मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ये क्या जगाह है दोस्तो

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ये क्या जगह है दोस्तो श्री.गोरा सौमित्र यांच्या " प्रलयानंतरची प्रार्थना" या लेखा (ते कथा म्हणत असले तरी मी गद्यकाव्यच म्हणतो) वरचे प्रतिसाद वाचल्यावर मला आठवण झाली ती ये क्या जगह है दोस्तो, ये कोनसा दयार है ? हद्दे निगाहतक जहॉं गुबारही गुबार है ! मित्र हो, आपण मिपावर लिहितो तेव्हा आपण एमेचा पेपर सोडवत नसतो, सेमिनारमध्ये वाचावयाचा निबंधही लिहित नसतो, नाही सत्यकथेत प्रकाशित व्हावी अशी कविता. आपली छायाचित्रे नॅशनल जीओग्राफित प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेची नाहीत हे आपल्याला माहीत असते. निदान माझी तरी अशी समजुत आहे. आपण आपल्या मित्रमंडळीत जे "गुण" उधळावयास लाजणार नाही असेच लेखन इथे करतो, करावयास आपण बिन्धास्त असतो. जर मला श्रीविठ्ठलावर लिहितांना डॉ.ढेरे. म.वा. धोंड यांच्या पातळीवर लिहावयाचे आहे किंवा कवितांवर लिहितांना शांताबाई शेळके, विजया राजाध्यक्ष यांच्या जवळपास तरी जावयाचे आहे असे जर कुणी सुचित केले तर .. तर संपलच की हो. लेखणी मोडूनच टाकली पाहिजे. आज इथेही काही सुरेख लेखन वाचावयास मिळते, मान्य. पण आपण कबुल करावयास काही हरकत नाही कीं आपण आपल्या निखळ आनंदाकरिता लिहितो व इथल्या सुहृदांना त्यात सहभागी करावयाचा प्रयत्न करतो. तुम्हाला आलेला चांगला एसेमेस मित्रमैत्रीणींना फ़ॉरवर्ड करता तसे. लिहिणारा जास्तीत जास्त चांगलेच तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार, होय कीं नाही ? मग समजा तुम्हाला ते आवडले नाही किंवा समजले नाही तर बिघडले काय ? माझ्या सुग्रण पत्नीने पन्नास वर्षे चांगलेचुंगले करून वाढले, एखादे दिवशी मीठ कमीजास्त पडले तर मी आरडाओरडा करत नाही, सुहास्यवदनानेच खातो. असे मी वागणे हा तिचा हक्क व माझे कर्तव्य आहे. मिपावर आपण एका कुटुंबातले आहोत. ही शिस्त आपण सर्वांनी पाळावी असे मला वाटते. म्हणजे टीका करूच नये कां ? नाही, मी तसे म्हणत नाही. पण मैत्रीणीने जरा जास्त पावडर लावली तर लगेच "खारादाणा" म्हणणे टाळावे. "शब्दबंबाळ" या कटु शब्दाऐवजी " जरा काटछाट केली असती तर जास्त बरे झाले असते. वाक्ये लहान व आपण नेहमी बोलतो त्या शब्दांचा उपयोग करून लिहिली असती तर आकलन सोपे झाले असते " असे म्हणणे योग्य. माउली नऊ हजार ओव्या मृदु भाषेत लिहितात तर आपणास आपल्या छोट्याशा प्रतिसादात कां बरे कठोर भाषा वापरावी लागावी ? आवडल नाही तर लिहा ना "मला आवडल नाही कारण ....". कळल नाही तर तसेही लिहा. पण एक लक्षात ठेवा मर्ढेकर, पु.शि.रेगे, ग्रेस व जी.ए.कुलकर्णीही आपल्याला पहिल्यांदी कळले नाहीत. जाणकार समीक्षकांनाही कळले नाहीत. त्यांची थोरवी कळण्यास काही वर्षे जावी लागली. इथल्या अल्पजीवी लिखाणाकडे नाही आवडले/कळले तर दुर्लक्ष करावे. मित्रहो, मला मान्य आहे की मी व सर्वसाधारण मिपाकर यांच्यांत एका पिढीपेक्षाही जास्त अंतर आहे. अंतर केवळ वर्षांनी मोजावे असे नाही. ते दृष्टिकोनातही असते. कोणालाही टोचावे असे आता वाटत नाही. मागे वळून पाहिल्यावर मी पूर्वीही असाच होतो असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण आज फुकटचा सल्ला देण्याचेच दिवस.( नाही तरी सल्ला विचारतो कोण म्हणा !) आज जरी टिंगळटवाळी, अवांतर-अतिअवांतर प्रतिसादांतून खुसपटे काढणे In असले तरी नवागताच्या पहिल्या लेखावर प्रतिसाद जरा सहृदयतेने द्यावेत असे मला वाटते. हल्ली बदनाम झालेल्या लोकसभेतही सभासदाच्या पहिल्या भाषणाच्यावेळी सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे, अडथळे आणू नयेत अशी प्रथा आहे. आपण खासदारांपेक्षा नक्कीच सुसंस्कृत आहोत ! मी श्री. गोरा सौमित्र यांच्या वतीने लिहित आहे असे मुळीच नाही. ते नखें काढून भांडावयास समर्थ आहेत असे त्यांच्या उत्तरांवरून उघडच आहे. असो. आता थोडेसे त्यांच्या लेखाबद्दल. लेखाचा आवाका तसा लहानच. एका खोलीत तो तिच्यावर आरडाओरडा करत आहे. ती गप्प बसून ऐकत आहे. तिला रडू फुटल्यावर त्याला त्याची चूक कळते व तो तिची क्षमा मागतो. बस्स. लग्नानंतर दोन-चार वर्षांतच या चहाच्या कपातील वादळांची सर्वांना सवय होते. गोसौ.यांनी लिहितांना जी भाषा वापरली आहे ती श्री. मन-१ यांनी अचुकपणे सांगितली आहे त्याप्रमाणे जुन्या नाटकातील वा ऐतिहासिक कादंबर्‍यातील स्वगत व हल्लीची बोली यांच्या मिश्रणाची आहे व त्यामुळे समजावून घेण्यास अवघड झाली आहे. इथे समजवून घेण्यास म्हणजे वाचक पात्रांशी/प्रसंगाशी समरस होण्यास. त्यामुळे त्यांनी उभे केलेले शब्दचित्र हे पिकॅसोचे चित्र झाले आहे. माझ्या मते या गद्यकाव्याचे रसग्रहण या एका वाक्यात होऊं शकेल. शेवटी एक आग्रहाची विनंती. एक छान कविता वाचावयाची असेल तर गोरा सौमित्र यांची खरडवही पहा. शरद

