Skip to main content

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

                           अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला. नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते. दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे रक्षण करू शकत नाही, हे अधोरेखीत झाले. सर्वत्र जनक्षोभ आणि संतापाची लाट उसळली, ज्यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले. जनक्षोभाचे विक्राळरूप बघून सरकार हादरले. भयमुक्त जीवन जगण्याचा नागरिकांचा अधिकार जोपासण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत निर्णय घेऊन जादूटोणा-विरोधी अधिनियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

                           जो अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. 

                    "प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नवा कायदा निर्माण केल्याने होते" अशी आधुनिक वेलक्वालिफ़ाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणार्‍या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एका नव्या कायद्याची भर घातली आहे. वस्तुतः: राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की, कोणत्याही गुन्हेगाराला वठणीवर आणण्यास पुरेसे ठरावे. पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नुसते नवेनवे कायदे केल्याने नव्हे तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्याने मिळवता येते, याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हातरी यायला हवे. 

                           अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे. 

                           जादूटोणा-विरोधी अधिनियम या प्रस्तावित कायद्याची सुद्धा तीच गत होईल, हे मसुद्याचे प्रारूप पाहून सहज लक्षात येते. एकंदरीत कुचकामी, निरुपयोगी पण उपद्रवी आणि पोलिसांना पैसे उकळण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा एक अनावश्यक कायदा, असे या प्रस्तावित कायद्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.

                           जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायद्याचे हे कलम अत्यंत अव्यवहार्य आहे, अनावश्यक आहे आणि शेतकरी वर्गाची गळचेपी करणारे आहे.

                           या राज्यात बहुसंख्येने शेतकरी राहतात आणि साप व विंचू यांचा घनिष्ट संबंध सर्वात जास्त शेतकर्‍यांचा येतो. सर्पदंश होऊन मृत्यू पावणार्‍यांमध्ये शेतकरी समाजच जास्त असतो. मग या विषयी एखादा कायदा तयार करायचा असेल तर शेतकरी समाजाला विश्वासात घ्यायला नको काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेईन किंवा अशा कायद्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यापूर्वी शेतकर्‍यांशी काही सल्लामसलत करेल, ही माझी अपेक्षा नव्हती आणि आजही नाही कारण; ही मंडळी स्वतः:च स्वतः:ला एवढी तज्ज्ञ आणि विद्वान समजतात की, त्यांना कुणाचेही म्हणणे समजावून घ्यायचे प्रयोजनच उरत नाही. पण सरकारचे काय? सरकारने तर संवाद साधायला हवा! संवाद साधला नाही तेही एकवेळ समजून घेता येईल पण निदान या प्रश्नाचा खोलवर अभ्यास तरी करायला हवा की नको? तेवढी विवेकशीलता जर सरकारमध्ये शिल्लक असती तर ते कलम या कायद्यात आलेच नसते.

                           साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे आता ही परंपरागत चालत आलेली उपचारपद्धती कायदेशीर अपराध ठरणार आहे. ज्या परंपरागत उपचार पद्धतीवर अनिसच्या दबावाखाली येऊन सरकार कायदा आणू पाहत आहे ती साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी उपचार पद्धती कशी असते, ते आपण पाहू.

१) विंचू (साधा) - साधा विंचू चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता नगण्य असते. चावल्यानंतर लगेच काही मिनिटातच अत्यंत असह्य वेदना सुरू होतात. पहिले साधारण दोन-तीन तासांपर्यंत असह्य वेदनांची तीव्रता चढत्याअंगाने आणखी वाढत जाते. त्यानंतर त्यापुढील दोन-तीन तास असह्य वेदनांची तीव्रता उतरत्याअंगाने कमी होत जातात. सर्वसाधारण पणे २४ तास विंचवाच्या विषाची परिणामता जाणवते. मात्र पहिले काही तास सोडले तर उर्वरित काळ वेदना सुसह्य असतात.

यावर करण्यात येणारे परंपरागत उपचार - काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.

