बाजीरावांची टोलेबाजी :५: टिळक, आम्हाला क्षमा करा!
लेखनप्रकार
टिळक, आम्हाला क्षमा करा!
आज १ ऑगस्ट. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. शाळाशाळातून वक्तृत्त्व स्पर्धा होतील. सगळे बालवक्ते टिळकांनी बालपणी निबंधात संत हा शब्द तीनप्रकारे कसा लिहिला, शिक्षकांनी एक शब्द बरोबर धरून बाकी दोन चूक धरताच सगळेच शब्द बरोबर धरण्याचा हट्ट टिळकांनी कसा धरला त्याची गोष्ट सांगतील. त्याच बरोबर वर्गात मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे तेथेच टाकली. पण चूक कुणीच कबूल करेना. मग शिक्षकांनी सगळ्या मुलांना छड्या मारायला सुरवात केली. पण टिळकांनी बाणेदारपणे 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी हात पुढे करणार नाही' असे सांगितले होते ती गोष्ट सांगतील. वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे. हल्ली वक्तृत्त्व स्पर्धा वगैरे तरी होतात की नाही कुणास ठाऊक. पण मुलांचं टिळकांबद्दलचं ज्ञान इथंच आणि एवढ्यावरच संपतं.
टिळक, तुमच्या वर्गातल्या काही मुलांनी पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर खूपच शेंगा खाल्ल्या आणि फोलपटे सार्या देशभर टाकली. पण त्यांना छड्या मारण्याचे धारिष्ट्य एकाही 'सरां'ना झाले नाही. ही मुलेही भलतीच बाणेदार. त्यांनीही छड्या खायला हात कधीच पुढे केला नसता. त्यांचे हात लाच घेण्यासाठी पुढे झालेले लाखो लोकांनी टीव्हीवर पाहिले. ही मुले आता लोकसभेत, विधानसभेत दंगामस्ती करतात. घटनेचे, संसदेचे पावित्र्य नष्ट करतात. पण त्यानाही कुठलेच सर छड्या मारू शकत नाहीत. संत वगैरे शब्दांची तर आता सगळ्यांनाच ऍलर्जी आहे. कुठल्याच प्रकाराने हा शब्दच लिहिला जाणार नाही याची काळजी सगळेजण घेतात. प्रश्नपत्रिकेतून सतांच्याबद्दल वेडेवाकडे उतारे छापले जातात. यांना कुणी छड्या मारायच्या?
तुम्ही स्वातंत्र्यासाठी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगलीत. आताचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन झालेल्या शिक्षा पंचतारांकित इस्पितळातून उपभोगतात. नंतर निर्लज्जपणे समाजात वावरतात. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे समर्थक त्यांचे स्वागत करतात. सत्कार करतात. सुवासिनी त्यांना पंचारत्या ओवाळतात. त्यांचे सरकारातले स्थानही अढळ असते. कुणालाही खेद नाही, खंत नाही. यांना छड्या कुणी मारायच्या?
तुमचा 'केसरी' गर्जणारा होता. आताची सारी वृत्तपत्रे कुणा ना कुणाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. मंत्री, शिक्षणसम्राट, उद्योगपती यांच्या वाढदिवसाच्या पुरवण्य़ा छापून जाहिरातींची साय ओरपण्यात मग्न आहेत. बातम्या छापायलाही पैसे आणि दाबायलाही पैसे. 'पाची बोटे तुपात' अशी वृत्तपत्रांची चैन, चंगळ आहे. अशा तुपाने बुळबुळीत झालेल्या संपादकीय हातांना लेखणीसुद्धा नीट धरता येत नाही. टीकेचे आसूड वगैरे कसे धरणार? अग्रलेखांची परंपरा मोडीत निघाली आहे. तेवढ्या ताकदीचे संपादकही आता दुर्मिळ झालेत. पेपर रंगीत झालेत, स्वस्त झालेत. पण जनतेचा आवाज त्यांतून उठेनासा झाला आहे. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा प्रश्न आजही पडतो. पण तो लोकांना. वृत्तपत्रांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. 'सरकारच्या जाहिराती ठिकाणावर आहेत काय?' एवढीच त्यांना काळजी.
परवा काही एका संदर्भासाठी एका प्रसिद्ध वाचनालयाच्या अध्यात्म, तत्त्वज्ञान विभागात 'गीतारहस्य' शोधत होतो. मिळता मिळेना. मग ग्रंथपालाला विचारले. त्याने 'रहस्यकथा' विभागात शोधायला सांगितले. नेमके मिळाले. पण बर्याच वर्षात कुणीही हात न लावल्याने खूप धूळ साठली होती त्याच्यावर. ही आमच्या अनास्थेची, सांस्कृतिक-सामाजिक र्हासाची आणि धुळीला मिळत चाललेल्या नीतीमूल्यांची धूळ होती. ती झटकण्याचे धाडस मला झाले नाही. टिळक, आम्हाला क्षमा करा.
-बाजीराव
(दै. तरुण भारत, बेळगाव मध्ये दि. ०१.०८.२००६ रोजी पूर्वप्रकाशित.)
वाचन
6538
प्रतिक्रिया
0