मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बदला !

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पलंगावर पडल्या पडल्या मी भिंतीवरच्या पालीच्या हालचाली न्याहाळत होतो. हळूहळू ती पाल समोरच्या नाकतोड्याकडे सरकत होती आणि तिच्या अस्तित्वाची जाणीवही नसलेला नाकतोडा एकदम शांत होता. अचानक पालीने त्याच्यावर झडप घातली आणि आपल्यावर येणार्‍या संकटाची त्याला कल्पना येण्यापूर्वीच तो तिच्या जबड्यात तडफडत होता. मी ही किरणवर असाच अनपेक्षितपणे घाला घालणार होतो. मार्ग सुचत नव्हता पण किरणला संपवण्याचा निश्चय मी पक्का केला होता. किरण आणि मी तसे जुने मित्र म्हणजे जिवलग म्हणता येणार नाही पण दोन मिनिट थांबून बोलण्याइतपत नक्कीच. आमची मैत्री जास्त वाढायला कारण ठरली ती मधुरा, माझी आणि किरणची कॉमन मैत्रीण. सदा हसरी, हजरजबाबी, स्मार्ट अशी. मधुरामुळे आम्हा तिघांचा ग्रुप झाला. कॉलेजकट्टा, कॅन्टिन ही आमची रोजची भेटीची ठिकाणं. तासनतास आमच्या गप्पा रंगत असत मग त्या कोणत्याही विषयावर का असेनात! माझं वाचन दांडगं असल्याने मी कधीच बोलण्यात हार जात नसे. बोलताना मी एखादा मुद्दा बिनचुकपणे मांडला की ती कौतुकभरल्या नजरेने माझ्याकडे पाहत असे. एकूणच वातावरण आणि वयं पाहता मला प्रेमात पडायला वेळ लागला नाही. माझं कॉलेजातलं अभ्यासातलं आणि इतर कलांमधलं वर्चस्व वादातीत असल्याने वर दिसायलाही उजवाच असल्याने तिच्याकडूनही मला प्रतिसाद मिळायला वेळ लागला नाही. या सगळ्या प्रकारात आमच्या ग्रुपचा तिसरा मेंबर म्हणजे किरण, त्याच्या कडे आमचं जरा दुर्लक्षच झालं. किरणच्या मनात काय विचार चालू होते त्याची जाणीव मला जेव्हा मधुराने तिला किरणने प्रपोज केल्याचे आणि तिने त्याला नकार दिल्याची बातमी मला सांगितली तेव्हा झाली. त्या दिवसापासून आमच्यात आणि किरणच्यात थोडा दुरावा निर्माण झाला खरा. यथावकाश मी आणि मधुराने प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या, कॉलेज संपल्यावर एखादी छानशी नोकरी मिळवून आम्ही लग्न करायचं ठरवूनही टाकलं. किरणच्या वडिलांना शेअरमार्केटमधे प्रचंड फायदा झाल्याने त्यांनी नोकरी सोडून धंद्यात उतरायचं ठरवलं, त्यावरून त्यांच्या घरात जे वादळ उठलं त्यात किरणही ओढला गेल्याने सगळंच सुरळीत झालं. कॉलेज संपलं आणि रोज डझनावारी अर्ज खरडताना ‘नोकरी मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही’ हे जाणवत राहिलं. नोकरी मिळाली तरी ती कुडमुडीच असायची पण मला हवी होती माझ्या स्वप्नातली छानशी नोकरी जिच्यामुळे मी मधुराशी लग्न करू शकलो असतो. या नोकरी शोधण्याच्या धडपडीत आमच्या भेटीगाठीही कमी झाल्या पण मलाही त्यात वावगं वाटलं नाही. एखादी चांगली नोकरी मिळायचाच अवकाश मधुरा कायमची माझी होणार होती. पण हे असं घडायचं नव्हतं. कारण ठरला किरण, त्याच्या वडिलांनी बिझनेसमध्ये उतरल्यावर भक्कम पैसा कमावला तो ही अल्पावधीत. एव्हाना ते शहरातल्या मोजक्याच श्रीमंतात गणल्या जायला लागले. यानंतर काय घडलं ते कळलं नाही पण एक दिवशी किरण- मधुराच्या लग्नाची पत्रिका माझ्या घरी येऊन पडली..... पोष्टाने. चडफडत....... चडफडत राहिलो मी......... एकदा वाटलं थेट मधुराला भेटून स्पष्टीकरण मागावं पण सध्या ती ही शहरात नसल्याचे कळले. बहुतेक