Skip to main content

अंधारातली पहाट......!

लेखक फिझा यांनी रविवार, 16/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारातली पहाट......! दबक्या पावलांनी श्रिया क्लासच्या दाराशी आली, " मे आय कम इन सर ?" " येस कम इन , यु आर लेट टुडे " सर घड्याळ पाहत म्हणाले . पहाटेचे सव्वा पाच वाजले होते. "सॉरी सर !" असे म्हणत श्रिया क्लास मधे येउन बसली. तिचे घाबरलेले डोळे ,थरथरणारे हात पाहत मी 'काय झाले ' असे खुणावुन विचारले. आणि तिनेही नंतर सांगते अशी ओठाची नुसती हालचाल करून सांगितले. 7 वाजता क्लास संपला तसा झपाझप जिना उतरत आम्ही सगळ्याजणी खाली आलो. आता कॉलेजला निघायचे म्हणून सायकल्स काढ़त काढ़त मी परत विचारले, " काय गं , बरी आहेस ना ? मगाशी काय बारा वाजले होते चेहऱ्यावर ? " " काही नाही गं ! एक कुत्र मागं लागलं होतं ! सो सायकल फ़ास्ट आणली , म्हणून ......! " श्रिया गेट कड़े जात जात म्हणाली. " अगं फ़ास्ट आलीस तर क्लासला उशीर कसा काय झाला?" मी हसत हसत विचारले. तिनेही नजर टाळुन सायकल चालवायला सुरुवात केली " चल आता पटकन,नाहीतर कॉलेजला पण उशीर होइल. " असे म्हणत आम्ही नेहमी प्रमाणे कॉलेजला जायला निघालो.का कुणास ठाऊक पण तिचा सायकलचा वेग नेहमी पेक्षा जास्त होता. आमचे अकरावीचे वर्ष . म्हणून अभ्यासाचा अजिबात ताण नव्हता. मस्त कॉलेजला जायचे ,सगळ्या क्लास्सेसला जायचे , बाकी वेळी एखाद्या मैत्रिणीकड़े जमुन धिंगाणा घालायचा . असं परफेक्ट आयुष्य होतं आणि वयही. ते वय आणि ते दिवस आता परत येणे नाही. असो. सकाळी , म्हणजे अगदी पहाटे 5 ला आमचा केमिस्ट्री चा क्लास असायचा, मग 7:30 ते 1:30 कॉलेज; त्यानंतर घरी येउन वामकुक्षी , मग 4ते 6 मैथ्स क्लास आणि 7:30 ते 8:30 फिजिक्स . असं रोजचं रूटीन . मग त्यात कधी थोडेफार बदल असायचे पण ते तेवढ्यापुरते. श्रिया आणि मी तशा लांब रहायचो पण फिजिक्सच्या क्लास वरुन येताना रात्री निम्मा रस्ता तरी सोबत असायचो. घरी पोचेपर्यंत 9 ते 9:15 व्ह्ययचे. तसे 'मेन रोड' असल्यामुळे रस्ता वाहता होता, भीतीचे अजिबातही कारण नव्हते. आणि एवढ्या तेवढ्या ने घाबरणाऱ्यातल्या 'आम्हीही' नव्हतो ! पण त्या दिवशी मात्र श्रियाच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव होते. तिचा चेहरा पाहून ' कुत्रं मागं लागलं नव्हतं , काहीतरी वेगळे कारण होते ' हे मला जाणवले. दिवसभर काही विशेष बोलली पण नाही ती. मी एकदोनदा खोदुन विचारायचा प्रयत्न केला परत , पण मैडम ना काही बोलयचेच नव्हते! पुढचे काही दिवस मग असेच गेले. डिसेम्बर महिना संपत आला होता तशी थंडी वाढली होती आणि दिवस पण लहान झाले होते. पहाटेच्या क्लासला जाणे अवघडच होउ लागले होते , पण काय ना ! पुढच्या वर्षी बारावी ! मग आत्तापसुनच अभ्यासाची, पहाटे उठण्याची सवय लागायला हवी अशी समस्त पालक मंडळींची ईच्छा होती. आणि आमचे केमिट्री सर तर खुपच शिस्तप्रिय होते. सगळ्या बैचचा केमिस्ट्री चा निकाल चांगलाच लागावा म्हणून त्यांचेही प्रयत्न चालू होते. आणि अशातच कुजबुज चालु झाली त्या 'काळ्या ' पहाटेबद्दलची. एके दिवशी अचानक सकाळी एक मुलगी क्लास मधे ओरडत आली, " सर , भूत भूत ! " खूप घाबरलेली, भल्या पहाटे सुद्धा घामाने थबथबलेली ती जणु काही जिवाच्या आकांताने ओरडत आत आली आणि म्हणाली ," सर , इथे डावीकडच्या गल्लीत ! तिथेच असेल ते अजुन .......