Skip to main content

सबनीस जिंकले, रसिक हरले!!

सबनीस जिंकले, रसिक हरले!!

Published on 22/11/2015 - 18:12 प्रकाशित मुखपृष्ठ
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये. तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती. त्यावेळी अभिव्य्कती स्वातंत्र्याचा एरवी गजर करणारी मंडळी थंडच होती. शरद पवार आणि विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेत होते. पण यादवांच्या समर्थनार्थ सरकारने काहीही केले नाही. बघ्याची भूमिक घेतली असे म्हटले तर वावगे ठरू नये. यादव काही महाबळेश्वरच्या त्या संमेलनात पोचलेच नाहीत. अध्यक्षाविना पार पडलेले ते एकमेव संमेलन असावे. सांगलीचे संमेलन त्या नंतर झाले. त्याचे नियोजित अध्यक्ष होते विख्यात पत्रकार उत्तम कांबळे. पण त्यांच्या हाती संमेलनाची सूत्रे ज्य मावळत्या अध्यक्षांनी सोपवायची ते मावळते अध्यक्ष अरूण साधू हेच रागावून निघून गेले. कारण का तर गृहमंत्री आर आर आबांच्या समर्थकांनी अशी काही गर्दी तिथे केली होती की साधू आले काय आण गेले काय कोणाला पाहायलाच वेळ नव्हता. आता सध्या ८९ व्या साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरु आहे. पिंपरी चिंचवडला म्हणजेच शरद पवारांच्या बारामती मतदारसंघातच हे संमेलन पार पडायचे आहे. त्याच्या आयोजनाची जबाबदारी पवारांच्या सांगण्यानुसार डी. वाय. पाटील विद्यापीठाने स्वीकारलेली आहे. तो मतदार संघ आहे खासदार सुप्रिया सुळे यांचा आणि तिथे वरचष्मा आहे तो अजितदादा पवारांचा. अशा या वातावरणात अध्यक्षपदाची या वेळेची निवडणूक वादात सापडली नसती तरच नवल होते. तसा तो वाद सुरुच झाला. धुळे नंदुरबारला प्राध्यापकी करून निवृत्त झालेले व सध्या पुण्यात स्थायीक झालेले डॉ श्रीपाल सबनीय यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडलेली आहे. तसा त्यांचा संदर्भ विदर्भाशीही आहे. त्यांचे वास्तव्य अमरावतीतही होते म्हणतात. सबनिसांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडावी यासाठी थेट थोरल्या पवारसाहेबांनीच प्रय्तन केले म्हणे. तशी उघड चर्चाच साहित्य वर्तुळात सुरु झालेली आहे. पवारांच्या माध्यम समुहात कार्यरत असणारे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी त्यासाठी विशेष खटपट केली. खरे तर कांबळे साहेब आपल्याला समर्थन देतील अशी अपेक्षा शरणकुमार लिंबाळेंनी बाळगली असेल तर त्यात वावगे काहीच नव्हते. दोघेही एकाच साहित्य प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे अशी आस शरकुमारांनी धरली होती. पण लिंबाळेनी उमेदवारी मागे घ्यावी कारण कांबळेंचे समर्थन सबनिसांना लाभलेले आहे असे जेंव्हा लिंबाळेंना सांगण्यात आले तेंव्हा त्यांना सहाजिकच धक्का बसला. पण लिंबाळेंनी काही उमेदवारी मागे घेतली नाही. खरेतर हे वर्ष आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे. या वर्षात आंबेडकरांच्या विचाराच्या उत्तम साहित्यिकाला शारदेच्या दरबारातील सर्वोच्च मानाचे स्थान मिळायला काय हरकत होती?! तसा विचार करणारे पन्नास मतदार लिंबाळेंच्या पाठी राहिलेच. पण ती संख्या अर्थातच खूपच कमी होती. पवार समर्थकांनी उचल खाल्ली व लिंबाळे मागेच पडले. या निवडणुकीचे आणखी एक उमेदवार होते विदर्भातील कवि प्रा विठ्ठल वाघ. ज्यांनी साहित्य संमेलनांत कधी तरी रस घेतला आहे अशा साऱ्याच रसिकांना कविसंमेलनात, खड्या आवाजात गायलेल्या वाघांच्या कवितांनी भुरळ पाडलेली आहे. संगीत प्रेमींनी वाघांचे एक गीत तर नक्कीच ऐकलेले असते. “ काळ्या मातीत मातीत, टिफन चालते...”, या प्रख्यात गीताचे कवि आहेत विठ्ठल वाघ! वाघ आणि शरणकुमार लिंबाळे हे दोघेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे यंदाचे अधिक पात्र उमेदवार होते अशीच भावना रसिक मराठीजनांच्या मनात दाटते आहे. पण साहित्य संमेलनाच्या निवडणुका हा एक निराळाच प्रकार आहे. यंदाच्या या निवडणुकीत एकंदरीत पाच उमेदवार उतरले होते. त्या पैकी सबनिसांनी 485 मते पडली. वाघ क्रमांक दोनची मते घेणारे उमेदवार ठरले , त्यांनी 373 मते घेतली. तिसऱ्या क्रमांकावर होते पुण्याचे लेखक प्रकाशक अरूण जाखडे. त्यांना 230 मतदारांनी पसंती दिली. शरणकुमार लिंबाळे होते चौथ्या क्रमांकावर. त्यांची मते राहिली फक्त पंचवीस. पाचवे उमेदवार श्रीनिवास वारुंजीकर हेही लेखक आहेत. पण त्यांना फक्त दोन मतदारांनी पसंती दिली. हे दोन महाभाग कोण आहेत याचा शोध साहित्य परिषदेत जोरात सुरु आहे म्हणतात. अखिल भारतीय साहित्य संमेलन असे जोरदार नाव मिरवणारे हे संमेलन भरणारी संस्था आहे अ. भा. साहित्य महामंडळ. या निवडणुकीचे मतदार आहेत फक्त एक हजार पंचाहत्तर. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. ज्या साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार लाखो रुपायांच्या देणग्या, अनुदाने देते, ज्या संमेलनासाठी संबंधित महानगर पालिका जिल्हा परिषदाही अनुदान रूपाने लाखो रुपयांचे सहाय्य करतात, ज्या संमेलनाध्यक्षाची भाषणे दूरदर्शनवरून लाईव्ह प्रसारित व्हावीत असा आग्रह धरला जातो, कधी परराज्यातील मोठे साहित्यिक, कधी गिरीश कर्नाड तर कधी थेट अमिताभ बच्चन असा महनीय व्यक्तींना संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करून संमेलनाची गर्दी खेचण्याची क्षमता वाढलली जाते आणि ज्या संमेलनावर एकूणच सात ते आठ कोटी रुपये खर्च केले जातात, त्या संमेलनाचे अध्यक्ष निवडण्यासाठी फक्त हजारच मतदार का असावेत हा प्रश्न आहे. त्यावर अनेक वर्षे चर्चा झालेली आहे. पण पुण्यातील मराठी साहित्य परिषद, मुंबईतील साहित्य संघ, नागपूर व औरंगाबादेतील विदर्भ व मराठवाडा साहित्य परिषदा या चारच संस्था प्रामुख्याने साहित्य संमेलनाचे नियंत्रण करत आलेल्या आहेत. या संस्थांनी एकत्र येऊन महामंडळाची स्तापना केली. नंतर मग बृहन महाराष्ट्रातील हैद्राबाद, बंगलोर, रांची, इंदूर, कलकत्ता आदि ठिकाणी वास्तव्य करीत मराठीवर प्रेम करणाऱ्या मंडळींच्या तेथील संस्थांना काही मते असा हा मतदार संघ असतो. यात महाराष्ट्रातील मराठीवर प्रेम करणारे रसिक आहेत कुठे ? कुठेही नाही! मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य व्यवहाराला चालना मिळत असेत. संमेलन स्थळी लागणाऱ्या भव्य मांडपा शेजारी पुस्तक विक्रीची शेकडो दुकाने स्थापन होतात आणि तेथे महाराष्ट्रा्च्या कान्या-कोपऱ्यातून येणारे प्रकाशक पुस्तकांच्या, ग्रंथांच्या विक्रीचे प्रयत्न करीत असतात. संमेलन काळात कधी कधी एक दोन कोटी रुपयांच्या ग्रंथांची विक्री होत असते. या प्रकाशकांना तरी अध्यक्ष निवडीत काही स्थान दिलेले असते का? त्यापैकी कांहींना तरी मतदार केले जाते का? अजिबातच नाही ! फारच कमी प्रकाशक, मूळ साहित्य संस्थांमध्ये काम करतात, पदांवर असतात. तेच मतदार होऊ शकतात. सर्वसाधारण लेखक तरी मतदार असतात का ? तेही नाही! या चार महत्वाच्या साहित्य संस्थांनी प्रत्येकी 165 मते घेतलेली असतात. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारिणीच मतदारांची निवड करते. म्हणेज मुंबई मराटी साहित्य संघाचे मतदार कोण असावेत हे संस्थेचे पदाधिकारीच ठरवत असतात. बृहन महाराष्ट्रातील अन्य संस्थांना उरलेली मते विखरून गेलेली असतात. तीस तीस मते या संस्थांनी द्यायची असतात. आणि मग एकदम थेट पंचाऐशी मतांचा घसघशित कोटा हा संमेलनाचे आयोजन करणाऱ्या संस्थेला दिलेला असतो. स्वागत समितीची ही मतेच संमेलनाचा अद्यक्ष ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावत असतात. या साऱ्या प्रक्रियेतील हास्यास्पद प्रकार किंवा खरेतर विदारक सत्य गेल्या वर्षी प्रकर्शाने पुढे आले. गतवर्षी महाराष्ट्रा बाहेर, पंजाबमध्ये घुमान येथे साहित्य संमेलन भरवले गेले. घुमानच का? तर पंजाबमधील त्या गावी महाराष्ट्राचे थोर संत नामदेव हे अनेक वर्षे वास्तव्य करून होते. खरेतर हे काही संत साहित्याचे संमेलन नव्हते. हे सार्वसाधारण रसिक मराठी वाचकांचे व सर्वसाधारण लेखकांचे संमेलन होते. पण तिथे संतसाहित्याचे अभ्यासक लेखकच अध्यक्ष व्हावेत असा एक विचित्र आग्रह काही मंडळींनी धरला. प्रा सदानंद मोरे यांच्यावर ती जबाबदारी आली. पण कशी आली यातच संमेलनाच्या निवडणुकीची सारा फोलपणा दडलेला आहे. विख्यात रसिकमान्य लेखक, कथाकार भारस सासणे हे मोरेंच्या समोर उभे होते. साहित्य संमेलनाच्या मतदारांनाही सासणेच अद्यक्ष व्हावेत असे वाटत होते. कारण सासणेंना 427 मते पडली. तर या मतदार यादीतील 413 मतदारांनी मोरेंना पसंती दिली. म्हणजे साहित्य महामंडळाच्या मतदारच्या यादीतील बहुसंख्यांनी सासणेंनाच पसंती दिलेली होती. तरी मग मोरे कसे काय अध्यक्ष बनले ? तर स्वागत समितीची मते त्यांच्या पारड्यात अलगद पडली. घुमान संमेलना मागे सरहद संस्थेचे संजय नाहर यांची प्रेरणा होती. त्यांचा आग्रह होता. त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांपासून ते दिल्लीतील काही उद्योजकां पर्यंत अनेकांचे सहकार्य त्यासाठी मिळवलेले होते. त्यांचे त्यासाठी अभिनंदन करावेच लागेल. पण त्यांच्या तिथल्या स्वागत समितीमध्ये बहुसंख्य मंडळींना मराठीचा गंध नव्हता. त्यांना बाबा नामदेवांचे प्रेम होते व आपल्या पंजाबात पुण्या मुंबईची मंडळी येतात याचे कौतुक होते. या समितीवाल्यांनी जर नाहर यांना साऱ्या कोऱ्या मतपत्रिका सोपवल्या असतील तर त्यात नवल काहीच नाही. ते म्हणाले असतील की, “आप चाहे जिसको करो अध्यक्ष!” झाले !! मोरंच्या नावे एकगट्टा मते आली. असेच बहुदा प्रत्येक संमेलनात होत असते. स्वागत समितीवाले ठरवतील तो अध्यक्ष बनतो. ही सारीच निवडणूक पद्धती अतिशय चुकीची आणि रसिकांवरही अन्याय कराणारीच आहे. ती तातडीने बदलली जायला हवी. साहित्य महामंडळातीलच एखादा पदाधिकारी राजिनामा देतो व त्याची नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केली जाते. खरेतर ती व्यक्ती महामंडळ चालवणाऱ्या पुढाऱ्यांच्याच दबावाखाली काम करत असते. म्हणून मग एखाद्या उमेदवाराला पुढे काढणे, एखाद्याला मागे ठेवणे, ज्याला पाडायचे त्या उमेदवाराच्या खास अशा असणाऱ्या मतपत्रिका गायब करणे, कधी त्या मतपत्रिकांची नोंदही न घेणे, अनेकदा प्रत्यक्ष मतदानासाठी पुण्यात कोणी हजर झालेच तरी त्या मतदारांनाही सांगितले जाऊ शकते की “अहो, तुमचे मतदान तर झालेलेच आहे!!” असेही प्रकार या निवडणुकीत नित्यशः होत असतात. त्या साऱ्या विरोधात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी न्यायलयातही धाव घेतात. तिथे टिकू शकतील असे गैरप्रकारांचे पुरावे देता येतच नाहीत. त्यामुळे मग साहित्य महामंडळाच्या निवडणूक प्रक्रिये विरोधातील मुद्दे न्यायालयात टिकतच नाहीत. मीना प्रभुंनाही तोच अनुभव आला आणि आता विठ्ठल वाघ न्यायलयात जातो म्हणत आहेत, त्यांना काही निराळा अनुभव येईल असे नाही... !! मुळात ही सारी निवडणूक प्रक्रिया अधिका पारदर्शक कशी होईल यासाठी रसिक मराठी वाचकांनी व लेखकांनीच आग्रह धरायला हवा. या साहित्य संस्था या साहित्यिकांच्या कमी आणि आयोजक राजकारण्यांच्या अधिक बनलेल्या आहेत. खटपटे लटपटे त्यात लक्ष घालतात त्यामुळे संवेदनशील लेखक दूर राहतात असेही होत असावे. हे सारे बदलण्याची सुरुवात विनाविलंब केली जायला हवी.
लेखनप्रकार

