Skip to main content

कृष्ण - एक विवेचन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 19/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कृष्ण या रचनेवर कधीतरी लिहावे असे मनात होते. बहुदा, ह्या रचनेचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मी रचनेतून योग्य रित्या पोहचवू शकलो नाही. अर्थात हा माझाच एक कवी म्हणून पराभव म्हणायला लागेल. कुठलीही रचना करतांना ती सुबोध आणि सहज व्हावी हाच उद्देश असतो, पण कां कोण जाणे हि रचना तशी झाली नाही. मग विचार केला, थोड लिहाव यावर आणि सांगाव कि मला नक्की काय अभिप्रेत आहे ते. म्हणून हा लेखनप्रपंच.कृष्ण ह्या व्यक्तिरेखेला अगणित पदर आहेत. प्रत्येकाला तो वेगळा दिसतो आणि यातच व्यासांच्या अतुलनीय प्रतिभेचे यश आहे. महाभारतासारखे महाकाव्य घडवतांना, त्यातील प्रत्येक घटनेला नेहमीच दोन बाजू असतील याची पुरेपुर काळजी व्यासांनी घेतली आहे. मग त्यातली कुठलीही बाजू योग्य वा अयोग्य ह्याचा निर्णय त्या रचनेचा आस्वाद घेण्यार्‍यावर व्यासांनी सोडून दिला आहे. आता यामुळे यावर बरेच वाद आहेत. जसे कि, राधा हे पात्र मुळ महाभारतात आहे कि नाही? कृष्ण हा खरचं 'देव' आहे कि नाही? वगैरे वगैरे. पण समजा आपण असे मानले कि, महाभारत फक्त एक महाकाव्य किंवा काव्यातून सांगितलेली एक भव्य कादंबरी आहे, तर त्यातून काही नवे पदर उलगडतात. मग त्यातली सगळी पात्रे हि 'लार्जर दॅन लाइफ' या पातळीवरुन 'मानवी' पातळीवर येतात आणि मग त्यांची सगळी सुख दुखः स्पष्ट दिसायला लागतात. असं म्हणतात, कुठलीही साहित्यिक रचना हि जीवनातूनच प्रेरित झालेली असते, मग महाभारत तर महाकाव्य, महर्षी व्यासांसारख्या महाप्रचंड प्रतिभावान कवीच्या प्रतिभेतून उतरलेले, ते याला अपवाद कसे असेल? आणि महाभारताबद्दल तर अनेक विचारवंतानी हे सांगितलेलेच आहे कि, मानवी मनाचा असा कुठलाही पदर नाही जो महाभारतात सापडणार नाही. असा सगळा विचार करत असतांना, मला असे वाटले, कि त्याच व्यक्तिरेखांना मानव्य पातळीवर आणले असता, मला महाभारतील प्रसंग, पात्रे, त्यांच्या आजुबाजुची परिस्थिती हे सगळे कसे प्रतित होईल? आणि महाभारतात सगळ्यात महत्वाचे पात्र कुठले? तर कृष्ण. मग त्याच्याच अवतीभवतीने महाभारत अनुभवणे गरजेचे झाले. म्हणून मग माझी हि पहिली रचना:
कृष्ण - १ कधी कधी वाटते कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्‍या कदंब वृक्षाखाली उदात्त युगातीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी सुंदर मोरपिसांच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली म्हणजे मग द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना साध्या सुती साडीच्या दोन हात तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही
आता या रचनेत, कृष्णाच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत, एक, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस धावून जाणारा दिव्य देवत्व उंची ल्यालेला कृष्ण आणि निरागस, अल्लड तारुण्यसुलभ प्रेमाचा उत्कट अविष्कार अनुभवणारा कृष्ण. निरागसता आणि प्रेम हा त्याचा मुळ स्थायीभाव, पण समोर येणार्‍या परिस्थितीमुळे पोक्त आणि सारासार विचार करुन येणार्‍या प्रसंगाला सामोरे जाणाराही तोच कृष्ण. या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या दोन ठळक बाजू इथे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. तुमच्या आमच्या सारख्या साध्या सरळ माणसांनी कितीही ठरवले तरी नेहमीच उदात्त किंवा तथाकथित सात्विकतेने वागता येतेच असे नाही. आपल्या जगण्याला व्यवहाराची रुक्ष आणि विरस बाजूही असते, तशीच ती कृष्णाच्या जगण्यालाही होती. पण तरी आपण त्याला देवच मानतो, कां?
कृष्ण - २ पण मग नंतर वाटते राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे कृष्णाच्या निळाईने भरलेल्या सहवासाची स्मरणे आयुष्यभर वाहण्यापेक्षा कधीतरी मी त्या गिरिधराला अर्पण होईन ही भावना नाही... ही "आशा" जास्त सुखदायी आहे
