Skip to main content

एक हरवलेली मैत्री..

सोमवार, 20/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग वैताग आहे हा पाऊस, नेमके घरातून बाहेर पडायच्या वेळी दारात हजर. जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा, पण ऐकतोय कसला. जरा कमी झाला तर निदान रिक्षास्टॅंड पर्यंत तरी जाता येईल. उगाच तेवढ्यासाठी म्हणून छत्री रेनकोट सांभाळायची झंजट नकोय. बाकी एकवेळ ते परवडेल, पण एकदा का हिची कधीपासून सांगतेय गाडी घ्या ची कॅसेट सुरू झाली की गाडी घसरलीच म्हणून समजा. उगाच मूडचा कचरा नकोय. किती दिवसांनी आज मस्त आऊटींग प्लॅन केलीय. मप्टीप्लेक्समध्ये सिनेमा, त्यानंतर मॉलमध्येच थोडीफार विंडो शॉपिंग, डोळे आणि मन भरून पावले की उदरभरणाची सोय जवळच्याच ओपन रेस्टॉरंटमध्ये. नेहमीचे आपले कोपर्‍यातले टेबल आणि इकडच्या तिकडच्या गप्पा.. आज तर सिनेमावरच रंगतील.. शेवटी शाहरुखचा आहे, माझा आवडता तर हिचा नावडता. कशी तयार झाली देव जाणे. बरेच दिवसांनी त्याचा सिनेमा येतोय म्हणून असावे. बाकी या शाहरूखला सुद्धा हल्ली आमीरचेच वारे लागले वाटते. बहुधा आय.पी.एल मध्येच जास्त व्यस्त झाला असावा. पण ही कुठे एवढा वेळ बिझी आहे, "ए चल ग लवकर, किती मेकअप-शेकअप करशील, समोर प्रियांका चोप्रा असताना तुला कोणी बघणार नाहीये तिथे." .. आह..!! प्रियांका चोप्रा..! तिचे सिनेमात असणे म्हणजे माझ्यासारख्या शाहरूख फॅनला पण बोनसच होता. ट्रेलर मध्ये काय चिकणी दिसत होती बया. सिनेमा बंडल निघाला तरी अर्धे पैसे वसूल याची फुल्ल ग्यारंटी.! यार, या रिक्षावाल्यांचा पण संप आहे का आज. नको तेव्हा मार्केट मार्केट गणेशनगर गांधीचौक करत अंगावर येतात, पण आज एक दिसेल तर शप्पथ. शाहरूखच्या पिक्चरची स्टार्ट म्हणजे भारताची बॅटींग सुरु असताना सचिन सेहवाग खेळत असलेल्या पॉवरप्लेची पहिली पंधरा षटके. कसेही करून वेळेवर पोहचा पण त्याची एंट्री चुकता कामा नये. तरी नशीब, सहाच डोक्यात ठेऊन निघालेलो पण शोचा खरा टाईम सव्वासहा होता. पाचेक मिनिटे आधीच पोहोचलो. अजून पूर्ण अंधार केला नव्हता म्हणून बरे, जागा शोधायला जास्त त्रास झाला नाही. तसेही बाल्कनीमध्ये प्रिमियर गोल्डच्या फक्त चार रांगा होत्या. आपला कॉलेजच्या जमान्यापासूनचा एक उसूल होता, जर सिनेमा थिएटरातच बघायचा तर मग फुल्ल शानसे नाहीतर केबलवाला झिंदाबाद. हे स्टॉल-बिल मध्ये बसून बघणे आपल्याला कधी जमलेच नव्हते. अजून जाहीरातीच चालू होत्या. एवढा वेळ हिला सिनेमाची सुरुवात चुकते की नाही याचे जराही टेंशन नव्हते पण आता जाहिराती देखील अश्या आवडीने बघत होती, जणू काही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावरची चलचित्रे बघत होती. माझी नजर मात्र भिरभिरत होती.. नेहमीप्रमाणेच.. सवयीप्रमाणेच.. पुढे कोण बसलेय, मागे कोण बसलेय, कोणाचे डोके तर मध्ये येत नाहिये ना. आपण फॅमिली बरोबर आलो आहोत, बाजूला एखादा टवाळखोर ग्रुप तर नाहिये ना. सिनेमात मन नाही रमले, वा एखादे गाणे नाहीच बघावेसे वाटले, तर सहज नजर टाकायला म्हणून आजूबाजुला एखादे प्रेक्षणीय स्थळ......... अन ईतक्यातच, माझी नजर एका २८-३० वर्षाच्या मुलावर.. अंह.. सद्ग्रुहस्थावर