Skip to main content

धुंदी कळ्यांना! भाग-३

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे.. "मित्रांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. माझ्या मैत्रिणीची. हो ती परत आलिये. आणि खरं सांगू माझ्यासाठी नाही आलिये ती परत. ती परत आलिये तिच्याचसाठी. आश्चर्य वाटलं ना? ती जर तिच्यासाठी परत आलिये तर मी तुम्हाला तिची गोष्ट सांगून का बोर करतोय? कारण ती जेवढी तिची गोष्ट आहे तेवढीच माझीही. वेडा म्हणाल मला खुशाल म्हणा,पण कुणासाठी वेड होण्यात जी मजा आहे, ती स्वतःसाठी शहाणे होण्यात नाहीये. आज मी तुम्हाला सगळं सगळं सांगणार आहे,तिच्या माझ्या आयुष्यातलं आणि त्यात आलेल्या वादळाचं. ऐकाल ना? " एव्हाना रेडियोमधला स्टाफदेखील जागच्या जागी थिजुन अभीची गोष्ट ऐकत होता. हा पहिला कार्यक्रम होता ज्यात सुरू होऊन दहा मिनीट झाले तरी कुणीही गाण्याच्या फर्माइशिचा फोन केला नव्हता की कार्यक्रमाच्या प्रोड्यूसर ने जाहिरात ब्रेक घेण्याचा इशारा केला नव्हता. "तिची ओळख करून देतो आधी..तिचं नाव अपर्णा दिवाकर. आम्ही एकाच कॉलेजमधे होतो. प्रेमात पडलो, लग्न ठरलं. सगळं आमच्या मनासारखे होत होतं, आणि आयुष्याला नेमकं तेच बघवल नसाव. मित्रांनो माझ्या मैत्रिणीला,माझ्या होणाऱ्या बायकोला ऑफीसमधून घरी जाताना एकटं गाठून आपले धडाडीचे नेते आणि या शहराचे नगरसेवक प्रकाश भामरे यांनी बलात्कार केला." आता सगळा स्टाफ अभिच्या केबिनबाहेर येऊन उभा होता. दहा पंधरा मिनिटात रेडियो स्टेशनबाहेर पक्याचे कार्यकर्ते गोळा झाले होते. इकडे पक्याने रेडियो स्टेशनच्या मेनेजरला फोन करून आताच्या आता प्रोग्राम बंद करून अभिला बाहेर हाकलून द्या म्हणून सांगितले होते. मॅनेजरने प्रसंगावधान दाखवून कॉल रेकॉर्ड केला आणि पोलीसांना फोन करून ऐकवला. पक्याच्या त्रासाला सगळेच वैतागले होते, त्यामुळे प्रत्येक जण आता आपली पोळी कशी शेकून घेता येईल हे बघत होतं. मॅनेजरच्या विनंतीमुळे सबइन्स्पेक्टर राजे रेडियो स्टेशन कडे रवाना झाले होते आणि जिच्यामुळे हे सर्व सुरू झालं ती अपर्णा? दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडायला गेलेली ती आश्चर्याने स्तिमित होऊन दारात उभ्या तिच्या मैत्रीणीकडे पहात होती. एक अबोली रंगाची कॉटनची साडी चापुन चोपुन नेसलेली, केसही तसेच नीट बांधलेले. पदर अगदी डोक्यावर नाही आणि अगदी खाली पडलेलाही नाही अशी रेवती ती पहिल्यांदाच पहात होती. क्षणभर अपर्णाला हसुच आलं. "रेवती अगं काय ग हे? एवढी कशी सोज्वळ झाली तू? आणि आज इकडे कुठे वाट चुकलीस?" तसं मंद स्मित करत रेवती म्हणाली,"यावं लागलं, तू भाग पाडलस यायला. आत येवू? " तिच्या अशा गंभीर बोलण्यामागचा उद्देश न कळल्याने गोंधळलेली अपर्णा दारातून बाजूला होत म्हणाली, " बापरे केवढी बदलली आहेस. चक्क परवानगी वगैरे? ये ना ग" हॉलमधल्या सोफ्यावर सावरून बसत रेवती म्हणाली. "रेडियो ऐकत नाहीयेस. अभिचा प्रोग्राम सुरू आहे." रेवतीच्या प्रत्येक वाक्यानिशी अपर्णाचा गोंधळ वाढत होता. "हो ग ऐकतीये. कोण आलं ते पहायला उठले आणि तुला अशी अचानक पाहून गोंधळले." "लाव ना परत. दोघी ऐकूया." रेडियो सुरू करता करता अपर्णा म्हणाली, "काय झालंय तुला रेवती? मी ओळखत होते ती रेवती तू नाही." "नाहीच आहे मी ती रेवती. ओळख करून देते, मी रेवती प्रकाश भामरे." सुन्न होऊन अपर्णा तिच्याकडे पहात राहिली. पुढच्याच क्षणी ती आपल्याकडे कशाला आली आहे ते समजून अपर्णाने दार उघडलं आणि रेवतीला बाहेरचा रस्ता दाखवत म्हणाली, "सॉरी रेवती, तू जर मला हे प्रकरण विसरून जा म्हणून सांगायला आली असलीस तर प्लीज मी ते करू