आता मीरा हे असेच एक वादग्रस्त पात्र, तसं तर महाभारततले हे पात्रच नव्हे, पण तरी कृष्णाशी जिवाशिवाचं नातं सांगणार. मग परत एकदा इथे मला साध्या माणसांच्या नैसर्गिक स्वभावाचा पैलू इथे दिसतो. तो मी असा मांडला आहे. माणसाला एखादी हवीहवीशी वाटणारी वस्तू म्हणा वा व्यक्ति म्हणा एकदा मिळाली कि माणूस त्यात समाधानी राहत नाही, तर त्याला अजून कुठलीतरी नविन आस लागते. आणि दुर्दैवाने जर एकदा प्राप्त झालेली वस्तू हरवली वा प्रिय व्यक्तिशी कायमची ताटातूट झाली कि माणसाला जास्तच दु:ख होते. हा माणसाचा स्थायीभाव. अर्थात तो वाईट अजिबातच नाही, त्यामुळेच कदाचित माणसाची प्रगती झाली असे म्हणता येईल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसाचे समाधान हरवते. म्हणूनच कदाचित माणसाला एखादी इच्छा प्रत्यक्ष पूर्ण होण्यापेक्षाही ती इच्छा पूर्ण होणार आहे हि भावना, हि आशा जास्त सुखदायी असते.
कृष्ण - ३ कधी कधी असही वाटते कृष्ण होण्यापेक्षाही अर्जुन व्हावे बृहन्नडा होऊन एखाद वर्ष नाचावे लागेल परंतु घनघोर रणसंगर चालू असतांना काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन नुसते बसून तर राहावे नाही लागणार
आता या रचनेकडे जरा या दृष्टीने पहा. मला नेहमीच असं वाटत आले आहे, कि विधात्याने सृष्टीची, माणसाची रचना केली आणि काही नियम ठरवले. नियम कशाचे तर जिवन नावाच्या खेळाचे. जिवनाच्या पटावर माणसांची, प्राण्यांची आणि इतर सजिव-निर्जिवांची प्यादी सोडून दिली आणि मग फक्त दुरुन हा खेळ तो पहात बसला. तो ह्या खेळात ढवळाढवळ करत नाही. आणि त्याचे नियम कोणीच मोडूच शकत नाही. तुमचे आयुष्य किती असावे याचे नैसर्गिक गणित आहे. तुमचे हृदय किती ठोके देणार हे इथे आल्यावर तुम्ही कसे वागता यावर ठरत असते. जसा एखादा कपडा तुम्ही कसा वापरता यावर त्याचे आयुर्मान ठरते, तसेच. पण आपणचं तयार केलेला कपडा, स्वतःचीच ओढाताण करुन घेतो आहे आणि स्वतःच्याच नाशाला कारणीभूत होत आहे आणि त्याला वाचविण्याची ताकद असून सुद्धा त्याला त्याच्या कर्मफळावर सोडून देणे हे भयंकर अवघड काम आहे. अहो, आपल्या स्वतःच्याच मुलांचे उदाहरण घ्या. त्यांना इजा होणार हे आपल्या लक्षात आले की आपण त्यांना त्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करत नाही कां? पण विधाता तसं करत नाही, तो सगळं तुमच्यावर सोडतो. हे वाटते तितके सोपे काम नाही. म्हणून वरील रचनेत, मनुष्याचे प्रतिनिधित्व अर्जुन करतोय तर विधात्याचे कृष्ण. अर्जुनाने जे काही केले ते आपले कर्तव्य मानून आणि कृष्ण फक्त साक्षिदार. तो त्या कर्माचा साथिदार नाही. तो फक्त कर्म समजावून सांगतो, ज्याला मी मगाशी जिवनाचे नियम म्हटले. हा जिवनपट कायमच घनघोर रणसंगर असतो आणि तो मांडणारा एक विधाता असतोच आणि त्यावर प्याद म्हणून अर्जुन असतातच अन् दुर्योधनही असतात. पण म्हणून या खेळात विधाता ढवळाढवळ करत नाही, तो फक्त पाहत असतो. आपल्याच रचनेकडे इतकं तटस्थपणे पहायला देवत्वाचीच उंची हवी.
कृष्ण - ४ कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही अहो,अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्‍या सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते
वरिल रचनेबद्दल सांगायचे तर, मुळात यात एक उपरोधिक प्रश्न आहे. जी व्यक्ति जन्मालाच मुळात अंधारकोठडीत येते, त्याच व्यक्तिने जगाला प्रकाशाची ओळख करुन देणे हा एक भन्नाट काव्यमय न्याय व्यासांनी साधला आहे असे मला वाटते. जिवनात रुढार्थाने ज्याला आपण सुख सुख म्हणतो असे काहीच प्राप्त न झालेला असा तो कृष्ण. सख्खे आई बाप भेटायला वयाची १४-१५ वर्षे जावी लागली. आयुष्यभर मित्र कमी आणि भक्तच जास्त मिळाले. पहिल्या प्रेमाची ओळख होता होताच प्रेयसीशी दुरावा. जिथे लहानाचा मोठा झाला तो प्रदेश, तिथल्या आठवणी तेथेच ठेवून, सोडून जावे लागले. अर्थात हे आपण कृष्णाला आपण मानवी पातळीवर आणून विचार केला तर जाणवणारी दु:खे आहेत. कृष्ण व्हायला सात भाऊ मरायलाच हवे असे नाही, पण जन्मत: मृत्यू पावणार्‍या सात भावांच्या पाठीवर जन्माला येणं, आणि समज आल्यानंतर ते कळणं, हे किती जिवघेणे असेल? आयुष्याच्या अखेरीस सुद्धा आपल्याच वंशाचा सर्वनाश आपल्याच डोळ्यांनी पाहणे नशीबी आले त्याच्या. आपण नेहमीच आपल्या इवल्या इवल्या दु:खांचे गोडवे गात बसतो, मग कृष्णाने काय करावे? म्हणून मी उपरोधाने म्हणतोय, कि कृष्ण होण तसे फार अवघड नाही.पण मग त्याच कृष्णाची दुसरी अत्यंत महत्वाची सकारात्मक बाजु अशी कि, याच कृष्णाने स्वबळावर, स्वचातुर्यावर आपल्या आजुबाजुच्या प्रतिकुल परिस्थितिवर मात करुन वासुदेवपदापर्यंत पोहचणे ह्यातच त्याच्या देवत्वपदाचे रहस्य असावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6240
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