याद्या 3983
प्रतिक्रिया 17

उत्तम लेख. तसंही साहित्य महामंडळ ही काही लोकांची खाजगी मालमत्ता झाली आहे. हे श्रीपाल सबनीस कोण हा प्रश्न ह्या वेळी पडला होता.

In reply to by प्रचेतस

हे श्रीपाल सबनीस कोण हा प्रश्न ह्या वेळी पडला होता. श्रावण मोडकांनी रंगवलेल डॉ. श्रीपाल सबनीसांच अप्रतिम व्यक्तीचीत्र. http://www.aisiakshare.com/node/35

In reply to by मारवा

दुव्याबद्दल धन्यवाद. उत्कृष्ट लेख. अर्थात ह्या लेखामधून सबनीसांच्या साहित्य क्षेत्रातील मुशाफिरीबद्दल फ़ारसं काही हाती लागलं नाही.

चांगले मुद्दे मांडले आहेत. फक्त श्रीपाल सबनीस ह्यांची अभामसासंअच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ पात्रतेच्या निकषांवर पाहिल्यास मला चुकीची वाटत नाही. एकूणच मराठी साहित्य परिषद हा एक सावळागोंधळ आहे. नियोजनबद्ध सावळा गोंधळ.

शरणकुमार लिंबाळे आणि विट्ठल वाघ यांची नावे जास्त ऐकलेली आहेत.

हवीच कशाला, कुठला असा नवीन विचार येत नाही. उगाचच सामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय होतो. या संमेलनातून अध्यक्षपदाचा वाद याशिवाय काय साधलेय आजवर विशेषतः गेल्या दहा वर्षात. एकतर ही संमेलन बंद करावीत किंवा याचे सरकारी अनुदान बंद करावे.

