Skip to main content

द ईएमआय ट्रॅप

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 16/07/2014 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान. lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत. किंमत बघून तितके पैसे आपल्याकडे जमलेले आहेत का? नसल्यास ते जमेपर्यंत खरेदी तहकूब. असल्यास ते इतर कुठल्या कारणासाठी राखून ठेवलेले नाहीत ना? त्यांचा इतर कुठे अधिक सदुपयोग होऊ शकतो का? हे प्रश्न पडताळले जात असत. आणि या सगळ्यातून जर निर्णय पुढे सरकलाच, तर ती गोष्ट विकत घेतली जाई. अपवाद इथेही असतीलच, परंतु सर्वसाधारण प्राधान्यक्रम हे असे असावेत. आता हे क्रम प्रचंड बदलले आहेत. गरजेच्या गोष्टींआधी हव्या असलेल्या गोष्टी येतात. त्याही हव्या यासाठी असतात की त्या दुस-या कुणाकडे असतात, पण आपल्याकडे नसतात. जागतिकीकरणामुळे एका गोष्टीसाठी पाच कंपन्यांचे पर्याय असतात. प्रत्येक कंपनीच्या ब्रँडची एक पत असते. अर्थातच जास्त पत असलेला ब्रँड घेणं ही प्रथम पसंती असते. इथवर गोष्टी स्वाभाविक आहेत. पुढे पैशाची गोष्ट येते जिथे ओढून ताणूनचा प्रकार बळावलेला आहे. कर्जसंस्कृती आधीही होती, परंतु त्या वाटेला जाणं हे काहीसं कमीपणाचं होतं. आता तसं नाही. कर्जहीन माणूस म्हणजे इच्छाहीन, आकांक्षाहीन माणूस. कारण, इच्छा तिथे पैसे, पैसे तिथे कर्ज असं समीकरणच आहे. भरीस भर म्हणून आलेला प्रकार म्हणजे क्रेडिट कार्ड. या क्रेडिट कार्ड संस्कृतीच्या प्रमाणाबाहेर लाडांमुळे आपणच आपल्याला कसे पिंज-यात बांधतो हे अनेकांना कळत नाही. परवा एका मॉलमधे मी एक जाहिरातीचा फलक बघितला. त्यावर लिहिलं होतं, ‘डिझायनर वॉचेस. ईएमआय लो ऑफर्स, १९९९ ओनली.’आता घडयाळ ही गरजेची गोष्ट मानली, तरी डिझायनर घडयाळ ही चैनीची बाब होते. तर ही कुठल्याशा परदेशी कंपनीची लाखो रुपयांची घडयाळं मंडळी आता हप्त्यावर घेणार हा विचार करून हसू आलं. घर ठीक आहेत, गाडया ठीक आहेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठीक आहेत, पण घडयाळासारखी गोष्ट हप्त्यावर म्हणजे कहरच. उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स येतील. जगणंच ईएमआय वर होईल. इथे पूर्वीचे सगळे क्रम उलटे झालेले आहेत. गरजेपेक्षा इच्छा, किमतीपेक्षा ब्रँड, आणि कुवतीपेक्षा ऑफर या गोष्टी मोठया झालेल्या आहेत. भारतीय ग्राहकाच्या मानसिकतेचा नेमका हाच कमकुवत दुवा आहे आणि तो कंपन्यांनी बरोबर हेरलेला आहे. मला आठवतंय माझा एक मित्र माझ्याकडे चांगला कॅमेरा कुठला अशी चौकशी करत होता. मी सहज ‘बजेट किती’ विचारलं असता तो म्हणाला होता की, ‘बजेट असं काही नाही, भारी पाहिजे कॅमेरा. तसंही ईएमआयवर घेणार आहे मी.’ ते ईएमआय दरमहा द्यायचा असतो हे त्याला ठाऊक होतं की नाही, कल्पना नाही. ईएमआय, क्रेडिट कार्ड यांनी त्याच वेळेला एखादी गोष्ट खरेदी करणं शक्य होतं यात दुमत नाही. परंतु त्यामुळे प्रलोभित होऊन आपण आपल्या कुवतीच्या कक्षा बळेच रुंदावतो आणि मग ठरावीक रक्कम दर महिन्याला खात्यातून वजा होणार आहे, त्यावर भक्कम व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे, या गोष्टींची बोच भूल दिल्यागत तेव्हा आपल्याला जाणवत नाही. परंतु नंतर तो ईएमआय खात्यातून वजा व्हायला लागतो, तेव्हा मात्र आपल्याला ते ओझं जड होतं. तेव्हा या ईएमआयच्या सापळ्यात आपण कमीत कमी अडकलेलंच हिताचं आहे. भलत्या उडया मारून नंतर लटकण्यापेक्षा सावध पावलं उचलणं कधीही योग्य असतं. माझ्या एका मित्राचे बाबा म्हणतात, Luxuries should never be bought with borrowed funds.’ अशी उदाहरणं, असे फलक बघितले की मला हे वाक्य नेहमी आठवतं. हा लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आला होता त्याचा हा दुवा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33890
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