व्वा!! अतिशय सुंदर मुक्तक लिहलंय. सध्या अरूणा ढेरेंच कृष्णकिनारा वाचतोय. राधा, कुंती आणि द्रौपदी! कृष्णाच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या स्त्रिया आणि त्यांना 'कळालेला' कृष्ण!

द्रौपदी वस्त्रहरण हा एकमेव प्रसंग मला नेहमी कोड्यात टाकत आला कि जिथे कृष्णाने अतिशय डॉमिनेटिंग पध्दतिने त्याचे देवत्व सिध्द केले. कारण हाच प्रसंग असा आहे ज्याने त्याच्या बालपणिच्या व्रात्यपणासंबंधी काहि कालाने उदभवु शकेल अशा वादांवर पांघरुण घातलेच, पण बाहुबल, वैचारीक हुशारी, कुटपणा, तत्ववेत्तेपणा यापलिकडील अचाट सामर्थ्याचे पुरुषांना धडकी भरवणारे प्रदर्शन ते हि होम पिच व एकांत नसताना करुन भक्तिप्रेममार्गे जाणार्‍या स्त्रियांच्या गळ्यातला ताइत बनवले. माझ्यापुरते विचार केल्यास, हा प्रसंग नसता तर बहुदा श्रीकृष्णाच्या असामान्यत्वावर पराकोटीच्या शंका निर्माण होतात*, भलेहि तो एक महान योध्दा, सर्वोतकृष्ट तत्ववेत्ता, हाडाचा राजकारणी व जाणता राजा होता. पण अल्टिमेट देवत्वाच निसंदिग्ध प्रदर्शन फक्त द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातच. *हो त्याचे गोकुळातिल सार्वजनिक चमत्कार माहित आहेत पण त्याबाबतही त्याला एक "माणुस" या पातळिवर आणायला काहि तर्क सहजी लावता येतात.