पडली. चेहरा साईड अ‍ॅंगलने ओळखीचा वाटत होता पण प्रकाश पुरेसा नसल्याने खात्रीने सांगता येत नव्हते. शाळा सोडून आज १४ वर्षे झाली होती. त्या नंतरही ३-४ वर्षे प्रसन्ना माझ्या संपर्कात होता. कधीतरी भेटणे व्हायचे, वर्ष सहा महिन्यातून एखादा फोन. पण गेल्या ६-७ वर्षात काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. ते थेट आज दिसत होता. चेहरा बराच बदलला होता त्याचा. कित्येक जण मला बोलायचे, आजही तू सोळा वर्षांचा बछडा वाटतोस यार, पण हा मात्र अकाली प्रौढ झाल्यासारखा वाटत होता. बरोबर एक मुलगी होती. बायकोच असावी. दुसरे काही असण्याची शक्यता नव्हती, आजही तसाच बावळट असणार तो. त्या वयातही एखाद्या मुलीकडे पाहून त्याला कधी काही वाटले नव्हते, तर आता कसल्या मुली फिरवतोय. एक-दोन वर्षापूर्वी त्याच्या लग्नाची बातमी कानावर आली होती. तसा सिद्धूला मेल ही आला होता. लग्न झाल्यावर दहा-एक दिवसाने त्याने चेक केलेला. माझ्याकडे तर त्याचा मेल आय-डी देखील नव्हता. मोबाईलचा तेव्हा जमाना नव्हता. माझ्याकडे तरी बर्‍याच उशीरा आला. मध्यंतरी तो उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलेला, हे ही इथून तिथून कानावर आलेले, त्याचे विमान उडाल्यानंतरच समजलेले. शाळेतील आमच्या ग्रुपमधील माझा सर्वात खास मित्र, पण आज त्याच्याबद्दल मला दुसर्‍यांकडून माहीती मिळत होती. अरे तुझा तो शाळेतला लंबू मित्र, काय नाव त्याचे.. हां.. प्रसन्ना.. आहे कुठे तो सध्या.. असे कोणी विचारले की माझ्याकडे उत्तर नसायचे. मग समोरचाच मला त्याच्याबद्दल काही सांगायचा जे मला माहीत नाही हे कबूल करायला लाज वाटावी.. चलता है, तसे मी तरी आजवर कुठे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला. या फेसबूक-ट्विटरच्या जमान्यात खरे तर ते सहज शक्य होते. पण नाही जमलं.. दुरावलेल्या नात्यांमध्ये नेहमी समोरून पाऊल उचलले जायची वाट आपण का बघतो.. त्यालाही माझ्याबद्दल इथून तिथूनच समजत असणार आणि तो ही आज माझ्याबद्दल असाच विचार करत असणार, जसे आज मी त्याच्याबद्दल करत होतो.. पण आज... आज मात्र अगदी जवळ बसला होता. पटकन हाक मारावीशी वाटत होती. ते देखील प्रसन्ना न बोलता ‘ए पश्याss फुसक्याs लंबूटांग’ करत ओरडावेसे वाटत होते. भले इतक्या वर्षांनी माझा आवाज ओळखणे शक्य नसले तरी हे शब्द त्याच्या कानी पडताच समजावे की कोणीतरी आपलाच शाळामित्र पुकारतोय. पण ही इच्छा तशीच दाबून ठेवली. समोर सिनेमा सुरू झाला होता. त्याच्याबरोबर त्याची बायको होती. मी सुद्धा एकटा नव्हतो. सिनेमा सुरू झाल्याने एक प्रकारची शांतता जाणवत होती, जिचा भंग करायची हिम्मत माझ्या नव्यानेच बनत चाललेल्या पांढरपेश्या व्यक्तीमत्वात नव्हती. ईतक्यात ही म्हणाली, "बघ रे, आता तुझ्या शारुकची एन्ट्री होईल". इतरवेळी मी हिला म्हणालो असतो, "चल हट, मी तर प्रियांकाच्या एन्ट्रीची वाट बघतोय." पण आज नुसतेच ‘ह्म्म’ केले. थोड्याच वेळात थिएटर शिट्ट्यांच्या आवाजाने दणानून उठले. कदाचित झाली असावी एन्ट्री. पण मी मात्र फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो. सहावी ‘ब’ मधून मी सातवी ’अ’ मध्ये प्रवेश