Skip to main content

एक अपघात........ न केलेला.

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 16/06/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर,गणपतीपुळे, मालगुंड पिकनिक करून काल म्हणजे १५ जून २०१५ ला पहाटे ४-३० ४-४५ च्या पंधराजण गणपतीपपुळ्याहून निघालो.त्यात पुरुष दोघेच त्यातले एक श्री दाभोलकर हे दोन महिन्यापूर्वी बायपास झालेलेआणि दुसरा माझा नवरा. बाकी सगळ्या वय वर्ष तीन ते अठ्ठ्याहत्तर मध्यल्या स्त्रिया. माझी नणंद सौ. सीमा इंदुलकर हिच्या मैत्रीणी आणि त्यांचे नातेवाईक अशी ही सारी मंडळी.सीमा ठाण्याच्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चीफ फार्मासिस्ट म्हणून काम करते .तिच्या मैत्रीणीही आरोग्य सेवेशी संबंधित क्षेत्राताल्याच.आम्ही दोधेही त्यांच्याबरोबर बऱ्याच पिकनिक केलेले.त्यांचेही दादा वहिनी. येताना आम्ही मीरा रोडहून तर बाकी सगळ्या, कुणी अंबरनाथ कुणी बदलापूर तर कुणी शहापूरहून ठाण्याला एकत्र आल्या होत्या.तीन चार ठिकाणीची खरेदी करून आता प्रत्येकीचे एखाद् दोन बोजे वाढलेले होते.आता प्रत्येकीला घराच्या आसपास सोडत कर्जत मार्गे ठाणा आणि नंतर मिरारोड असे यायचे ठरले.यासाठी सकाळी लवकर नुसते तोंड धुवून निघयचे ठरले.त्याप्रमाणे निघालोही. आणि पालीमार्गे एक्स्प्रेस वेवर यायचे ठरवून मुंबई-गोवा महामार्गावरून पालीचे वळण घेतले. वाकण नावाच्या गावाजवळच्या ब्रिजवर आलो आणि पुढे दहा ते पंधरा फुटावर एक सायकलस्वर डाव्या बाजूने चालला होता,त्याला काय झाले ते समजलेच नाही तो अचानक रस्त्याच्या मध्ये येऊन कोसळला.आमच्या चालकाने तातडीने ब्रेक मारून गाडी थांबवली.आमच्याशिवाय दुसरे कोणीही तेव्हा तिथे नव्हते. आम्ही दोघे नवरा बायको बाकी कुणीही खाली उतरू नका असे सांगून खाली उतरून पहिले तर त्याच्या डोक्याला जखम झालेली,डोळे उघडे,जीभ दातातून बाहेर आलेली,त्यामुळे तोंडातून रक्तस्राव होत असलेला. रस्त्यात आडवी झालेली सायकल एव्हाना आमच्या गाडीचा जवळ आलेली पण तिचा गाडीला स्पर्श झाला नव्हता.चालक म्हणू लागला,”इधरके लोग बडे खराब होते है.हम पुलिसको खबर देके निकलते है.सब लेडीज लोग है.” पण आम्ही पडलो जागरूक नागरिक.’आपण ह्याला घेऊन दवाखान्यात पोचू,तिथे पोलिस असतीलच.’असा विचार करून रुग्णवाहिकेसाठी १०८ला फोन लावला तो पुण्याला जाऊ लागला.इतक्यात सीमाने पाली आरोग्यकेंद्रात फोन करून तिथल्या डॉक्टराना फोन लावून अपघाताची कल्पना देऊन तयार राहायला सांगितले.यावेळपर्यंत एकदोन वाहने पसार झाली. कोणी थांबायला तयार नाही. एका गाडीताल्यानी ओरडून आम्हाला सल्ला दिला.’यहा रुको मत.निकाल जाव.’ ’इतक्यात एका स्कुटीवरून दोघे आले त्यांनी अपघात पाहताच ते थांबले.आणि त्यातला एक मोबाईल वर फोटो काढू लागला तर दुसरा अपघातग्रस्त माणसाकडे पाहू लागला.