त्यानं हात ओढला सर ! " .......क्लास मधे अचानक कल्लोळ उड़ल्यासारखे झाले ....कुणाला काहीच समजेना ....... तसे सर लगेच तिला म्हणाले ," शांत हो, आधी काय झालंय ते नीट सांग!" " सर , मी क्लासला येत होते , नेहमीच्या रोड ने तर , इथे अलीकडच्या गल्लीत आजकाल लाइट नसतो ना ! तिथे कुणीतरी बेंच वर बसले होते , आणि अचानक मला बघून माझ्या सायकलच्या समोर आले , अंधारात काही कळले नाही, पण हात ओढला माझा आणि मी पडले सायकलवरून, आणि मोठमोठ्याने ओरडायला लागले !" " मग पुढे काय, कोण होतं ? " सर काळजीने विचारू लागले , " माहित नाही, मी पळत आले , तिथेच सायकल टाकलिये !" म्हणत म्हणत ती परत रडू लागली . सर ताबडतोब 6-7 मुलांना आणि वोच्मन काकांना घेउन तिकडे पळत गेले . तोपर्यंत ती मुलगी क्लास मधे बाकिच्यांना झालेला प्रकार सांगत होती आणि अहो आश्चर्य !! क्लास मधल्या अजुनही 3-4 मुलींना त्या गल्लीत कुणीतरी आपला पाठलाग करत आहे हा अनुभव आला होता, फ़क्त त्यांनी ते आजपर्यंत कुणाला सांगितले नव्हते. कदाचित कुणी पाठलाग करणे ही गोष्ट तितकी गंभीर त्यांना वाटली नसावी किंवा कदाचित भास होतोय असेही वाटले असेल किंवा आपण हे कुणाला सांगितले तर काय म्हणतील लोक , आपल्या मैत्रिणी , क्लास मधले मुलं आपल्याला हसतील आशा नाना कारणास्तव त्या ते कुणाशी बोलल्या नव्हत्या. मग मात्र मी श्रियाकड़े रोखून पाहिले , तिचे लाल झालेले पाणावलेले डोळे आता उघडपणे बोलत होते. " आता तरी सांगशील का , काय झाले होते त्या दिवशी ?? " असे विचारताच तिने हुंदका टाकला आणि ओक्साबोक्शी रडू लागली . आम्ही सगळ्या जणी तिला धीर देत होतो.ती सांगू लागली , " तो कोण होता माहित नाही, पण त्या दिवशी तो गाडीवर होता , समोरून गाड़ी येत असल्या मुळे हेड लाइट चा प्रकाश माझ्या तोंडावर, सो गाडीवर कोण बसलंय ते दिसले नाही ..... पण पण .......अचानक गाड़ी माझ्यापाशी आली ......त्याने माझा गळा धरला ......आणि ......ड्रेस ऒढला .......मी पडले सायकल वरुन,ओरडले मोठ्याने , तोपर्यंत ती गाड़ी निघून गेली. इथे क्लास वर येउन मला हिम्मतच नव्हती कुणाला काही सांगायची "........ " अगं ,पण तू तेव्हाच सांगितले असतेस सरांना, घरच्यांना ,आम्हाला कुणाला तर काही करता आले असते ,,,,,अशा दोन नाकावर बुक्क्या ठेउन द्यायच्या ना त्याच्या !..........मी असते ना......तर.........." माझे वाक्य तोडत श्रिया म्हणाली ," पुस्तकात वाचायला आणि बोलायला सोप्पे आहे हे सगळे .....