Skip to main content

धुळवड

धुळवड

Published on 05/03/2015 - 11:18 प्रकाशित मुखपृष्ठ
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते. धूळ उडवून ही धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे. पोर्णिमेच्या दिवसापासून चालू झालेल्या या सणाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी वाड्या-वाड्यातील गावकरी डोल-ताश्या, सनई घेऊन वाजत-गाजत गावातील एका ठराविक ठिकाणी गोळा होतात. या ठिकाणाला 'मांड' म्हणतात. पुरेशे गावकरी गोळा झाल्यावर होळी उभारण्यासाठी लागणाऱ्या आंब्याच सरळ किंवा माडाच उंच झाड तोडतात. त्याची उंची साधारणता ४० ते ५० फुट असते. तत्पूर्वी त्या झाडाची गावातील प्रमुखांव्दारे पूजा केली जाते. तोडलेलं ते झाड ज्याठिकाणी होळी उभारायची असते त्या मंदिराच्या ठिकाणी घेवून जातात. तिथे घेऊन गेल्यावर त्या तोडलेल्या झाडाची बाहेरची साल काढली जाते आणि त्यावर आंब्याच्या पानं बांधून वरच्या टोकाला भगव्या रंगाचा झेंडा बांधतात. अशाप्रकारे ही होळी सजवून झाल्यावर जमिनीमध्ये होल मारून ती उभी केली जाते. हि होळी उभी करण्यासाठी जी कसरत आणि मेहनत घेतली जाते ती वाखाण्याजोगी आणि स्पुर्तीदायक असते. कुटल्याही मशिनरींचा वापर न करता एकीच्या बळावर हे गावकरी ती होळी लीलया उभी करतात. त्यानंतर ब्राम्हणांच्या सहाय्याने पुन्हा तिची पूजा होते. त्यानंतर ४-५ फुटाचा गवताचा घेरा करून त्या गवताला डोल-ताश्यांच्या गजरात अग्नी दिली जाते. त्यानंतर त्या होळीला कोकणी पध्दतीने गाऱ्हाण घालतात. त्यामध्ये एक वाक्य असते 'जोकोण आजपासून शिमगो संपापर्यंत बोंबटात नाय तो………. (कोकणी शिवी)' हेही त्यामध्ये असते. शिमगा संपेपर्यंत दर संध्याकाळी वाड्या-वाड्यातील गावकरी डोल-तश्याच्या गजरात 'हव्वा हव्वा' असे जोर जोरात ओरडत, नाचत होळीला भेटायला जातात. या ओरडण्याला आणि नाचण्याला 'रोंबाट' म्हणतात. 'रोंबाट' हा प्रकार या होळी सणाचा एक आकर्षक भाग असतो, लहान-थोर, हवशे-नवशे या 'रोंबाटा' मध्ये बेधुंद होवून नाचत ओरडत असतात. शिमग्यातील दिवसाच्या वेळी गावा-गावातील काही लोक आपल्या वेशभूषा मध्ये बदल करून, वेगवेगळी सोंग घेवून घरोघरी 'शबय' मागायला येत असतात. शबय मागण्याची पद्धतही हटकि असते. 'शबय-शबय-शबय…… आयनाचा बायना घेतल्याशिवाय जायना' हे ठरलेलं वाक्य. तसेच पुरुषाला साडी नेसवून राधा बनवली जाते आणि घरोघरी गाण्यांच्या तालावर नाचवलं जात. असे वेगवेगळे काही गंमतीशीर, काही पारंपारिक उपक्रम या होळी सणामध्ये होत असतात. सणाच्या शेवटच्या दिवशी माणसांनाच घोड्यांसारख सजवून घोडेमोडणी आणि देवाच्या प्रसादाने होळीच्या सणाची सांगता करण्यात येते. असा हा बोंबाबोंब करणाऱ्या सणाची रंगत अलीकडच्या काळामध्ये कमी झालेली दिसते. असे म्हटले जाते की होळी सणामध्ये गावातील वाड्या-वाड्यातील भांडणे नव्याने उगाळून काढली जातात. त्यामुळे बऱ्याच गावातील हा सण कोर्ट कचऱ्या पर्यंत जावून बंद स्थितीत पडलेला आहे. जर का गावकऱ्यांनी अशाप्रकारचे वाद थांबवून हा सण पूर्वीप्रमाणेच तेवढ्याच पारंपारिक श्रद्धेने आणि पवित्र्याने साजरा केल्यास याचे आकर्षण नव्याने अनुभवास येईल. भरत माळकर -भांडूप
लेखनप्रकार

याद्या 4253
प्रतिक्रिया 9

मस्त लिहिले आहे. पण
आंब्याच सरळ किंवा माडाच उंच झाड तोडतात
हे नक्की का? या (होळीच्या) दिवसात आंब्याचे झाड तोडतील असे वाटत नाही आणि तळकोकणात मी तर बर्‍याच नातेवाईकांच्या, परिचितांच्या तोंडुन माड तोडणे अशुभ / पाप असते असेच ऐकले आहे. होळीला एरंडाचे झाड सर्रास तोडतात असे पाहिले आहे. तसेच होळीसाठी लाकडे चोरुनदेखिल आणायची प्रथा आहे मात्र हल्ली सरपणाचा वापर कमी झाल्यामुळे ही प्रथासुध्दा जवळ्-जवळ बंद झाली आहे. तळकोकणचे अजुन लेख वाचण्यास उत्सुक (तळकोकणप्रेमी) सौंदाळा

छान माहिती. होली के दिन दिल मिल जाते है असे आमचे पाजी म्हणतात. आज मला थंडाई फ्लेवर गिफ्ट आला आहे. उद्या त्याची थंडाइ बनवणार.

छान माहिती. होळीसाठी काही ठिकाणी आंब्याचे (कितीही लगडला असेल तरीही होळीसाठी कोणीही नाही म्हणत नाही) तर काही ठिकाणी सूरमाडाचे (नारळाचे नाही) झाड तोडतात. काही गावातून शेवरीची होळी पण असते. पण एरंडाची होळी मी तरी कुठे पाहिली/ऐकली नाही.

In reply to by Nidhi

माझ्या गावी निपाणीला, एरंडाची फांदी मधे उभी करुन त्याभोवती शेण्या (गोवर्या) रचतात. होळी जळाल्यावर ती फांदी ज्या दिशेला पडेल तिकडे अवंदा पाऊस ज्यादा पडंल म्हणतात. या होळीला अर्पण केलेल्या पोळ्या अर्धवट जळाल्या असताना मधेच काढून पोरं प्रसाद म्हणून वाटतात.

छान आणि माहितीपूर्ण लेख. 'होळी' आणि 'शिमगा', 'रंगपंचमी' आणि 'धुळवड' ह्या शब्दांचा वापर वाचून छान वाटले. 'रोंबाट, शबय, हव्वा' हे शब्द आधी ऐकले नव्हते, हे अपभ्रंशीत शब्द आहेत का ? असल्यास मुळ शब्द कळतील का ? "आयनाचा बायना घेतल्याशिवाय जायना" ह्या अपभ्रंशीत वाक्याचे मूळ वाक्य, "(आज)आई नाही की बहिण नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही" असा आहे, असे वाचल्याचे आठवते. लेख मस्तच.