तोपर्यंत फोटो काढणाऱ्याला माझ्या नवऱ्याने त्या माणसाला आरोग्यकेंद्रात नेण्यासाठी आमच्या गाडीत ठेवण्याची विंनंती केली. तो हो म्हणून पुढे आला. इतक्यात अपघातग्रस्त माणसाची ओळख पटल्याने दुसरा तोंडाने अर्वाच्य शिव्या देत,गाडीवर लाथाबुक्क्याने हाणू लागला, चालकाला मारू लागला.फोटो काढणारही आम्हाला मदत करायची सोडून त्याच्या मदतीला धावला. इथे आमच्यातल्या सीमा, सुषमा, शोभा, निमा ,राजश्री अशा चौघी-पाचजणी खाली उतल्या. माझा नवरा त्यांना आवरण्यासाठी,”अरे,अरे ऐका तरी ,आमच्या गाडीने त्यांना अपघात झाला नाही.ते सायकल चालवता चालवता चक्कर येऊन पडले.म्हणून आम्ही मदत करायला थांबलो.’त्यावर ते दोघे माझ्या नवऱ्याच्या अंगावर धावून आले.,”हां,फिट आली सांगतोय भे****.” माझी नणंद सीमा आणि तिची मैत्रीण सुषमा चटकन मध्ये घुसल्या आणि नवऱ्याला बसमध्ये घेऊन गेल्या.इतक्यात काही दुचाकी गाड्या विरुद्ध दिशेने आल्या.इतकी गडबड पाहून त्यांचा वेग मंदावला आणि दुसऱ्याने त्यावर बसलेल्या लोकाना हाक मारून उतरवले. “ए विलास,ए ललित थांब रे..काकाला उडवला यांनी.”ते उतरले आणि चालकावर धावून आले. गाडीवर, गाडीच्या काचांवर हाणूलागले.जमाव वाढू लागला.जो येत होता तो चालक आणि गाडीवर हाथ धुवून घेत होता.परत काही जणींनी मध्ये पडून चालकाला गाडीत नेले”.गाडीची चावी काढून घ्यारे.”कोणीतरी फर्मावले.आता मात्र मी संतापून त्यांना आवाज दिला,”तुम्हाला या माणसाचा जीव वाचवण्यात इंतरेस्ट आहे की नाही?त्या माणसाला उचलून गाडीत ठेवा नाहीतर मीच तुमच्यावर तुम्ही उशीर करता आहात म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेन.”तोपर्यंत त्या जखमी माणसाची बायको तिथे आली होती.ती गहिवर घालून रडू लागली.मी त्या तिलाच सांगितले.हे तुमचे नातेवाईक फक्त मारामारी करताहेत तर त्यांना यांना उचलून गाडीत घालायला सांगा.”तीही यांच्या विनवण्या करू लागली.शेवटी एकदाचे त्या जखमी गृहस्थाना उचलून आमच्या गाडीत घालून पाली आरोग्य केंद्रात घेऊन आलो.पण मोलाचा अर्धातास वाया गेला होता. तिथेही सगळे आमच्यामागोमाग तिथे पोचले.तिथेही जमाव होताच.अगोदर रुग्णवाहिका का नाही आली म्हणून तिथे वाद सुरु करून डॉक्टरला मारहाण करण्यात आली.त्यातही काही वेळ गेला.पण तिथे काही स्वयंघोषित नेते आले त्याच्याशी बोलल्यावर रुग्णावर उपचाराला सुरूवात झाली.सीमा आत जाऊन डॉक्टरांशी बोलली. रुग्णाला प्रथमोपचार करून पुढे अलिबागला पाठवावे लागेल कारण येथे बाकी काही सोयी नाहीत.काहीतरी रस्त्याच्या कामामुळे पाण्याची लाईन फुटल्यामुळे तिथे पाणीही नव्हते.हे कळल्यावर सीमाने अलिबाग सिव्हील सर्जनना फोन करून कल्पना दिली.रुग्णाच्या पत्नीला रक्ताने भरलेले हात धुवायलाही पाणी नव्हते.स्पिरीटच्या बोळ्याने त्यांचे हात स्वच्छ करावे लागले.तिला धीर देउन अलिबागला न्यावे लागेल असे सांगितले एव्हाना तीही जनमावाच्या नावाने बोटे मोडू लागली होती. नवऱ्याने गाडीत बसून काही ओळखीच्या लोकांना फोन केले.लोक बाहेरून त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते.ज्याने जखमीला ओळखून मारहाण सुरु केली होती तो त्यांचा पुतण्या असल्याचे समजले तो तिथेही लोकभावना भडकावत होता. त्याचे नाव होते राहुल ठोंबरे.”तो ढापणी आहे न,तो आय*** सांगतोय की फिट आली म्हणून त्याला काढा बाहेर.”त्यातले दहापैकी पाच लोकांच्या तोंडाला दारूचचा वास येत होता.माझ्या पोटात गोळाच आला होता.पण माझ्या आजीची शिकवण आहे की,पोटात कितीही भीती असली तरी ती तोंडावर दिसत कामा नये,तुम्ही घाबरला आहात हे समोरच्याला समजत नाही तोपर्यंत तोही टरकून असतो.मी पुन्हा राहुलला सांगितलं,”ए भ**.तू माझ्या नवऱ्याला जी शिवी दिली त्याचा अर्थ कळतो का तुला? तू तुझ्या आईची इज्जत काढतोयसआणि मग माझा नवरा तुझा बाप लागतो.तो काय भित्रा आहे म्हणून आत बसला नाहीये. तू जर आता गडबड केलीस तर मी तुला खुनाचा प्रयत्न केला म्हणून पकडून देईन.आणि तुझी पण मेडिकल करायला लावते बघ आता. तो ललित ,विलास आणि तू तुम्हा तिघांचीही मी नावानिशी तक्रार करते आता.” तसे काही लोक मागे सरकले. माझी नणंद आत अडकली होती.नवऱ्याला लोक गाडीबाहेर ओढू पाहत होते.त्याचा जीव ते मला किंवा सीमाला काहीतरी करतील म्हणून तळमळत होता.पण मी त्याला शपथ घातली.”तू काही झालं ना तरी खाली उतरू नकोस.या सगळ्या मुलींची जबाबदारी तुझ्यावर आहे.माझं मरण इथेच असाल तर ते इथे येईल. पण मला मी बाईमाणूस आहे म्हणून तरी ते हात लावणार नाहीत.” माझ्या नवऱ्याचे सहकारी असलेल्या एका अधिकाऱ्यांनी यांनी पाली पोलिस स्टेशनला फोन करून जमाव हिंसक झाल्याची खबर दिल्यावर पोलिस अपघातस्थळी रवाना झाले होते पण आम्ही तिथे नव्हतोच.आम्ही इथे अडकलो होतो.मी सगळ्यांना गाडी लॉक करून आत बसा. मी सीमाला घेऊन येते.” त्या मॅडम कुठे आहेत.?अलिबाग सिव्हील सर्जनना फोन करताहेत त्या ,”असे मोठ्याने बोलत मी आत शिरले.लोकही बाजूला सरकत होते.सीमाला अगदी आतल्या खोलीत ठेवल्याचे सांगितले.मी तिथे जाऊन तिला हाक मारली.तशी तीही दार उघडून बाहेर आली.तिचा हात धरून मी मी पुन्हा बसमध्ये येऊन बसले. आता मात्र आम्हाला कोणीही अडवले नवहते . बसमध्ये बघते तरचालकाला जास्त मारहाण झाल्याचे कळले.कोणीतरी त्याला पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे असं सांगितल्याने तो तिथे जात असता पुन्हा बाईक तिघांनी वरून जाऊन त्याला मजबूत मारला होता.त्याच्या डोक्यात काठी घातली होती.पण आता आम्ही सर्व एकत्र होतो.नवऱ्याचा एक बालमित्र मुंबई पोलिसात आहे.त्यानेही पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता.अदिती दामोदर या सीमाच्या मैत्रीणीच्या राजश्रीच्या मुलीचे सासर पाली हेच असल्याने तिनेही त्याच्याशी संपर्क साधला होता.तिथूनही काही ओळखीच्या लोकांशी संपर्क साधण्यात आला होता. नंतर एका उंचीपुरी व्यक्ती बस मध्ये शिरली.”तुम्ही काय कारताय?पोलीसठाण्यात येणार का?”आम्ही सगळ्यानी एका सुरात होकार दिला”.ठीक आहे तिथे यायला तयार आहात तर मी तुमची जबाबदारी घेतो घेतो.”असे आम्हाला सांगून ते खाली उतरले.आम्हाला आधी ते त्यांच्यापैकीच वाटले पण ते होते पाली पोलीसठाण्याचे हेड कॉन्स्टेबल.