शकणार नाही. सो तू इथून निघून गेलेलंच बरं." "असं कसं, आता एवढी सुरुवात केलीच आहेस तर परिणामसुद्धा भोगायलाच हवेत नाही का? आपल्या प्रियकराला तुझी कहाणी सांगायला लावून हा जो तुझा सहानुभूति मिळवायचा प्रयत्न चालला आहे ना त्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. लिहून घे माझ्याकडून." पुढे येवून रेवतीने धाडकन दार पुढे ढकलले. अपर्णा तिथेच कोसळत म्हणाली, "रेवती तुला माहीत नाहीये हे सगळं खरं आहे. अभी मनाच काही सांगत नाहीये. You just dont know what I have been through." "अपर्णा जरा किचनची खिडकी उघडून बघ.एक मुलगा बाइकवर बसून फोनवर बोलत असेल. कुणाशी आणि काय ते तू समजून घेशीलच." खात्री करण्यासाठी अपर्णा किचनमधे गेली आणि हळूच खिडकी किलकिली करून पाहिल, खरोखर एक धिप्पाडसा मुलगा आजुबाजुला लक्ष ठेवत कुणाशीतरी फोनवर बोलत होता. बाहेर येवून ती रेवतीला म्हणाली, "रेवती, तू मला धमकी देतियेस? काही उपयोग नाहीये याचा. तू जाऊ शकतेस." "अपर्णा, तो मुलगा अजून बाहेर का उभा आहे माहीतीये? अगं माझी गाडी बाहेर पार्क केलेली पाहिलिये त्याने,मला तुझ्याकडे येताना त्याने पाहिलं आणि म्हणून तु अजून इथे उभी तरी आहेस नाहीतर उद्या पेपर मधे बातमी आली असती, प्रकाश भामरे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेली तरूणी गायब." "तुला काय वाटतं रेवती जिवाच्या भितीने आता मी मागे हटीन? मी हा विचार केलाच नव्हता असं वाटतं का तुला? " "केला असशील तू विचार,पण कुठल्याही क्षणी तो अविचारात बदलू शकतो. तू तुला स्वतःला, अभीला आणि तुझ्या आईबाबांना केवढ्या मोठ्या संकटात ढकलतीयेस आणि तेही फक्त तुला न्याय मिळवून द्यायला" " अगं फक्त माझ्याच न्यायाचा प्रश्न आहे का? आमच्या सर्वांचीच आयुष्य उध्वस्त केली त्याने. कधी कुणाच्या मध्यात न पडलेले बाबा, काय चूक केली ग त्यांनी म्हणून सगळ्या नातेवाईकांनी आमच्याकडे पाठ फिरवली माझं बेंगलोरला जायच खरं कारण कळल्यावर. आई? आई अजून रात्री अपरात्री घाबरुन उठते. आणि अभी? सांग मला माझ्यावर प्रेम करून चूक केली का त्याने? आणि आज हा माझा प्रश्न आहे,उद्या अजून किती जणांच्या प्रेयसीचा,मुलीचा,बहिणीचा प्रश्न असेल तू सगळ्यांनाच हेच सांगणार आहे का?" "अपर्णा मला कळतीये तुझी तळमळ. मला फक्त भिती वाटतीये. आधीच तुझ्याबाबतीत जे झालं त्याला मी जबाबदार आहे असं मला वाटतं आणि त्यातून तुला काही बरंवाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. अगं आयुष्याची परवड तर आपल्या दोघीच्या झालीये.." रेवतीच वाक्य मधेच तोडत अपर्णा म्हणाली, "रेवती तू? तू कशी जबाबदार? अगं काय केलंस असं तू? " "सांगते सगळं. तू आधी शांत हो. तुला जर असं वाटत असेल की प्रकाशने रेंडमली कुठल्यातरी मुलीवर बलात्कार केला तर ते चूक आहे. त्याला तू हवी होतीस. पहिल्यांदा तुला पाहिलं त्या क्षणापासून." स्तब्ध होऊन अपर्णा ऐकत होती. "तुला आठवतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तू आणि अभिने गाणं म्हणलं होतं" "धुंदी कळ्याना. कसं विसरेन मी.." "त्या कार्यक्रमात प्रकाश आला होता. मी कुणालाच सांगितल नव्हतं पण माझं आणि प्रकाशच लग्न मी तिसऱ्या वर्षाला असतानाच ठरलं होतं." " काय? पण तू सांगितल का नाहीस?" " कारण मला नव्हतं करायच त्याच्याशी लग्न. डोकं ठिकाणावर असलेली कुठली मुलगी अशा गावगुंडाशी लग्न करेल? आमच्या बंधुराजांचे प्रतापही त्याच्या सारखेच. अगं त्याच्या पैशावर ऐश करत असताना माझ्या भावाला कळलसुद्धा नाही की तो प्रकाशच्या मैत्रीच्या नावाखाली विनलेल्या जाळ्यात अडकत चाललाय. परिणाम एकच झाला, प्रकाशने मागणी