केला. वर्ग बदलला तसे वर्गमित्र बदलले. एकाच वर्गातील म्हणून वर्गमित्र नाहीतर मैत्री तशी अजून कोणाशी झाली नव्हती. पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिका देशमुख बाईंनी सर्वांना आपापल्या मित्रांबरोबर हवे त्या जागी बसायची परवानगी दिली. नवीन मुलांमध्ये चटकन मिसळायची सवय नसल्याने मी मात्र एकटाच मागे राहिलो. पश्या त्या दिवशी आला नव्हता. त्यामुळे उरलेसुरले आपापसात या हिशोबाने दुसर्‍या दिवशी बाईंनीच आमची जोडी लावून टाकली. पण हीच जोडी पुढे जाऊन आपल्या डोक्याला ताप होणार आहे याची त्यांनी कल्पना केली नसावी. महिन्याभरातच जैसे को तैसा मिला म्हणत आमचे छान जमले. बंडखोरी ही आम्हा दोघांची वृत्ती नसून स्वभावाचाच एक पैलू होता. शाळेत आपण फक्त शिकायलाच येत नाही यावर आम्हा दोघांचाही ठाम विश्वास होता. शाळा म्हटले की शिस्त आली आणि शिस्त म्हणाले की नियम हे आलेच, पण प्रत्येक नियम हा एकदा ना एकदा तरी तोडलाच गेला पाहिजे हा नियम आम्ही दोघे काटेकोरपणे पाळायचो. आमच्या पुढच्या बाकावर सिद्धेश आणि सुयश बसायचे. जशी आमची एक जोडी तशी त्या दोघांची दुसरी जोडी, अन या दोन जोड्या मिळून आम्हा चौघांची एक चौकडी तयार झाली होती, जी पुढच्या काही महिन्यांतच ‘राजा शिवाजीची चांडाळ चौकडी’ म्हणून सार्‍या स्टाफ मध्ये ओळखली जाउ लागली. कोणतीही पालकसभा असो, त्यात निघणारी ब्लॅकलिस्ट वा डिफॉल्टर लिस्ट असो, त्यात आमचे नाव नाही असे कधी झाले नव्हते. सातवी ते दहावी या चार वर्षात किमान चाळीस वेळा तरी आम्हा दोघांना एकमेकांचे कान पकडून कॉरिडॉरमध्ये उभे राहायची शिक्षा झाली असावी. आमचा सगळा कारभारच एकत्र चालायचा. रोज सकाळी मी मुद्दाम एक स्टॉप आधी उतरून त्याच्याबरोबर चालत यायचो, तर संध्याकाळी तो माझी बस येईपर्यंत माझ्या स्टॉपवर बसून मला कंपनी द्यायचा. दुपारचे जेवण एकमेकांच्या डब्यात व्हायचे. जगात उष्टे खाणे असा काही प्रकार असतो हे कधी मनालाही शिवले नव्हते. डब्यात एखादा खास पदार्थ असेल तर इतरांपासून लपवून ते आधी एकमेकांना द्यायचो. अश्यावेळी डबा शिक्षकांची नजर चुकवून मधल्या सुट्टीच्या पंधरा मिनिटे आधीच निघायचा. एखादी गोष्ट तुझी माझी असा उल्लेख आमच्यात कधी झालेला आठवत नाही. मग ते पेन-पेन्सिल, वही-पुस्तक वा पाण्याची बाटली का असेना. जेवण झाल्यावर पाणी प्यायलाही एकत्रच जायचो. डबा धुवायला मात्र मैदानाजवळच्या पाणवठ्यावर, जिथून शेजारील मुलींच्या शाळेच्या बिल्डींगवर सहजच नजर टाकता यायची. इथे मात्र तेवढे दोघांचे तोंड दोन दिशेला असायचे. कधी चोरट्या नजरेनेही त्याने तिथे पाहिल्याचे आठवत नाही. वर्ग चालू असताना एकालाच टॉयलेटला झाली असली तरी दोघेही करंगळी वर करायचो. दादरच्या पूलावर ४-५ रुपयाला भेटणारी पिवळी पुस्तके मागच्या बेंचवर बसून मोठ्या आवडीने वाचायचो. एकदा चौगुले बाईंनी पकडले होते तेव्हा दोघेही ते पुस्तक आपलेच आहे असे बोलत होतो. शेवटी शिक्षा म्हणून दोघांनाही शंभर सुभाषिते लिहावी लागली होती. एखाद्या तासाला दोघांपैकी कोणालाही कंटाळा आला की आमचे वहीचे शेवटचे पान उघडायचे. तिथे फुलीगोळ्या पासून कार्टून काढण्यापर्यंत सारे खेळ चालायचे. ऑफ पिरीअडला