Skip to main content

माफ करायचं...

लेखक धन्या यांनी सोमवार, 04/08/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने. मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर. वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते. माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते. ज्या व्यक्तीने दुखावले त्या व्यक्तीचा बदला घेण्याची भावना प्रबळ होत जाते. हा सुड कसा घेता येईल याचे मन सतत चिंतन करु लागते. समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या नादात आपणच सुडाच्या, क्रोधाच्या आगीत जळत राहतो. किंवा अगदीच तसं झालं नाही तरी आपल्या दु:खाला कुणीतरी दुसरा कारणीभूत आहे या विचारांनी मन खिन्न होते. तो असं बोलला नसता किंवा त्याने असं केलं नसतं तर हा विचार मनात पिंगा घालू लागतो. दुसर्‍याला त्रास कसा देता येईल किंवा दुसर्‍यामुळे आपण कसे दु:खी आहोत या विचारांनी आपली झोप उडते. आपणच पेटवलेल्या वणव्यात आपणच होरपळत आहोत हे आपल्या गावीही नसते. हा वणवा विझवून आपण आपल्या जखमेवर हळूवार फुंकर मारु शकतो हे आपल्याला कळत नसते. फार काही करावं लागत नाही त्यासाठी. ज्याने आपल्याला दुखावले, शब्दांतून किंवा कृतीतून, त्याला माफ करायचे. अगदी मनापासून. तुमच्या-आमच्यासाठी माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. खरं नाही ते तितकंसं. माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं. ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे. मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते. कधी कधी नुसताच स्पर्श राहतो. मात्र असे माफ करण्यासाठी आपल्याला दुखावणार्‍या व्यक्तीला समजून घ्यावे लागते. मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, करुणा निर्माण व्हावी लागते. माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे. माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले, ती व्यक्ती माणूस म्हणून स्खलनशील आहे, तिच्याकडून चूका होऊ शकतात हे स्विकारणे. माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. आपणच पेटवलेल्या क्रोधाच्या, सुडाच्या वणव्यावर हळूवार फुंकर मारणे. थोडासा आपल्याला दुखावणार्‍या माणसाचा विचार करायचा. तो ही आपल्यासारखाच माणूस आहे, चूका करु शकणारा. स्वतःबद्दलच्या आणि सभोवतालच्या जगाबद्दलच्या भ्रामक विचारांच्या जाळयात अडकलेला. कुठेतरी सुरक्षितता, मान-सन्मान, स्विकृती शोधणारा. परिस्थीतीवर ताबा ठेवू पाहणारा. स्वतःच्या जगाबद्दलच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे भेदरलेला. आणि या सार्‍याच्या मागे असलेला तो आहे तुमच्यासारखंच निसर्गाचे लेकरु, मनःशांतीच्या शोधात असलेला. न जाणो त्याने लहानपणापासून काय झेललं असेल, कशा-कशाला तोंड दिलं असेल. त्याला कसं घडवलं गेलं असेल, तो कसा घडला असेल. कुठल्या विचारांना त्याने आपलंसं केलं असेल, कुठल्या विचारांना त्याने धुडकावून लावलं असेल. आजचे त्याचे विचार, त्याची कृती कदाचित स्विकारण्याजोगी नसेल. पण आत खोलवर कुठेतरी हा त्याच्यापरीने मार्ग शोधण्याचा प्रयत्न असेल. म्हणूनच, सोडून दयायचं. माफ करायचं...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28374
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

खूप आवडलं. माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. हेतर खूपच छान आहे. :) पण तरीही एकीकडे प्रगोशी सहमत व्हायचा मोह होतोय!! :P

