Skip to main content

सोबत ... : अंतीम भाग

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
थांब सुन्या.....! मी तुझ्याशी थोडं खोटं बोललोय ! मी तुला इथे वाघ बघायला नाही आणलय. इथे येण्याचं कारण काही वेगळं आहे. खरेतर मला कुणाचीतरी सोबत हवी होती कारण इथे एकट्याने यायची माझी हिंमत नव्हती, माझ्याकडे तेवढे धाडस नव्हते." सोबत भाग १ आता पुढे ... ****************** पक्या नरमाईच्या सुरात बोलला. तसा सुन्या थबकला.... "पॅक्स, आर यु क्रेझी? एकतर गेले दोन दिवस सॉरी दोन दिवस आणि एक रात्र मी तुझ्याबरोबर इथे सडतोय तो फडतुस वाघ बघण्यासाठी. साल्या काल शुक्रवार, २२ तारीख ना, बिप्सची नवीन मुव्ही रिलीज होणार होती. तुझ्यामुळे मी माझा फर्स्ट डे. फर्स्ट शो चुकवला आणि आता तू मला सांगतोयस की इथे आपण वाघ पाहण्यासाठी आलोच नाहीये. तू त्या देसुशी बोलत होतास त्या कुठल्यातरी अगम्य भाषेत तेव्हाच खरेतर मला संशय यायला हवा होता काहीतरी शिजतय म्हणून. पण........" "ते सोड, मला एक सांग पक्या, तू माझ्याशी खोटं का बोललास? जर वाघ नाही बघायचाय तर इथे आपण का सडतोय गेले दोन दिवस?" "सुन्या, खरे सांगायचे तर मला एक स्वप्न पडतेय गेले महिनाभर. त्या स्वप्नात..........." पक्या दबक्या आवाजात बोलत होता... "एक, एक मिनीट पक्या, तूला कुठलंतरी एक टिनपाट स्वप्न पडलं आणि त्यासाठी तू मला इथे घेवुन आलास, काहीही कारण नसताना." सुन्याने आता पक्याला फटके द्यायचेच काय ते बाकी ठेवले होते. "सुन्या, तू माझे पुर्ण म्हणणे ऐकुन घेणार आहेस का? लेट मी कंप्लीट फर्स्ट, मग काय घालायच्या त्या शिव्या घाल्.....ओके?" पक्याने अक्षरशः हात जोडले तसा सुन्या नरमला. "तसं नाही बे, पण तू खोटं बोललास ना म्हणुन सालं पेटलो मी. तू खरं कारण सांगुन चल म्हटला असतास तरी मी आलो असतो यार....!" "मला खात्री आहे, तू नक्की आला असतास. पण मग हजार प्रश्न विचारले असतेस आणि माझ्याकडे तर तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. काय सांगणार होतो मी तुला. माझा ८-९ महिन्यापुर्वी गायब झालेला एक ट्रेकर मित्र माझ्या स्वप्नात येतो. कुठल्यातरी एका घनदाट जंगलात, एका मचाणावर बसुन तो मला हाका मारतो.... "प्रकाश, हेल्प मी ! वाचव मला म्हणुन !! आणि त्याला वाचवायला म्हणुन मी अशा जागी तुला बरोबर घेतोय जिथे तो नक्की असेलच याची मलाही खात्री नाहीये. काय स्पष्टीकरण देणार होतो मी? " पक्या बोलत होता. सुन्याने पुढे होवुन त्याच्या खांद्यावर थाप मारली. "ठिक आहे यार ! पण आता मला सांग कुणाबद्दल बोलतोयस तू. आणि या जागेबद्दल कसे काय कळाले तुला?" पक्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला लागला. "या सगळ्याला साधारण एक महिन्यापुर्वी सुरुवात झाली. मला रोज रात्री एक ठराविक स्वप्न पडत होते. त्यात एक जंगल दिसायचे, जंगलात एक जनावरांची पाणी प्यायची जागा दिसायची. हळु हळू जंगलाची भयानकता जाणवायला लागली. आधी हिरवेगार दिसणारे जंगल आता काळ्या रंगात परावर्तीत होवु लागले होते. सुरुवातीला ही स्वप्ने म्युट , नि:शब्द असायची. नंतर मग जंगलातले आवाज जाणवायला लागले. घनदाट जंगलातील काळी कुट्ट रात्र, मधुनच एखादा काजवा चमकुन त्या भयावहतेत अजुनच भर घालतोय. रात किड्यांच्या किरकिरण्याचा आवाज. जंगलातल्या विविध प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज. रात्रीच्या