वर्गात छापा-काटा करत हळूहळू जुगाराचा अड्डा सुरू करायचे श्रेय सुद्धा आम्हालाच जाते. शिक्षकांसाठी असलेल्या टेबलवर टेबलटेनिस खेळणे हा आम्हा दोघांच्या सामाईक आवडीचा खेळ, अन त्यासाठी कित्येकदा शाळा सुटल्यावर थांबून राहायचो ते शेवटी मामांनी येऊन हाकलवेपर्यंत. आठवीच्या वर्गशिक्षिका फडणीसबाईंनी, तुमचा मुलगा दुसर्‍याच्या नादाने फुकट जात आहे असे सांगत, दोघांच्या पालकांचे वेगवेगळे कान भरल्याचे आठवतेय. आमच्यात फूट पाडायचा प्रयत्नच होता तो. पण त्या सहामाहीला आम्ही एकत्र अभ्यास करून त्याचे उत्तर वार्षिक निकालात दिले होते. कितीही मस्ती करत असलो तरी अभ्यासात आम्ही बर्‍यापैकी हुशार होतो ही आमची जमेची बाजू होती. मी त्याचा गणिताचा शिक्षक होतो आणि तो माझा इंग्लिश टीचर. दहावीला असताना माझे पहिलेवहिले प्रेम. आमच्याच शाळेच्या गर्ल्सस्कूलमध्ये शिकणारी ती. जिच्या मागे वर्गातील अर्धी मुले लागली होती. अन म्हणून मी हे कोणालाही सांगितले नव्हते. जे फक्त आणि फक्त या कलंदरालाच माहीत होते. रोज सकाळी तिच्या शाळेत यायच्या वाटेवर ताटकळत थांबणे, संध्याकाळी दोघे मिळून स्टेशनपर्यंत तिचा पाठलाग करने, तिला पटवण्यासाठी म्हणून आमच्याच शाळेत असलेल्या तिच्या भावाची खुशामत करने, आणि सरते शेवटी तिला दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर केलेला प्रपोज. सगळ्या सगळ्यात हा सामील होता. पण शेवटपर्यंत कोणाला थांगपत्ता लागू दिला नव्हता गड्याने. आज याच्या दिसण्याने माझ्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या. ईतक्यात थिएटरमध्ये अचानक लाईटस लागल्या. मध्यंतर झाले म्हणून मी हिला म्हणालो, "तू थांब, मी काहीतरी खायला घेऊन येतो". तसे हिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि एकाएकी खोखो हसत सुटली. जेव्हा हि अशी बावळटासारखी हसते तेव्हा समजायचे की आपणच कोणतातरी मुर्खपणा केला आहे. आजूबाजूला एक नजर टाकली आणि एकदम ओशाळल्यासारखे झाले. सिनेमा संपला होता. थिएटर खाली होत होते. मध्यंतर केव्हा झाले, सिनेमा केव्हा संपला, नक्की कोणत्या दुनियेत हरवून गेलो होतो मी.. पण लवकरच भानावर आलो, म्हणालो चल पटकन, आपल्यालाही निघायला हवे. बाहेर येऊन चौफेर नजर टाकली, आसपास कुठे दिसला नाही तो. एवढ्या गर्दीत आता शोधू तरी कुठे याला, कुठच्या दिशेने बाहेर पडला असेल. इतक्या जवळ येऊनही भेट नाही झाली तर... मी कावराबावरा होऊन सवयीने नखे चावायला लागलो, आणि अचानक काहीतरी सुचावे तसे झाले. हिला तिथेच थांबायला सांगून कारपार्किंगच्या दिशेने धावत सुटलो. अपेक्षेप्रमाणे तो दिसलाच. बरोबर वहिनी नव्हत्या. कदाचित त्यांचीच वाट बघत तो उभा होता. का कुणास ठाऊक, पण हेच सोयीचे वाटले. कदाचित त्यांच्यासमोर याला कडकडून भेटायला संकोचच वाटला असता. लांबूनच त्याला हाक मारली, अधीरतेनेच.. एक आरोळी ठोकल्यासारखा आवाज.. ओये पश्याss... त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. माझा हलणारा हात, त्याच्या सहज नजरेस पडावा असा. किंचित रोखून पाहिले त्याने माझ्याकडे, तसे हळूहळू नजरेत ओळखीचे भाव दिसू लागले. तरीही थोडाफार साशंक चेहरा. की मलाच तसे