मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तो वेडा आहे भाग १

चिनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तो वेडा आहे ! आजपर्यन्त जितक्या वेळा मी माझ नाव ऐकलं नसेल त्याहून जास्त वेळा मी हे वाक्य ऐकलं आहे. वेडा! वेडा! वेडा!. कधी कधी वाटतं हेच आपलं नाव आहे का? नाही..नसावं. आईने कधीच मला या नावाने हाक मारल्याच आठवत नाही. कधी कधी बाबा वैतागून म्हणतात.पण लगेच आई त्यांना रागावते. माझा दादा पण नावानेच हाक मारतो. पण मग बाकी सगळे मला वेडा का म्हणतात. लहानपणी वर्गातल्या बाईंनी वेडा म्हणून मला वर्गाबाहेर काढलं. नंतर मुख्याध्यापक बाईंनी शाळेबाहेर काढलं. म्हणाल्या की कोणत्याच विषयात याची प्रगती नाही. खरं म्हणजे चित्रं चांगले काढायचो मी...अजूनही काढतो. तर म्हणाल्या की चित्रकला हा काही विषय नाहीये. मग शाळेत शिकवतात कशाला ? मग चित्रकलेचे सर सुद्धा वेडे आहेत का ? काही कळत नाही. आता मी दिवसभर घरीच असतो. घरात बसून कंटाळा आला की मी आंगणातल्या जिन्यावर जाऊन बसतो. येणारे जाणारे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात. त्यांच्या मुलांना सांगतात," ऐ तो वेडा आहे. जवळ जाऊ नको." माझ्या जवळ येण्याने काय होतं? कळत नाही. आई म्हणते तू त्यांना त्रास नको देऊ. म्हणजे ते असा करणार नाहीत. मी रस्त्यावरून जाणाऱ्या सगळ्यांकडे बघून हसतो. हसणं म्हणजे त्रास देणं होतं का ? काही मुले माझ्या दिशेने दगड फेकून मारतात. कधी कधी लागतो मला. कोण कोणाला त्रास देतंय? गल्लीतली मुलं क्रिकेट खेळत असतात. ते मला ब्याटिंग आणि बौलिंग काहीच देत नाहीत. तरीपण सगळे मला 'सचिन' म्हणतात. नालीत वैगेरे चेंडू गेला तर मला काढायला लावतात. मला सचिन म्हटलेलं माझ्या दादाला आवडत नाही. तो त्यांच्यासोबत खेळत नाही. मलापण खेळू नको म्हणतो. पण वेडा म्हणून घेण्यापेक्षा सचिन चांगलंय ना म्हणून मी खेळतो त्यांच्यासोबत. दादा चांगला आहे. खूप गप्पा मारतो माझ्यासोबत. शाळेतल्या गोष्टी सांगतो.पाणीपुरी खायला घेऊन जातो. मला शाळेत न्यायची त्याची इच्छा असते. पण आई नाही म्हणते न्यायला. आई मला घरीच शिकवते. बेरीज, वजाबाकी करता येते मला. भागाकार,गुणाकार कठीण वाटतात. पण प्रयत्न करतो मी. मागे एकदा आईने साखर आणायला दुकानात पाठवलं मला. दुकानातले काका म्हणाले," २२ रुपये किलो साखर आहे. चार किलोचे ९० रुपये झाले." १० रुपये वापस केले १०० ची नोट दिल्यावर. मी गुणाकार केला तर ८८ येत होता.पण त्यांनी ऐकलं नाही. म्हणाले, " तुला गुणाकार येत नाही." घरी आल्यावर आईला विचारलं तर म्हणाली तुझा गुणाकार बरोबर आहे. पण मग ते काका असं का म्हणाले? संध्याकाळी दादा रागारागाने त्यांचाकडे गेला. तर ते म्हणाले ," मी पूर्ण पैसे दिले होते. तुझ्या भावाने २ रुपयांचं काय केलं मला काय माहिती?" मी कशाला काही करणार २ रुपयांचं ? आईच्या डोळ्यात पाणी आलं हे ऐकून. मी म्हणालो,"आई रडू नकोस. मी २ रुपये आणून देईल तुला." आई अजूनच रडायला लागली. म्हणाली," २ रुपये नको आहेत रे बाळा मला." !! खरं म्हणजे माझ्यासाठी पुरणपोळी करायलाच आईने साखर आणायला पाठवलं होतं. मी खाल्ली पुरणपोळी. छान झाली होती. पण का कोण जाणे आई ने खाल्लीच नाही ! क्रमश:

वाचन 5994 प्रतिक्रिया 0