पण ........." तेवढ्यात सर आले , तिकडे कुणीच नव्हते असे त्यांनी सांगितले आणि आत्ता उजाड़ू लागले होते , त्यामुळे कदाचित ते जे कुणी होते ते पहाटेच्या अंधारातच पसार झाले होते ........ सरांनी वेळ पडली तर पोलिसात जाऊ असे सांगितले आणि आपल्याच क्लासचे काही मूलं सोमवार पासून त्या गल्लीत पहारा द्यायला थांबतिल असे ठरले. "पण भुताला पकड्णार कसे ?" अशा खुळचट प्रश्नांना सरांनी 'व्यवस्थित' उत्तरे देऊन सर्वांचे मनोबल वाढवले.समोर आलेल्या परिस्थितीला आपण कसे सामोरे गेले पाहिजे धीराने ,हुशारिने ते सरांनी नीट समजावून सांगितले. आता सोमवार पासून गस्त घालायला मंडळी सज्ज होती . आणि तो पहाटेचा माणुस रोज रोज नसतो कधितरीच दिसतो , त्यामुळे तो काही लगेच उद्या दिसणार नाही असा तर्क मुलींनी काढला. पण तरीही "उद्या ग्रुपने क्लासला या " असे सरांनी सांगितले. माना डोलावुन आम्ही पुढच्या दिवसाला सुरुवात केली अन कॉलेजला निघालो. आणि गुरुवारचा हा क्लास अशा सगळ्या कल्लोळामधे पार पडला. ही गोष्ट घरी सांगुन उगीच त्यांना कशाला टेंशन म्हणून मीही घरी काही बोलले नाही. शुक्रवारी पहाटे मी ठरल्याप्रमाणे श्रियाकड़े गेले. आम्ही एकत्र जाणार होतो क्लासला! बेल वाजवली, काकुंनी दार उघडले ,पण श्रियाला मध्यरात्रीपासून ताप असल्यामुळे त्यांनी तिला पहाटे उठवले नाही असे सांगितले. मग "ओके" म्हणून मी तिथून निघाले. पहाटेचा मैंन रोड सुद्धा सुनसान असायचा,पण रोजची सवय असल्यामुळे त्याचे काही वाटायचे नाही. मस्त गार थंडीतला वारा लागला की मनाला उत्साह वाटायचा. रोजचे टाईमटेबल डोक्यात येउ लागायचे. आजसाठी काय काय होमवर्क आहे, कॉलेज मधे , क्लास्सेस मधे ते आठवून तो पूर्ण आहे का , नसेल तर कधी करायचा, किंवा काल पाहिलेला मूव्ही , त्यातले गाणे असे सगळे विचार मनात घोळायचे. दूर कुठून तरी गायत्री मंत्राचे स्वरही ऐकू यायचे . ' ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् .............' आणि त्याच तालात सायकल चालू रहायची ...... पण आज श्रिया चा सुद्धा विचार मनात येत होता. तिने बिचारीने घरी सांगितले असेल का, खुप टेंशन घेतले असेल तिने म्हणूनच आजारी पडली असेल वाटत होते. आणि ती मुलगी ,ती तर भूत भूत म्हणूनच ओरडत होती , मग काय तिने काही भयानक पाहिले असेल का............देव जाणे ! पण छे , भूत बित काही नसतेच !आणि असेलच तर ते छेड़ कशाला काढेल मुलींची ....डायरेक्ट जिवच घेईल ना ! .....मुव्ही मधे तसेच दाखवतात.....असा विचार मनात येउन.....हलकेच हसू आले आणि मी "त्या" गल्लीत प्रवेश केला. सगळ्या विचारान्म्धे कधी मी तिथे पोचले ते कळलेच नाही.......... रस्ता नेहमीचाच. आज काही वेगळा दिसत नव्हता. दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे मागच्या आणि पुढच्या चौकातल्या दिव्यांचा उजेड गल्लीत नव्हता. गल्लीत मधोमध दिव्याचा खाम्ब आहे, पण तो दिवा नेहमीच शेवटची घटका मोजत असायचा आणि काही दिवसांपुर्वी तो अखेरचा बंद झाला