In reply to by मित्रहो

टीकास्वयंवर मध्ये प्रश्नकर्ता नेमाडेंना विचारतो १- संमेलनाचा मुळ उद्देश साहित्य समाजोन्मुख करणं हा असतांनाही, तुमच्यासारखे वाड्:मयीन संस्कृतीबद्दल सचेत असलेले लोक यापासुन दुर राहुन तरी काय साधतात ? नेमाडे: जाऊनही आम्हाला काही करता येईलसं वाटत नाही. कारण अशा बाजारामुळे साहित्य समाजोन्मुख होईल असं मला वाटतं नाही. पण संमेलनामुळे वाईट काही होतं असही मला वाटत नाही. साहीत्यातल्या हौश्या-गवश्यांसाठी अशा गमतीच्या गोष्टीही समाजात पाहिजेतच. खर्‍या साहित्यप्रेमिकांनी मात्र तिथं जाऊन, दोन दिवस खराब करुन नेहमीची वैताग भाषणं, चर्चा आणि मुख्य म्हणजे वैताग चेहरे पाहुन साहित्याबद्दल वाईट मत करुन घेऊ नये. २- यावर तम्ही काय पर्याय सुचविता ? नेमाडे :- ज्यामुळे लेखकांचा वाचकांशी लाइव्ह कॉन्टॅक्ट होईल, काही विचार प्रत्यक्ष बोलुन प्रसृत करता येतील, वाचकांची मतं लेखकांना कळतील अशा पद्धतीचा, आपल्या जुन्या जत्रांसारखा नवा प्रकार सुरु होणं आवश्यक आहे. तिथे सगळ्या लेखकांना तंबु टाकुन द्यावेत, भेटणार्यांनी दोन-चार तास पाहीजे तिथे बसावं, बाकी इकडे तिकडे फिरावं, साहित्यीक पाहावेत्,सर्व प्रकारच्या पुस्तकांची दुकाने वगैरे असावीत, काही वाङमयीन करमणुकीचे प्रकार-- चांगले सिनेमे, विनोदी लेखकांचे हसवण्याचे प्रयोग, गटागटांनी काव्यगायनाचे कार्यक्रम सतत चालु असावेत, सर्वांनाच कविता वाचु द्याव्यात, सर्वांना स्वातंत्र्य असावं, अध्यक्ष-स्वागताध्यक्ष वगैरे लफडी मुळीच नसावीत. अशी साहीत्याची जत्रा गंभीरपणे सुरु करणं , हा एक पर्याय मला वाटतो, ह्यामुळे वाड्:मयीन उद्देश सफल होईल. पण ह्यात ना अध्यक्ष ना स्वागताध्यक्ष , पुन्हा राहण्या-खाण्याचा खर्च ज्याचा-त्याचा, तेव्हा यात कुणी रस घेणार नाही हेही मला माहीत आहे. यात नेमाडेंचा मजेदार तिरकसपणा पुरेपुर उतरलाय. अर्थात ही मुलाखत फार जुनी आहे १९७८ ची आहे त्यानंतर काय मत बदलली असतील माहीत नाही. पण या निमीत्त्ताने एक विचार येतो. ही लाइव्ह कॉन्टॅक्ट ची त्याकाळात नेमाडे अपेक्षा करत होते ती आज पुर्ण झालेली आहे. कविता महाजन सतीश तांबे आदी लेखक आज वाचकांच्या लाइव्ह कॉन्टक्ट मध्ये आहेत. तर पुर्वी किरण नगरकरांची एक कादंबरी प्रकाशित व्हायला काही ७ ते ८ वर्ष लागली होती असे ऐकलेय. तर आज जो प्रतिसाद लेखकाला तात्काळ मिळतो त्याने लेखकाच्या लेखनावर काय नेमके परीणाम होत असतील हा विचार करण्याजोगा विषय वाटतो. म्हणजे लेखकाला पुर्वी जस लिहील्यानंतर मुळात प्रकाशनच फार दिर्घ काळाने त्यावरील प्रतिक्रीया तर अजुन मुष्कीलीने फारच उशिराने मिळत असतील. तेव्हा मग काय व्हायच ? जुने लेखक आपल्या गैरसमजांमध्ये मशगुल राहत होते व तेच ते तेच ते रीपीट करायचेत काय ? की जुने लेखक अधिक प्रतिसाद निरपेक्ष असल्याने अधिकाधिक सकस लिहायकडे प्रवृत्त होत असत. जुन्या लेखकांना एक निवांतपणा आपाधापी से दुर जो कुठल्याही सृजनशील कलावंताला अत्यावश्यक असतो स्व-संवाद चिंतन आदीसाठी तो अधिक लाभायचा का? ते अधिक फ्लो मध्ये राहयचे का ? की अधिकच दांभिक होऊन जायचे आताचा लेखक वाचकानुनय अधिक करुन आपला मूळ गाभा हरवतोय स्वतःशी अप्रामाणिक होत जातो नक्की की त्याच्या उलट आत्मपरीक्षणास उद्द्युक्त होऊन वाचकांच्या प्रतिक्रीयेने स्वतःत आवश्यक बदल करुन घेतो ? काय होत असेल या सर्वाचा परीणाम प्रश्न जरुर निर्माण होतात

In reply to by मारवा

एक नंबर प्रतिसाद! वाचकानुनयी असणं ही वाईट गोष्ट अजिबात नाही. फक्त कोणत्या वाचकाचा अनुनय करायचा हे लेखक ठरवतो. मिपासारख्या फोरमवरही "एकच प्रतिसाद असा यावा की ललित लिहिल्याचं सार्थक व्हावं" अशी भावना वेळोवेळी व्यक्त होते. मराठी लेखन करणे हा पापी पेट का सवाल झाला की वाचकानुनयामुळे दर्जा घसरायची भीती वाटणं योग्य आहे. (उदा० एका वाहिनीवरच्या एका महाभिकार मालिकेचा लेखक माझ्या कॉलेजच्या काळात उत्तम एकांकिका लिहीत असे.) कविता महाजन काय किंवा सतीश तांबे काय - मराठी लेखन हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय नाही (असा माझा समज आहे.) त्यामुळे, मिपाच्या भाषेत, कल्जी क्रू ने. ;)

In reply to by आदूबाळ

अगदी एकच प्रतिसाद असेल व तो विचारपुर्वक विषयाला धरुन मग तो कीतीही टीकात्मक का असेना वा सकारात्मक कसाही असो. लेखकाला तृप्त करुन जातो. मागे एक गमतीदार आय डी होता ५० फक्त ( बरेच दिवसांनी अर्थ कळला ५० प्रतिसाद हवेत फक्त असा अर्थ होता हाही अंदाजच ) पण तुम्ही म्हणता ते जास्त योग्य १ फक्त असला तरी सार्थक झाल. कुठल्या कवीने म्हटलय ना प्रतिसाद एक पुरे ढंगाचा मग वर्षाव पडो जिलब्यांचा