भयाण शांततेत सलगपणे चालणारी वार्‍याची मंद सळसळ अंगावर काटा आणायची. मधुनच पायाखालचा पाचोळा कुरकुरण्याचे आवाज ! काही दिवसानंतर हळु हळु असे भास व्हायला लागले की मी स्वतः त्या जंगलात अडकलो आहे. बाहेर यायचा रस्ताच सापडत नाहीये........!" सुन्या सावरुन बसला होता. " पुढे काय झालं आणि तुझा कोण तो हरवलेला ट्रेकर मित्र, मला कसा माहीत नाही? " "तूला माहीतेय तो सुन्या, तूही ओळखतोस त्याला चांगलाच......! गिरीश गायकवाड आठवतो?" "न आठवायला काय झालं, पण गिर्‍या सद्ध्या सौदीत आहे ना?" सुन्याने चमकुन विचारलं. "मी पण असेच समजत होतो इतके दिवस. कारण त्याने मला तसेच सांगितले होते. तुला आठवते आपण शेवटचे भेटलो होतो गिर्‍याला?" "न आठवायला काय झालं. माहिमचा पास्कलचा बार, तिथली गिर्‍याची ती भन्नाट पार्टी, दारुचा महापूर आणि हाय.... ती बिजलीसारखी नाचणारी चंचल बाला, 'नफिसा' ........ कैसे भुल सकता हु यार?" सुन्या त्या आठवणींनी कळवळला. "येस, तीच पार्टी. त्यानंतर गिर्‍या आपल्याला भेटलाच नाही कधी. मीही समजत राहीलो की तो सौदीला गेला. पण...... "एनी वेज, बॅक टू जंगल...., नंतर हळु हळू त्या जंगलातले चित्र्-विचित्र आवाज जाणवायला लागले. स्वप्नात जंगलातली ती काळीकुट्ट रात्र यायची. मग......, तो पाणवठा...., पाणवठ्यावर पाणी प्यायला येणारे प्राणी...., खरेतर येणारे प्राणी कसे म्हणू? मला फक्त एकच प्राणी दिसायचा तिथे....., अंगावर सोनेरी पिवळसर रंगावर काळे ठिपके मिरवणारा जंगलचा राजा.... वाघ ! मी एका झाडाआड लपलेलो असायचो. वाघ पाणी प्यायला म्हणुन तिथे पाणवठ्यावर यायचा..... त्या पाणवठ्याकडे जाता जाता सावकाश वळुन मी लपलेल्या झाडाकडे बघायचा. जणुकाही माझं अस्तित्व त्याला जाणवलं असावं. माझ्या रक्ताचं पाणी पाणी व्हायचं. सगळ्या अंगाला घाम फुटायचा. मी घाबरुन पळायच्या बेतात .... आणि स्वप्न संपून मी जागा व्हायचो !" "कम क्विक, पक्या... पाल्हाळ लावु नकोस ! गिर्‍या..., गिर्‍या.......(?) तो कुठे येतो या प्रकरणात?" "हळु हळु स्वप्नाचा पल्ला वाढायला लागला होता. तो वाघ मी लपलेल्या झाडाकडे बघत बघत पाणवठ्याकडे जात असायचा. मध्येच त्याचे ते तिक्ष्ण सुळे चमकायचे. माझा जीव अर्धा झालेला असायचा. आणि त्यात एके दिवशी मी ते ऐकलं........ आधी तर मला ते नीट ऐकुच आलं नाही. पण दोन तीन वेळा तेच स्वप्न रिपीट झाल्यावर लक्षात आलं की तो कुजबुजल्या सारखा आवाज त्या झाडावरुन येतोय ज्याच्या मागे मी लपलेला होतो. मी कुतुहलाने वर बघितलं तर वर झाडावर एक लाकडी , जंगलाच्या वेलींनी बांधलेलं मचाण होतं. त्या मचाणावरुन कुणीतरी दबक्या स्वरात मला हाक मारत होतं. मी थोडं वर चढुन बघीतलं....तर.... त्या मचाणावर गिर्‍या बसलेला होता. "पॅक्स, मी गिरीश, ओळखलंस मला?" तो माझ्याशी बोलला.... पण खरे सागायचे तर मी त्याला ओळखलाच नाही क्षणभर. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झालेल्या, केस वाढलेले. सगळे अंग रक्ताने माखलेले अशा अवस्थेत गिर्‍या मला हाका मारत होता... "प्रकाश, मी इथे गेले कित्येक दिवस अगदी एकटा आहे रे. प्रचंड भीती वाटतेय. कसलीच सोबत नाहीये. मला वाचव प्रकाश......, मला या एकटेपणाची खुप भीती वाटतेय...." एकदम मी ज्या फांदीवर उभा होतो ती फांदी तुटली आणि मी धपकन खाली पडलो. जागा झालो तेव्हा पलंगावरुन खाली पडलेलो होतो. सुन्या का कोण जाणे पण मला अजुनही असं वाटतय की गिर्‍या जिवंत आहे. तो मला मदतीसाठी बोलवतोय. ते म्हणतात ना की तुमची जगण्याची इच्छा, जिवनाबद्दलची आसक्ती जर खुप तिव्र असेल तर ती मानसिक पातळीवर तुम्हाला इतरांशी संपर्क साधायची शक्ती प्राप्त करुन देते. आणि गिर्‍याचे तर भविष्याबद्दल किती सॉलीड प्लान्स आहेत. तुला आठवतं ना, तो नेहमी भरभरून बोलायचा...., काही वर्षे तिकडे पैसा कमवुन परत यायचं. मग स्वतःचा व्यवसाय, घर, गाडी ! शक्यता आहे की त्याची ही जिवनेच्छाच त्याच्या संकटाबद्दलची माहिती अशा पद्धतीने माझ्यापर्यंत पोचवत असेल. दिवा विझायला लागला की त्याची झळाळी अचानक वाढते. मे बी गिर्‍या नसेलही जिवंत कारण हि स्वप्ने सुरू होवून महिन्याच्यावर कालावधी होवुन गेलाय. पण यदाकदाचित जर तो असेलच तर मला एक संधी घेणे किंवा गिर्‍यासाठी म्हणुन एक संधी देणे भागच आहे ना रे..... म्हणुनच मग मी त्या स्वप्नात दिसलेल्या जंगलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळी पुस्तके चाळली, जुने ग्रंथ चाळले, इंटरनेटवर खंगाळून पाहीले. जिथे जिथे म्हणुन जंगलांबद्दल माहिती मिळायची शक्यता होती अर्थात फोटोसकट, ती शोधुन पाहीली आणि सुदैवाने जगप्रसिद्ध शिकारी लालु दुर्वे यांच्या एका पुस्तकात मला ते जंगल, तो पाणवठा दिसला........., त्या मचाणासहीत होता तो फोटो! मी स्वप्नात बघितलेल्या मचाणाचा फोटो. आय वाज शॉक्ड बट हॅप्पी ऑल्सो! त्यानंतर एकदा मी इथे येवुन पण गेलो, पण मला ते मचाण, तो पाणवठा सापडला नाही. गेल्या महिन्यात चार्-पाच दिवस अन्न्-पाण्याशिवाय या जंगलात भटकत होतो मी. तेव्हा या देसुनेच वाचवलं मला. त्यांनेच पुन्हा मनुष्यवस्तीत आणुन सोडलं.......... पण स्वप्नांनी माझा पिच्छा सोडला नव्हता. पुन्हा पुन्हा गिर्‍या स्वप्नात यायचा आणि मदतीची याचना करायचा. मग मी पुर्ण तयारीनिशी परत यायचं ठरवलं. आणि तुला घेवुन इथे येवुन पोहोचलो." पक्याने एक निश्वास सोडला "अरे पण मग मला सगळे सांगितले असते तर काय झाले असते." सुन्या थोडा समजुतीच्या सुरात म्हणाला. "सोड ना यार, पुढे काय करायचं ते ठरवु या का?" "अर्थात आता इथपर्यंत आलोच आहोत तर आजची रात्र अजुन वाट पाहू या. पण मला एक कळत नाही गिर्‍या जर जिवंत असेलच तर तो इथुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल ना की इथे मचाणावर बसुन राहील. मग आपण त्याला जंगलात इतरत्र शोधायच्या ऐवजी इथे मचाणावर काय करतोय? अर्थात त्याला दिवसभर शोधुन झालेय पण एवढ्या विस्तारलेल्या जंगलात आपण दोघेच काय शोध घेणार?" "सुन्या, तू विसरतो आहेस. मला अगदी शेवटपर्यंत हे मचाण आणि मचाणावर बसलेला गिर्‍या दिसत होता. पण जेव्हा मी इथे शोधलं तेव्हा हे मचाणच काय हा पाणवठापण मला दिसला नाही. यावेळेस जेव्हा देसुला पटवण्यात यश आले तेव्हा त्याने या जागेपर्यंत पोचवले. तुला आठवतं देसुने काय सांगितलं होतं..... "काहीही झालं तरी या मचाणावरून उतरायचं नाही. हि एकच जागा सुरक्षीत आहे. त्याच्या कुठल्यातरी भगताने की देवऋष्याने मंत्रीत केलेली आहे." छोड यार, मुर्खपणा आहे सगळा. असलं काही नसतं. " सुन्या प्रामाणिकपणे म्हणाला. "अ‍ॅग्रीड, पुर्णपणॅ मान्य ! पण मग स्वप्नात कायम हे मचाण आणि हा पाणवठा येण्याचे कारण काय? जे मी कधीही बघितलेले नव्हते, अगदी चित्रात सुद्धा ती जागा माझ्या