एकच सुधारणा. आपण त्या घरात स्वत: किंवा जोडीदार जिवंत असेपर्यंत राहू शकतो, केवळ २० वर्षे नाही. वीस वर्षानंतर उत्पन्न बंद होईल किंवा जागेच्या वाढलेल्या किमतीनुसार नवीन उत्पन्न चालू होऊ शकेल.

एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? किंवा हौस्,मौज म्हणून असल्यास परवडणारी आहे का? याचा विचार प्रत्येक खरेदीआधी केल्यास कर्ज, क्रेडीट कार्ड वापरून आपला फायदा करुन घेता येउ शकतो. मी फक्त गृहकर्ज घेतलय. जिथे शक्य असेल तिथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट करतो. ०% असल्यास EMI ने पैसे भरतो. कुठलेही अरितिक्त चार्जेस नसलेले क्रेडीट कार्डच वापरतो. वेगवेगळ्या बिलिंग सायकलची २-३ कार्ड वापरून जास्तीत जास्त उशीरा पण न विसरता आणी लेट चार्ज लागण्यापूर्वी पेमेंट करतो.

In reply to by बाळ सप्रे

कार्ड रिसायकलींगनं उशीरा पैसे भरुन विषेश फायदा होत नाही, त्यापेक्षा लगेच पेमेंट करुन होणारी मानसिक सुटका जास्त श्रेयस आहे. करुन पाहा.

क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे असे समजावे (म्हणजे कॅश बाळगण्याची कटकट नाही वगैरे फायदे). याशिवाय पॉईंट्स मिळाल्याने होणारा फायदा , इतर ऑफर्स (सिनेमाच्या तिकिटाच्या वगैरे) यांचा अवश्य लाभ घ्यावा. पण लिमिट मोठे आहे म्हणुन खर्च करत सुटू नये. खरेतर लिमिटही कमीच ठेवावे. म्हणजे साधारण मासिक खर्चाच्या फारतर दीडपट-दुप्पट वगैरे. याचा अजून एक फायदा की आपल्या क्रेडीट कार्डाच्या बाबत काही फ्रॉड झालाच तरी होणारे नुकसान कमी असेल. शक्यतो क्रेडिट कार्डाचे पेमेंट लवकरच करावे कारण तसेही सेवींग खात्यात पगार आल्यावर ४% दराने मिळणारे व्याज फार काही मोठे नसते. शिवाय बँकेत पैसे असताना खर्चायचा मोह होत राहील. याशिवाय स्वतःला काही नियम घालावेत. उदा: घेतलेला मोबाईल किमान दोन वर्षे बदलणार नाही. नवीन मोबाईल घेताना आधी बजेट ठरवावे आणि त्यातच खरेदी करावी ई.

एकंदर (प्रतिसाद आणि लेख) दोन्हीकडे सूर असा दिसतोय कि फक्त "गरजेच्या" गोष्टींसाठी कर्ज काढायला हरकत नाही. माझ्यामते काही ठिकाणी चैनीच्या वस्तूंसाठी पण कर्ज काढायला हरकत नाही. उदा. मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला ०% व्याजाने दुकानदार २४ महिन्यांसाठी कर्ज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे की मी २४ नव्हे तर १२ महिन्यातच ते पैसे फेडू शकतो. तर मी तो टिव्ही आत्ताच का घेऊ नये? की "चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घ्यायचे नाही" एवढ्याच कारणासाठी मी १२ महिने वाट बघायची? आता यामध्ये मी फक्त एवढेच भान ठेवीन की माझे सगळे पैसे महिनाअखेरीला खर्च होत नाहीत आणि माझ्या महिन्याच्या बचतीवर नवीन कर्जाचा फार मोठा परिणाम होत नाही. जर योग्य मेळ जमवता आला तर चैन आणि बचत दोन्ही साधता येईल. क्रेडीट कार्ड हे सुद्धा एक प्रकारे कर्जच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून त्याचा खूप चांगला वापर करून घेता येतो हा स्वानुभव.

