Skip to main content

लहान मुलांच्या बाबतीत

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 22/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये. म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा. चंद्राला म्हणतो, नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू किंवा यक्ष-पर्‍यांनो स्वप्‍नीं नाचून नीज नका चाळवू म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये. किती खोलवर विचार केलाय कविने. लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा. पण उदाहरणे मात्र उलट दिसतात. परवा एक प्रसंग पाहीला. एक लग्नसमारंभ होता. एक आई आपल्या अगदी लहान रांगत्या बाळाला घेऊन आली होती. मोठ्या शहरात काही कार्यालयात काही सुजाण केटरर्स लहान मुलांसाठी खाण्याची वेगळी व्यवस्था ठेवतात. पाटी असते' "लहान मुलांसाठी मऊ भात" परवाच्या लग्नात अशी व्यवस्था नव्हती. दुपारची वेळ. बाळाला भूक लागली असेल असे समजून त्या आईने कार्यालयातच बनवलेला आमटी भात बाळासाठी कालवून आणला आणि त्याला भरवू लागली. पहील्या घासापासूनच ते मूल मोठ्याने रडायला लागले. तोंडातून घास बाहेर फेकू लागले. आई चिडली. म्हणू लागली, " बघा किती मस्ती आहे याला, एवढे देते आहे तर थूंकून टाकतो आहे" काही वेळ हाच प्रकार चालू राहीला. बाळाचे रडणे थांबेना. ते पाहून एक आजी आल्या. त्या बाळाच्या आईला म्हणाल्या, "अगं बाळाला जे भरवते आहेस ते तू खाऊन पाहीले आहेस का ?" ती म्हणाली, "नाही" त्या म्हणाल्या, "मग तू पहा ना" तिने तो आमटी भात चाखून पाहीला आणि तिच्या लक्षात आले. आमटी नेहमीपेक्षा प्रचंड तिखट आहे. तिला चूक उमगली. इतका तिखट पदार्थ बाळ कसे खाईल ? अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला घडताना दिसतात. मुले रडत असतात. कुरकुर करत असतात. त्यांना काही म्हणायचे असते. पण मोठ्या माणसांच्या ते लक्षातच येत नाही. एखादे मूल रडत असते. पालक त्याला बळे बळे काही खाऊ घालतात. पण त्याचे रडणे थांबत नाही. पालकांच्या लक्षात येत नाही त्याला भूक लागली नसून तहान लागली आहे. तेव्हा काही खायला नको तर प्यायला पाणी देण्याची गरज आहे. अशावेळी पाणी दिल्यास ते मूल खरेच अगदी शांत होउन जाते. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत काही काळजी घ्यायला हवी, काही गोष्टी टाळायला हव्यात. उदा: लहान मूल झोपले असेल तिथे आवाज होणार नाही, डोळ्यावर फार उजेड येणार नाही हे पाहीले पाहीजे. तान्ही मुले ही फार सेन्सिटिव्ह असतात. अगदी खुट्ट झाले तरी ती जागी होतात. त्यामुळे ती झोपलेली असताना मोठ्या आवाजात बोलणे, टीव्ही रेडीयोचा आवाज करणे हेही टाळावे. विषेशतः स्वयंपाकघरात देखील काही कूटण्याचे, कूकरच्या शिट्टीचे आवाज बाळाच्या झोपेत व्यत्यय आणणार नाहीत ना याची काळजी घेतली पाहीजे. टू व्हीलरवर नवराबायको चाललेले असतात. नवरा गाडी चालवत असतो. बायको मागे बसलेली असते. तिच्या हातात दुपट्यात गुंडाळलेले बाळ असते. हे चित्र कुठेही दिसते. एखाद्या छोट्या रस्त्यापासून ते अगदी हायवेवर देखील. यामधे धोके किती आहेत. याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. लहान मुलांना टू व्हीलरवरून नेणे टाळायला हवे. दोन मुले असतील तर दोन मुले आणि आई वडील अशीही सर्कस बाइकवर लोक करताना आढळतात. हे झालं अगदी लहान बालकांबाबत पण याहून जरा मोठ्या मुलांच्या बाबतीत एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. कुणीही भेटणारे, घरी येणारे लोक मुलांना एक प्रश्न हमखास विचारतात, "तूझं नाव काय ?" वास्तविक हा प्रश्न दिवसात मुलांना कितीवेळा विचारला जातो कुणी विचार केलाय का . किती वैतागत असेल ते मूल या एकाच प्रश्नाने. काही शेजारपाजारच्या लोकांना आपण कसे लहान मुलांचे मित्र आहोत किंवा मुलात मूल फूलात फूल आहोत हे दाखवण्याची फार हौस असते. असे बालमित्र लोक मुलांच्या मनात नसले तरी त्यांना पकडून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते मूल दूर पळत असेल तर त्याला पकडून बळेच कडेवर घेणे, त्याची पापी घेणे असे प्रकार करताना दिसतात. असे लोक मुलांच्या डोक्यात जातात. याबाबतही काळजी घेतली पाहीजे. आणखी एक हौस लहान मुलांना उंच फेकणे आणि झेलणे. या गोष्टी टाळायला हव्यात. यातले धोके सांगायला हवेत का ! अलिकडे कसे माहीत नाही पण सुंदर तरुण मुली आणि लहान मुले यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना कॅडबरी देण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण दातांचे आरोग्य बिघडू नये हा विवेक लोक विसरतात. कधी कधी मुले एकटीच तल्लीन होउन खेळत असतात. अशावेळी त्यांची एकाग्रता भंग करून त्यांना उचलून घेणे इ. गोष्टी टाळाव्यात. मुलांचे एकटेच आपले आपले खेळणे हे त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असते. अगदी लहान मुले मुठी चोखतात, पुढे बोटे तोंडात घालतात पुढे पुढे पायाचे आंगठे तोंडात घालतात. काही जणांना मुलांची ही सवय गैर वाटते. असे लोक मुलांच्या अशा सवयीला प्रखर विरोध करतात. मुलांनी तोंडात बोटे घातल्यास बोटे खसकन बाहेर ओढणे, मुलावर वस्सकन ओरडणे इ. पण मुलांच्या बौद्धिक विकासातील हे नैसर्गिक टप्पे आहेत हे लक्षात घ्यायला हवे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. सिगारेट पिऊन आल्यास किंवा तोंडात गुटखा असताना तोंडाला दुर्गंधी येते. अशावेळी मुलांच्या जवळ जाणे टाळावे. अशावेळी तुम्ही कितीही प्रेमाने जवळ गेलात तरी मुले दूरच पळणार हे लक्षात ठेवा. अनेक मोठ्या माणसांना हे भान राहात नाही. -- काही पाहुणे घरी येतात. त्यांना एक खोड असते. मुलांना प्रश्न विचारण्याची. मुलांची परीक्षा घेण्याची. तूझे नाव काय ? तू कितवीत जातोस ? कुठल्या शाळेत जातोस ? इथून प्रश्न सुरु होतात. मग मुलांना जरा अवघड प्रश्न विचारायचे. मुले यांच्या परीक्षेत नापास झाली की हे खूष. मुलांचे ऐका. प्रश्न विचारून त्यांना पिकवू नका. मुलांना असे नापास करणारे पाहुणे आवडत नाहीत... रस्त्याने जाताना मूल भरभर चालू शकत नसेल तर त्याला आपल्या स्पीडने चालवू नये. त्याची फरफट होते. काही पालकांना आपल्या बाळाची प्रगती पहायची फार घाई झालेली असते. ते आपण होऊन उभे राहत नसताना हे पालक त्याला बळे बळे उभे करतात. चालायला लावतात. परीणामी मुलाच्या गुडघ्यावर, पाठीवर ताण येतो. कधी कधी यामुळे मुलाच्या चालण्यात जन्मभर दोष निर्माण होऊ शकतो. तेव्हा हे टाळायला हवे. दुसरी गोष्ट - "शेजारचा मुलगा ह्याच्या एवढाच आहे तो पळायला लागला. हा अजून उभा सुद्धा राहत नाही." ही तुलना नको. मुलांच्या बाबतीत सतत जागरुकता आवश्यक आहे, फक्त पालकांचीच नव्हे तर आजूबाजूला वावरणार्‍या लोकांचीही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21259
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