एका बाईकवाल्याला आम्हाला रस्ता दाखवायला सांगून ते निघून गेले. सगळा जमाव आमच्या मागोमाग पोलीस ठाण्यात घुसला.नवरा आणि मी चालकाला घेऊन आत शिरलो.एक लेडी पी. एस. आय. आणि एक लेडी कॉन्स्टेबल यांनी खास पोलिसी आवाजात त्यांनी सांगितले की, ‘साहेब,तुम्ही बसा. मॅडम तुम्हीपण बसा.बाकीच्यांनी बाहेर व्हा,ज्यांनी अपघात पाहिलाय त्यांनीही बाहेर थांबा.पंचनाम्यावर सही करणार असतील त्यांनीच थांबा. फक्त फिर्यादी आत येतील.’एक एक करून सगळे गायब.चालकाला ए तू तिकडे बस.असे सांगितले. फिर्यादीने आमच्या गाडीनेच अपघातग्रस्त माणसाला उडवल्याची फिर्याद दिली.माझे व नवऱ्याचे जबाब घेतेवेलळी मी जेव्हा नावासहित कोणी कोणी मारहाण केली ते सांगितल्यावर, तुम्ही यांना ओळखत नाही मग नावे कशीसांगू शकता?असा प्रश्न विचारला.तेव्हा मी राहुलने त्यांना हाक मारून थांबवून घेतले.म्हणून नावे कळली.आणि ते जखमींना मदत न करत मारहाण करण्यातच धन्यता मानत असल्याने लक्षात राहितेत व आमच्या गाडीतील लोकांनी त्यांचे छायाचित्रण केल्याचे सांगितले.ज्यांनी फिर्याद दिली होती तेही गडबडल्याचे दिसून येत होते. अलिबागहून रुग्णाला मुंबईला पाठवण्यात आले आहे आणि अजून गंभीर अवस्थेत आहेत तर चालकाला सोडणार नाही कारण तो मालक नाहीय.आणि आता त्याला सुरक्षेच्या कारणामुळे सोडू शकत नाही.शिवाय गाडी सोडणार नाही आता आर.टी,ओ.ने पाहिल्याशिवाय ,असे समजले. वचालकाकडे मूळ कागदपत्रे नसल्याने मालकाशी संपर्क साधण्यात आला.गाडी नवी असल्याने कागदपत्र बँकेत असल्याचे संगीताले व मी उदया तिथे पोचेन असे सांगितले.त्या गृहस्थांची सायकाळी पोलीसठाण्यात आणली होती.तीच एक स्पोकही वाकडा झाला नव्हता,त्यावरूनच समजत होते की आमच्या गाडीने अपघात केला नव्हता पण स्थानिकांचे दडपण पोलिसांना लघेच झुगारून देता येत नव्हते आणि निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही ठाण्यात नव्हते, ते अलिबाग येथे क्राईम मीटिंगसाठी गेले होते. इतक्यात एक वार्ताहर तिथे आले.गावातल्या लोकांचे ऐकून त्यानीहि अपघात आमच्याच गाडीने केल्याचे गृहीत धरले होते.आणि बातमी लिहायला ते तिथे आले होते.त्यांच्याशी आम्ही बोललो मग त्यांनी गाडी व सायकलचे निरीक्षण केले आणि गेले. एव्हाना समीर काळभोर यांनी पर्यायी बसची व्यवस्था केली होती.स्थानिक चालक नौशाद यांनीही खूप मदत केली.चालकाची मेडिकल आणि जबाब झाल्यावर आम्ही निघालो. कारण चालक तमिळ होता.त्याला मराठी येत नव्हते. आम्ही तिथून निघालो. तेव्हा पाच वाजून गेले होते.अपघात सव्वाबाराला झाला होता..तसेच पारोसे देवळात जाऊन दर्शन घेऊन प्रवास पुढे सुरु झाला.आज गाडी मालक जाऊन त्याला घेऊन आले आहेत. दरम्यान यापुढे अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत करू धजेन का?याचा विचार मला पडला आहे..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26016
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

