" कळश्या भोसडीच्या खेळायला का येन्नास . लगीन बिगिन केल्यास कि काय . च्यायला पोरगी घावली तुला . दोस्ताबरोबर खेळूस लाज वाटते स्हाय्बास . . "
शनिवारी संध्याकाळच्या अगदी Peak Hours च्या गर्दीत . सिग्नल सुटताना गाडीला किक मारली . गियर टाकून पुढे जाणार तेवढ्यात हे वाक्य पडलं आलं . आलं म्हणण्यापेक्षा . आदळलं म्हणू शकतो . . आता यावर नॉर्मली मी भ , फ ची बाराखडी सुरु करतो . पण . .
पण . खूप खूप प्रयत्नानंतर मागची सीट योग्य त्या कामी उपयोग होईल अशी व्यवस्था केली होती . डावीकडचा आरसा थोडासा वाकवून . . डायरेक बघता येईल अशी सोय केली होती . थोडी वायफळ बडबड आणि थोडी फेकाफेकी याने या मागल्या सीट वरल्या सुबक ठेंगणीला हसवत आणि थोडं थोडं इम्प्रेस करणं चाललं होतं . . आणि . त्यात हि अशी भाषा . . छी छी छी !! . .
असो . तर .आता उजवी कडे तो शिवी देणारा मुलगा . आणि मागे हि आमची ती हि . दोघेही बघताएत . मी काय उत्तर देतो याकडे लक्ष देऊन . त्यातल्या त्यात शांतपणे म्हणालो . "म्हमद्या . तुला नंतर भेटतो ग्राउंडवर तिथेच बोलू . आपल्या भाषेत . "
त्यावर हि तो म्हणालाच . . "येन्नास तू भावड्या . लई मोठा झालास तू"
आणि तो सुटला . नेहमी प्रमाणे वेगात . आणि मी मागून कानात पडणाऱ्या . "हळू रे हळू . भीती वाटते . . ए तो कोण होता . शिवी का दिला तुला . आणि तू शिवी खाउन पण गप्प का बसलास . ए हळू चल ना . भीती वाटते . " च्या आरड्या ओर्ड्यात जमेल तेवढ्या वेगात . . चक्क ३० किमी प्रती तास एवढ्या वेगात जात राहिलो .
तिला तिच्या घरी सोडलं . आणि मी निघालो माझ्या घरी . आणि नेहमी प्रमाणेच . मी ग्राउंड वर जायचं विसरून गेलो .
पण जाताना म्हमद्या . आणि त्याच्या दिसण्याने ते सगळे जुने दिवस . आठवून मस्त वाटत होतं .
कळश्या . हे काही माझं नाव नाही . किंवा माझ्या नावाचा कोणताही अपभ्रंश नाही . पण . तरी हे नाव मला पडलं होतं ते ह्या म्हमद्या . किंवा . मोहम्मद देसाई मुळे .
एका १५X १५ च्या छोट्या खोलीत आपल्या बहिणीबरोबर राहणारा . पहिल्यांदा खेळायला गेलो . तेव्हा . कोणाच्या तरी पायाला माझी लाथ बसली . आणि तो मुलगा म्हणाला . "मायला क्याल्शियामच्या गोळ्या खातो का बे रोज . . लागलं कि मला . "
खेळाच्या जगाचं एक मस्त असतं , एकदा मैदानावर गेलं कि लॉजिक , ओळख . इत्यादी बाहेरच्या जगातले विषय आड नाही येत कधी . लागतं ते फक्त फुटबाल विषयी वेड . आणि पायात बूट . .
आणि तेवढ्याच जोरावर आमची हि रोजची फुटबाल क्लबवारी सुरु झाली होती .
त्या एका वाक्यामुळे . मला calcium आणि म्हमद्या च्या इंग्रजीच्या अज्ञान्यामुळे त्याचा झालेल्या कळश्या . अशी विचित्र नावं मला पडली होती .
माझ्यापेक्षा ४-५ वर्ष मोठा असेल . कुठल्या तरी गेरेज मध्ये काम करतो . बहिणीला शिकवलं . पण स्वतः काही शिकला नाही .
पण एकदा ग्राउंड वर उतरला . कि नुसता वेग वेग आणि वेग . त्याला मागून गाठणे अशक्य . समोरून पाडवणे हाच एक उपाय . ज्यात मी चांगलाच होतो .
प्रत्येक वेळा पडला कि पुढची ५-१० मिनिटे असंख्य चित्र-विचित्र शिव्या . आणि नंतर . "कळश्या मेरी जान . चिडला का बे . अरे मी काय साला शिकलो नाय तुझ्या सारखा . मी शिकलो ते फक्त बेवड्या बापाच्या शिव्या . डोक्यात नको ठेऊन घेऊ . घरी जाताना चहा देतु तुला . " असं स्वतःच म्हणायचा . . यामुळे खेळून परत सरळ घरी जायचं सोडून वाटेतल्याच छोट्या हॉटेलात बसून चहा चे भुरके घेत कधी एकमेकाची टिंगल करत किंवा जगाच्या कोपऱ्यातल्या कोणत्याही विषयावर बडबड करण्याचा प्रोग्राम रोजचा झाला होता .
