काव्यकर्तनालय बंद होते तेव्हा..!
'मिसळपाव' उघडलं आणि केशवसुमाराचे विडंबन नाही असे दिवस माझे तरी फार थोडे गेले. पान उघडल्यावर 'काव्या'च्या विभागात केसुशेठचे एखादे फर्मास विडंबन वाचायचे आणि पुढच्या उद्योगाला लागायचे हा माझा शिरस्ताच झाला होता म्हणा ना.
परवा केसु ने निवृत्तीची घोषणा केली आणि विनंत्या, आर्जवे, कविता, विडंबने, प्रतिविडंबने यांचा पाऊस पडला.
केसु आणि निवृत्त? असं काय झालं? मलाही थोडे बावचळल्यासारखे झालं खरं आणि मी ही एक विडंबन करण्यास उद्युक्त झालो. काही लोकांनी त्याच्या ह्या निर्णयाबद्दल खुषीही व्यक्त केली त्याची काव्यप्रतिभा आता मोकळी होईल अशा शुभेच्छाही दिल्या.
व्यक्तिशः मला काय वाटलं ते सांगायला खरं तर मी हे लिहायला बसलो आहे. माझी अवस्था एका डोळ्यात आसू आणि दुसर्यात हसू अशी झाली.
आसू अशाकरता की सहाजिकच एका विलक्षण प्रतिभावंत विडंबकाच्या काव्यकृतींना आपण मुकणार हे नक्की झाले. केसुशेठसारख्या प्रतिभावंताला हा निर्णय घेताना काय यातना झाल्या असतील ह्याचा एक लुडबुड्या विडंबक म्हणून मला थोडाफार अंदाज येऊ शकतो!
आणि हसू अशाकरता की रसिकांची वाहवा मिळत असतानाच, सेंचुरी मागून सेंचुरी सुरु असतानाच निवृत्त व्हायला फार धैर्य लागतं ते केसुशेठने दाखवलं, प्रसिद्धीच्या मोहाला, टाळ्यांना न भुलता त्याने त्याला जो निर्णय त्याच्या मनाशी प्रामाणिक वाटला तो घेतला. मला त्याबद्दल त्याचं कौतुक वाटतं! शिवाय तो 'अनिरुद्ध अभ्यंकरच्या' वेशातून उत्तमोत्तम गझला द्यायला समर्थ आहेच त्यामुळे आपण सर्वस्वी त्याच्या प्रतिभेला मुकणार नाही हे ही नक्की आहे.
विडंबन हे एका दुधारी शस्त्रासारखे आहे असं मला वाटतं!
एका बाजूला विडंबन ही एक कला असली तिचं स्वतंत्र अस्तित्त्व मूळ कलाकृती शिवाय नाही असा आक्षेप घेतला जातो. विडंबनाचे काम हे दुय्यम दर्जाच्या प्रतिभेचे आहे असेही काही जणांना वाटत असेल. मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. उत्तम कलाकृतीतून तितकेच किंवा कधीकधी मूळ कृतीहून सरस विडंबन घडलेले आपण बघतो तेव्हा हे पटते. मुळात चांगली काव्यप्रतिभा असणे हा अत्यावश्यक घटक आहे. लय, ताल, मीटर, चपखल शब्द निवडणे आणि त्यांचा तोल सांभाळणे, ह्या सगळ्याची एक उपजत आणि नंतर अभ्यासाने कमावलेली जाण असणे अत्यंत गरजेचे आहे. कच्चा माल निवडतानाची एक पारखी नजर असली तर आत हिरा कोठे दडलेला आहे तो नेमका बाहेर काढणे जमते!
त्याचवेळी दुसर्या बाजूला विडंबन हे एखाद्या व्यसनासारखे आहे. एकदा त्याची चटक लागली की मानवी रक्ताची चटक लागलेल्या वाघासारखी अवस्था होते! दिसली कविता की घाल चरकात, ऐकले गाणे की वळ कडबोळे! ;) डिसलेक्शिया असलेल्या व्यक्तीसारखे शब्द नाचायलाच लागतात डोळ्यांसमोर आणि वेगवेगळ्या कल्पना डोक्यात पिंगा घालायला लागतात. अवस्था वेड्यासारखी होते. ते विडंबन कधी एकदा पूर्ण करतो आहे असे होऊन जाते. त्याला रसिकांच्या वाहवाने तर आणखीनच उधाण येते. झिंग चढते. पुढचे कधी? कच्चा माल कुठे? शोध संपत नाही, उसंत मिळत नाही. टीका झाली की कुठेतरी वाईटही वाटते. वाटतं आता 'एकच कविता' मग पुरे, मग नंतर करणार नाही पण तसं घडत नाही नवीन काहीतरी डोळ्यांसमोर येतेच आणि नव्या जोमाने तो 'एकच प्याला' तोंडाला लावला जातोच!
वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत सचिनने सेंचुर्या मारतच रहाव्यात असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे पण एक अनुभवी, प्रगल्भ खेळाडू म्हणून कुठे आणि कधी थांबायचे ह्याबद्दलचा व्यक्तिगत निर्णय आपण एक चाहते म्हणून सन्मानानेच घेऊ, कितीही दु:ख झाले तरी! तसेच माझे झाले आहे. मला आत कुठेतरी एक अतीव समाधान आहे की केशवसुमार ह्या दुष्टचक्राचा भेद करून यशस्वीरीत्या बाहेर आला. आणि त्याच्या ह्या निवृत्तीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो आहे, कितीही दु:ख झाले तरी!
चतुरंग
वाचने
2870
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सुंदर चिंतन..
विडंबन आणि लोणचे
In reply to विडंबन आणि लोणचे by धनंजय
सुंदर प्रतिसाद धनंजय..
केशकर्तनालय...
हं
शिवाय तो
In reply to शिवाय तो by विसोबा खेचर
असेच म्हणतो