्लिनमधला एक दिवस. रेचेल पुर्व बर्लीनमध्ये येवुन दाखल होते. इथे तिला अजुन दोन मोस्सादचे गुप्तहेर डेव्हिड पेरेट्ज आणि स्टिफन गोल्ड यांच्याबरोबर एका मोठ्या कामगिरीला यशस्वी करायचेय. आधीपासुनच बर्लिनमध्ये खोटे व्यक्तिमत्व (डु. आयडी ?) धारण करून वास्तव्यास असलेल्या डेव्हिड पेरेट्जची पत्नी म्हणून ती दाखल होते. मुल होत नसल्यामुळे तिला त्यावरील इलाजासाठी बर्लिनच्या विख्यात डॉक्टरकडून उपचार करुन घ्यायचेत. डेव्हिड तिला आपल्या मुक्कामी घेवुन येतो, जिथे तिची ओळख स्टिफनशी होते.
तरुणपणीचे रेचेल(Jessica Chastain) आणि डेव्हिड पेरेट्झ (Sam Worthington)
रेचेल आणि स्टीफन गोल्ड (Marton Csokas)
इथे स्टिफन तिला डॉक्टर वोगेलबद्दल सांगतो, त्याच्या प्रयोगाच्या काही फोटोंचे अल्बम बघायला देतो.व्होगेलने नाझी छळछावणीतील कैद्यांवर विशेषत: लहान मुलांवर केलेल्या अघोरी प्रयोगाचे ते फ़ोटो रेचेल बरोबर आपल्यालाही शहारून टाकतात.
कोण आहे हा डॉ. डिटर वोगेल?
डिटर व्होगेल (Jesper Christensen)
डॉ. डेटर वोगेल हे त्याचे चित्रपटातील नाव आहे. ते कदाचित आपल्याला नवीन असेल पण त्याचा भुतकाळ त्याला 'सर्जन ऑफ बिर्कनौ'' या नावाने गौरवतो (?) हे नाव 'सर्जन ऑफ बिर्कनौ ' आपल्यापैकी बर्याच जणांना ऐकुन माहीत असेल. विकृत आणि अविचारी हिटलरचे शुद्ध रक्ताचे प्रेम आणि अशुद्ध रक्ताबद्दलची म्हणजे यहुदी (ज्यु) आणि जिप्सी लोकांबद्दलची पराकोटीची घृणा, तिरस्कार यांनी भारलेला तो काळ होता. जर्मनी हा पुर्णपणे शुद्ध रक्ताच्या आणि सुदृढ, निरोगी माणसांचा देश असावा या विलक्षण भावनेने व्यापलेल्या हिटलरने त्या पवित्र (?) कारणावर संशोधन करण्यासाठी एका अनुवंशिकतेवर संशोधन करणार्या डॉक्टरची निवड केली होती. डॉ. जोसेफ मेंगेल. आपण हिटलरला कृरकर्मा म्हणतो पण हिटलरला कृरकर्मा ठरवताना त्या उपाधीचा खरा अधिकारी डॉ. जोसेफ मेंगेलला मात्र विसरतो. ऑशवित्झच्या छळछावणीत अनुवंशिकतेची लक्षणे आणि त्याचे परिणाम यावर संशोधन करायला म्हणून गेलेल्या जोसेफ मेंगेलची तिथली कारकिर्द प्रचंड रक्तरंजीत अशीच आहे.
डिटर वोगेलच्या (अर्थात मुळ मेंगेलच्या) काही प्रयोगांचे फ़ोटो...
असो या भागाचा विषय जोसेफ मेंगेल नाही, त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलुच....!
तर पुर्वाश्रमीचा हा कृरकर्मा सद्ध्याच्या बर्लीनमध्ये एक वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणारा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असतो. पण मोस्सादने आपल्या ज्यु वंशावर झालेल्या अत्याचाराचे, हत्याकांडाचे आरोपी शोधण्याचे काम आजही चालु ठेवलेले आहे. जगभरातुन अशी माणसे शोधून काढून त्यांना त्यांच्या दुष्कृत्याची शिक्षा द्यायची हे काम अव्याहतपणे चालू आहे. त्याच मिशन अंतर्गत रेचेल, डेव्हिड आणि स्टिफन बर्लिनमध्ये हजर असतात. डॉ. वोगेलला चक्क पळवून इजरायला नेवुन न्यायासनासमोर उभे करायचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आलेले असते. त्यानुसार रेचेल डॉक्टरला जावून भेटते. मुलाची आस असलेली एक स्त्री म्हणून त्याचे उपचारही चालु करते. अर्थात वोगेल सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. शेवटी तो तिच्यावर उपचार करायला तयार होतो. त्याचा फायदा घेवून मोस्सादचे हे तिघे एजंट त्याला पळवण्यात यशस्वी होतात. डॉ. वोगेलच्या किडनॅपींगचा हा प्रसंग खरोखर सुंदर चित्रीत झाला आहे. कुठलीही अतिशयोक्ती न करता, नायक्-नायिकेला सुपरमॅन न बनवता केवळ अक्कलहुशारीच्या जोरावर आखलेला हा किडनॅपींगचा प्लान खरोखर आपली दाद घेवुन जातो.