हे ही किरणनेच रचलेलं कारस्थान असावं ,आपल्या एकुलत्या एक मुलाच्या हट्टापुढे जगातला कोणता बाप झुकणार नाही ? बस्स, त्याच दिवशी मी किरणचा बदला घ्यायचा निश्चय केला. मला किरणला संपवायचं होतं पण कसं.....? चाकू, सुरा असल्या हत्याराने त्याला मारणं मला मुळीच शक्य नव्हतं कारण मुळात इतकी हिंमत माझ्यात नाही, आणि रक्त बघून तर मला चक्कर येते. बंदूक, पिस्तूल माझ्या आवाक्या बाहेरची हत्यारं आणि विषप्रयोग करणे सर्वथा अशक्य. एक- दोन दिवस अश्या भयाण अस्वस्थतेत गेल्यावर डोक्यातले विचारमंथन कमी झाले आणि त्यातूनच तेलाच्या काळ्या तवंगासारखा एकच विचार तरंगला, काळी जादू ....... करणी ......., हा मार्ग माझ्या सारख्यांसाठी एकदम योग्य होता. मी निवडलेला मार्ग तसा वरवर सोपा वाटत होता पण प्रत्यक्षात फ़ाSSरच कठिण. एकतर असे काळी जादू करणारे बाबा लोक रस्त्यावर सापडत नाहीत. वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीतली तमाम वचनं आणि विधानं तद्दन खोटी असतात हा ही अनुभव आला. शेवटी अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांतून मी एक पत्ता मिळवलाच, यासाठी मला दारूच्या गुत्त्यापासून ते सभ्य माणसाला नाव घ्यायलाही लाज वाटेल अश्या ठिकाणांपर्यंत वावर केला. सरतेशेवटी मी मिळवलीच. ती एक निर्जन जागेतली झोपडी होती. शहराच्या बाजूने वहाणार्‍या नदीच्या पात्रा पलीकडे असलेली. तिथलाच तांत्रिक असले अघोरी कार्य करू शकतो असे मला पक्के कळले होते. झोपडीपर्यंत जाताना ठाम असलेली माझी पावले जवळ जाताच लटपटायला लागली. वेळ दिवसाची असली तरी भयाण शांतता, अगदी एखाद्या पाखराचाही आवाज नाही. बाजूने वाहणारी नदीही शांतच, मध्येच तिच्या प्रवाहात तयार होणारा एखादा भोवरा त्या वातावरणात आपल्या खळबळाटाने भर घालतोय, जणू पाण्यातून अचानक काही बाहेर येऊ पाहतंय असं वाटावं. थरथरत्या हातानं मी झोपडीचा दरवाजा उघडून आत पाऊल टाकले. वर कुठेतरी लावलेल्या एखाद्या काचेच्या कौलातून आत पसरलेल्या अंधुक उजेडात धिप्पाड वाटणारी काळीभोर असलेली त्या मांत्रिकाची बाह्याकृती माझ्याकडेच पाहताना दिसत होती. त्याच्या बाजूलाच म्लान असलेले अग्निकुंड दिसत होते. तिथे रिकाम्या असलेल्या एकमेव फाटक्या चटईवर मी बसलो. अर्थात इतक्या दूरवर मी आल्याने माझ्या हेतूची थोडीफार कल्पना असावीच, पण मी माझ्या कामाचे स्वरूप सांगताच त्याने सरळसरळ नकार दिला, पण मी पिच्छाच सोडत नसल्याचे बघून थोडे आढेवेढे घेत अखेर तो तयार झाला. या कामासाठी लागणार्‍या साहित्याची यादी जेव्हा त्याने माझ्यासमोर मांडली तेव्हा मात्र माझे डोळे विस्फारले. साध्या लिंबापासून ते कोणत्या कोणत्या प्राण्या-पक्ष्यांच्या नेमक्या हाडांपर्यंत बरंच काही होतं त्यात, या वस्तू मी कधी आणि कशा मिळवणार.....? अखेरीस या वस्तूही त्यानेच आणायचे मान्य केले पण त्यासाठी त्याने मागितलेली रक्कमही तशीच होती. सूडाने वेडापिसा झालेल्या अवस्थेत मी ती रक्कमही मान्य केली, मात्र एक गोष्ट मात्र मलाच मिळवावी लागणार होती. किरणचे रक्त.. अगदी एखादा थेंब असेल तरी चालेल पण ते गरजेचं होतं, ते ही येत्या दहा दिवसांत कारण दहा दिवसांनी अमावस्या होती आणि तीच रात्र किरणची शेवटची रात्र ठरणार होती. त्या दहा दिवसांच्या कालावधीत मला जमा करण्याची मुख्य