पूर्वेच्या समुद्रात -- २
लेखनप्रकार
आमचे जहाज संध्याकाळी गोव्याच्या आसपास पोहोचले. अर्थात हे फक्त आम्हाला जी पी एस आणि दीप स्तंभांवरून कळत होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्रकिनारा दिसत नव्हताच. पण गोव्याच्या आसपास पोहोचल्यावर तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात संपर्क केला असता पुढचे दोन दिवस गोवा ते कारवार अशी गस्त घालण्याचे आदेश मिळाले. म्हणजे सरळ दक्षिणेकडे कूच करायच्या ऐवजी तिथेच खेटे मारत राहायचे होते.
आता हे का करायचे तर पावसाळ्यात मासेमारी बंद असते. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो त्यामुळे मत्स्यबीज कमी होऊन पुढच्या वर्षभर तुटवडा जाणवू नये म्हणून केलेली बेगमी असते. परंतु या काळात आपल्या देशाऐवजी दुसर्या देशात मासेमारी करता येते म्हणून श्रीलंकेचे किंवा इंडोनेशियाचे मासेमार कारवार गोव्या पर्यंत येतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि आपल्या साधन संपत्तीचे रक्षण करणे हा या गस्त घालण्याचा हेतू असतो. तट रक्षकाची पांढरी जहाजे दिसली कि हे मासेमार घाईघाईने परत जातात. अर्थात यासाठी दोन तीन दिवस अशा खवळलेल्या समुद्रात नुसते इकडून तिकडे फिरत राहणे फारच कष्टदायक वाटत होते. मुळात विक्रांतवर २ वर्षे राजासारखे राहिलो होतो. शिवाय ते जहाज वज्रच्या १६ पट मोठे होते. त्यामुळे विक्रांतवर समुद्र/ बोट लागणे हे फारच कमी होत असे.
दुसर्या दिवशी सकाळी आमचा अधिकार्यांचा स्वयंपाकी चक्कर येउन पडला म्हणून शुभ बातमी माझ्या सहाय्यकाने दिली. त्याला पहिले तर हा पठ्ठ्या दोन दिवसापासून उपाशीच होता आणि जरा उभा राहिला कि त्याला उलटी येत असे. कसे तरी त्याने रात्रीचे जेवण तयार केले होते. मग मी त्याला माझ्या दवाखान्यात घेऊन आलो. त्याला सलाईन लावले उलटी येऊ नये म्हणून औषधाचे इंजेक्शन ठोकले आणि तेथे झोपवून ठेवले. सकाळी न्याहारीची वेळ झाली तेंव्हा न्याहारीला काहीच नव्हते. मग आम्ही सर्व अधिकार्यांनी सैनिकांच्या मुदपाकखान्यातून मैगीच्या नुडल बनवून आणल्या आणि खाल्या. दुपारच्या जेवणाची काहीच तयारी नव्हती. त्यामुळे दुपारच्या जेवणातसुद्धा मैगीच्या नुडल खाल्या. संध्याकाळी समुद्र जास्तच खवळला होता आणि जहाज फारच वरखाली होत होते. सैनिकांच्या मुदपाकखान्यातून सुरणाची भाजी आणि जाड जाड कमी भाजलेल्या रोट्या (पोळ्या) आणि एक पिवळी दाल आणि फडफडीत भात असा स्वयंपाक आणला होता त्याच्या कडे बघूनच माझी भूक गेली त्यामुळे रात्री मी फक्त थंडा फराळ केला. हा स्वयंपाकी माझ्याच दवाखान्यात आडवा झालेला होता आणि त्याची काही काम करण्याची मुळीच मानसिक स्थिती नव्हती. एक दिवस तर मी त्याला पूर्ण विश्रांती दिली होतीच. पण त्याचा साथीदार सुद्धा फारशा चांगल्या स्थितीत नव्हता.त्यामुळे त्याने अधिकाऱ्यांच्या ऐवजी सैनिकांच्या स्वयंपाकघरात जाऊन तेथील इतर स्वयंपाकि यांच्या मदतीने जे जमेल तसा स्वयंपाक केला होता.