मित्रासकट माझ्या स्वप्नात येते. काही काळानंतर ती जागा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे हे देखील सिद्ध होते, म्हणजे जर मला स्वप्नात दिसणारी ती जागा जर अस्तित्वात असेल तर त्या मचाणावर दिसलेला आणि परवापर्यंत दिसणारा गिर्‍यादेखील अजुनही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित या जागेचा वापर गिर्‍या रात्रीच्या मुक्कामासाठी करत असेल कारण येथुन पाणवठा जवळ आहे. दिवसा जंगलाबाहेर पडणारा रस्ता शोधणे आणि रात्री इथे मुक्कामाला असा गिर्‍याचा इथला कार्यक्रम असु शकतो. काल ज्या रस्त्यावरुन आपण आलो..... उद्या सकाळी जर देसु आपल्याला न्यायला नाही आला तर तुला वाटते आपण रस्ता शोधु शकु परत जायचा?" पक्या खुपच गंभीर झाला होता. "डोंट वरी यार, माझ्याकडे कंपास आहे. ते आपल्याला दिशा दाखवेल नक्की. त्याची काळजी करु नको तू. आणि येताना मी गपचुप सगळ्या रस्त्याने काही ठराविक खुणा करत आलोय, जेणेकरुन परतीचा रस्ता सापडणे सोपे जावे. सो तो देसु आपल्याला न्यायला येवो न येवो. मी माझ्या हँडीकॅमवर पुर्ण रस्ता जवळजवळ शुट केलाय. डोंट वरी अबाऊट दॅट! " सुन्याने डोळे मिचकावत सांगितले. "ग्रेट, हे काम चांगले केलेस तू. पण कंपासवर अवलंबुन राहु नकोस, ते तुझी काहीही मदत करु शकणार नाहीये." पक्या गंभीरपणे बोलला. "कम ऑन पक्या, तु एक जातीवंत ट्रेकर असुन असे बोलावेस. अशा ठिकाणी कंपास हाच सगळ्यात चांगला वाटाड्या असतो मित्रा, फक्त तो तुम्हाला वापरता यायला हवा." "अस्सं, काढ बर तुझा कंपास बाहेर आणि सांग मला कुठली ट्रु नॉर्थ आहे ते?" सुन्याने बॅगेतले होकायंत्र बाहेर काढले, तळहातावर धरुन त्याकडे नजर टाकली आणि चमकलाच................. होकायंत्राची सुई ३६० अंशात गरागरा फिरत होती, एखाद्या चक्रासारखी ! सुन्या वेड्यासारखा एकदा त्या भिरभिरणार्‍या सुइकडे तर एकदा पक्याकडे पाहात राहीला. "आयल्ला, ही काय भानगड आहे बे?" "आत्ता कळलं, मी त्याचा काही उपयोग होणार नाही असं म्हटलं ते? मी मागच्यावेळी हा अनुभव घेतलाय सुन्या. खरेतर तुला नाऊमेद करायचा बिलकुल हेतु नाहीये पण.....! माफ कर यार, मी तुला बरोबर आणायलाच नको होतं, विनाकारण माझ्याबरोबर मी तुझाही जीव धोक्यात घातलाय." पक्या विलक्षण बेचैन झाला होता. "कानफाट फोडीन साल्या. आजची मैत्री आहे का आपली? खरेतर तू मला आणले नसते तर मला राग आला असता. माझा मित्र इथे प्राणाशी खेळतोय आणि मी तिथे मस्त चिल्ड बिअर मारतोय. साल्या शरमेने आत्महत्या करायची वेळ आली असती माझ्यावर. पुन्हा काहीतरी मुर्खासारखे बोलू नकोस." "सॉरी मित्रा, पण मला खरेच माझे चुकल्यासारखे वाटतेय." पक्याच्या आवाजात एक प्रकारचा कंप होता. त्यामुळे लीड घेण्याची पाळी आता सुन्याची होती. एकदम त्याला काहीतरी आठवले आणि त्याने बॅगेतुन आपला हँडीकॅम बाहेर काढला. "काय करतोयस तू? एवढ्या अंधारात काही रेकॉर्ड करणे मला तरी कठीणच वाटतेय सुन्या.................. "शुSSS...., सुन्याने तोंडावर बोट ठेवले. थांब जरा मला एक शंका आलीय.....!" कॅमेर्‍यात पाहता पाहता सुन्याने चेहरा वर केला आणि डोळे मिचकावले.... "आता माझ्या शंकावर काही कोटी करु नकोस..!" पक्या हसला, "नाही रे, आता कोट्या करायची मनस्थितीच उरलेली नाहीये बे !" सुन्या अतिशय व्यग्र चेहर्‍याने आपल्या हॅंडीकॅममध्ये काहीतरी शोधत होता. पक्या त्याच्याकडे