गोष्ट होती ‘पैसा’ कारण मांत्रिकाला द्यायची रक्कम भरमसाठ होती. दहा दिवसांत मला ती जमवायलाच हवी होती. थोडीफार शिल्लक आणि उसन्याउधार्‍या करूनही ती पूर्णं होत नव्हती म्हणून मी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला लाजिरवाणी वाटणारी गोष्ट केली आणि सतत आठवडाभर ती करतच राहिलो. या आठवड्याभरात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किरणचे ‘रक्त’ कसे मिळवायचे याचाच विचार करत राहिलो. कदाचित कुठूनतरी माझाही विचार होत असावा, किरणला अपघात झाला. त्याला शहरातल्या एकमेव मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. मला ही बातमी कळल्यावर आनंदच झाला, या अपघातातून तो वाचूच नये अशी इच्छाही मनात डोकावून गेली, पण नाही...., किरणचा मृत्यू मी योजलेल्या भयानक पद्धतीनेच मला व्हायला हवा होता. मला चटकन एक कल्पना सुचली, तडक मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. किरणची प्रकृती ठीक होती पण ते एक बडे धेंड असल्याने त्याला एका खास ए.सी. रूममध्ये ठेवलं होतं. सर्जिकल मास्कमागे चेहरा लपवत त्या रूमच्या आजूबाजूला वावरत राहिलो. तिथले सगळेच कर्मचारी तसले मास्क वापरत असल्याने त्यात वावगं वाटायचं कारणच नव्हतं. बराच वेळ घोटाळत राहिल्यावर मला जे हवे होते ते घडले. तासातासाने रूम साफ करणार्‍या सफाई कर्मचार्‍याने किरणच्या रूममधली वेस्टबास्केट उचलून बाहेर आणली. ताबडतोब मी त्याच्या हातातून घेतली, कदाचित मला एखादा नवा कामगार समजून तो सरळ पुढच्या रूमकडे निघून गेला. आडबाजुला जाऊन मी ती बास्केट उपडी केली. आतला कचरा विस्कटून पाहताना मला हवी ती गोष्ट सापडली. तो एक कापसाचा गोळा होता, त्याच्यावर एक लहानसाच पण रक्ताचा डाग होता. कदाचित सलाईन इंजेक्शन वगैरेच्या सुईमुळे आलेले रक्त त्याने टिपले असेल. हवी ती वस्तू सापडताच मी सरळ घर गाठले. माझ्याकडे आता महत्त्वाच्या दोन्ही गोष्टी होत्या उद्याच्या अमावास्येला किरणचा शेवट नक्की होता. अमावास्येची काळीकुट्ट रात्र, त्या निर्जन भागात बॅटरीच्या झोताच्या मागोमाग चालणारा मी एकटाच. त्या दिवशी दिवसा जे पक्षांचे आवाज ऐकायला मी आसुसला होतो तेच आवाज आता या काळोखाच्या विळख्यात कानावर पडताच दचकायला होत होतं. वा-याच्या सळसळत्या आवाजात बॅटरीच्या उजेडाच्या कडेकडेला दिसणारी झाडंही भयावह आकृत्या दाखवत होती. हातातल्या रुमालाने सारखा घाम टिपावा लागत होता, एव्हाना हातातल्या टॉर्चचे सेलही संपायला लागल्याने असेल उजेड मंदावला होता. कसाबसा मी त्या झोपडीपर्यंत पोहोचलो. छातीतली धडधड कानापर्यंत पोचत होती तिच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत, लटपटत मी दरवाजा लोटला. आतला भाग मागल्यावेळेच्या तुलनेत पार बदलला होता. गेल्यावेळी म्लान दिसणारे ते अग्निकुंड आता धडधडत होते, त्याच्या पिवळ्यानारंगी उजेडात दाढीमिश्यांचे जंजाळ असलेला तो धिप्पाड तांत्रिक भयावह दिसत होता. त्याने भस्माने अंगावर काढलेले पट्टे त्यात आणखी भर घालत होते, कोणत्या चितेची ती राख असेल कोण जाणे. आजूबाजूला ठेवलेल्या मानवी कवट्या, त्यातल्या काही नकलीही असतील पण छातीत धडकी भरवायला पुरेश्या होत्या. हातातलं पैशांचं पुडकं मी त्याच्या समोर ठेवलं. त्यानं मान डोलवत ते न मोजताच बाजूला