वाटले. क्षणाक्षणाला त्याच्या चेहर्‍यावरचे पलटणारे भाव आणि बदलणारी नजर, की माझाच तो भास होता. त्या क्षणाला असे वाटत होते की जवळ जाऊन आनंदाने चित्कारून त्याला एक कडकडून मिठी मारावी जेणेकरून आजूबाजूच्या सर्व लोकांना समजावे, दोन जिगरी दोस्त आज कित्येक वर्षांनी असे अचानक भेटत आहेत. पण मी जसा त्याच्या जवळ जात होतो तसे आमच्यातील अंतर वाढत आहे असे वाटत होते. त्याच्या चेहर्‍यावर ना आनंद दिसत होता ना आश्चर्य. आलिंगन देण्यासाठी हवेत उठलेले माझे हात माझ्याच नकळत खाली झाले आणि सहज एखादी टाळी देण्यासाठी म्हणून हात पुढे केला. पण समोरच्याला तेही अपेक्षित नव्हते. केवळ औपचारिकता म्हणून आमचे हस्तालोंदन झाले. बोलणे ही जुजबी. त्यातही वहिनी येण्याच्या आधीच मला कटवण्याची घाई दिसून येत होती. वाटले की आपणच विचारावे, वहिनी कुठे आहेत. पण हा लोचटपणा जमला नाही मला. एकेकाळी आमची मुले देखील आमच्यासारखेच एकमेकांचे जिगरी दोस्त झाले पाहिजेत अशी स्वप्ने बघितली होती आम्ही, पण आज एकमेकांच्या परिवाराची साधी चौकशी करण्यात रस नव्हता. अजूनही काहीतरी शोधत होतो मी त्याच्या चेहर्‍यावर, पण ते दिसत नसल्याने स्वत:च्याच चेहर्‍यावरचे भाव लपवायची कसरत करावी लागत होती. चेहर्‍यावर कोरडे भाव ठेवण्यासारखा दुसरा कठीण अभिनय नसावा या जगात. मलाच आता आमचे संभाषण ताणून धरण्यात अस्वस्थता वाटू लागली. जसे तो चल निघतो आता असे म्हणाला, तसेच मी सुद्धा भेटत राहा बोलून तिथून निघालो. ना आम्ही फोननंबर एक्चेंज केले ना अ‍ॅड्रेस शेअर केले. साधा मेल आय-डी सुद्धा नव्हता एकमेकांचा. तरीही माझ्या भेटत राहा वर नक्की बोलून कसेबसे हसला तो.. परत आलो तर बायको माझी वाट बघत होती. कुठे गेलो होतो, या तिच्या प्रश्नाला देण्यास उत्तर नव्हते माझ्याकडे. आणि तिनेही जास्त ताणून धरले नाही. त्या रात्री माझी अस्वस्थता तिला जाणवल्याशिवाय राहिली नाही. कदाचित तिच्याशी हे शेअर केल्याने हलके वाटेल म्हणून सांगायचे ठरवले तिला, आज प्रसन्ना भेटला होता. ओळख पटावी म्हणून याआधी सांगितलेला आमचा एक किस्सा आठवून दिला. पुढे काय घडले हे माझा चेहराच सांगत होता. तिनेही हलकेच माझ्या केसातून हात फिरवत माझी समजूत काढली, "ठीक आहे रे, भेटलाच नाही असे समज." .. खरे तर भेटलाच नसता तर किती बरे झाले असते नाही. त्याच्या या अश्या भेटीने आजवरच्या सार्‍या आठवणी तुरट झाल्यासारख्या वाटू लागले होते. आजवर कित्येक वेळा मी माझ्या शाळेतले किस्से माझ्या आताच्या मित्रांना सांगितले असतील, बायकोशी शेअर केले असतील. पुढे जाउन मुलांना, नातवंडांनाही सांगितले असते. यानंतर मात्र कदाचित ते आठवायची इच्छाही होणार नव्हती. माझी ही मनस्थिती ओळखून बायको गपचूप कुशीत शिरून म्हणाली, "विसर हे आता, काढून टाक मनातून, एक मित्र हरवला असे समज आणि झोप गपचूप." .. मी मनातच खिन्नपणे हसलो आणि स्वताशीच विचार करू लागलो, नाही यार, मित्र कधीच हरवत नाहीत.. हरवते ती मैत्री.. जी आमची कधीच हरवली होती.. फक्त जाणीव आज झाली होती.. ... तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9153
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