आख्ख्या धाग्यातल्या बहुतांश गोष्टींना +१. मी लहान असतानाच्या काही गोष्टी अगदि प्रखरपणे आनी व्यवस्थित आठवतात. काही दिव्य लोक बाहेरुन आले की "आई आवडते की बाबा रे बेटा" असे विचारीत. आम्ही गांगरलो, की त्यांना मजा वाटे. म्हणजे मला अमुक एक गोष्ट सांगायची भिती वाटायची, किंवा दोघांपैकी एकाला निवडायची भिती वाटायची असे खरेच नव्हते. मल खरोखरच काय उत्तर द्यावे तेव्हा कळत नव्हते. आजही कळत नाही. दोघांशीही मी मनसोक्त भांडतो. दोघेही मला आवडतात. . त्याच प्रमाणे दोघा पोरांसमोरच काही दिव्य लोक पालकांना "अधिक शहाणा कोण" हे विचारण्याचा उपद्व्याप करतात. निदान ह्यावर तरी राष्त्रिय बंदी घातली जावी.

लहान मुलांशी वागताना हे सर्व खूप उपयोगी पडेल. धन्यवाद!

'अलिकडे कसे माहीत नाही पण सुंदर तरुण मुली आणि लहान मुले यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना कॅडबरी देण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण दातांचे आरोग्य बिघडू नये हा विवेक लोक विसरतात. आता बिघडलं सुंदर तरुण मुलींच्या दातांचे आरोग्य, काय बिघडतंय हे समजु शकेल काय. ?

In reply to by ५० फक्त

सुंदर तरुण मुली हसताना त्यांचे किडलेले/पिवळे दात नि ५ फुटांवरुन गेल्यावरसुद्धा येणारी दुर्गंधी पाहून काय वाईट्ट वाटते ते तुम्हाला सांगून काय उपयोग ५० राव? :( दिसतात लय भारी पण... फक्त 'दूरदर्शना'साठी चांगले आहे. -सध्या अल्जेरियानिवासी प्यारे

In reply to by ५० फक्त

आता बिघडलं सुंदर तरुण मुलींच्या दातांचे आरोग्य, काय बिघडतंय हे समजु शकेल काय. ?
सायबा… हिकड आमी अजून ब्याच्लर हाये म्हनल…फरक पडतो ना… का आणि कसा आता फोड करून सांगाया पायजे का? ;)

बायको मागे बसलेली असते. तिच्या हातात दुपट्यात गुंडाळलेले बाळ असते. हे चित्र कुठेही दिसते. एखाद्या छोट्या रस्त्यापासून ते अगदी हायवेवर देखील. यामधे धोके किती आहेत. याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. लहान मुलांना टू व्हीलरवरून नेणे टाळायला हवे. दोन मुले असतील तर दोन मुले आणि आई वडील अशीही सर्कस बाइकवर लोक करताना आढळतात.
मग काय प्रत्येकाला प्रत्येकवेळेला रिक्षा करणं परवडतं का? उद्या म्हणाल प्रदुषणामुळे फक्त काचेच्या वहानातुनच घेउन जा. आपच्याकडे काही पर्यायच नसतो हो. गरीबांनी पोरं पैदाच करायची नाहीत काय?

In reply to by दादा कोंडके

मग काय प्रत्येकाला प्रत्येकवेळेला रिक्षा करणं परवडतं का? उद्या म्हणाल प्रदुषणामुळे फक्त काचेच्या वहानातुनच घेउन जा. आपच्याकडे काही पर्यायच नसतो हो. गरीबांनी पोरं पैदाच करायची नाहीत काय? ज्याच्याकडे दुचाकी असु शकते त्याच्याकडे रि़क्षातुन प्रवास करायला पैसे नसणार काय ? आणि लहानग्यांच्या जिवा पुढे रिक्षा प्रवास महागडा कसा ? राज्यातले रस्त्यांची अवस्था पाहता एका माणसाने दुचाकी चालवणे हेच आजच्या काळात धोकादायक आहे.मी स्वतः अनेक शाहणे अश्या अवस्थेत बाईकवर पाहिले आहेत्,तसेच मी स्वतः दुचाकीवर स्त्रियांना मागच्या सीटवर गळ्यातली ओढणी जी हवेत हुलकावत असते घालुन बसलेल्या असतात... तेव्हा ओ ताई ओढणी आवरा असे मोठ्यांनी ओरडुन सांगतो.मागच्या चाकात ओढणी अडकुन अपघात होण्याची शक्यता जास्त असते.योग्य सल्ला देणे आपल्या हातात असते,तो पाळणे दुसर्‍याचा हातात. बाकी गरिबांनी पोर पैदा केली तर त्यांची काळजी/सुरक्षितता त्यांनीच ओळखली/घेतली पाहिजे.