डूख धरणे, बदला घेणे, आकस ठेवणे वगैरे वगैरे टाळणं शक्य असतं. पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे असा गैरसमज पसरू न देणं हेही पाहावं लागतं. तसंच, अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद मनांत करून ठेवणं, आपल्या पुढच्या वाटचालीत ती व्यक्ती समोर आल्यास आपल्या वागण्याची तर्‍हा ठरवून ठेवावीच लागते. तुम्ही माफ करता म्हणून समोरचा माणूस येताजाता तुमचा पाणउतारा करुन स्वतःचा 'स्व' कुरवाळू पाहात असेल तर कानाखाली काडकन आवाज काढायची ताकद मनगटात आणि हिम्मत मनांत ठेवावी लागते. ते नाही केलं तर आत्मसन्मानाला धक्का पोहोचून तणाव (स्ट्रेस) वाढू शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत.. ह्यावरुन एका हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या.. "क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहीत विनीत सरल हो |"

लेख अतिशय आवडला. बहुतांशी सहमत. विखार, क्रोध या नकारात्मक भावनांनी मनातली जागा व्यापली की आनंद, समाधान अशा सकारात्मक बाबी दूर, बाहेर लोटल्या जातात. आपली कार्यशक्ती कमी होते आणि उद्दिष्टावरील लक्ष विचलित होते.

आवडले आणि पटले देखील ! बदल्याच्या आगीत शत्रुपक्षाला नुकसान होईल तेव्हा होईल..पण तो पर्यन्त आपणच पेटविलेल्या वणव्यात आपलीच राख होत जाते ... मानसिक त्रास तर होत असतोच पण नकळत शरिरावरही आघात होत असतो .. आपण कणा - कणाने मरत असतो आपल्याच विचार- शृंखलानी आपणच बेडीत अडकतो.. आणि असल्या विचारानी बाहेरच्या परिस्थितीत शष्प देखील फरक पडत नाही ... !

आपल्याला त्रास देणारी व्यक्ती पुन्हा तसे करणार नाही ह्यासाठी गड सुरक्षित करावा आणि माफी देवुन टाकावी पण "आपल्या मनात". त्या व्यक्तिबरोबर मात्र फार सावधपणेच वागावे. पण ती व्यक्ती / घटना मनात ठेवुन माफी देणे कठीण. One needs to forget as well as forgive.

लेखातील काही मते पटली तर काही पटली नाहीत. ह.घ्या: मी बाकी कोणालाही माफ करेन पण फेसबुकावर कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट पाठवणार्‍या कोणालाही माफ करू शकणार नाही :)

बघ लवकरच टंकावे लागेल .....|| क्या जमाना था ||

मला वाटतं, दुसर्‍याला माफ करण्याआधी स्वतःला माफ करता आले पाहिजे. माझ्या हातूनही चुका होतात, मला कोणी फसवू शकतं, माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, मला कोणी वाईट वागवलं आणि त्याचा प्रतिकार करता आला नाही असंही होऊ शकतं. आणि त्याबद्दल स्वतःला जर माफ केलं तर दुसर्‍याला माफ करणं फार सोपं होईल. बहुतेकवेळा दुसरा असा कसा वागला यापेक्षाही मला या घटनेबद्दल काही करता येत नाहीये ही भावना जास्त त्रासदायक असते.

In reply to by पैसा

अत्यंत सहमत. बहुतेक वेळा बोलणारा बोलून जातो आणि त्याला त्याचक्षणी सडेतोड उत्तर का सुचले नाही याबद्दल स्वतःचाच राग येत राहतो. मग असंच म्हणायला हवं होतं आणि तसंच करायला पाहिजे होतं हे मनाचे खेळ काहीकाळ चालू राहतात. पुढच्यावेळी पुन्हा अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मनाचे खेळ चालू राहतात. बरं सूड किंवा बदला घेण्याएवढीही त्या माणसांना किंमत द्यायची इच्छा नसते; मग अशावेळी अशा माणसाचं बोलणं ऐकून घ्यावं लागण्याचा बावळटपणा घडल्याबद्दल स्वतःलाच माफ करणे याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही. विशेषतः मनमभोळ्सट, साध्यासुध्या आणि भोळ्सट लोकांना तथाकथित व्यवहारी व स्मार्ट लोकांकडून असे अनुभव वारंवार येतात. त्यासाठी आधी स्वतःला क्षमा करण्याची कला साध्य होणे महत्त्वाचे असते.