नॅशनल हायवेवर सायकली आणू शकतो. एक्स्प्रेस वे वर सायकलीच काय दुचाकीही आणू शकत नाही. मुंबई - गोवा हा नॅशनल हायवे आहे. ज्या गावांमधून जातो त्या गावकर्‍यांना त्याचा वापर करावाच लागतो. अगदी गुरे घेउन जाण्यासाठी सुद्धा. (यामुळेही बरेच अपघात होतात.) खरे तर नियमाप्रमाणे बांधलेल्या हायवेला सर्वीस रोड असावा लागतो. पण मुंबई-गोवा रोड साठी ते एक स्वप्न आहे.

त्याची ही अवस्था फिट आल्यामुळे झाली का? "त्याच्या डोक्याला जखम झालेली,डोळे उघडे,जीभ दातातून बाहेर आलेली,त्यामुळे तोंडातून रक्तस्राव होत असलेला." तिथल्या डॉक्टरांनी त्याला पाहिल्याबरोबर हे जाहीर का केले नाही? जर डॉक्टरांनीच सांगितले की हा अपघात नसून फिट आहे, तर जमावाची सर्व हवाच निघून गेली असती.

हे वाचून धक्का बसला आणि तुमच्या धैर्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे हे सांगायचे राहिले.

काय बोलणार ! आजच्या काळात दुसर्‍याला मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा /कुर्‍हाड चालवुन घेणेच ठरेल असे दिसते ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aao Raja... ;):-Gabbar Is Back

सुरंगीताई तू खूपच धीराने वागलीस ! प्रसंगावधानाला प्रणाम !! जवळच्या नात्यातील व्यक्ती वेळेवर मदत न मिळाल्याने वारली. मागे बायको न दीड वर्षाचा मुलगा आहे. ते जवळून अनुभवलय. म्हणून असे वाईट अनुभव आले तरी मदत करायचे सोडू नये असेच म्हणेन. अर्थात स्वतःची सुरक्षितता आणि परिस्थितीचे भान ठेवूनच !

सुरंगी ताई, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागून बर्याच गावात डांबरट लोक आहेत. खाजगी गाड्यांच्या पुढे कोंबड्या सोडणे आणि कोंडी मेली कि गाजावाजा करीत एका कोंबडीचे २०० रुपया पासून पाचशे पर्यंत पैसे उकळणे, काही बारीकसा अपघात झाला तरी मोठा गहजब करणे आणि गाडीवाल्यांपासून पैसे उकळणे हे धंदे तेथे सर्रास चालतात. माझे वडील रोह्यात पेपर मिल मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक होते तेंव्हा अशा बर्यच घटना त्यांनी पाहिलेल्या आहेत. जमावाची बुद्धी १० वर्षाच्या मुलासारखी असते.त्यात ज्याचे वाहन मोठे त्याची चूक हा नियम मग यात रिक्षावाला हि येतो. श्रीमंतीचा द्वेष करणे हे लहानपणापासून मनावर बिम्बवलेले आहे. श्रीमंत माणूस म्हणजे गरिबाना पिळूनच श्रीमंत होतो हे ब्रम्हवाक्य.त्यातून स्थानिक राजकारणी लोक आपल्याला मदत करतील हि अपेक्षाच चूक आहे. कारण कोणताही राजकारणी आपल्या मतपेटीच्या विरुद्ध जाणारच नाही हे हि ब्रम्हवाक्य. उलट ते समाजाला खुश करण्यासाठी आपल्याला गोत्यात आणण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत हि वस्तुस्थिती. स्थानिक पोलिस सुद्धा यात संधी शोधणार नाहीत हि शक्यता कमीच. कारण तुम्हाला अडकवून ठेवण्यात त्यांना चार पैसे सुटत असतील तर ते तुम्हाला सोडवण्याचा मुद्दाम प्रयत्न करतील असे नव्हे. अशी परिस्थिती असताना आपण आपला जीव धोक्यात घालून समाजकार्य करण्यात कोणताही हशील नाही. तेथे थांबून तुम्ही गोत्यात येण्यापेक्षा पुढे जाऊन पोलीसाना खबर देणे हाच शहाणपणाचा उपाय आहे. हे काम सार्वजनिक दूरध्वनीवरून करावे आणि आपला भ्रमणध्वनी आणि आपल्या स्वतःचे वाहन असेल तर त्याचा नंबर पोलिसांना चुकुनही देऊ नये. चार दिवसांनी आपल्या घरात समन्स घेऊन पोलिस उभे राहिले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नये. आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेस पाच सात वर्षांनी आपल्याला स्थानिक न्यायालयात उभे राहण्याचे समन्स नक्की येते. (जो माणूस सरकारी नोकरीत असतो/ किंवा ज्याचे वर लागे बांधे असतील त्याच्या मागे पोलिस सहसा लागत नाहीत) आपण केले ते काम प्रशंसनीय आहे परंतु समाजाने आपल्याला बेदम चोपले असते तर आपण स्वतःचा जीव वाचवणार कि त्या व्यक्तीचा. डॉक्टराना होणार्या मारहाणीच्या घटना नंतर भारतभर बर्याच डॉक्टरानी आता रुग्णाला जरा जरी धोका असेल तरीही आमच्याकडे सोय उपलब्ध नाही तेंव्हा तुम्ही मोठ्या/ सरकारी रुग्णालयात घेऊन जा हे सांगायला सुरुवात केली आहे. आपल्या उदाहरणातहि पालीच्या रुग्णालयात डॉक्टरला काहीही कारण नसताना मारहाण केल्याचे आपण म्हटलेच आहे. तेथे सोयी उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. असे काही सुरस किस्से आहेत परंतु धाग्याचे अपहरण होऊ नये म्हणून मी ते येथे टाकत नाही. समाजाची मनोवृत्ती जोवर बदलत नाही तोवर काही निष्पाप माणसांचे असेच बळी जाणार हि खरी शोकांतिका आहे.