३) साप - विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.
परंपरागत उपचार पद्धत : सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्याला झोप लागू देत नाही. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते. (दवाखान्यात उपचार करणार्‍या डॉक्टरचे सर्व पर्याय संपले आणि कोणताही रोगी शेवटच्या घटका मोजायला लागला की डॉक्टरमंडळी सुद्धा रोग्याची सलाईन सुद्धा काढून टाकतात आणि छातीवर जोरजोराने भार देऊन त्याचा श्वासोश्वास बंद पडू नये म्हणून कृत्रिमरीत्या प्रयत्न करतात. अर्थात ही उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्रात सुद्धा वापरली जाते) मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही
.......(अपूर्ण).........
                                                                                                                             - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24952
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by जॅक डनियल्स

डॉक्टरांचे नाव हिम्मतराव बाविस्कर नसून बावसकर आहे. लाल विंचवाचे विषाचा मोठ्या माणसानवर तेवढा जास्त प्रभाव होत नाही आणी सर्वात जास्त प्रभाव लहान मुलांवर होतो( वजनाच्या प्रमाणात विषाची मात्रा जास्त होते त्यामुळे) लाल विंचू चावल्यावर माणसाच्या रक्ताचा दाब प्रमाणाच्या पेक्षा वाढतो आणी त्यामुळे हृदयाचे काम अस्थिर होऊन रुग्णाला आकडी येते आणी रुग्ण दगावण्याची शक्यता असते यात प्राझोसीन नावाचे औषध शिरेतून दिले जाते आणी रुग्णाचा रक्तदाब नियंत्रित केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राझोसिन हे औषध विंचवाच्या प्रतीविषापेक्षा जास्त परिणामकारक आहे असे आढळले आहे. प्राझोसीन हे औषध अतिशय स्वस्त आणी कोणत्याही रुग्णालयात नेहेमी वापरले जाणारे औषध आहे. डॉक्टर बावसकरांच्या या संशोधनाने हजारो बाल रुग्णांचे कोकणात जीव वाचले आहेत. रच्याकने- हि सर्व माहिती मला स्वतः डॉक्टर( बावसकर) साहेबांच्या तोंडून ऐकायचे भाग्य लाभले. आम्ही ठाणे जिल्ह्यात एका डॉक्टर म्हसकरांच्या रीसोर्टला गेलो असताना ते स्वतः तेथे आले होते.डॉक्टरसाहेबाना मी( तेंव्हा मी लष्करात डॉक्टर होतो त्यामुळे थोडेसे वजन होते) विनंती केल्यावर त्यांनी तेथे या विषयावर एक छोटेसे भाषण दिले आणी आपले स्वतःचे अनुभव अतिशय सुंदर शब्दात सर्वाना सांगितले. अत्यंत हुशार पण साधा आणी सरळ माणूस आहे हे लगेच कळून येते.त्यांच्या सेवावृत्तीला प्रणाम.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद् ! थोडी चूक झाली. डॉ. बावसकरनी हे प्रयोसीन औषध कसे देतात आणि ते त्यांनी कसे शोधले हे मी त्यांच्या पुस्तकात वाचले होते पण आत्ता इकडे ते पुस्तक माझ्या कडे नसल्याने संदर्भ देता आले नाहीत.

मुटे यांचा लेख वाचला. तर्कसंगत वाटला. एक मुद्दा हत्या का झाली ? कुणी तरी असेच एक बाबा आहेत, त्यांचा भांडाफोड करण्याची घोषणा डॉ. दाभोळकरांनी केली होती. त्यांचे नाव घेतले जात आहे. आणि असे बाबा राज्यकर्त्या पक्षाशी संबंधित असतील तर पुढे काय होणार आपण कल्पना करु शकता.

