श्रीगणेश लेखमाला ५ : माझी पत्रकारिता
लेखनप्रकार
माझी पत्रकारिता
राष्ट्रीय वाहिनीवरील सलमा सुलतान, मराठी दूरदर्शनवरील प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, ज्योस्त्ना किरपेकर, नलिनी सिंग यांच्यानंतर ९०च्या दशकातील बरखा दत्तपर्यंत तमाम पत्रकारांचे आणि वृत्तनिवेदकांचे लहानपणापासून प्रचंड आकर्षण होते. ३१ डिसेंबरला दिल्ली दूरदर्शनवरून सादर होणारा 'अराऊंड द वर्ल्ड' कार्यक्रम असो वा साप्ताहिकी, प्रत्येक कार्यक्रम लहानपणापासून मनावर नकळत पत्रकारितेचे संस्कार घडवत होता. खांद्याला झोळी, हातात नोट पॅड आणि पेन, समोरच्या भ्रष्ट नेत्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारा किंवा अंडरवर्ल्डमध्ये फिरून बातम्या काढणारा फिल्मी पत्रकार पाहिला की आपणही पत्रकारच व्हायचे असे पुन्हा पुन्हा वाटायचे. स्व. प्रमोद नवलकर यांचे 'भटक्यांची भटकंती' वाचले. त्यातील त्यांच्या शोधपत्रकारितेच्या प्रेमात पडले. पत्रकार होण्यासाठी काय करावे लागेल, कोणता अभ्यासक्रम निवडावा लागेल याची काहीही माहिती नसताना मी पत्रकारच होणार असे ठामपणे सांगू लागले.
१९८६-८७चा तो काळ होता. खरे तर पंधरा-सोळा वर्षाचे ते वय होते. आतासारखे इंटरनेट, ज्ञान देणार्या भरमसाठ टी.व्ही. वाहिन्या नव्हत्या. पुस्तके आणि वर्तमानपत्रे ही दोनच माध्यमे जगाशी जोडत होती. अधाशीपणे त्यावर तुटून पडायचे. मुंबईहून निघणारा महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया नांदेड येथे एक दिवस उशिरा यायचा. घरी चक्क संध्याकाळी पेपर टाकला जायचा. वडील केव्हा पेपर खाली ठेवतात आणि तो आपल्याला वाचायला मिळतो याची घाई व्हायची. नुकतीच दहावी झाली आणि पुढे काय करायचे ते वडिलांनी विचारले. क्षणाचाही विलंब न लावता मी मला पत्रकार व्हायचे आहे असे सांगून टाकले. काळाचा महिमा बघता अस्मादिकांना पत्रकारितेत पडायची संधी मिळणार नव्हतीच. "आधी बी.ए. पूर्ण कर" असा वडिलांनी हूकूम सोडल्याने निमूटपणे पदवीला प्रवेश घेतला.
पत्रकारितेचा किडा डोक्यात होताच. दरम्यान साहित्याचीही गोडी लागली होती. त्यामुळे बी.ए.नंतर एम.ए. पूर्ण केले. आता मात्र मनातील चलबिचल वाढली होती. लेखणी चालवायची हौस कॉलेजच्या मासिकांमध्ये पूर्ण करत होतेच. एम.ए.ला असताना नांदेड येथील प्रसिद्ध दैनिक 'गोदातीर समाचार'मध्ये स्तंभलेखकाची जागा आहे असे कळले. वडिलांच्या एका मित्रानेच ही माहिती दिली असल्याने "बघ जमते का" म्हणत त्यांनी परवानगी दिली आणि वृत्तपत्र क्षेत्रात चंचुप्रवेश झाला. वेध या सदराखाली दररोज दोनशे शब्दांचा एक कॉलम लिहावा लागत असे. त्यासाठी महिन्याला पगार मिळे चारशे रुपये. वडील प्राध्यापक होते. आपल्या मुलीनेही प्राध्यापक व्हावे असे त्यांना वाटे. त्यांनी बी.एड. करण्यासाठी मला प्रवृत्त केले. सकाळी ९ ते १२ नोकरी, त्यानंतर साडेबारा ते पाच बी.एड. कॉलेज असा दिनक्रम सुरू झाला. बी.एड. केल्यानंतर माझे पत्रकारितेचे वेड कमी होईल असे वडिलांना वाटले असावे. पत्रकार होणे हे शाळकरी वयात बघितलेल्या स्वप्नाएवढे सोपे नाही, हे तोपर्यंत समजले होते.
१९९६ साल उजाडले. नावापुढे सौ.ची उपाधी लावून औरंगाबादेत आले. नव्याने नोकरी शोधण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत शिक्षणाचा बाजार जोरात सुरू झाला होता. आपण एवढे श्रीमंत नाही त्यामुळे पत्रकारिताच बरी, असे वाटत होते. त्याच दरम्यान ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकार निखिल वागळे यांनी औरंगाबाद येथून त्यांचे 'आपलं महानगर' हे दैनिक सुरू केले. अनुभव गाठीशी असल्याने उपसंपादकपदावर सहज नेमणूक झाली. या वेळी पगार चक्क तीनशे रुपयांनी वाढला होता. सातशे रुपयातही खूश होते, कारण मी आता खर्या अर्थाने पत्रकार झाले होते. महानगर दोन वर्षात बंद पडले, तरी पत्रकारितेतील खाचाखोचा माहीत झाल्या होत्या. औरंगाबादेत नव्याने सुरू झालेल्या 'सांजवार्ता'त रुजू झाले. उपसंपादकापासून वृत्तसंपादकापर्यंतची जबाबदारी पार पाडताना पत्रकारितेत बीट म्हणजे काय येथपासून ते बातमीचे संपादन, मुख्य मथळ्याची बातमी, पानाचे लेआऊट, विशेष पुरवण्या, दिवाळी अंक, जाहिरात अंक अशा एक एक पायर्या सर केल्या. नव्याने सुरू झालेल्या या दैनिकाला एका उंचीवर नेऊन ठेवल्याचे समाधान तर मिळत होतेच, त्याचबरोबर माझ्या पत्रकारितेलाही नवे धुमारे फुटत होते.