In reply to by अग्निकोल्हा

जिथे कृष्णाने अतिशय डॉमिनेटिंग पध्दतिने त्याचे देवत्व सिध्द केले
हाच प्रसंग भांडारकरच्या संशोधित प्रतीमध्ये काढून टाकला आहे. विकर्ण आणि विदुराने केलेला हस्तक्षेप, भीमार्जुनांच्या कौरव-कर्ण वधाच्या प्रतिज्ञा ऐकून सारासार विचार करून धृतराष्ट्र वस्त्रहरणाचा प्रसंग थांबवून द्रौपदीला तीन वर देण्यास प्रवृत्त होतो. कृष्णाने द्रौपदीला सोडवले नाही या घटनेला पुढे वनपर्वातही आधार आहे. वनवासात पांडवांना भेटायला कृष्ण जातो तेव्हा वस्त्रहरणाची संपूर्ण हकिकत द्रौपदी कृष्णाला सांगते यात ती कृष्णानेच वस्त्रे पुरवून तिचे लज्जारक्षण केले याचा उल्लेख कुठेही करत नाही. याउप्पर कृष्ण तिला सांगतो की ह्यावेळी तो द्वारकेत नसून शाल्वाच्या सौभ नगरीचा नाश करण्यासाठी गेला असल्याने त्याला ही घटना समजली नाही नंतर सात्यकीकडून हस्तिनापुराचा समग्र वृत्तांत कळल्याबरोबर तो पांडवांना भेटण्यासाठी वनात आला.

In reply to by प्रचेतस

हाच प्रसंग भांडारकरच्या संशोधित प्रतीमध्ये काढून टाकला आहे
नक्कि कोणति प्रत व्यासांचे मुळ "महाकाव्य" की आणखि काही ? तीन वर कोणते व त्यातुन काय मागितले ? चला म्हण़जे कृष्ण संकटसमयि धावुन आला न्हवता तर ? क्या बात है :)
कृष्णाने द्रौपदीला सोडवले नाही या घटनेला पुढे वनपर्वातही आधार आहे.
असुदे असुदे. चांगलच आहे :). फक्त सामान्य मानवाचा विचार केल्यास. कोणतिही स्त्रिलिंगी व्यक्ति तिला पुरुषांची प्रत्यक्षप्रत्यक्ष मदत नसेल तर पुरुषांवर अंकुशधारी सत्ता गाजवु शकत नाही, त्यांचे निर्णय फिरवु शकत नाही*. विषेशतः जेव्हां त्यांच्या विरोधात निर्णय अमलात आणायचा असेल तर. शारिरीक हल्ला सोडा, शाब्दिक झटापटही ती एकटी तरु शकणार नाही. तर मग ज्या स्त्रिकडुन सणसणित अपमान होउन पुरुषि अहंकार कमालिचा डिवचला गेल्याने संतापलेला सैतान, साक्षात बापजाद्यांसमोर रडिचा डाव खेळुन जिंकतात व त्याच्या व बलाच्या विजयोन्मादात असताना, त्या अबलेबाबत अचानक थोरामोठ्यांचे फंडे ऐकुन थंड पडतात... हेच मुळात पटत नाही. असला कठिण डाव साधणे निलकांत सोडुन अन्य कोणाला प्रॅक्टिकली शक्यच वाटत नाही. म्हणूनच ह्या प्रसंगाचे मोठे कोडे आहे. की कृष्ण नसेल तर नक्कि घडलं तरी काय ?