In reply to by मारवा

आपला प्रतिसाद आवडला. संमेलनामुळे लेखक वाचकानुनय करुन आपला मूळ गाभा हरवतोय आणि त्यामुळे सकस साहीत्य निर्माण होत नाही. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. मला वाटत लेखक आणि वाचक दोघेही एकाच गाड्याची दोन चाके आहेत. त्यांच्यात समन्वय असने केंव्हाही योग्यच. वाचक नसेल तर प्रयोग करायचा लेखकाचा उत्साह हरवू शकतो. असा एक प्रयोग फसला तर तो तेच देत राहील जे तो देत आला आहे. वाचकांसोबतच्या सतत संपर्कामुळे हाच प्रयोग तुकड्या तुकड्यातून करता येतो. त्य़ातून लेखकाला आपले विचार, साहीत्य वाचकांपर्यंत कसे पोहचवता येइल याचा अंदाज येउ शकतो. लेखनामधे प्रयोगशीलता वाढू शकते असे मला वाटते. माझा संमेलनाला विरोध हा निव्वळ आर्थिक आहे. आज संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण कोण वाचतो, किती समजून घेतो. प्रकाशकांसाठी पुस्तक विक्री हाच उद्देष असेल तर बरेच मार्ग आहेत. नेमाडे म्हणतात तशी जत्रा भरवली तरी चालेल. कदाचित ऑनलाइन पुस्तक जत्रा. करदात्यांचा पैसा खर्च करुन हे सार करायची गरज नाही. इंग्रजी मधे द हिंदू फेस्टीवल किंवा जयपूर फेस्टीवल होतच असतात. ह्यावरुन यस मिनिस्टरचा आर्ट गॅलरी की फुटबॉल स्टेडीयम हा भाग आठवला.

In reply to by मित्रहो

टीकास्वयंवर मध्ये प्रश्नकर्ता नेमाडेंना विचारतो १- संमेलनाचा मुळ उद्देश साहित्य समाजोन्मुख करणं हा असतांनाही, तुमच्यासारखे वाड्:मयीन संस्कृतीबद्दल सचेत असलेले लोक यापासुन दुर राहुन तरी काय साधतात ? नेमाडे: जाऊनही आम्हाला काही करता येईलसं वाटत नाही. कारण अशा बाजारामुळे साहित्य समाजोन्मुख होईल असं मला वाटतं नाही. पण संमेलनामुळे वाईट काही होतं असही मला वाटत नाही. साहीत्यातल्या हौश्या-गवश्यांसाठी अशा गमतीच्या गोष्टीही समाजात पाहिजेतच. खर्‍या साहित्यप्रेमिकांनी मात्र तिथं जाऊन, दोन दिवस खराब करुन नेहमीची वैताग भाषणं, चर्चा आणि मुख्य म्हणजे वैताग चेहरे पाहुन साहित्याबद्दल वाईट मत करुन घेऊ नये. २- यावर तम्ही काय पर्याय सुचविता ? नेमाडे :- ज्यामुळे लेखकांचा वाचकांशी लाइव्ह कॉन्टॅक्ट होईल, काही विचार प्रत्यक्ष बोलुन प्रसृत करता येतील, वाचकांची मतं लेखकांना कळतील अशा पद्धतीचा, आपल्या जुन्या जत्रांसारखा नवा प्रकार सुरु होणं आवश्यक आहे. तिथे सगळ्या लेखकांना तंबु टाकुन द्यावेत, भेटणार्यांनी दोन-चार तास पाहीजे तिथे बसावं, बाकी इकडे तिकडे फिरावं, साहित्यीक पाहावेत्,सर्व प्रकारच्या पुस्तकांची दुकाने वगैरे असावीत, काही वाङमयीन करमणुकीचे प्रकार-- चांगले सिनेमे, विनोदी लेखकांचे हसवण्याचे प्रयोग, गटागटांनी काव्यगायनाचे कार्यक्रम सतत चालु असावेत, सर्वांनाच कविता वाचु द्याव्यात, सर्वांना स्वातंत्र्य असावं, अध्यक्ष-स्वागताध्यक्ष वगैरे लफडी मुळीच नसावीत. अशी साहीत्याची जत्रा गंभीरपणे सुरु करणं , हा एक पर्याय मला वाटतो, ह्यामुळे वाड्:मयीन उद्देश सफल होईल. पण ह्यात ना अध्यक्ष ना स्वागताध्यक्ष , पुन्हा राहण्या-खाण्याचा खर्च ज्याचा-त्याचा, तेव्हा यात कुणी रस घेणार नाही हेही मला माहीत आहे. यात नेमाडेंचा मजेदार तिरकसपणा पुरेपुर उतरलाय. अर्थात ही मुलाखत फार जुनी आहे १९७८ ची आहे त्यानंतर काय मत बदलली असतील माहीत नाही. पण या निमीत्त्ताने एक विचार येतो. ही लाइव्ह कॉन्टॅक्ट ची त्याकाळात नेमाडे अपेक्षा करत होते ती आज पुर्ण झालेली आहे. कविता महाजन सतीश तांबे आदी लेखक आज वाचकांच्या लाइव्ह कॉन्टक्ट मध्ये आहेत. तर पुर्वी किरण नगरकरांची एक कादंबरी प्रकाशित व्हायला काही ७ ते ८ वर्ष लागली होती असे ऐकलेय. तर आज जो प्रतिसाद लेखकाला तात्काळ मिळतो त्याने लेखकाच्या लेखनावर काय नेमके परीणाम होत असतील हा विचार करण्याजोगा विषय वाटतो. म्हणजे लेखकाला पुर्वी जस लिहील्यानंतर मुळात प्रकाशनच फार दिर्घ काळाने त्यावरील प्रतिक्रीया तर अजुन मुष्कीलीने फारच उशिराने मिळत असतील. तेव्हा मग काय व्हायच ? जुने लेखक आपल्या गैरसमजांमध्ये मशगुल राहत होते व तेच ते तेच ते रीपीट करायचेत काय ? की जुने लेखक अधिक प्रतिसाद निरपेक्ष असल्याने अधिकाधिक सकस लिहायकडे प्रवृत्त होत असत. जुन्या लेखकांना एक निवांतपणा आपाधापी से दुर जो कुठल्याही सृजनशील कलावंताला अत्यावश्यक असतो स्व-संवाद चिंतन आदीसाठी तो अधिक लाभायचा का? ते अधिक फ्लो मध्ये राहयचे का ? की अधिकच दांभिक होऊन जायचे आताचा लेखक वाचकानुनय अधिक करुन आपला मूळ गाभा हरवतोय स्वतःशी अप्रामाणिक होत जातो नक्की की त्याच्या उलट आत्मपरीक्षणास उद्द्युक्त होऊन वाचकांच्या प्रतिक्रीयेने स्वतःत आवश्यक बदल करुन घेतो ? काय होत असेल या सर्वाचा परीणाम प्रश्न जरुर निर्माण होतात