बघत होता. जसजसा वेळ जायला लागल तसतसा सुन्याच्या चेहर्‍याचा रंग बदलायला लागला होता. शेवटी जेव्हा सुन्याने कॅममधुन आपले डोके बाहेर काढले तेव्हा त्याचा चेहरा अतिशय गंभीर झाला होता. "पक्या..... वाईट बातमी ! कालपासुन आपण जे जे शुट केले या कॅमेर्‍याने ते सगळे आहे इथे. फक्त एक क्लिप गायब आहे. इथपर्यंत येताना आपण वापरलेल्या रस्त्याचे शुटींग केले होते मी. नेमकी तीच क्लिप गायब आहे डिस्कवरुन. हे मात्र धक्कादायक आहे मित्रा! त्या आधीच्या क्लिप्स आहेत, नंतरच्या आहेत फक्त ती एकच क्लिप गायब. मला पक्के आठवतेय मी ती नक्की स्टोअर केली होती आणि आत्तापर्यंत मी काहीही डिलीट केलेले नाहीये डिस्कवरुन." सुन्याचा आवाज आता खुप व्रेगळा वाटत होता. "मला माहीत होतं असं काहीतरी होणार म्हणुन. इनफॅक्ट मला खात्री आहे सुन्या, तू येताना झाडांवर केलेल्या खुणादेखील आता त्या जागेवर नसतील. कारण हा अनुभव मी पुर्वी घेतलेला आहे." पक्याने एक थंड निश्वास सोडला. "याचा अर्थ असा की आता आपल्याला पुर्णपणे आपल्या स्मरणशक्तीवरच अवलंबुन राहावे लागणार आहे तर." इति सुन्या... "तिचाही फारसा उपयोग होइल असे वाटत नाही सुन्या." "कमॉन पक्या, तू फारच निराश झालेला दिसतोयस यार. डोंट वरी यार, आपण काहीतरी मार्ग काढू यातून." इतक्यात आसमंतात एक वाघाची डरकाळी घुमली. तसे दोघेही सावध झाले. "पक्या, ज्यासाठी आलोय ती वेळ आता जवळ आल्यासारखी वाटतेय. गिर्‍या मिळो ना मिळो वाघ मात्र बघायला मिळणार बहुदा." सुन्या हसुन म्हणाला. "यार कधीतरी गंभीर हो...!" इति पक्या तेवढ्यात त्यांच्या मचाणाच्या झाडापासुन साधारण १००-१५० मिटरवर असलेल्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकु आली. त्या जाळीतून येणारा गुरगुरणारा आवाज तिथे वाघाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता. जाळी थोडा वेळ खसफसली आणि थोडावेळाने त्यातुन काहीतरी बाहेर आलं. बाहेर आलेल्या त्या प्राण्याकडे बघितल्यावर मात्र दोघेही प्रचंड चमकले. त्या प्राण्याला माणसाप्रमाणे दोन हात, दोन पाय होते. हातापायाची नखे वाढलेली. एखाद्या आदिमानवासारखा दिसत असला तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे केस मात्र तेवढे वाढलेले नव्हते. अंगावर काही झाडांच्या पानांपासुन बनवलेले वस्त्र पांघरलेले. तो स्वतःदेखील दबकत दबकत , इकडे तिकडे बघत पाण्याकडे सरकत होता. तो झाडाच्या आणखी जवळ आला.....! तो अगदी दृष्टीच्या टप्प्यात येवुन पोचला आणि पक्या जवळ जवळ ओरडलाच. गिर्‍या.........! ***************************************** सुन्या शुंभासारखा बघतच राहीला. त्या प्राण्याला गिर्‍या कसे म्हणावे हाच मोठा प्रश्न होता. कारण सुन्याच्या डोळ्यासमोर अजुनही तो हसतमुख, देखणा गिरीशच होता. पण कटु असले तरी सत्य होते ते. तो गिर्‍याच होता. अतिशय वाईट अवस्थेत असला तरी गिर्‍याच होता. पक्याचा आवाज ऐकला आणि चमकुन त्याने वर बघितले. या दोघांना बघुन आधी त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. पण ते सत्य आहे हे लक्षात आल्यावर त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या. "तू खरोख आलास पॅक्स ? मला वाचवायला, माझी मदत करायला. माझा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नाहीये मित्रा. तुम्ही दोघे माझ्यासाठी इथवर आलात. मी इथे सारखा