In reply to by रामपुरी

थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा स्लिपरी स्लोप होउ शकतो. कधी थांबायचं हे कळलं तर जगातले खूपसे प्रॉब्लेम्स आलेच नसते.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

थिओरेटिकलीच नव्हे पण प्रॅक्टीकली सुद्धा हे शक्य आहे. फक्त सगळे लगाम हातात घट्ट असले पाहीजेत.

In reply to by रामपुरी

२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यायला दुकानदार तयार आहे. त्यासाठी त्याने आगोदरच किमत वाढवून ठेवली नाही आहे हे बघा. जुना माल गळ्यात मारत नाही ना याची खात्री करा. बाकी सौदा फायद्याचा आहे.

In reply to by रामपुरी

मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे
"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.

In reply to by चित्रगुप्त

गरज म्हणजे ज्याच्याशिवाय पर्याय नाही असा खर्च आणि चैन म्हणजे असा खर्च, जो केला नाही तरी चालेल.
प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.
फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच
या अ‍ॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही. फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही. वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!

In reply to by संजय क्षीरसागर

आमच्या माहितीत एकजण आहेत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात. कर्ज काढुन खुप मोठे घर घेतले आहे. दोघांचा एकुलता एक मुलगा खुप लहान आहे. दोघे सकाळी ८ ला जातात ते रात्री ९-१०-११ कसेही परत येतात. मुलाचा सहवास मिळत नाही. जे घर घेतले आहे तिथे फक्त झोपायला येतात. आम्हालाच खुप वाईट वाटते ते बघुन (त्यांना वाटते कि नाही माहित नाही).

In reply to by पियू परी

धड येत नसेल. त्यात (स्वैपाक जमत नसल्यास) जेवणाची बोंब. घरी नोकरीची विवंचना आणि ऑफिसमधे मुलाची ओढ. अशी एकूण परिस्थिती आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे. शिवाय थोडे नियोजन करुन पार्ट पेमेंट करुन लवकर सुटता येत. अन मग हवा तेवढा वेळ देता येइल मुलांना. (स्वानुभव)

हा हा! अहो काही दिवसांपूर्वीच अरमानी च्या कपड्यांसाठी EMI ची योजना आलीये! :D म्हणजे आता न परवडणारे बूट, कपडेसुद्धा कर्ज काढून घ्यायची सोय झालीये लोकांची!! हि बघा लिंक.

In reply to by शब्दबम्बाळ

चला म्हणजे आता ह्या क्षेत्रातली डिफॉल्टर मंडळी लगेचं ओळखता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कर्ज हप्ते न भरल्यामुळे कार जप्त करणे ईत्यादी प्रकार ऐकुन होतो. आता परिधान केलेली वस्त्रे कोणी काढुन नेणार असेल तर कहरच होईल!

अश्या प्रकारे, कर्ज काढुन प्रगती होते आहे, असे वाटायचे आही.. हा धागा आधी पाहिला असता तर तसेच माझे मत मांडले असते.. परंतु हा EMI ट्रॅप खरेच नको असे वाटत आहे.. माझे सगळे क्रेडिट कार्ड आनि घराचे सोडुन बाकीचे ईएमाय बंद करणार आहे.. खुप होरपळलो या चक्कर मध्ये.. खुप तोटा.. मान्य घरामध्ये फायदा झाला २५ लाखाचे घर ४ वर्षात ९५ लाखाचे झाले.. परंतु इतर गोष्टी चुकल्याच.. आणि त्या चुकल्या म्हणुनच आता किंमत कळते आहे... सविस्तर लिहेन कधीतरी.. परंतु सगळ्यातुन बाहेर येवुनच .. धागाकर्त्याचे म्हणणे आज मला योग्य वाटत आहे.. माणसाने समाधानाने रहावे.. आनंद तुमच्याकडे किती गोष्टी आहेत त्यात नाही असा अनुभव. - एक क्रेडिट कार्ड आणि गाडीत फसलेला , पहिल्यांदा सगळे बोलतात अगदी तसेच बोलत होतो मी.. वेळ बदलली.. सगळे बदलले.. त्यामुळॅ आधीच्या चुकांवर मात करुन आत पुन्हा तशी चुक कदापी करणार नाही.. ० % व्याजावर पण मी आता कुठली गोष्ट घेणार नाही...