मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक मनस्वी अद्वैत

दिवाकर कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
एक मनस्वी अद्वैत अनुराग कंपनीत कामाला जाताना रोज त्या घड्याळाच्या शो रूम वरून जायचा . काहीवेळा क्षणभर थांबायचाही. ती चकचकीत फॅशनेबल चुटूकशी शोकेसमध्ये ठेवलेली लेडीज घड्याळं त्याला मोहवायची.रागीणीच्या हातावर कुठलं जास्त खुलून दिसेल याचा विचारहि तो करत रहायचा. उद्या त्यांच्या लग्नाला पांच वर्ष होतायतायात. अजून तेच लग्ना आधीचं जूनं घड्याळ ती वापरते . उद्या कोणत्याहि परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला तिला सरप्राइज द्यायचंच तो मनोमन ठरवतो. लाडक्या रागीणी साठी तो एक रिस्ट वॉच घ्यायचं ठरवतो. तिला आपल्या परिस्थितीचि जाणीव आहे.वडलांच्या अखेरच्या दिवसात औषधापाण्यावर झालेला वारेमाप खर्च, त्यातून लगेचच झालेलं लहान बहिणीचं लग्न.ओढाताणच ओढाताण ! त्यामुळं ती समजूतदारपणानं वागते,पराकोटीचा समजूतदारपणा तिच्याकडं आहे , आपण जे ठरवू ,योजू ते ती मान्य करते,कधीही मतभेद,वादावादी नाही.आग्रही भूमिका नाही. कोणती कशाचीही मागणी नाही. पण तिलाही कांही हौस मौज असू,शकते कधी लक्षात घेतलंय आपण?नव्हे ,आपणतर तिच्या समजूतदार पणाचा गैर फायदा घेत आहोत,त्याचं एक मन त्यालानेहमी म्हणायचं.एका टीनपाट घड्याळाच्या गिफ्टनं ,तिच्या गेलेल्या दागींन्यांची भरपाई होवू शकते? कदापीही नाही.तरीहि, य:कच्छित भले , माझ्या जिवलगासाठी तेव्हडं,तरी करू दे,तो स्वत:चीच समजूत घालतो आणि तिच्या साठी एक घड्याळ निवडतो. त्यानं निवडलेल्या घड्याळाची किंमत ९५०० रु. होती.एक्चेंज आॅफरमध्ये आणखी हजार दीड हजार कमी होत होते . तरी एक रकमी ८००० ? महिन्याचं बजेट कोलॅप्स होणार होतं . पण रागीणीला तेच शोभणार होतं. तिच्या नाजूक सावळ्या हातावर तेच खुलणार होतं.उद्या एका मनस्वी पणाचा , समजूतदारपणाचा गौरव करायचा, तोहि त्या समजूतदार पणाला बेसावध ठेवून त्याच्या अंतर्मनानं ठरवलं. दुपारी कंपनीतून त्यानं तिला फोन केला ,दोन तीन वेळा,पण,प्रत्येक,वेळेला नो रिप्लाय मिळाला. अखेर अगदी निघायच्या वेळी पांच वाजता फोन लागला .दुपारी फोन कां उचलला नाहीस म्हणाला ,पण तिच्या उत्‍तराची वाट न बघताच पुढं म्हणाला मी बरोबर सहा वाजता येतो, तू खालीच येवून थांब, फ़र्निचरचा एक सेल लागलाय सोफ़ा कम बेड बघूयाका आपण? चहा आपण बाहेरचा घेवू.ती बरं म्हणाली. ती खाली येवून थांबली,तोही वेळेवर आला. आज एकदम सोफ्याचं काय काढलंत, तिनं विचारलं. कांही नाही फक्त विंडो शॉपिंग आपण किती दिवस करायचं?आणि हे काय घड्याळ कां नाही घातलंस? आहो दोन दिवस सापडतंच नाहीयं. कुठं डाव्या उजव्या हातानं कोण जाणे. दोन मिनिटं अनुराग विचारात पडला.नर्व्हस वाटला जरा, स्वत:शीच कांहींतरी पुटपुटला आणि लगेच सावरून घेतलं स्वत:ला.चल जाऊ म्हणाला.