तुझीच आठवण काढतोय. पण ...., पण तुम्हाला कळले कसे मी इथे अडकलोय म्हणुन?" गिर्‍याच्या आवाजात प्रचंड आश्चर्य होते. "गिर्‍या तुझ्या इच्छाशक्तीने आम्हाला इथवर खेचुन आणले रे. तुझं ते बोलावणं माझ्यापर्यंत पोचलं म्हणुन तर इथपर्यंत येवु शकलो आम्ही." पक्याने त्याला थोडक्यात आपल्या स्वप्नांची कहाणी ऐकवली. तसा गिर्‍या सदगदित होवुन त्यांच्याकडे बघायला लागला. "केवळ स्वप्नावर विश्वास ठेवुन तूम्ही माझा शोध घेत इथपर्यंत आलात? तुमचे हे उपकार मी कसे फेडु मित्रांनो. आज प्रचंड आनंद झालाय मला. इथे खुप एकटेपणा जाणवत होता रे. प्रत्येक रात्र मी अक्षरशः जीव मुठीत धरुन काढलीय गेले काही महिने. प्रचंड भीती वाटायची. पण दुसरा पर्यायच नव्हता. आता तुम्हीपण आलात. आपण तिघे झालो. खुप आनंद झालाय रे मला." सुन्याला त्याचं बोलणं काहीसं विचित्र वाटलं. पण ते बोलण्याची हि वेळ नव्हती. "पण तु इथे कसा काय आलास गिर्‍या?" "वाघ बघायला म्हणुन आलो होतो आणि वाघच काळ झाला आमचा!" गिर्‍याने एक थंड सुस्कारा सोडला. "आमचा......? आणखी कोण आहे तुझ्याबरोबर?" "आहे नाही होते म्हण. दोघे मित्र होते. पण ते सुटले बिचारे." "म्हणजे?" "सोड ना, नंतर सांगेन सगळं सविस्तर आधी इथुन चला. चला...लवकर उतरा त्या मचाणावरुन. नाहीतर उशीर होइल. थोड्याच वेळात दोन वाजतील आणि मग त्याची यायची वेळ येइल." पक्या घाई-घाईत मचाणावरुन उतरायला लागला. तसे सुन्याने त्याला अडवले... "थांब पक्या, आठवतं देसुने काय सांगितले होते ते. काहीही झाले तरी रात्रीच्या वेळी मचाणावरुन उतरायचे नाही, काहीही. तु एक काम कर ना गिर्‍या, तु पण ये वरच. उद्या सकाळी उअतरुन जाऊ आपण." "अहं तोपर्यंत खुप उशीर झालेला असेल. खुप उशीर! चला, लवकर उतरा आणि इथुन शक्य तितके दुर चला नाहीतर तो येइल इतक्यात. " गिर्‍या खुपच घाबराघुबरा झाला होता. "तो म्हणजे...?" सुन्याने साशंक आवाजात विचारले. "तो म्हणजे वाघ, खरेतर तो एक चित्ता आहे. झाडावर देखील चढता येते त्याला. आणि ज्या मचाणावर तुम्ही बसलाय ना ती त्या आदिवासींची बळी द्यायची जागा आहे. तो साला, देसु....., आम्हालाही त्यानेच इथेच बसायला सांगितले होते. त्या रात्री चित्त्याने हल्ला केला आणि...... ते दोघे सुटले बिचारे कायमचे आणि मी मात्र अडकलो इथे. चला लवकर दुर चला इथुन." गिर्‍या खुपच घाई करायला लागला तसा पक्या सरसर झाडावरुन खाली उतरला. "चल बे सुन्या, मघापर्यंत तुझा तसल्या गोष्टीवर विश्वास नव्हता आणि आता गिर्‍या समोर दिसतोय, ज्यासाठी इथवर आलो ते कार्य सिद्ध झालेय तर तु त्या गोष्टी करतोयस." शेवटी नाईलाजानेच सुन्यापण खाली उतरला. पण त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह कायम होते. "गिर्‍या... एक सांग, तू एवढ्या रात्री एखाद्या सुरक्षीत ठिकाणी थांबायचे तर इथे तुझ्यामते या धोक्याच्या असलेल्या जागी काय करतोयस?" गिर्‍याच्या ऐवजी पक्यानेच उत्तर दिले.... "चल बे सुन्या आता गपचुप. उगाचच फाटे फोडु नकोस." गिर्‍या पुढे आणि दोघे त्याच्या मागे चालु लागले. गिर्‍या जंगलात अजुन आत चालला होता. म्हणुन पक्याने विचारले... "गिर्‍या, आत कुठे चाललास अजुन? बाहेर पडायचा रस्ता तिकडे आहे." "हो, पण त्या रस्त्यावर ते आदिवासी वाट बघत असतील आपली. हा चित्ता त्यांच्या वस्तीवरची माणसे पळवायचा म्हणुन ते बाहेरुन कुणी आले की सरळ सरळ त्याला बळी