होता , म्हणून गल्लीत अंधार ! एक मस्त वाऱ्याची झुळुक आली आणि शहारून गेली. विचारात गर्क असणारं मन, एका कसल्याशा आवाजाने भानावर आलं . कोणती तरी दुचाकी चालू झाली होती बहुधा. कदाचित kinetic असावी. तो आवाज आधी लांबून येत होता, आता तो आवाज हळु हळु जवळ येउ लागला. सायकल चालवताना एखाद्या गाडीने ओव्हरटेक करणे हे काही नविन नव्हते , आताही ही गाड़ी ओव्हरटेक करत पुढे जाईल आणि त्याच प्रकाशात मलाही थोडा रस्ता दिसेल असा विचार मनात चालला असतानाच एक गोष्ट लक्षात आली, की ती kinetic अगदी माझ्या मागे जवळ आहे आणि तिचा हेडलाइट मात्र बंद आहे. आणि त्याच क्षणी ! आकाशातून विज चमकून जमिनीवर पडावी आणि मोठ्ठा आवाज यावा तसा काल घडलेल्या सगळ्या प्रकाराचा एक विचार सर्रर्र्रकन डोक्यातुन मनापर्यंत चमकला आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. तो माणूस , ते भूत , ते जे कुणी होते ते माझ्या मागे अगदी जवळ आले होते. अगदी मागेच ! आता मी मोठ्ठ्याने ओरडायला हवे ,काहीतरी करायला हवे, असे वाटण्याच्या आतच.......एक हात माझ्या पाठी जवळ आला आणि माझी sack ओढ़ली गेली ,तशी मी जिवाच्या आकांताने ओरडले, काय करावे हे मला कळेचना आणि ओढल्या गेलेल्या त्या sack ला , मी एक जोराचा झटका दिला , तसे त्याने माझ्या सायकलचे carriage धरले....... मी ओरडतच सायकल सोडली आणि अलीकडच्या बाजूला पटकन उतरले , तशी सायकल त्याच्यावर पडली. तो kinetic स्वार इतका वेळ माझ्या मागच्या बाजूला असल्याने त्याला पहाणे शक्यच नव्हते. आता मला अंधारात तो साधारण दिसत होता, एक किडमिड्या अंगकाठीचा माणूस,अंगावर बहुतेक पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचा शर्ट होता ,पांढऱ्याच रंगाची प्यान्ट , तोंडावर रुमाल बांधला होता, दरोडेखोर बांधतात तसा . रंग सावळा असावा कारण चेहरा मला नीट दिसला नाही अंधारात. सायकल पडली तशी त्याने गाड़ी थांबवली आणि सायकल जोरात ढकलून दिली. हे थरार नाट्य होत असताना आता आपल्याला देवच वाचवू शकेल म्हणत मी जीव मुठीत घेउन पळत सुटले ओरडत. त्यानेही गाडीचा वेग वाढवला आणि मागे आलाच! इतक्यात कसे कुठून माहित नाही पण मी सगळे बळ एकवटले आणि पाठी वरची सैक काढून जोरात मागच्या दिशेने भिरकावली. आणि ती बरोबर त्याच्या मुस्काटात बसली व तो गाड़ी वरुन पडला , आपटला . तेवढ्यात बहुतेक क्लासला येणाऱ्या काही मुलांचा घोळका आला असावा, हसण्या खिदळण्याचा आवाज येऊ लागला. आता काही आपले खरे नाही हे ओळखून त्याने तशीच गर्र्र्र्कन गाडी वळवली आणि तो पसार झाला परत त्याच अंधारात. त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकड़े मी थरथरत पहात राहिले आणि कितीतरी वेळ तो kinetic चा आवाज माझ्या कानात घुमत राहिला ! पुढे सगळा प्रकार मी 'माझी शौर्यकथा' म्हणून क्लासमधे व घरीही सांगितला. सरांनी सोमवार पासून मुलांना आणि पोलिसांना पाळती वर ठेवले ,त्या गल्लीतला तो दिवा पण लगेचच