छान !!! मनातील लेख

आवडलं... शेवटचा पंच सुंदर! कधी व्यक्ती बदलतात, कधि परिस्थिती, कधी दोन्ही! वागण्या बोलण्याचे संदर्भ बदलतात, क्षितिजेही बदलतात. नाही म्हटलं, तरी.. 'त्रास होतोच'! अवांतरः ह्याची दुसरी (किंवा दुखरी) बाजू येणार का? ;)

In reply to by उपास

दुसरी बाजू म्हणजे त्या मित्राची का... नाही नाही, तसा काही विचार नाही. खरे तर हा जुना लेख, म्हणजे माझे बहुधा दुसरेच लिखाण असावे. परवा नजर पडली तर स्वतालाच पुन्हा वाचून बरे वाटले. पण सुरुवातीच्या काळातला असल्याने शैली कच्ची होती, शुद्धलेखनाच्या ढिगभर चुका होत्या, त्या ठिकठाक करून प्रकाशित केला.. :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

लेख आवडला. तोडलंस मित्रा! काही आठवणी खर्‍या आहेत शंबर सुभाशितं,जुगार वगैरे :) पण एकंदर लेखाचा सारांश कळल्यावर वाटलं, होतं असं कधी कधी. माझा एक भ्रम होता. मला वाटायचं दोन मित्रांची मैत्री कायम टिकते आणि दोन मैत्रिणींची काही काळ. पण तो शेवटी भ्रमच होता. वास्तवात मला उलटचं दिसलं.

सुंदर आहे कथा. पण इतकी गाढी मैत्री अशी, कांही कारणं न देता, कशी तुटते? त्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? मित्राच्या मृत्यूच्या बातमीपेक्षा, मैत्रीचा मृत्यू अधिक क्लेशकारक असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका तुमच्याशी १०० % सहमत. सुरेख कथा..अगदी ओघवत्या शब्दात..

In reply to by प्रभाकर पेठकर

खाली पैसा उर्फ ज्योती ताई यांचा रिप्लायच माझा रिप्लाय समजा, अन मित्र दुरावण्याचे कारण शोधले नाही तरी साधारण असेच असू शकते.. नुसती आजूबाजुची परिस्थितीच नाही तर व्यक्तीमत्वेही बदलतात.. कॉलेजजीवनातील मैत्रीत सहसा असा अनुभव येत नाही पण शालेय जीवनातील मैत्रीत येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण बरेच बदल घडतात.. हे मी माझ्या कोणा मित्राला नजरेसमोर ठेऊन नाही लिहिले वा शालेय मैत्रीला कमी लेखायला नाही लिहिले तर हे असे होऊ शकते असे माझ्या ध्यानात आले तेच कथेतून इतरांशी शेअर केले.. आता यातून सकारात्मक बोध घेणेच चांगले नाही का.. :)

मुलांचीच नव्हे तर मुलींचीही मैत्री संपते. तुटत असेलही पण लग्न होऊन सासरी गेल्या की सगळं बदलतं. पुन्हा निमित्ताने, अचानक भेट झाली तर काय बोलावे हा प्रश्न असतो. आधी अगदी अपराधी वाटायचे नंतर मात्र हे असेच असल्याचे जाणवले.