साहित्य महामंडळ, साहित्यिक, संमेलन व निवडणूक या सर्व गोष्टी राजकारण्यांपासून दूर राहणे सयुक्तिक असले तरी व्यावहारिक दृष्ट्या ते शक्य नाही. संमेलनासाठी, त्याच्या आयोजनासाठी बर्‍याच गोष्टींची आवश्यकता असते (इन्क्लुडिंग मनीभाई) जी राजकीय व्यक्तींमुळे पुर्ण होते. जेव्हा या गोष्टी राजकीय हस्तक्षेपाशिवाय करने महमंडळाला शक्य होईल तेव्हा संमेलनेही अ-राजकीय होतील. अर्थात राजकारणी लोक्स महामंडळाला व संमेलनाला असे स्वतंत्र अस्तित्व, स्वायत्तता लाभू देतील का, हाही प्रश्न आहेच. असो. लेखातील १-२ मुद्दे सोडून बाकी मुद्दे योग्य आहेतच. (घुमानच्या संदर्भातः) पण तिथे संतसाहित्याचे अभ्यासक लेखकच अध्यक्ष व्हावेत असा एक विचित्र आग्रह काही मंडळींनी धरला. हे वाक्य व खरेतर हे वर्ष आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे. या वर्षात आंबेडकरांच्या विचाराच्या उत्तम साहित्यिकाला शारदेच्या दरबारातील सर्वोच्च मानाचे स्थान मिळायला काय हरकत होती?! हे मत परस्परविरोधी वाटली. आंबेडकरांच्या १२५व्या जयंती वर्षातच दलित साहित्यिकाला (म्हणजे आंबेडकरांच्या विचारांच्या) अध्यक्षपद मिळावे, हा योगायोग जुळवण्याची गरज काय? दुसर्‍या कोणत्याही वर्षात अशा साहित्यिकाला अध्यक्षपद मिळाल्याने व आंबेडकरांच्या १२५व्या जयंती वर्षात न मिळाल्याने काय फरक पडतो? तसेच उत्तम कांबळेंनी ते स्वतः दलित वर्गातले असल्याने सबनीसांऐवजी लिंबोळेंना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा का करावी? उत्तम कांबळेंनी जातीच्या पलिकडे विचार करून सबनीसांना पाठिंबा दिला तर काय बिघडले? (कदाचित यामागे राजकारणही असेल, उत्तम कांबळे-सकाळ-पवार-पिंपरीचिंचवड असा संबंधही असेल, पण हे राजकारण मला जातीआधारित पाठिंब्यापेक्षा जास्त योग्य वाटते. ("दोघेही एकाच साहित्य प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात" असे म्हटले तरी त्याचा अर्थ जातीयवादाकडे झुकणारा वाटतो) सहमतीच्या गोष्टी :) इतक्या मोठ्या इव्हेंटसाठीचा अध्यक्ष फक्त हजार मतदारांनी वादविवाद करून, गटबाजी करून (व कधी कधी जातीच्या आधारावर-यात उच्चवर्णीयांपासून मागासवर्गीयांपर्यंत सर्वच) निवडणे योग्य नाहीच. पण मतदारांमध्ये सामान्य रसिकांचा समावेश केल्यास त्या सामान्य रसिक मतदारांमध्ये राजकीय लोक्स त्यांचे कार्यकर्ते घुसवतील याबद्दल शंका नसावी. प्रकाशकांचा मतदारांमध्ये समावेश असावा, हेही पटते. पण मग निवडणूकीच्या राजकारणात अर्थकारण मिसळेल अशी भिती वाटते. त्यापेक्षा साहित्यिक मतदार हा बेस थोडा वाढवला (हजारवरून टप्प्याटप्प्याने १०,०००-१५,००० केला) तर जास्त चांगली निवडणूक होईल का, यावरही विचार व्हावा.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक प्रक्रियेवरचे भाष्य आवडले. नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विठ्ठल वाघ यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाने पुन्हा एकदा हूलकावणी दिली. एक गोष्ट मात्र खूपच खटकली. या विषयावर भाष्य करणारा लेख अन कौतिकराव ठाले पाटिल यांचा उल्लेखही नाही. जसे कौतिकराव म्हणजे मराठी साहित्य संमेलन चळवलीचे दालमिया. साहित्य महामंडळाची घटना विविध परिशिष्ट व अनुच्छेदांसकट त्यांना तोंडपाठ असते. संमेलनांच्या वेळी होणारे वाद हाताळायचं त्यांच कसब अतुलनीय आहे. मराठी साहित्य संमेलनाची चळवळ सातासमुद्रापार नेण्याचे श्रेय त्यांचेच. अरुण साधू यांनी सांगलीतल्या साहित्य संमेलनावर घातलेला बहिष्कार कुठल्या तरी तात्विक कारणाने होता असे त्यांनी त्यावेळी पत्रक काढून स्पष्ट केल्याचे वर्तमानपत्रातील बातमीत वाचल्याचे आठवते. बादवे, काळ्या मातीत मातीत तिफन चालते अशी त्या कवितेची पहिली ओळ आहे. आम्हाला शाळेत मराठी कुमारभारतीमध्ये होती. बहुधा आमच्या अगोदर व नंतरच्या अभ्यासक्रमांमध्येही असावी.