लावला गेला, सगळे सतर्क झालो.......... पण त्यानंतर कधी त्या गल्लिमधे तो प्रकार घडला नाही. अंधाराचे साम्राज्य संपले होते तिथले, म्हणून असेल कदाचित. पण भल्या पहाटे उठून केवळ मुलींची छेड़ काढण्यासाठी कोण आणि का येत असेल , तो जो कुणी होता त्याला क्लास बद्दल कसे माहित असेल, की तो कुणी क्लास मधलाच असेल असे बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहिले. आणि तशी कुणाला काही गंभीर इजा झाली नव्हती म्हणून त्या गोष्टीचे तितकेसे गाम्भीर्यही राहिले नव्हते........ पण एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की, झालेल्या घटनेबद्दल पेपर मधे वाचणे, होऊन गेलेल्या गोष्टी वर चर्चा करणे , असे करयाला हवे होते , तसे केले असते तर बरे झाले असते , वगैरे वगैरे हे बोलण्यापुरते ठीक आहे पण जेव्हा तो अनुभव प्रत्यक्ष घ्यावा लागतो, तेव्हा हात पाय थरथरत असतात , मेंदू की डोकं तेव्हा काम करत नाही , डोळे फ़क्त विस्फारले जातात , आता हा आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असे वाटत असते आणि काय चाललंय हे पहायच्या , काही समजायच्या आतच ते घडून गेलेले असते. खेळ मोजुन 1-2 मिनिटे चालतो , पण ते ओरखाडे मात्र आयुष्य भर राहतात........... पहाट ....ही नेहमी रम्य च असते असे नाही ! आमच्या पैकी काहींनी ही अशी थरारक पहाट पण पाहिली आहे. kinetic गाड्या आता तशा बंद झाल्यात, पण आजही .....एखादी गेलीच आजुबाजुने रस्त्यावरुन, तर तो आवाज ......माझ्या काळजाचा ठोका चुकवुन जातो हे तितकेच खरे ! –-----------फिझा .
लेखनविषय:

वाचने 1960
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हा अनुभव खरा आहे का? असेल तर फारच वाईट. खरं तर वाचतानाच अनेक वेळा मन अकरावी-बारावीत जाऊन पोहचले. त्या गल्लीबोळा, क्लासमधल्या मुली आणि सर डोळ्यांसमोर आले. माझाही केमिस्ट्रीचा क्लास भल्या पहाटे असायचा. सुदैवाने असा अनुभव कधीही आला नाही. पण, आज जेव्हा विचार करते तेव्हा वाटतं की असं एकटं अंधारात जाणं किती धोक्याचं होतं. कुणी माणूस मागे लागणं तर जाउ द्या, पण कधी एखादा कुत्रा मागे लागला असता तर काय असे विचार मनात येउन मी आजही घाबरते.

तुझ धाडस आवडलं, असचं करायला हवं. तो विकृत होता हे उघडच आहे, आणि जनरली भ्याड असतात अशी माणसं. पण कधी कधी मात्र या प्रकारची विकृत माणसे नेहमीच भ्याड असतात अस नव्हे आपण कल्पना हि करु शकत नाही अशा वेगळ्या थरावर हि लोकं जाऊ शकतात.. थोड जपुन टॅक्टफुली हाताळावं लागत यांना. स्वतःचा बचाव करणं कधी कधी जास्त महत्वाचा असतो. तो अस का वागत असेल याला मात्र अनेक कारणे असु शकतात अतृत्प लैंगिक इछा, न्युनगंड, जेनेटिकल फॉल्ट, एक लैंगिक विकृती असते एक्झिहीबीशनीझम ची ती ही असु शकते. पण तु छान प्रतिकार केलास. तुझा धाडसी स्वभाव आवडला. ( एक अवांतर तुमच्या एका विशिष्ट वयात तुम्ही जास्त रमतात का ? लिहीतांना अस होत, सहज विचारलं हं )