Skip to main content

अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.

लेखक गवि यांनी सोमवार, 21/10/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.." खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला. नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्‍यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती. घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते. मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं. पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता. तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड... मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले. आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर. असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही. चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो. घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी.. बरं. तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी. आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे. अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात. त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात. मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही. आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्‍यातून येणार्‍या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन. कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं. नुसतीच अंडी. पक्षी नाहीच. First श्रीमती घुत्कर: B पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें. म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त. D पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप. E अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं: F बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन. आत्तापर्यंत दिसलेलं: - एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही. - काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं. पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत. काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत. बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे. सी यू सून.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45780
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

थरारक, उत्कंठावर्धक, नेत्रसुखद, वाचनीय, नाविन्यपुर्ण ओळ न ओळ वाचतोय. तुमचे अपडेट आले की आधीचे व्हीडीओ बघुन परत परत तुलना करतोय. आणि पुढच्या अपडेट्सची वाट बघतोय.

बहुगुणी म्हणतायत तेच म्हणतो, तंतोतंत.. अजून एखादा कॅमेरा डकवता आला तर बघा.. आणि गविकाक, दिवसातून किमान एक अपडेट तरी टाकाच, काळजी/ उत्सुकता वाटतेय.. एस्.पी.सी.ए. ला कळवणार आहत का? पुढे जाऊन ही पिल्लं घरट्याबाहेर कधी आणि कशी झेप घेतील तेव्हा तुम्ही त्यांना कसं सावरणार, काही विचार केलाय का? कावळा हा महानालायक प्राणी आहे, टपून असतो! उडायला शिकणार्‍या कित्येक पोपटांना समूहाने कावळे टोचताना पाहिलय..

चांगला करमणूकीचा उपक्रम आहे .पक्षी थोडावेळ दूर जात असेल तर ओळखण्यासाठी अंड्यांवर स्केच पेनने रंगीत रेघा (रेझिस्टनसवर असतात तशा)मारा आणि वहीत प्रत्येकाची नोंद करा .जमल्यास अंडयाचे वजन घ्या .अगोदर आलेल्या पिलांच्या पायात रंगीत दोरे बांधा .पुढे कधी मोठे घुबड पाहिल्यास ओळखता येईल गविंचे घुबड .

गवी काका . त्या पिल्लांची काळजी घुबड घेइलच . पण तुम्ही जे करताय त्याला अगदी मनापासून सेल्यूट

In reply to by प्रभाकर पेठकर

आज व्हिडीओ तर घेतले. पण घुबडाईने पिल्लाना पूर्णवेळ पोटाखाली लपवून ठेवलेलं ... जाम उघड करेना. त्यामुळे काही इव्हेन्ट कॅप्चर झाला नाहीच. मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले. समोर बसून मॅन्युअली कॅप्चर करणं कार्यालयामुळे शक्य नाही. त्यामुळे पहाटे उठून वेळ काढतो. पण तेवढ्यात काही घडले नाही की काहीच कळत नाही अपडेट. आज घुबडीण जागची हललीच नाही त्यामुळे आज अपेक्षित असलेलं आणखी एक पिल्लू बाहेर आलं की नाही हेही कळलं नाही. :-(

In reply to by गवि

मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले.
बघाSSSS! झाला नं अपशकून??

In reply to by गवि

लॅपटॉपच्या एक्झॉस्ट जवळ एक टेबल फॅन चालू ठेवा. माझा लॅपटॉप तापला की मी सरळ त्याला उचलुन एसीच्या ब्लोकडे ठेवतो २-३ मिनीटं. तुमचा एसी सध्यां बंद असल्याने जर टेबल फॅन असेल तर तो वापरुन पहा.

व्हिडिओ कॅप्चरिंग आणि प्रोसेसिंगसाठी चिक्कार सिपीयू लागतो राव, नेहमीचा लॅपटॉप घेऊन केलत तर सीपीयु तापतोच, आतल्या संरक्षक रचनेमुळे प्रमाणाबाहेर तापत असेल चीप तर मशिन बंद होते आपोआप. गणपा भौ ने सांगितल्यानुसार थंड ठेवता येईल का बघा लॅपटॉप नाहीतर एक से भले दो ;) म्हणजे एक काम करेल तेव्हा दुसर्‍याला विश्रांती. अहो, जगभरातल्या माणसांचे डोळे लागलेत तुमच्या इव्हेंटवर, नाहीतर एखादा हायर करा लॅपटॉप.. (सिरीयसली) पण मशिन नाही हे सांगू नका ब्वॉ :)