वाचने 2296 वाचनखूण प्रतिक्रिया 5

विश्वनाथ मेहेंदळे 06/08/2013 - 11:56
चोवीस तासात एकही प्रतिसाद नाही… शरद काका, अरण्यरुदन यालाच म्हणतात :-( जरा सविस्तर प्रतिसाद द्यायचा आहे. रात्री देईन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/08/2013 - 12:01
लेखातील भावनेशी जवळ जवळ सहमतच असल्यामुळे प्रतिसाद लिहुनही मी तरी लिहायचे टाळले होते. अरण्यरुदन वगैरे असं मला काही वाटत नाही, बाकी,आता मलाही सायंकाळी सवडीनं प्रतिसाद लिहिणं आलं. :) -दिलीप बिरुटे

मदनबाण 06/08/2013 - 12:27
आपली छायाचित्रे नॅशनल जीओग्राफित प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेची नाहीत हे आपल्याला माहीत असते. निदान माझी तरी अशी समजुत आहे. माझी देखील अशीच समजुत आहे... आपण खासदारांपेक्षा नक्कीच सुसंस्कृत आहोत ! हल्ली सुसंस्कृत असण्याचे तोटेच जास्त आहेत की काय असे वाटु लागले आहे, खासदारांना २० हजार आणि आमदारांना ४० हजार पेंशन विधीमंडळात कोणतीही चर्चा न करता केवळ 2 मिनीटात पदरी पाडुन घेतलं आहे. जनतेचे सेवक आहेत ना हे ? मग जनतेच्याच खिशातुन जमा करुन सरकारी तिजोरीत जमा केलेल्या पैशांवर ३० कोटी बोजा पडणार याच यांना काहीच वाटत नाही ? ५रु / १२रु मधे जेवण मिळत ना ? गरिबी कमी झाली आहे ना ? मग यांना पगारवाढ / पेंशन कशाला हवी ? यावर मात्र सर्व पक्ष एकी दाखवतात ! पण वर्षानु वर्ष खड्ड्यांतुन प्रवास करणार्‍या सामान्य जनतेस मात्र जगणेही कठीण करुन ठेवणार.सामान्य माणसाने प्रामाणिकपणे कष्ट करुन पैसे कमवुन घर चालवण्याचे दिवस संपले हेच खरे ! :( असो बरेच अवांतर झाले... मी श्री. गोरा सौमित्र यांच्या वतीने लिहित आहे असे मुळीच नाही. ते नखें काढून भांडावयास समर्थ आहेत असे त्यांच्या उत्तरांवरून उघडच आहे. यातच सर्व काही आले असे वाटते.

पैसा 07/08/2013 - 15:14
पण हे कुणी मुद्दाम केले आहे/असेल असे वाटत नाही. मिपाच्या नेहमीच्या पद्धतीनेच सुरुवातीचे काही प्रतिसाद आले की पुढे त्यावर साधारण त्याच लाईनीने प्रतिसाद येतात. बरेचजण निव्वळ सगळ्या चेष्टामस्करीत सामील होण्यापुरते असतात. त्यात लेखकाचा हिरमोड करण्याचा हेतू नसतो. खूपदा अशा रॅगिंगचा शिकार झालेला नवा सदस्य जरा जुना झाला की तेव्हाच्या नव्या सदस्यांना मिपाच्या "परंपरा" दाखवून देतो! तरीही निदान काही जणांनी तरी स्फुट आवडल्याचे लिहिले आहेच!
हे बाकी खरे आहे ! आतले आणि बाहेरचे !बाहेरचे आत आले की आधिक उत्साहाने बाहेरच्याना विरोध करतो ! आपला मुद्दा समजला पण त्याचबरोबर " काहीही" चालते हा समज होऊ नये हे ही आवश्यकच ! किमान पात्रता ही असायलाच हवी. आणि काही ठिकाणी आरडाओरडा करावा लागतो , लातोंके भूत बातोसे नही मानते ! अर्थात तारतम्य आणि विवेक असायलाच हवा !