In reply to by अग्निकोल्हा

नक्कि कोणति प्रत व्यासांचे मुळ "महाकाव्य" की आणखि काही ?
प्रक्षिप्त असलेले भाग गाळून महाभारताची जास्तीत जास्त अचूक प्रत. याबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.
तीन वर कोणते व त्यातुन काय मागितले ?
पहिला वराने द्रौपदीने युधिष्ठिराला दास्यत्वातून मुक्त केले, दुसर्‍या वराने इतर चारही पांडवांना त्यांच्या रथ आणि शस्त्रांसह दास्यत्वातून मुक्त केले. धृतराष्ट्र अजूनही तिसरा वर देत असताना द्रौपदीने तो स्वीकारला नाही आणि मला क्षत्रिय स्त्रीस तिसरा वर मागणे हे अनुचित असून दास्यमुक्त पांडव आपल्या कर्मांनेच सर्व प्राप्त करून घेतील असे म्हटले. याउप्परी धृतराष्ट्राने स्वतःच पांडवांना त्यांचे धन,राज्य सर्व काही परत दिले.
त्या अबलेबाबत अचानक थोरामोठ्यांचे फंडे ऐकुन थंड पडतात.
विदुर, विकर्ण, भीष्माचे कोणीही ऐकत नाहीत. पण भीमार्जुनांच्या रक्तपाताच्या भीषण प्रतिज्ञा ऐकून भयभीत झालेला राजा धृतराष्ट्र निर्णायक हस्तक्षेप करतो. बाकी नक्की काय घडले ते वर आलेच आहे. वस्त्रहरणाचा प्रसंग अर्ध्यावरच थांबवला गेला. पण जी काही मानहानी व्हायची ती झालीच व पुढील युद्धाची बीजे पेरली गेली. हाती आलेला डाव मोडल्यामुळे निराश झालेल्या दुर्योधन, शकुनीने बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास असा एकच पण लावून अनुद्युत खेळण्यासाठी इन्द्रप्रस्थी निघालेल्या पांडवांना अर्ध्या वाटेवरूनच परत बोलावले.

In reply to by अग्निकोल्हा

हे श्रीक्रुष्णाने शिश्टाई साठी गेले असताना,जेव्हा दुर्योधनाने या गवळ्याला पक्डुन कैद करा असे सन्गितले तेव्हा होते. असे वाटते.

मला सगळीच कविता आवडली होती. तेंव्हाही अन आत्ताही. तरीही विवेचन आवडल. स्वतःचा विचार विस्तृतपणे लिहिणे, हे ही एक आव्हानच.

कृष्ण सविस्तर प्रतिसाद नंतर देतो

सुंदर काव्यमनोगताची सुंदर उकल... सर्व प्राचीन साहित्य काव्यातच लिहिले जात होते कारण लिखित पुस्तके येण्याच्या अगोदरच्या काळात केवळ मौखीक परंपरेने इतिहास पुढच्या पिढीकडे जाणे शक्य होते. छंदबद्ध काव्यरचमुळे मूळ रचना लक्षात ठेवणे सोपे होते आणी त्यांत भेसळ करणे (असे झालेच नाही असे नाही, पण) कठीण होत असे. महाभारत हे धार्मिक काव्यापेक्षा जास्त इतिहासाच्या धाटणिने लिहिलेले आहे. कारण त्यांतले वर्णन "जसे झाले तसे" आहे... धार्मिक लेखनासारखे कोणतिही व्यक्तीरेखा १००% चांगली किंवा १००% वाईट रंगवलेली नाही. याविरुद्ध रामायण हे धार्मिक काव्याच्या पठडीतले आहे... त्यांत रामाच्या प्रत्येक गोष्टीचे चांगली म्हणूनच समर्थन आहे... मग ते पाठिमागून बाण मारून केलेला वालीवध असो अथवा कोण्या एका परिटाच्या बडबडीमुळे केलेला सितेचा त्याग असो. कृष्णाला त्याच्या जीवनकाळात (महाभारतातील त्याच्या पात्राला) देवत्व बहाल केलेले नाही. मात्र एक असामान्य कर्तृत्वाचा मानव म्हणून त्याचा हस्तीनापूर ते द्वारका या राजघाराण्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित राजेरजवाड्यांवर प्रभाव नक्कीच होता. पण त्यालाही स्वतःच्या राज्याचे आणि स्वतःच्या मोठेपणाचे रक्षण करण्यासाठी जन्मभर माणसासारखा लढा द्यावाच लागला... हे काम त्याने कोण्या एका दैवी चमत्काराने चुटकीसरशी केले असे महाभारतात तरी नाही. आयुष्याच्या शेवटास तर तो स्वकियांच्या कलहालाही आवरू शकला नाही. मात्र त्याच्या मृत्युनंतर मात्र ज्यांनी त्याला आयुष्यभर विरोध केला त्याच लोकांनी देवत्व बहाल करून त्याच्या दैवी चमत्काराच्या कहाण्या लिहायला सुरुवात केली ! कृष्ण मला आपल्या कर्तृत्वाने असामान्यत्व कमावलेला एक माणूस म्हणून--- नराचा नारायण कसा बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून--- निश्चितच आदरणिय वाटतो !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>>कृष्ण मला आपल्या कर्तृत्वाने असामान्यत्व कमावलेला एक माणूस म्हणून--- नराचा नारायण कसा बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून--- निश्चितच आदरणिय वाटतो !>>>