धन्या शेठ, लेख आवडला. ज्यानी कोणि आगळीक केली ति त्याची मानसीक अपरिहार्यता होती, त्यामुळे तो तसा वागला, त्याच्याबद्दल सहानुभुती-दया वाटावी... असले विचार केल्याने माफिनामा आपसूक पास होतो म्हणतात (आपण त्या वाटेला फार जात नाहि) बर्‍याचदा आगळीक करणार्‍याचं काहि वाईट झालं कि आपला बदला अ‍ॅटोमॅटीक पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं, किंवा दुश्मनकोभि ऐसे दिन ना देखने पडे टाईप काहि भोग त्याच्या वाटेला आले कि एक सहाजीक माणुसकिची भावना म्हणुन देखील त्याच्याबद्दल दया उत्पन्न होते व सहाजीक क्षमादान होतं. पण प्रयत्नपूर्वक मनापासुन क्षमा करायला फार मोठं मन लागतं हे नक्की.

बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण समोरच्याला वाटते की हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीं आणि मग तो आपला अजून पाणउतारा करू पाहतो. समोरच्याला माफ करायला हरकत नाही पण त्याने तिथेच थांबले पाहिजे यासाठी इशारा तर द्यावाच लागणार. साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी

In reply to by खटपट्या

साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी
हे परक्यांच्या बाबतीत शक्य असतं. काही नाती किंवा प्रसंग अगदी नाजूक किंवा गुंतागुंतीची असतात. अशा वेळी कितीही "डिसापॉईंट" किंवा "हर्ट" झालो तरीही हताशपणे डोक्याला हात लावणे किंवा आतल्या आत धुमसत राहणे या पलिकडे आपण काहीच करु शकत नाही. मात्र अशा धुमसत राहण्याने त्रास आपल्यालाच होतो. त्यावेळी सोडून दयावं. :)

लेख आवडला. पण माफ करताना ती व्यक्ती आपल्याला दुबळा समजणार नाही ह्याची काळजी मात्र करावी. आणि माफ एकदाच करावं, कारण कितीतरी वेळा, ह्यानी माफ केलं, परत करेल, चलता है बॉस असा अ‍ॅटीट्युड होत जातो लोकांचा.

गड सुरक्षित करण्याची आयड्या साअंगा की राव ! मग माफीचा विचार करू.

गुंतागुंतीचा आणि बहुपेडी आहे.एकाच व्य्क्तीच्या बाबत काय माफ करायचं आणि काय नाही हे घटनासापेक्ष आहे.सगळीच नाती काळी-पांढरी नसतात त्यामुळे "करडा" रंग काळा होउ नये म्हणून प्रयत्न कारायचे का, त्याला पांढरा करायचा अट्टहास हे ज्याच्या त्याच्य स्वभावावर्/वर्तनावर अवलंबून आहे.

काही स्वयंघोषीत महात्म्यांना त्यांनी केलेल्या प्रत्येक कॄतीची आणि उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाच्या योग्यतेची इतकी खात्री असते की त्यांना माफीची गरजच नसते. त्यांना आम्ही पामरं काय माफ करणार? काही लोक पावसाळी चिलटां सारखी त्रासदायक असतात, परंतु इरेला पडून त्यांचा सूड घ्यावा अशी त्यांची योग्यता नसते. त्यांचा संपर्क टाळणे हा एकमेव पर्याय असतो. .... पण जी लोकं माझ्याशी माणूसकीने / माणसांसारखी वागतात, बोलतात त्यांना मी सहजी माफ करू शकते . किंवा त्यांनी केलेली आगळीक मला फारशी खुपत नाही असे म्हणणे संयुक्तीक ठरेल.

खूप आवडला आहे हा लेख आणि त्यातल्या काही प्रतिसादही.काही काळापुरतंतरी क्रोधाविष्ट मन अशा लिखाणामुळे शांत वाटून विचार करु लागतं.तापलेल्या डोक्यावरुन बर्फ फिरवल्याचा इफेक्ट म्हणायला हरकत नाही!!

आपण ज्याला माफ केल त्याला नंतर ते समजल आन तो भांडायला आला तर काय करायचं? तू कोण माफ करणार मला? मी माफी मागितली होती का? :)