म्हणुन या मचाणावर पाठवतात. चित्ता इथे पाणी प्यायला म्हणुन आला की त्याला मानवी शरीराचा गंध येतो आणि तो हल्ला करुन त्यांना मारुन टाकतो. आमच्यावरदेखील त्यानेच हल्ला केला होता. माझे दोन्ही मित्र कायमचे सुटले.....! मी मात्र इथे अडकलो....... बोलता बोलता गिर्‍या एका दाट, माणसाच्या उंचीएवढ्या झुडपात शिरला. सुन्या आणि पक्या दोघेही त्याच्या मागोमाग आत शिरले. आत शिरताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आत एक प्रशस्त गुहाच होती. एका झुडपामागे एवढी मोठी गुहा? दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. "मी इथे राहतो.....!" त्यांच्याकडे वळत गिर्‍या म्हणाला........., "आणि हि इथे पडलेली हाडे.........!" सुन्याने साशंक स्वरात विचारले तशी गिर्‍याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. त्याचे डोळे एका वेगळ्याच तेजाने चमकायला लागले. "खरं सांगु? ती हाडं आहेत्...माणसांची...! मी खाल्लेल्या माणसांची. त्यात काही आदिवासी असतील, त्यात तुमच्यासारखी बाहेरुन वाघ बघायला येणारी माणसे असतील. त्यात..... त्यात तुमचा 'गिर्‍या' पण असेल......!" "गिर्‍या पण असेल? म्हणजे तुला काय म्हणायचेय? तु गिर्‍या नाहीस? तर तु कोण आहेस मग......?" गिर्‍या बोलायला लागला. पण आता त्याची भाषा काहीशी विचित्र होती. सुन्याला काहीच कळेना. हि भाषा कुठेतरी ऐकली असल्याची ओझरती जाणीव मात्र झाली. पण पक्याला मात्र ती भाषा खुप चांगल्या पद्धतीने कळत होती. "ज्याला तुम्ही बघायला आला होतात... तोच ! तो या जंगलातला कुप्रसिद्ध वाघ. असे आश्चर्याने बघु नका. मी "डेका" आहे, डेका बिरसा. देसुचा मुलगा ! काही वर्षापुर्वी त्या आदिवाश्यांनी मला या जंगलात घेरुन, जाळुन मारले होते. त्यांच्या मते मी एक चेटक्या होतो. ठिक आहे, मला होत्या अवगत काळ्या जादु. माझ्या बापाकडुनच शिकलो होतो मी. पण तो मुर्ख एवढ्या प्रचंड शक्तीचा उपयोग म्हणे त्या मुर्ख आदिवास्यांच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी करायचा. मी त्यांचा उपयोग आणखी ताकद मिळवण्यासाठी केला. काही आदिवास्यांना तिथेच त्या मचाणापाशी बळी दिले सैतानाला. मला अजुन शक्ती हव्या होत्या. शेवटी एक दिवस सगळे उघडकीला आल्यावर त्यांनी मला पकडुन जाळुन मारले. तिथे त्याच मचाणापाशी ! पण त्या मुर्खांना कुठे माहीत आहे. देह हे माझ्यासाठी केवल एक माध्यम आहे. हा नाही तर तो. मग मी या चित्त्याच्या शरीरात शिरलो. माझी साधना चालु ठेवली. एकुण दहा शेकडा बळी द्यायचेत सैतानाला. त्यानंतर माझा धनी मला सर्वशक्तीमान बनवेल. मग मी या समस्त जगावर राज्य करेन. पण माझ्या या साधनेत माझा मुर्ख बापच सर्वात मोठा अडथळा आहे. आणि अजुनतरी त्याच्याशी झुंझ घेण्याची माझ्यात शक्ती नाही. त्याने माझे साधनास्थळ, ते मचाणच अभिमंत्रीत करुन माझ्यासाठी बंद केले. त्याला वाटले ती जागा बंदीस्त केली की मीही बांधला जाईन. त्याने तुम्हाला बरोबरच सांगितले होते, मचाणावरुन खाली उतरु नका कारण त्याला माहीत आहे आता मी त्या मचाणावर चढु शकत नाही. पण तो मुर्ख माझा बाप आहे. अजुनही माझ्याबद्दल कुठेतरी, त्याच्या मनात प्रेम आहे. त्यामुळे अजुन त्याने मला संपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मग मचाण नाही म्हटल्यावर मी दुसरे साधनास्थळ तयार केले. आता माझ्या बळींना मी