मुद्दा सरकार व्ययक्तीक जीवनात हस्तक्षेप करत आहे हा आहे प्राध्यापक बिरुटे सर, आनंदिता आणि बाकी बरेच सुशिक्षीत मिपावासी ह्यांना हा कायदा झाला असल्या मुळे बरे वाटले आहे. त्यात चुक पण काही नाही. पण हे लक्षात घ्या की अश्या कायद्याच्या निमित्ताने सरकार तुमच्या व्ययक्तीक विचारधारा ठरवायचा प्रयत्न करत आहे्. आणि हे खुप धोकादायक आहे. मी नास्तिक आहे त्यामुळे समाजात एकदम मायनोरिटी मधे आहे, त्यामुळे मला सरकार अशी सक्ती करु लागले की भीती वाटते. आज तुम्हाला पाहिजे तसा कायदा केला गेलाय. नंतर दुसरे धार्मिक सरकार आले, आणि त्यांनी म्हणले की जे नास्तिक आहेत त्यांना ७ वर्ष तुरुंगात टाका. तर? जर मला आज मांत्रिका कडे जायला सरकार बंदी घालू शकते, तर उद्या दुसरे सरकार मी नास्तिक आहे म्हणुन मला शिक्षा करु शकते. म्हणुनच मी पहिल्यापासुन म्हणतो आहे की हा कायदा जरी आपल्या सर्वांना योग्य वाटत असला तरी सरकारला अशी सक्ती करण्याची संधी देऊ नये.

In reply to by प्रसाद१९७१

मी नास्तिक आहे
आणि तरीसुध्धा मांत्रिकावर विश्वास??...कारण मांत्रिकावर विश्वास ठेवणे म्हणजे मंत्रविद्या, त्यांच्या देवता (आणि त्याचबरोबर सगळ्या ३३ कोटी देवांवर विश्वास ठेवणे) तुमच्या घरातल्या व्यक्ती आजारी असतिल असतील तर तुम्ही त्याना डौक्टरकडे कधीच घेउन जायला नको मग...बरोबर??

In reply to by टवाळ कार्टा

आणि तरीसुध्धा मांत्रिकावर विश्वास??...
असे मी कधी म्हणले? तुम्ही नीट वाचा मी काय लिहीले आहे ते. लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे मूर्खपणा करायचे ( दुसर्‍यांना त्रास न होता ) व्यक्ती स्वातंत्र आहे की नाही?

In reply to by प्रसाद१९७१

लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे मूर्खपणा करायचे ( दुसर्‍यांना त्रास न होता ) व्यक्ती स्वातंत्र आहे की नाही?
व्वा :)

In reply to by प्रसाद१९७१

मुलांना शाळेत घालणे हे पालकांचे पालकांचे कर्तव्य आहे तसेच योग्य उपचार करणे हे पिडीत व्यक्ती सोबतच्या लोकांचे कर्तव्य आहे . असे उपचार मिळणे हा लोकांचा हक्क हक्क आहे . हा कायदा योग्य उपचार देण्यासाठी आणि अयोग्य उपचारांपासून वाचण्यास मदत करेल . यात कोणत्याही वैयक्तिक हक्कावर गदा येत नाही . हा कायदा आस्तिक असण्याला , देवाची उपासना करण्यास विरोध करत नहि.

जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे.
मुळातले कलम काय आहे सांगु शकाल काय? (पेपरात आलेले सारांश नव्हे. आजकाल पेपरात जे येते त्यात सारे काही सत्य मिळाले तर पेढे वाटले जातात म्हणणे ;) ) ते वाचल्याशिवाय लेखातील भावनेशी सहमती/असहमती शक्य नाही

In reply to by ऋषिकेश

अहो कायदा अथवा वटहुकूम लांब राहीला... हे सरकारी संस्थळावरून पाहीले.... मंत्रिमंडळ त्रिर्णय 21 ऑगस्ट, 2112 (मंत्रिमंडळ बैठक क्र. 129) हे वाचले तर समजेल की अधिकृत नोंदींमधे वटहुकूम काढला जावा ही जी काही बातमी माध्यमांमधे आली आहे त्याची साधी नोंदही नाही आहे. :(