सरकवलं कदाचित आपल्याला फसवण्याची कुणाला हिंमत होणार नाही याची त्याला खात्री असावी. खर्जातल्या आवाजात त्याने माझा विचार पक्का असल्याची खात्री करून घेतली. मी मान डोलवताच त्याने आत्ता करत असलेल्या कामाची जबाबदारी माझी असल्याचे सांगून टाकले. बहुदा ही त्यांची रूढी असावी. त्याने माझ्यावर सोपवलेल्या दुसर्‍या कामाबद्दल मला विचारलं, थरथरत्या हातानं मी खिशातली कागदाची पुरचुंडी काढून त्याच्याकडे दिली, त्यातल्या कापसाच्या बोळ्याकडे पाहून मान डोलवत त्याने ती बाजूला सुरक्षित ठेवली. तांत्रिकाच्या सांगण्यावरून समोरच्या नदीत अंघोळ करून ओल्या कपड्यातच मी त्याच्या समोर आखलेल्या रिंगणात बसलो. रिंगणातून काहीही झालं तरी बाहेर न पडण्याची कडक ताकीद त्याने मला दिली होती. आपल्या खर्जातल्या आवाजात एक एक मंत्र उच्चारत त्याने बाजूला ठेवलेल्या ढिगातून एक एक वस्तू काढून समोरच्या अग्निकुंडात टाकायला सुरुवात केली. प्रत्येक वस्तू आगीत पडताच कुंडातून निघणारे चित्रविचित्र आवाज आता त्या झोपडीत दाटायला लागले होते. अग्निकुंडातून निघणार्‍या धुराला खवखवणारा उग्र वास यायला लागला. मध्येच एखादी वस्तू आगीत पडताच ज्वाळेचा रंग निळा होत होता. कडवट दर्प सहन न होऊन नाकाडोळ्यांतून पाणी वाहायला लागले. अचानक मंत्रोच्चारण थांबले. आपल्या जागेवरून उठून त्याने झोपडीची काही कौलं बाजूला काढली आणि पुन्हा तो आपल्या जागी बसला. त्यावेळी मोठ्या आवाजात काही उच्चारून त्याने मुठीतली वस्तू कुंडात टाकली, त्यासरशी ज्वाळा आणखी भडकल्या. तडतड करत उडालेल्या एका ठिणगीचा चटका मलाही बसला, पण..... पण, आणखीही काही घडत होतं. मघा त्याने काढलेल्या कौलांतून थंडगार वारा आत येत होता. आधीचं ओला असल्याने म्हणा पण मला चांगलीच थंडी वाजायला लागली. बाहेर वा-याचा जोर जास्त असावा असं आत येणार्‍या वार्‍याच्या झोतावरून वाटत होतं. काही वेळातच हा प्रकार काही वेगळाच असल्याची जाणीव झाली, आत येणार्‍या वार्‍याने आता लहानश्या वावटळीचे रूप घेतले. आता तांत्रिकाने बाजूला ठेवलेली आणि इतकावेळ मला न दिसलेली लहानशी कापडी बाहुली हातात घेतली. मंत्रोच्चार करताना तो तिच्यावर काही प्रक्रिया करत होता. शेवटी त्याने मी आणलेला कापसाचा बोळा त्या बाहुलीत भरला आणि बाहुली बंद केली. पुन्हा बाहुली समोर ठेवून त्याचे मंत्रोच्चार वेगाने सुरू झाले. झोपडीत अवतरलेल्या त्या वावटळीचा केंद्रबिंदू आता ती बाहुली झाली होती. मध्येच अचानक कुणी बटण दाबावे तशी ती वावटळ थांबली, आणि प्रथमच माझे लक्ष समोर केंद्रित झाले. अग्निकुंडाच्या वेड्यावाकड्या नाचणार्‍या प्रकाशात समोरच्या त्या वेड्याविद्र्या विकृत चेहर्‍याच्या त्या बाहुलीला मी हालचाल करताना पाहिले आणि डोळ्यावर अंधार दाटून आला. गाSSर पाण्याच्या सपकार्‍याने मी शुद्धीवर आलो. एव्हाना छताच्या कौलांसहित सर्व पूर्ववत झाले होते. समोर तांत्रिकाच्या हातात ती बाहुली होती, आणि तो मला सांगत होता. " आता हिच्यात तुमच्या मानसाचं प्रान हैत समजा, हिला कायबी कराल तसं त्या मानसाला हुईल बगा" बोलता बोलता त्याने पुढे केलेल्या बाहुलीच्या स्पर्शाने मी दचकून मागे उडालो. त्या भरात मी कधी ते रिंगण पार केलं ते मलाच कळलं नाही, चमकून मी तांत्रिकाकडे पाहताच त्यानं मान डोलवली, कदाचित