घातली मला. आई पपा नाही म्हणाले ग पण वेळ निघून गेली होती. माझ्या भावाच्या पराक्रमांचा पाढा वाचून दाखवून आता अडकवतो त्याला अशी धमकी दिली त्यानं. काय दुर्दैव बघ ज्या कुलदीपकाने दिवे लावले त्याला वाचवायला आपल्या हुशार मुलीचा बळी देताना क्षणाचाही उशीर नाही केला त्यांनी." "पण मग तू आता इथे कशी? तुला अडवले नाही त्याने? आणी अजूनही माझ्या बाबतीत जे झालं त्याला तू कशी काय जबाबदार हे कळतच नाहीये." "त्या कार्यक्रमानंतर तो मला तुझ्याबद्दल खोदुन खोदुन विचारायचा. मी जुजबी उत्तर देऊन विषय टाळायचे. तू ट्रेनिंगसाठी मैसूरला गेलीस त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता. पण चार महिन्यांनी तू परत आलीस आणि नेमकं पक्याने तुला अभीबरोबर पाहिलं. आमच अजून लग्न झालं नव्हतं. त्याने मला तुझ्याबद्दल विचारल. साहजिकच कॉलेजनंतर आपण संपर्कात नव्हतो. मी त्याला तसं सांगितल्यावर त्याने पुन्हा मला भिती दाखवुन माहिती काढायला लावली. तुला आठवतं मी फोन केला होता तुला एकदा आणि आपण बराच वेळ तुझा जॉब,लग्न सगळं डिस्कस करत होतो. ते सगळं मला पक्याला सांगावं लागलं. पण खर सांगू तो इतक्या खालच्या पातळीला जाइल अस मला नाही ग वाटलं त्या वेळी. आणि मी माझ्या आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक होती ती. त्यानंतर मी कधीही तुला फोन केला नाही. तुलाही कधी प्रश्न नाही पडला का ते? " "होली शीट! " म्हणत अपर्णाने कपाळाला हात लावला. "इतकं सगळं प्लान केलं होतं त्या ####ने. त्यानंतर तो तुझ्या मागावर असायचा. अभीचा काटा काढणं त्याला अवघड नव्हतं पण त्याला तेव्हा ते महत्वाचही नाही वाटलं. एक दिवस अभी बरोबर नसताना आयती शिकार चालून आली आणि त्याने डाव साधला. पुढे सगळं त्याच्या मनासारखच झालं. पोलीसांना तुम्ही केस बंद करायला लावली आणि तू बेंगलोरला निघून गेलीस. त्याला वाटलं आता तू परत येणारच नाहीस. पण खरं सांगू मला माहिती होतं तू येणार, अगं तुझं मन तू इथेच ठेवून गेली होतीस. अभिला सोडून तू राहणं ही अशक्य गोष्ट आहे हे माहिती होतं मला. आणि मी त्याच संधीची वाट पहात होते. मलाही त्या नरकातुन बाहेर पडायचच होतं. मी रोज ऐकायचे अभिचा कार्यक्रम कधीतरी तो तुला पुन्हा भेटल्याच सांगेल म्हणून. आणि आज तो रेडियोवर जे सांगत होता ते ऐकून मी चाटच पडले. एवढं मोठं धाडस? ज्यांना प्रेमाचा खरा अर्थ कळला तेच करू जाणे हे! मी तुझ्या बरोबर आहे अपर्णा. मला तुझी ढाल कर. मी तुला समजून सांगून परत पाठवते,तिला काही करू नको अशी विनंती करून मी आलिये घरून. तो फसला. आपण याचा फायदा घेतलाच पाहिजे अपर्णा." "मी केस ओपन करण्यासाठी प्रयत्न करतीये पण मला कुणी दाद देत नाही." "आता देतील. मी साक्ष द्यायला तयार आहे. तुला जे सांगितल तो शब्द न शब्द मी आता पोलीसांना सांगायला तयार आहे." एव्हाना अभिचा कार्यक्रम संपत आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी त्यानं आवाहन केलं होतं ही केस पुन्हा ओपन करा म्हणून पोलीसांना इतके फोन करा की नाईलाजाने त्यांना तसं करावं लागेल. अभिचा कार्यक्रम संपला आणि पुढच्याच क्षणाला पोलीस स्टेशनमधला फोन खणखणला. "हेलो, इन्स्पेक्टर जाधव स्पीकिन्ग. आपण?" दुसऱ्या बाजूला अपर्णाचा हात हातात घेऊन रेवती बोलत होती, "हेलो. मी रेवती प्रकाश भामरे बोलतीये." क्रमशः
लेखनविषय:

वाचने 1716
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

क्रमश: टाकायचं राहील शेवटी. सा.सं मदत करा प्लीज. ३ भागात संपवेन असं वाटलेलं पण लिहिता लिहिता आधी जी गोष्ट डोक्यात होती ती बदलली. पुढचा भाग मोठा आणि शेवटचा करायचा प्रयत्न करेन.