इथे घेवुन येतो. तुमच्या मित्राला देखील इथेच बळी दिला मी. त्याचे ते दोन मित्र शहाणे ठरले. त्यांनी देसुचे ऐकले व मचाणावरुन उतरलेच नाहीत. त्यामुळे वाचले आणि माझ्ज्या तावडीतुन सुटले. हा मुर्ख मात्र खाली उतरला , एक गरीब आदिवासी त्याच्यासमोर तडफडुन मरताना बघवला नाही त्याला. त्याची मदत करायला म्हणुन खाली उतरला आणि फसला. वेगवेगळी रुपे घेण्यात माझा हातखंडा आहे. आता तुमची पाळी. तुमचा नंबर आठ शेकडा आणि १०,११ ! अजुन खुप बळी शोधायचेत मला. जेव्हा तुमचा मित्र सापडला तेव्हा त्याच्या विचारांमार्फत मी या मुर्ख पक्यापर्यंत पोचलो. हा मुर्ख, भावुक माणुस आपल्या मित्राचा शोध घ्यायला म्हणुन इथपर्यंत आला आणि येताना तुलाही बरोबर घेवुन आला. चला तयार व्हा, आपल्या मित्राला सोबत करायला आलात ना! माझ्या मुर्ख बापाचा देसुचा विचार बदलायच्या, त्याचे रुपांतर एका कर्तव्यनिष्ठ मानवहितचिंतकात व्हायच्या आत आत मला माझे बळी पुर्ण करायचेत. तयार व्हा........." पक्या गर्भगळीत होवून त्याच्याकडे बघत होता. तर सुन्याला काहीच कळालेले नव्हते. एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आलेली होती.... "आपल्या आयुष्याचा हा शेवट आहे." त्याने पक्याला कडकडुन मिठी मारली. "आत्तापर्यंत प्रत्येक सुख्-दु:खात एकत्र राहीलोय, आता मरणही एकत्र पत्करु मित्रा." पक्याने आपले बाहु त्यांच्या खांद्यावर टाकले आणि आपली मिठी घट्ट केली. हळुहळु समोर उभा असलेला गिर्‍या धुक्यात विरघळुन गेला, आता त्याच्या जागी एक चित्ता उभा होता. जिभल्या चाटणारा, हे मोठे मोठे सुळे बाहेर आलेला, आपल्या बळींची वाट पाहात उभा असलेला चित्ता. कुठल्यातरी कोपर्‍यातुन, त्या धुसर धुक्यातुन पुन्हा एकदा डेकाचा आवाज आला. "ज्याला तुम्ही पाहताय तो मी नाही. तो माझा धनी आहे. माझा सर्वशक्तीमान धनी! सैतान..........!!" एक प्रचंड डऱकाळी फोडत त्या चित्त्याने आपल्या सावजांवर झेप घेतली.................... ***************************************** देसुने आपल्या हातातली दोन हाडे दारावरच्या खोबणीत खोचुन टाकली. तो मनाशी काहीतरी पुटपुटला. पक्या असता तर त्याला त्याचे पुटपुटणे बरोबर कळाले असते.... ८१०, ८११ ! आता फक्त १८९ राहीले. लवकरच काहीतरी करायला हवे. काहीही करुन डेकाला रोखायलाच हवे. आत्ता बस्स झाले ! एक मात्र नक्की आता गिर्‍याला कधीच एकटेपणा जाणवणार नव्हता. त्याला पक्या आणि सुन्याची सोबत होती ना आता. खंत इतकीच, या सगळ्या मागचे रहस्य, आपल्या मृत्युचे कारण जे पक्याला कळाले ते गिर्‍या आणि सुन्याला कधीच कळणार नव्हते ! समाप्त विशाल कुलकर्णी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3283
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कथा भारीच आहे. अजून नक्की लिही पुढचे भाग. पार डेली सोप केला नाहीस तरी ब्योमकेशसारखी थोड्या भागांची नक्कीच करू शकतोस. नोटः ह्या भागाचा शेवट नेहेमीप्रमाणे 'क्रमशः' ने न होता 'समाप्त' ने झाला म्हणून जास्तच आनंद झाला :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्रत्येक वेळी दुष्टावर सुष्टांची जीत होते वगैरे भाबड्या अंधश्रद्धा बाळगायचे दिवस गेले रे बापू ;)

अरेरे! मस्त जमलीय कथा. पण का कुणास ठाऊक, मला दुख्खांत नाही आवडत जास्त.

छान! मस्त जमलीय कथा. पण का कुणास ठाऊक, मला दुख्खांत नाही आवडत जास्त.