या किडनॅपींगच्या वेळी डॉ. व्होगेलची प्रचंड घाबरलेली पत्नी रेचेलला विचारते, "ते त्याला मारुन तर टाकणार नाहीत ना?" त्यावेळी रेचेलच्या चेहर्यावर उडालेली खळबळ एका क्षणात तिच्या अभिनयाची दाद घेवुन जाते.
पण ऐनवेळी ज्या रेलगाडीने त्याला बर्लिनच्या बाहेर घेवून जायचे असते तिथेच स्टेशनवर व्होगेलच्या धडपडीमुळे एका पोलीस अधिकार्याला संशय येतो आणि यांचा बर्लिनबाहेर पळून जाण्याचा बेत फसतो. त्यांना पुन्हा बर्लिनमध्येच, निदान पुढच्या संधीपर्यंत तरी भुमिगत आसरा घ्यावा लागतो. इथे ते तिघेही आळीपाळीने व्होगेलवर पहारा द्यायचे ठरवतात. इथुन पुढे हे मिशन फसायला सुरुवात होते.
या तिघा एजंटसपैकी 'स्टीफन गोल्ड' हा एकटाच काय तो खरोखर निर्दय आणि कर्तव्य कठोर एजंट वाटतो. त्याच्या दृष्टीने फक्त आपले काम पुर्ण करणे हीच प्राथमिकता असते. बाकी दोघे मात्र अजुनही माणुसकीच्या, भावनांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात. त्याच दरम्यान कुठेतरी नकळत रेचेल आणि डेव्हिड एकमेकात गुंतत जातात. कित्येक वर्षे नाझी छळछावण्यांवर काम केलेला डॉ. व्होगेल, रेचेल आणि डेव्हिडची ही अवस्था बरोबर हेरतो आणि त्याच्यावर मानसिकदृष्ट्या दबाव वाढवायचा प्रयत्न करायला लागतो.
(रेचेल आणि व्होगेल)
परीणाम....?
स्टीफन आपली शक्ती आणि अधिकार वापरून पद्धतशीरपणे डेव्हिडचा काटा काढतो. रेचेलला भेटुन परत जात असताना एका रोड अॅक्सीडेंटमध्ये डेव्हिड मारला जातो. आता पाळी रेचेलची असते...
व्होगेलला मारल्याबद्दल गेली ३० वर्षे तिने इजरायलमधे प्रचंड मान सन्मान आणि प्रसिद्धी उपभोगलेली असते. तेव्हा आता स्वतःला व्होगेल म्हणवून घेणार्या त्या म्हातार्या गृहस्थाचा शोध घेणे आणि तो जर खरोखरच डॉ. डिटर व्होगेल असेल तर त्याला संपवणे हे तिचे कर्तव्य असते. किंबहुना तिचे ते इजरायल आणि मोस्सादप्रती 'एक देणे'च असते. The Debt !
Rachel has been taking credit for killing Vogel for 30 years. She is the one who must now actually kill him. She owes “The Debt” because she took credit for something that she didn’t do. Now she must pay that Debt by killing Dieter Vogel.
पण त्यावेळची तरुण रेचेल आता ३० वर्षाने वृद्ध झालेली असते. पुढे काय होते? पन्नाशीतली रेचेल जेव्हा त्या नर्सिंग होममध्ये पोचते तेव्हा तिच्या लक्षात येते की हा गृहस्थ डेटर व्होगेल नसुन त्याचा तोतया आहे. त्यामुळी ती त्याला न मारताच परत फिरते. इथे मृत्युशय्येवर असलेल्या त्या तोतयाच्या सलाईनच्या बाटलीला विषाचे इंजेक्शन टोचताना मनातील कर्तव्य आणि सदसदविवेकबुद्धी या दोन भावनांचे प्रभावी द्वंद्व अभिनेत्री ’हेलेन मिरेन’ अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते.
कर्तव्य आणि विवेक यांच्या कात्रीत अडकलेली रेचेल
विशाल कुलकर्णी
वाचन
3642
प्रतिक्रिया
0