बाईकवर ती बसली. इकडं कुठला आलाय फ़र्निचरचा सेल,रागीणी म्हणेपर्यंत त्याची, बाईक आली सुद्धा घड्याळाच्या शो रूम समोर.हे काय इकडं,कुठं आलोय,रागीणी म्हणाली . चला आलोच आहे तर जरा आत,जावून येवू ,अनुराग म्हणाला आणि हात धरुन तिला आत घेवून आला.आणि नंतर ...... आता गोंधळायची ,भांबायची पाळी तिची होती. कौंटर वरची सेल्स हेड रागीणीकडं बघून हसली ,तिला रागीणीबरोबर कांही बोलायचंही असावं पण त्याच्या आधीच अनुरागानं सराईतासारखं तिला वरच्या मजल्यावर आणलं. लेडीज सेक्शन इथं होता,त्यानं आधीच माहिती करून घेतली होती.अनुरागानं फक्त बोट दाखवलं. तिथल्या सेल्स गर्लनं रागीणीचा हात हातात घेतला आणि ते एक देखणं इवलसं लेटेस्ट मॉडेलंचं रिस्ट वॉच तिच्या हातावर चढंवलं.रागीणीला कांहीं कळतंच नव्हतं. काय चाललंय.अनुरागच्या चेहर्यावरील हा हर्षोन्माद तिला अनोळखी होता . आपल्याला कांही नको म्हणायहि आता तिला सुचलं नव्हतं.स्वताची झाखली मूठ , झाखलीच राहिल्यामुळं ती आश्‍वस्थहि झाली होती. आवडंलं ?अनुरागानं तिला विचारलं. हो छान आहे सोफा ती म्हणाली. तू असं कधी बनवशील असं वाटलं नव्हतं मला.हातातच राहू दे रिस्ट वॉच तिच्या ,अनुराग सेल्स गर्लला बोलला .आणि तू खाली चल मी बिल सेटल करून येतो असं रागीणीला म्हणाला. ते लाल चुटुक, घड्याळाचं वेलवेटचं पण रिकामं पाऊच घेवून रागीणी खाली उतरली, दोन मिनटानि अनुराग पण खाली आला.बघू पावती म्हणाली आणि तिनं पावती हिसकावूनच घेतली. तिचं अनुमान बरोबर होतं.एक्चेंजच्या सवलतीसाठी अनुरागानं स्वताचं घड्याळ दिलं होतं. ती कांहींच बोलली नाही.गप्पच उभी राहिली.आणि ते घडलं. शोरुम मधून एक पोर्या बाहेर पळत आला ते थेट रागीणीकडं ,मगासारखंच एक लाल चुटुक पाऊच हातात होतं, मी उद्या सुट्टीवर आहे मॅडम.हेड मॅडमना माहीत नव्हतं,त्या पळत जावून तुम्हाला हे देवून ये,म्हणाल्या .चालेल नं मॅडम.? आणि देवून तो पळाला . अनुराग नुसता बघतच होता. त्याला काय चाललंय कांही काळात नव्हतं.तेव्हां रागीणी हलकेच त्याला बिलगली नि म्हणाली , मला माफ करशील? कशाबद्दल? माझ्याकडून एक आगळीक घडलीय. अं? दुपारी तुझा फोन मी उचलला नाही. मग? तेव्हां मी घरी नव्हते.मी इथंच आले होते. तू ?इथं? अं! हं! सारखे तुझे मित्र तूला चिडवायचे,ती चुन्याची डबी बदल म्हणून. माझ्या फ़ॉल पिकोतून आणि घर खर्चातून थोडे पैसे साठवले होते त्यातून आणि एक्चेंजच्या सवलतीसाठी माझं स्वताच रिस्ट वॉच देवून दुपारीच हे एलिगंट एक्स्ट्रा थीन वॉच तुझ्यासाठी घेतलं.उद्या वाढदिवशी घरी डिलिव्हरी द्या म्हणून सांगितलं होतं.तूला सरप्राइज करायचं होतं.नंतर माझ्या घड्याळाचं खरं सांगणार होते. माफ करशील नं? अनुरागकडं बोलायला शब्द नव्हते.आजहि रागीणीपुढं तो थिटा पडला होता .तिच्या मनस्वी पणानं त्याच्या गळ्यात हुंदका दाटला होता.कशाचीही तमा न बाळगता तिला जवळ घेवून त्यानं तिच्या गालावर ओठ टेकवले.

वाचन 2950 प्रतिक्रिया 0