तुझी कविता तेव्हा आवडली होतीच, आता अधिकचं विवरण सुद्धा आवडलं.

कृष्ण १ ते ४ या कविता (खास करुन २) फारच आवडल्या होत्या. पण त्याच्या सुंदर गूढ अर्थाला तसेच राहू द्यायचे होते. ते संपूर्णपणे उलगडून सांगितल्याने त्याविषयीचे आकर्षण कमी झाले, असे मला वाटते. ग्रेसनी जर त्यांच्या कविता स्पष्ट करुन सांगितल्या असत्या तर त्यांचे वलय कमी झाले असते. बाकी तुम्ही लिहिलेलाच अर्थ बहुतांशाने जाणवला होता.

कविता आवडली, विवेचनही. बाकी 'महाभारत' हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहील इतके त्याचे सामर्थ्य नक्कीच आहे. आता मीरा हे असेच एक वादग्रस्त पात्र, लोक वाद घालतात म्हणून ते व्यक्तिचित्र वादग्रस्त होत नाही, लोक वादग्रस्त असतात :-)

In reply to by आतिवास

लोक वाद घालतात म्हणून ते व्यक्तिचित्र वादग्रस्त होत नाही, लोक वादग्रस्त असतात
खल्लास!!!! पूर्ण सहमत!

In reply to by आतिवास

लोक वाद घालतात म्हणून ते व्यक्तिचित्र वादग्रस्त होत नाही, लोक वादग्रस्त असतात.
ताई, दंडवत स्विकारावा.. ह्याला म्हणतात भाषाचातुर्य..

+१.

कविता आवडली... मला मात्र 'रुक्मिणी' व्हावेसे वाटते. विश्वातील सर्वोत्तम, सर्वेश्रेष्ठ आणि सर्वाधिक यशस्वी अशा पुरुषोत्तम द्वारकाधीशाची 'सहधर्मचारिणी' बनावेसे वाटते. एकवेळ राधा-मीरा बनणे सोपे, पण कॄष्ण अन्तर बाह्य फक्त रुक्मिणीलाच समजला असावा

In reply to by मनिम्याऊ

हेच तर कृष्णाचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं 'ये सिर्फ मेरा है' वाटायला लावायला आवश्यक सगळे गुण,पुरावे नि प्रसंग असणारा पूर्णावतार नि तरीही प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचा. अवांतर असावं कदाचित : आकर्षति इति कृष्णः (सगळ्यांना आकर्षून घेणारा. नि त्याबरोबर विभूतीयोग वाचल्यावर जे जे आकर्षक नि स्वतःकडं खेचून घेणारे ते ते कृष्णाची/ त्या तत्त्वाची आठवण करुन देणारं ठरावं )

In reply to by प्यारे१

प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं 'ये सिर्फ मेरा है' वाटायला लावायला आवश्यक सगळे गुण,पुरावे नि प्रसंग असणारा पूर्णावतार नि तरीही प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचा.
स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ही श्वेताश्वतर उपनिषदातली प्रसिद्ध उक्ती आठवली. सर्व विश्व व्यापूनही दशांगुळे उरणारा तो.