आजची पत्रकारिता खरे तर वेगवेगळ्या बिटांमध्ये बांधली गेलेली. बीट म्हणजे एक क्षेत्र. शिक्षण, ग्रामीण, शेती, गुन्हेगारी, महापालिका, जिल्हा परिषद.. प्रत्येक क्षेत्राचे एक बीट आणि तो बीट बघणारा एक पत्रकार. मला बिटकरी पत्रकार व्हायचे नव्हते. त्यातच ज्या काळात मी पत्रकारितेच्या क्षेत्रात औरंगाबादेत काम करत होते, त्या वेळी फक्त एक-दोन मुलीच या क्षेत्रात होत्या, त्याही ऑफिसमध्ये बसून टेबलवर काम करणार्या. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन वार्तासंकलन करणे ही पुरुष पत्रकारांचीच मक्तेदारी होती. आजही ती काही प्रमाणात आहे. हे आव्हान स्वीकारले. स्पेशल फीचरसाठी फील्डवर जाणे सुरू केले, तसे पुरुष पत्रकारांनाही सुरुवातीला आश्चर्य वाटले, पण नंतर त्यांनी माझे फील्डमध्ये येणे स्वीकारले. 'गावगाडा' आणि 'महानगराचा गाडा' ही दोन साप्ताहिके माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील 'माईलस्टोन' ठरली. औरंगाबादेतील ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी ही साप्ताहिके सुरू केली आणि त्यांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली. 'गावगाडा'च्या निमित्ताने ग्रामीण पत्रकारितेचे धडे मिळाले. संपूर्ण मराठवाड्याचे ग्रामीण विश्व जवळून बघता आले. औरंगाबाद शहराचे चांगलेपण आणि येथील माणसाचे चांगुलपण टिपण्याचा प्रयत्न 'महानगराचा गाडा'मधून केला. नकारात्मक पत्रकारितेच्या काळात सकारात्मक पत्रकारितेचा केलेला प्रयोग खर्या अर्थाने समाधान देऊन गेला.
माझ्या पत्रकारितेला पैलू पाडण्याचे काम केले ते ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते यांनी, 'सांजवार्ता'मध्ये असताना त्यांनी फोटो एडिटिंगपासून ते फीचर रायटिंगपर्यंत सगळ्यांची मांडणी कशी करायची ते शिकवले. संजीव उन्हाळे यांनी माझी पत्रकारिता अधिक पॉलिश्ड केली. शोधपत्रकारिता आणि विविध संदर्भ देत बातमी, लेख कसे लिहायचे, संपादन कसे करायचे याचे ज्ञान मला त्यांच्याकडे मिळाले. या दोघांमुळे खरे तर मला पत्रकारितेची पदवी घेण्याचीही गरज पडली नाही. पदवी असावी म्हणून एकदा विद्यापीठात जर्नालिझमला प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा "तुम्हाला पंधरा वर्षांचा अनुभव असताना पदवीची गरज काय?" असा प्रश्न प्राध्यापकांनी विचारला. त्यानंतर पत्रकारितेची पदवी घेण्याचा विचार सोडून दिला.
अलीकडची काही वर्षे महाराष्ट्रातील अग्रगण्य 'दैनिक लोकमत'मधील अनुभव खर्या अर्थाने समृद्ध करून गेले. लोकमतमध्ये विविध विषयांचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली. महिला पत्रकार म्हटली की तिच्याकडे हमखास महिलाविषयक बातम्यांचे संकलन करण्याचे काम देण्यात येत असे. लोकमतमध्ये सुखद धक्का मिळाला. उद्योग, शिक्षण यासारखे महत्त्वाचे विषय सोपवण्यात आल्याने पुन्हा एकदा या क्षेत्रातील पुरुषांच्या भुवया उंचावल्या. लोकमतने पत्रकारितेतले सुख दिले. बायलाईन बातमी हा प्रत्येक पत्रकाराच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. लोकमतमध्ये अनेक बायलाईन बातम्या प्रकाशित झाल्या. प्रत्येक वेळी वृत्तपत्रातील आपल्याच नावावरून हळुवार बोट फिरवताना लहानपणी उच्चारलेले "मी पत्रकार होणार" हे शब्द आठवतात. मागच्या वर्षी माझ्या वडिलांनी माझ्या लेखांची व बातम्यांच्या कात्रणांची फाईल सजवून मला भेट दिली, तो दिवस माझ्यासाठी बायलाईन बातमीपेक्षाही जास्त समाधान देणारा होता.
वाचन
39991
प्रतिक्रिया
0