In reply to by सुबोध खरे

समाजाची मनोवृत्ती जोवर बदलत नाही तोवर काही निष्पाप माणसांचे असेच बळी जाणार हि खरी शोकांतिका आहे.
खरेकाका, याला अगदी अगदी सहमत.. मग तिकडे सरकार कोणाचेही येऊ दे ..

अत्यंत मनस्ताप देणारा अनुभव आहे तुमचा. झालेला प्रकार समजून न घेत जे काही त्या जमवणे केले ते अत्यंत अयोग्य आहे. कोणत्याही ठिकाणी जेव्हा जमाव एकवटतो तेव्हा खुपदा जमावाची प्रवृत्तीहि नुकसान करणे, हिंसाचार करणे किंवा लुबाडणे अशा गोष्टींकडे झुकणारी असते. अशा प्रकारची हीन मनोवृत्ती ठेवून लोकांना कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो किंवा मिळवायचा असतो ? मुंबईच्या बाहेर गेल्यावर असे प्रसंग जास्तच आढळतात. त्याहीपेक्षा हि मुंबई - पुण्याची माणसे चिक्कार पैसा असेल त्यामुळे घ्या लुबाडून त्यांना अशी प्रवृत्ती असते. पण त्याक्षणी तुम्ही जे धैर्य दाखवलेत त्याला तोड नाही.

म्हणजे ज्याचं करावं भलं.. असा प्रकार झाला की... स्वाती

सुरन्गीताई, तुम्हाला खरंच सलाम. हा अनुभव खूपच वाईट आहे. पण कधी कधी खरोखर गरज पण असते. मागच्या वर्षी माझ्या काही नातेवाईकांचा मोठा अपघात झाला. पण तो अपघात झालाय एवढं आम्हाला कळेपर्यंत त्यांना कुणीतरी अज्ञात लोकांनी हॉस्पिटलमधे पोहचवून अ‍ॅड्मिट केलं होतं. आमच्याकडून काही हालचाल होण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु झाले होते. त्यामुळे गाडीतल्या तिघांचे तरी जीव वाचू शकले. कुणी अ‍ॅडमिट केलं हे कळलं का नाही मला माहीत नाही. पण अशाच कुणीतरी सज्जनांनी मदत केल्याचं आम्ही विसरू शकत नाही.

In reply to by पिशी अबोली

मीही शाळा-कॉलेजात असतांना अश्या जखमी, चक्कर येऊन पडलेल्या लोकांना मदत केलीय. एकदा रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला, म्हणून नागपूरच्या उन्हाळ्यात दोन-तीन किलोमीटर सायकल हाणत गेलो, पोलिसांना सांगितलं. पोलिस सोबत घेऊन पोहचेपर्यंत तो माणूस तिथून गायब झाला होता, म्हणून पोलिसांच्या शिव्यापण खाल्ल्या.. आणि एकदा एका माणसाला जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलम्ध्ये घेऊन गेलो.. तोपण गरीब आणि आमचेपण खिसे रिकामे तरी तिथल्या डॉक्टरांनी त्याच्यावर मोफत इलाज केले. त्याच्या घरच्यांनी तिथे पोहचल्यावर आमचे हात जोडून आभार मानले, तीच पोचपावती.. पण आता सुरन्गीताईंचा अनुभव आणि इतरांचे प्रतिसाद वाचून वाटतंय की 'या तो हम तब बच्चे थे, या फिर दुनिया इतनी जालिम ना थी'.. आता मात्र एक तर माणुसकी नको दाखवायला किंवा मग स्वॅप्स म्हणताहेत तसं कमरेला बंदुक असल्यासच..