याच्या या शिव्या देण्यामुळे आणि तापट पणामुळे खूपदा अडचणीत आला . आम्हालाही आणलं . एकदा रेफ्री ने फ्री किक नाही दिली . याने पुढच्या १० मिनटात रेफ्री ला ३ वेळा मारला बॉल . आणि प्रत्येक वेळी . "साल्या कळश्या . पुढे ये कि कवर ला . सरांना बसतो ना बॉल तुझ्यामुळे " असं म्हणायचा .
पुढे मी पण हाच खेळ चालू केल्यावर दोघानाही बाहेर काढलं होतं . दोघांचीही डोकी तेवढीच गरम . पण हा माणूस तेवढ्याच लवकर थंड पण व्हायचा . याच्या एकट्याच्या जोरावर आम्ही मिड फील्ड आणि डिफेन्स मध्ये केलेल्या चुका हि खपून जायच्या . खात्री होती . हा काही न काही गोंधळ घालेल . आणि करेल एखादा गोल .
पण मग . माझी नोकरी . आणि मधेच पुणे वारी . असं साधारण २ एक वर्ष काहीच संपर्क नवता . खेळ हि बंद पडला .
शनिवारी दिसला ते अगदीच बारीक झाला होता . डोळे हि खोल गेले होते . . याच्या बापाने याला दिलेली एकच गोष्ट . व्यसन . दारू आणि बिडी .
दिवसभर गेरेज मध्ये काम आणि बिडी . रात्री दारू . सकाळी खेळ . मग परत तेच . हाच याचा दिनक्रम .
दोन तीन आठवड्यांनी सकाळी एक फोन आला . . "कळश्या काय? "
गेली ५-६ वर्षे आम्ही त्याला मोबाइल घे म्हणून सांगत होतो . शेवटी त्याने घेतला असेल म्हणून खुश झालो . पण तरी एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारलं .
"हो . कोण बोलतंय . म्हमद्या? "
तो:- नाही . मी अविनाश रे . म्हमद्या गेला . अर्धा तास झाला . झटका आला त्याला .
बेवडं सालं . दारू पिता पिताच मेलंय . येउन जा . संध्याकाळपर्यंत ठेवणार आहोत . आपणच आहोत खांद्याला .मौलवी येईल संध्याकाळी . खेळायला बोलवत होता म्हमद्या सगळ्यांना . सगळे आले . तू नाही आलास . आता तरी येतोस ना?
एकदम काय बोलावं काही सुचलंच नाही .
समोरचा मुलगा बिचारा कितीतरी वेळ ' हेलो हेलो ' करत होता .
शेवटी कसं तरी म्हणालो .
" हो . येतो . खांद्याला येतो . रात्रीच उरकू . "
च्यायला . हे लोक अगदी कमी दिवसात इतक्या जवळ येतात . कि ते गेल्यावर . नेहमीच्या ओळखीच्या ठिकाणी जायला सुद्धा नको वाटतं . माझं ऑफिस टायमिंग सेकंड शिफ्ट ला गेल्यावर परत खेळायला जायचा विचार करत होतो गेले काही दिवस . . नकोच वाटतंय आता .
डिफेन्स ते त्यांच्या कोर्नर पर्यंत बॉल पळवल्यावर आम्ही क्रॉस करणार . पण तिथे साला तिघांच्या मधून सुसाट पळत येउन डाइव करत हेडर मारून गोल करून लहान मुलासारखा नाचायला किंवा क्रॉस चुकल्यावर . " जीव दे XXXXXXXX . . एक क्रॉस करूस येन्नाय " असं म्हणत चिडून एकटाच बॉल पळवणारा म्हमद्या नसेल . .
वाचने
3731
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कथा आवडली.
आवडलं पण म्हणता येईना..
चटका लावणारी कथा.
कथा मस्त पण...
"लिहायचं" शिकतोय अजुनी . .
In reply to कथा मस्त पण... by बोका-ए-आझम
कथा आवडली...
+१
In reply to कथा आवडली... by मुक्त विहारि
+१११. चटका लावुन गेली.
In reply to +१ by स्पंदना
=११११
In reply to +१११. चटका लावुन गेली. by प्यारे१
मूवी काका , अपर्णा ती , आणि
ताई *
In reply to मूवी काका , अपर्णा ती , आणि by अद्द्या
कथा आवडली, थोडी आटोपती
छोटी आहे म्हणून आणखीच
सत्यकथा आहे ना ? श्रद्धांजली