या जहाजांमध्ये मुळात बरेचसे तरुण सैनिक असल्यामुळे त्यांना बोट लागणे हे प्रकार जास्त होतात. त्यातून वादळासारखी परिस्थिती असेल तर अजूनच वाईट. त्यामुळे आपल्याला चांगले जेवायला मिळत नाही म्हणून त्याच्या डोक्यावर बसणे मला अमानुष वाटत होते. याचा थोडासा फायदा त्याने दुसर्या दिवशी पण घेतला. दुसर्या दिवशी सकाळी पण आमहाला न्याहारी साठी उकडलेली अंडी किंवा मैगी नुडल यात निवड करायची होती. त्या अंड्यांच्या वासाने मला नकोसे झाले म्हणून मी परत मैगी नुडलच खाल्ल्या. भूक अजिबात नसली तरी काहीतरी पोटात ढकलणे आवश्यक होते. मधल्या काळात मी मधून मधून ब्रिज वर जाऊन काय चालले आहे ते पाहत असे. तेथे रडारवर समुद्रात काहीच हालचाल होताना दिसत नसे. मधूनच एखादा माग(CONTACT) लागला तर तेथे जाऊन पहिले तर एखादे तेलवाहू जहाज आखाताकडून दक्षिणपूर्व आशियाकडे जाताना दिसत असे. कंटाळून मी माझ्या खोलीत आडवा झालो. माझ्याकडे माझ्या बायकोमुलांच्या फोटो चे दोन अल्बम होते ते पाहत राहणे आणी त्यांच्या आठवणीत रमणे हा एक विरंगुळा होता.
दुपारच्या जेवणाच्या वेळेस मी झोपलो होतो. त्यामुळे ते जेवण थोड्या वेळाने वाढपी( STEWARD) परत घेऊन गेला. मी उठलो तेंव्हा दुपारी चार वाजले होते आणी आश्चर्य म्हणजे मला भूक लागली होती. अधिकाऱ्यांच्या जेवण घरात(DINING HALL) गेलो तेंव्हा साम्सूम झालेली होती. वाढपी( STEWARD) राहतो तिथे जाऊन पहिले तर तो झोपला होता. आता काय करावे या विचारात होतो. परत जेवणघरात आलो तेथे एका टोपात(CASSEROLE) मध्ये सकाळच्या मैगी नुडल ठेवलेल्या होत्या त्या एका काचेच्या प्लेट मध्ये काढल्या मायक्रो वेव्ह मध्ये गरम केल्या आणी खाल्ल्या. परत तेथेच बसून राहिलो. काय करावे याचा विचार करत? दिवसभर काय करावे हा खरोखरच प्रश्न होता. काही वाचावे तर जहाज सारखे हलत असल्याने थोड्या वेळानं डोळे आणी डोकं दुखू लागतं. पोटात डचमळत असतच. संगीत ऐकावं तर जहाजाच्या यंत्रांचा आवाज त्याला साथ देत असतो. करायला काही नाही बोलायला माणूस नाही अशी डोक्याची वजनरहित अवस्था काय असते हा अनुभव त्या एका वर्षात पुरेपूर घेतला.. मला एक गोष्ट जाणवली कि आपण दोन दिवस फक्त मैगी नुडलवर काढले. यानंतर मैगीच्या मसाला नुडलवरून माझं मनच उडालं कि आता शक्यतो मी कोणत्याच नुडल्स खात नाही पण मसाला तर नाहीच नाही.