आवडलं. जगात कित्येक गोष्टींना असं का याचं उत्तर नसतं. ही त्यातलीच एक. लहान असतानाचं ते जग नंतर रहात नाही. तिथे अशा मैत्रीला नेमकी कुठे जागा द्यावी हे कळत नाही. त्यामुळे जुने शाळूसोबती मित्र प्रत्यक्ष आयुष्यात परत येऊन त्या दोन मित्रांच्यामधे पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स अशा गोष्टी येण्यापेक्षा अशी मैत्री एक आठवण म्हणून राहणेच जास्त श्रेयस्कर असावे.

In reply to by तुमचा अभिषेक

त्या दोन मित्रांच्यामधे पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स अशा गोष्टी येण्यापेक्षा ....
गाढी मैत्री, खरी मैत्री (जी कथेत वर्णीली आहे) त्यात वरील प्रश्न कधी उद्भवत नाहीत. निदान पहिल्या भेटीत तरी नाहीच नाही. तसे उद्भवत असतील तर गाढी मैत्री, खरी मैत्री हे आपले त्या काळचे भ्रम होते किंवा वरवरच्या नात्याला दिलेले एक चुकीचे 'लेबल' होते असे कबूल केले पाहीजे. १४ वर्षांचा काळ म्हणजे कांही फार मोठा काळ नाही. ४० वर्षांनंतर आम्ही ६९ च्या S.S.C.(त्या काळची ११वी) बॅचचे १८ वर्गमित्र, (गाढी आणि खरी मैत्रीवाले १-२च) एकत्र आलो पण आम्हाला असा कुठला दूजाभाव मनांत आला असे जाणवले नाही. त्या नंतर दरवर्षी (मी रजेवर जातो तेंव्हा) मित्राच्या घरी किंवा त्याच्या फार्म हाऊसवर भेटत असतो. वर्गमैत्रीणीही असतात. कधी त्यांची मुले असतात (तीशीत पोहोचलेली), नवरे नसतात (ते एक बरे आहे). खाणे, 'पिणे', गप्पागोष्टी, हास्यविनोद, जुन्या शाळेच्या शिक्षकांच्या आठवणी असे अनेक विषय असतात. कधी कुठे कोणाच्या वागण्या बोलण्यात पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स वगैरे येत नाही. हास्यविनोदांबरोबर तब्येतीच्या तक्रारींवर चर्चा होतात. कोणाला रक्तदाब, कोणाला मधूमेह, कोणाला मज्जारज्जूची समस्या तर कोणाला व्हर्टिगो अशा चर्चा होतात. एकमेकांना प्रेमळ, कळकळीचे सल्ले दिले जातात. दर भेटीत कोणीतरी मला वजन कमी करण्याचे महत्त्व पटवून देत असतोच. दिवसाचे ५-७ तास एकत्र घालवून हसत खेळत आम्ही पुन्हा कधी भेटायचे ह्यावर चर्चा करून आपापल्या घरी जातो. जीथे, पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स हे विचार मनांत येतात तिथे मैत्री वास करीत नाही. कृष्ण-सुदाम्याची मैत्री हे टोकाचे उदाहरण वाटले तरी आदर्श आहे, ह्या बाबत दुमत नसावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