आता त्या रिंगणाची गरज नसावी. तरीही मला ती बाहुली हातात घ्यायची नव्हती. अखेरीस मी त्यालाच काय काय करायचे ते सांगितले पण एक अट घातली. सकाळी दहाच्या आत त्याने काहीही करायचे नव्हते कारण..... हॉस्पिटलातल्या पेशंटना भेटण्याची वेळ सकाळी दहाला सुरू होते. मला किरणच्या त्या अघोरी यातना माझ्या डोळ्याने पाहायच्या होत्या. एका आसुरी आनंदात मी घरी आलो. झोप कदाचित येणार नाही असं वाटत होतं पण डोळा लागलाच. जाग आली तेव्हा सव्वा नऊ झाले होते. मी घाईतच आवराआवरी केली. तरी आरशासमोर उभं राहून केसांवर कंगवा फिरवेपर्यंत घड्याळाने दहाचे ठोके दिले. आणखी पंधरा मिनिटांनी काही फरक पडणार नव्हता. बूट चढवताना समोर पडलेल्या जुन्या वर्तमानपत्रातला किरणच्या अपघाताच्या बातमीचा मथळा दिसला. विचार केला बातमी वाचून आलो असं सांगता येईल म्हणून पूर्णं बातमी वाचून काढली. बातमीच्या शेवटाला एक आवाहनही होते, अपघातामुळे किरणला रक्ताची तातडीने गरज आहे शहरातल्या रक्तपेढीत त्याच्या गटाच्या रक्ताची कमतरता असल्याने रक्तदात्यांनी तातडीने मदत करावी. त्याचा रक्तगटही अत्यंत दुर्मिळ असा `ओ निगेटिव्ह' असल्याने ही गरज निर्माण झाली होती. बातमी वाचून वर्तमानपत्र बाजूला टाकले आणि बाहेर पाऊल टाकणार तोच............ माझ्या डाव्या पायातून जोरदार वेदना उसळली आणि तो पाय लुळा पडला. वेदना सहन न होऊन मी जमिनीवर कोसळलो. मनात क्षणात विचार चमकला अरे असे तर.........त्याच क्षणी उजव्या पायातूनही तशीच जोरदार वेदनेची लाट शरीरभर पसरली. वेदनांच्या मोहोळात सापडल्याने डोळ्यावर अंधेरी यायला लागली. ओरडून सांगावेसे वाटत होते कुणीतरी त्या तांत्रिकाला थांबवा...... आता तो अश्याच सुया खुपसत राहणार. दोन्ही पायात झाल्या आता दोन्ही हातात, आणि नंतर कपाळाच्या मध्यभागी खिळा..........., वेदनेच्या तिसर्‍या लाटेत मनातले विचारही कस्पटासारखे भिरकावल्या गेले, पण असं मला का........? वेदनेने तडफडत डोळ्यातला अंधार दाट होत असताना शेवटच्या क्षणी वीज चमकल्यासारखा विचार चमकला. मागे आठवडाभर मी एक लाजिरवाणे कृत्य करत होतो, महागड्या दराने माझंच बहुमूल्य रक्त विकत होतो. आणि माझा रक्तगट आहे `ओ निगेटिव्ह'.

वाचने 5599 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by टवाळ कार्टा

शिल्पा ब 24/06/2013 - 23:28
हेच माझ्याही मनात आलं. मला आधी वाटलं होतं की वीर्य वगैरे विकतो की काय ! कारण आठवडाभर रक्त देउन सशक्त राहणे कसं शक्य आहे?

आतिवास 24/06/2013 - 21:02
भयकथेचा थरार जमला आहे - पण आज अशा गोष्टी घडतील हे पटत नाही (माझे मत चुकीचे असू शकते.)कदाचित काळाचा संदर्भ बदलला तर अशी काल्पनिक शक्यता वाटू शकते. शिवाय रक्तदानाबद्दल जी काही शास्त्रीय माहिती वाचली आहे, तिच्यानुसार तुम्ही मांडलेली शक्यता ( कापसावरचा थेंब किरणचा नसून दुस-याच्या रक्ताचा निघणं ..) काही जमलेली नाही असं वाटून गेलं.

पैसा 24/06/2013 - 22:35
फक्त किरण ऐवजी मधुरा किंवा इतर कोणी हॉस्पिटलमधला माणूस निघेल असं वाटलं होतं. @ टवाळ कार्टा, आपण मध्यमवर्गीय मंडळी रक्तदान कारतो. रक्त विकत नाही.

ब़जरबट्टू 05/07/2013 - 14:25
थोडक्यात घोळ झालाय काहीतरी. हेच म्हणतो.. शेवट 'आम्लेट जमले नाय म्हणून भुर्जी' करुन टाकल्यावानी वाटतय.