नविन माहिती मिळाली. यातील काहीच माहिती नव्हतं. फक्त दरवर्षी होणारे वादच ऐकले होते. तुम्हाला बारामती म्हणायचय का? की पिंचि? अर्थातच कागदोपत्री नाव वेगळं आहे तरी पुस्तकप्रदर्श्नाला भेट दिली असती म्हणून विचारतोय. बादवे - अकोल्याला मामा ज्या घरी भाड्यानी राहायचा तिथे बाजुलाच विठ्हल वाघांचं घर होतं. वडिलांनी एक्दा दुरून त्यांना दाखविल्याचं स्मरतं. काया मातीत मातीत बरिच नंतर अभ्यासक्रमात आली पण रेडियोवर खूपदा ऐकलि होती.

दादर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट यांच्या नंतर साहित्यिक म्हणून आम्हाला परिचयाचा असलेला कुणीही लेखक किंवा लेखिका अध्यक्ष झाल्याचे मला आठवत नाही. रा. ग. जाधव, कोतापल्ले, सध्याचे श्रीपाद सबनीस हि नावं तर मी कधी ऐकलीही नव्हती. चिपळूण येथे कोण अध्यक्ष होतं ते नाव पण आठवत नाही आता मला. अपवाद चितमपल्ली आणि सदानंद मोरे यांचा पण त्यांचे लिखाण साहित्य म्हणण्या पेक्षा संशोधनात्मक जास्त वाटते. थोडक्यात काय तर निवडणूक जिंकायचे तंत्र ज्याला उमगले तो विद्वान अशी स्थिती आहे सध्या. मग ती निवडणूक साखर कारखाना, पतसंस्था, सहकारी बँक, दूधसंघ, क्रिकेट कौन्सिल याची असो किंवा साहित्य संमेलनाची असो.

दिवाळीनंतर जे फटाके फुटले, त्यामुळे डोकं फिरायची वेळ आली होती. त्यात हा लेख जरा वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन आला.