दोन दिवस कारवार गोवा च्या आसपास समुद्रात भटकत काढल्यावर आम्हाला पुढे कूच करण्याचा हुकुम मिळाला. आणी उद्या कोचीन बंदरात प्रवेश करायचा आहे या आनंदात मी रात्र काढली. तीन चार दिवस अशा खवळलेल्या समुद्रात काढल्यावर मला पण सवय झाली होती त्यामुळे आता पोटात ढवळणे पण कमी झाले होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस मेक आणी इलेक्त्रीकल इंजिनियर आणी EXO असे तिघे हि एकत्र होते. तीन दिवस जहाजाचे व्यवस्थापन लावून ते पण कावले होते. मला त्यांच्या कडे पाहून छान वाटत होते कि आपण फार तर दोन वर्षे अशी काढायची आहेत यांना तर आयुष्यच समुद्रात काढायचे आहे. तेंव्हा एक गोष्ट जाणवली कि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याला किंमत नसते आणी मृगजळाच्या मागे मात्र आपण धावत असतो. तट रक्षक दलात काढलेल्या एका वर्षात मी ज्या गोष्टी शिकलो त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माणसाला आयुष्यात अमुक एक गोष्ट लागतेच हे असत्य आहे. लोक मला रात्री दही भात "लागतोच " असे म्हणतात.
किंवा घरातून गणपती जातात केंव्हा आणि मी दारू पितो किंवा चिकन /मटण केंव्हा खातो असे हि लोक आहेत. असे करणाऱ्या लोकांची मला कीव करावीशी वाटते. मला जेवताना काहीही असेल तरी चालते मग त्यात नुसता ढोकला किंवा फरसाण असेल किंवा दही भात आणि कांदा असेल किंवा नुसती दाल आणि पाव असेल तरीही.नुसती काकडी आणि टोमाटो सुद्धा मीठ लावून असेल तरीही. आठवडाभर चहा नाही प्यायला तरीही चालते. चहा ऐवजी दुध किंवा कॉफी किंवा सरबत किंवा काहीही नसेल तरीही चालते.माझे डोके दुखत नाही कि कोणताही त्रास होत नाही. ( चहा प्यायला नाही तर बायकोचे डोके दुखते). झोपायला गादीच हवी, उशी उंचच हवी, ए सी शिवाय झोपच लागत नाही हे सर्व सुद्धा नखरे आहेत. लोकांना श्रावण आला कि "कसेसे"च होते हे सुद्धा नखरे आहेत असे मला वाटते. आपण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये हेच खरे.
क्रमशः
वाचने
17035
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
(No subject)
छान
काय मजा होती तुमची रोज रोज
बस लागणे
http://www.misalpav.com/node
नखरे...
आपण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये हेच खरे.
नेहमीप्रमाणे लेख आवडला !!
वाचतिये.
म्हणजे कशाचाही आहार करावा पण
डॉक,
In reply to डॉक, by गजानन५९
गजानन राव
पर्फेक्ट
In reply to पर्फेक्ट by समीरसूर
मस्त !!
जबरदस्त अनुभव!
In reply to जबरदस्त अनुभव! by पैसा
आमच्या घरच्यांना पण असेच वाटायचे...
In reply to आमच्या घरच्यांना पण असेच वाटायचे... by मुक्त विहारि
समीरसूर++१११
आधी थोडे नखरे कमी केले असते तर एवढी कडक शिक्षा मिळाली नसती....
In reply to आधी थोडे नखरे कमी केले असते तर एवढी कडक शिक्षा मिळाली नसती.... by मुक्त विहारि
अरेच्चा...
काहीही - कसेही - कधीही चालते.
लेख आवडला
In reply to लेख आवडला by श्रीरंग_जोशी
होस्टेलवर राहिल्यास अन कठिण
आहेत त्यांची आपल्याला किंमत
In reply to आहेत त्यांची आपल्याला किंमत by कैलासवासी सोन्याबापु
खूप छान लेख आणि प्रतिसादही.
In reply to आहेत त्यांची आपल्याला किंमत by कैलासवासी सोन्याबापु
जबरदस्त प्रतिसाद!
बापूसाहेब
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
एक्सक्टली!!! असेच प्रॉब्लम
सोन्याबापू आणि डॉक.