बाप रे भयानक अनुभव. तुमच्या शौर्याला आणि त्या "प्रेझेन्स ऑफ माईंड' ( मराठी शब्द माहिती नाही) ला सलाम!!!!

तुझ्या प्रसंगावधानासाठी _______/\______

आपल्या धाडस आणि प्रसंगावधानाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आपला समाज अजूनही नागरी संस्कृतीच्या पहिल्या पायरीवरच आहे ही अनेकदा मांडली गेलेली स्थिती अशा प्रसंगांतून पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहते आहे. अद्यापही टोळीसदृश म्हणजे ट्रायबल मानसिकतेत वावरणारी आपण माणसे. सदैव एखाद्या टोळीप्रमुखाच्या आज्ञेखाली वावरायचे. व्यक्तिगत मत, व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद यांचा मागमूसही नाही, तेथे व्यक्तिविकासाचे प्रकाशकिरण झिरपायचेच कसे? सिविल सोसायटीचे काही नियम, कायदेकानून असतात हे आपल्या गावीही नसते. गावकी, भावकी, पंचायत यातच आपण गुंतून राहाणार. आमचे जंगल, आमची गल्ली, आमचे राज्य या मिजाशीतच वावरणार. झुंडशाही हीच आमची सिस्टिम. त्यालाच हवंतर तुम्ही लोकशाही म्हणा. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या महत्तेच्या आत्मगौरव-गुंगीतून आम्ही कधी बाहेर पडू? खर्‍याखुर्‍या सिविल सोसायटीच्या निर्माणाची पहाट आमच्याकडे कधी उगवेल?

छान प्रसंगावधान दाखवल.बाकी खेडवळ लोक डांबरट असतात हे पुन्हा सिद्ध झाले.

रत्नागिरीच्या माझ्या काकांचा रस्ता ओलांडत असताना अपघात झाला. दहा ते पंधरा मिनीटे रक्ताच्या थारोळ्यात तळमळत पडले होते. इस्पितळ अगदी हाकेच्या अंतरावरच होते. पण बघ्यांनी त्यांना तिथल्या इस्पितळात नेण्याची तसदी घेतली नाही, ते बघ्यांच्या भूमिकेतच राहिले. कदाचित त्यांना 'नको त्या भानगडीत' पडायचे नसेल.

तुमच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल, हे अगदी नीट समजू शकतो. स्थनिकांच्या गुंडगिरीमुळे किंवा ओळखींमुळे खुपदा वेगळीच तक्रार नोंदवली जाते. एक 'न केलेल्या अपघाताची' खूप मोठी कहाणी माझ्याकडेही आहे, जमेल तेंव्हा सविस्तर लिहायची खूप इच्छा आहे, कधी योग येतोय कुणास ठाऊक?

बाबौ!!!! जास्त पुरुष मंडळी असती तर त्यांना जमावाने फारच त्रास दिला असता. परिस्थिती चांगली हॅन्डल केलीत. तरी त्यावेळचा ताणतणाव आणि चुक नसताना झालेला त्रास हा वाइटच की.

शंभरावा

अशा जखमी माणसाला आपण मदत केलीत हे तुमच्या संवेदनशीलतेचे उदाहरण आहे. ____/\_____. अन्यथा अशा वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्याने पेशंट्ची परिस्थिती चिघळू शकते. अर्थात तुम्हाला आलेला अनुभव संतापजनकच आहे. पण अशावेळी आपला एक फोनदेखिल एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. माझ्या नात्यातल्या काही व्यक्ती वाहन अपघातात जबर जखमी झाल्या होत्या. पैकी एका घटनेत तर एका बड्या धेंडाने अपघात केल्याने पोलिसांनीही आम्हालाच मिटवुन घेण्यासाठी दमदाटी केली होती. :(

ओह्ह!! कठीण आहे :( भयंकर अनुभव आहे हा सुरंगीताई.