कृष्ण सुदामा नक्कीच आदर्श मैत्रीचे उदाहरण आहे आणि म्हणूनच ते पुराणात आहे. पण एखादा दिवस सुदामा आला तर कृष्णाने त्याचे आदरातिथ्य केले पण पुढे काय? पुढे कृष्णपुराणातून तो सुदामा गायबलाच. तसेच त्याला कृष्णाने श्रीमंती अन वैभव दिले असेही कथेत आहे, गरीब म्हणूनच राहिला असता एखादा मित्र तर कृष्णाला चालले नसते का? हलकेच घ्या हा हे सारे मुद्दे, निव्वळ वादाला वाद म्हणून लिहिलेय. :) असो, आपण जी वर स्वताची उदाहरणे दिलीत तशीच उदाहरणे देवाच्या कृपेने माझ्याही गाठीशी आहेत. शाळेचे बरेच मित्र फेसबूकात असले तरी खास संपर्कात असणारे दोनच मित्र आहेत... मात्र डिप्लोमा डिग्रीचा वीजेटीआयचा आमचा भलामोठा ग्रूप अजूनही जसाच्या तसा आहे... पहिल्या नोकरीचा चौघांचा ग्रूप ही तसाच, अजूनही आम्ही ठरवून भेटतो. दुसर्‍या जॉबला एकच खास मित्र होता, पुढे आमच्या कामाच्या जागा बदलल्या, पण माझ्या लग्नाच्या वेळी तो दिल्लीवरून दोन-तीन दिवस सुट्टी टाकून आला, त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी माझे एक छोटेसे ऑपरेशन निघाल्याने मला त्याच्या गावी केरळाला जाता आले नाही.... हल्ली ऑर्कुट आटपले मात्र पाच-सहा वर्षांपूर्वी ऑर्कुटच्या माध्यमातूनच भेटलेल्या मित्रांशी अजूनही भेटीगाठी होतात.... चाळ सुटली, मित्र इथे तिथे पांगलेत पण अजूनही ठरवून ट्रिपा निघतात, पार्ट्या साजर्‍या होतात.. तर असेही अनुभव आहेत अन तसेही अनुभव आहेत.. एखाद्या मैत्रीचे आयुष्य असते तेवढेच, किंवा ती त्या एखाद्या वयात अन एखाद्या परीस्थितीच उमलते, बहरते अन नंतर आयुष्यातून निघून जाते. म्हणून ती गाढी नव्हती असे म्हणने नाही पटत.. खास करून शाळेच्या लहान वयातील मैत्री..

कडाक्याचं भांडण होऊन संपलेली मैत्री कायम परवडली .आठवण आल्यावर कमीत कमीत रागात चार शिव्या तरी घालता येतात पण हे . काहीच न बोलता थोडं थोडं संपत जाणं . लई त्रास होतो डोक्याला .दर वेळी वाटतं . . कि नाही . सगळं होईल पूर्वी सारखं . पण . . असो . कथा / अनुभव आवडेश . . :)

In reply to by अद्द्या

आम्ही चार मित्र,रहायला देखिल चौघांचे बंगले एका चौकोनात चार कोपर्‍यावर्,मी वैद्यकीय व्यवसायात्,दुसरा डॉक्टरच पन पेट्रोल पंपवाला,तिसरा आयटीवाला आनी चौथा सगळ्यात मोठा डाकु लॅण्ड डेव्हलपर पण मैत्रीत कधीच एकमेकांचा व्यवसाय काय आहे याचा विचार केला जात नाही.जो कोनी अडचणीत असेल त्याला इतर तिघे सांभाळातात्,एकाच्या घरात कार्यक्रम असेल तर बाकीचे सगळा कार्यक्रम पार पडेपर्यंत राबत असतात.एकवेळ जवळचे नातेवाइक नाही करणार पन आम्ही चौघे एकमेकांच्या प्रचंड जवळ असतो. आणी यासगळ्यात पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्यांना कुठेच जागा नसते,उलट जो कमी पडेल त्याला योग्य ती मदत न मागता पुरवली जाते. भांडण होत नाही असे नाही पन ते कधीच ताणल जात नाही.म्हणुन म्हणतो मैत्रीत वयक्तीक अंहकार बाजुला ठेवला तर ती मैत्री कधीच संपत नाही...

काय लिहिलय! अगदी स्वतः बाबतीत असाव अस वाटल. शाळेतल्या भाबड्या वयात जुळणारे विश्व असच कायम खुणावत रहात. काहीजण त्यातच रहातात तर काहीजणांना तिकडे फिरकुन पहायचही धाडस होत नाही, तर काहीजणांच्या लेखी ते कुठच अस्तीत्वात नसत. चालायचच.

माझी 'मैय्या' मला म्हणते "आपलं आयुष्य हे एका 'पझल'सारखं आहे...तुकड्या-तुकड्यात जोडलेलं. कुठल्याही एका तुकड्याशिवाय ही 'पझल' पुर्ण होत नाही." तो मित्रही आयुष्यात त्यातल्या एका तुकड्याप्रमाणे आला होता असं मनाला समजवायचं. बाकी मित्रा तुझं लेखन फारच अप्रतिम असतं.

In reply to by किसन शिंदे

आपलं आयुष्य हे एका 'पझल'सारखं आहे...तुकड्या-तुकड्यात जोडलेलं. कुठल्याही एका तुकड्याशिवाय ही 'पझल' पुर्ण होत नाही.
खरंय. आणि कोणताही एक तुकडा म्हणजे आयुष्य असं होत नाही.