In reply to by मदनबाण

ज्याच्याकडे दुचाकी असु शकते त्याच्याकडे रि़क्षातुन प्रवास करायला पैसे नसणार काय ?
हो. तेव्हड्या रिक्षाच्या भाड्यात चार दिवसाचं पेट्रोल येतं. माझ्या मित्राकडे लोनवर घेतलेली शीटी हंड्रेड आहे. कंपनीच्या कमासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं होतं म्हणून लोन वर घेतलेली. त्याला कुठेही बाहेर जायचं म्हटल्यावर रिक्षा कशी परवडेल. आणि फक्त नवरा-बायकोने जायचं म्हणल्यावर बाळाला कुठे ठेवायचं आं?
आणि लहानग्यांच्या जिवा पुढे रिक्षा प्रवास महागडा कसा?
मग रिक्षासुद्धा असुरक्षितच. ट्याक्सी बरी. बंद काचा असल्यामुळे प्रदुषणाचा पण त्रास नाही. हे असच पुढे वाढत जातं. मग आम्ही कुठे जायचं? उद्या म्हणाल फुटपाथवर रहाणार्‍या लोकांनी लहान मुलांना तिथच झोपवू नये. धोकादायक असतं म्हणून. ती बिचारी कुठे जाणार?

In reply to by दादा कोंडके

रि़क्षातुन केलेला प्रवासा पेक्षा बाईक किंवा स्कुटरवर बाळाला घेउन केलेला प्रवास (ज्यात शक्यतो आई स्वतःचा तोल आणि बाळाला सांभाळते)यात जास्त सुरक्षित कुठला हे जर तुमच्या मित्राला किंवा इतर कोणाला कळत नसेल तर त्याची कीव करण्यापलिकडे मी काही करु शकत नाही.आयुष्याची किंमत पैशात करता येत नाही. सुरक्षित आणि असुरक्षिततेच म्हणाला तर माझा प्रतिसाद वाचतात वाचता सुद्धा तुमच्या गचकण्याची शक्यता नाकारता येत नाही.;)(At its best, life is completely unpredictable.Christopher Walken )भुकंपात बिल्डिंग कोसळुन अनेकजण मॄत्यूमुखी पडतात,तरी सुद्धा त्यात काही लोक जिवंत राहतात त्यात अगदी नवजात बालकाचा देखील समावेश असु शकतो. काय घडेल ते आपल्या हातात कधीच नसते,पण काही घडु न देण्याचा प्रयत्न करण्यासाठी योग्य पर्याय निवडणे हे सहज शक्य असते. हेल्मेट वापरल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत हे आपणाला ठावुक असेल असे समजतो.

In reply to by मदनबाण

स्कुटरवर बाळाला घेउन केलेला प्रवास हे असं मी केलं काही दिवस, नंतर नंतर माझा मुलगा उभा राहण्यासाठी रेटा देऊन वडीलांचे कपडे मुठीत धरून ओढणे, रस्त्यावर (बाजूला नव्हे तर पुढे) नक्की काय चालले आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणे असले प्रकार करायला लागला. पण कार घरी येण्यास (आम्हाला जो रंग हवा होता तो मिळण्यास) वेळ लागणार होता तेंव्हा मात्र आम्ही रिक्षातून जायचो हे आठवले. बाकी चर्चा चालूद्या.

In reply to by मदनबाण

रि़क्षातुन केलेला प्रवासा पेक्षा बाईक किंवा स्कुटरवर बाळाला घेउन केलेला प्रवास (ज्यात शक्यतो आई स्वतःचा तोल आणि बाळाला सांभाळते)यात जास्त सुरक्षित कुठला हे जर तुमच्या मित्राला किंवा इतर कोणाला कळत नसेल तर त्याची कीव करण्यापलिकडे मी काही करु शकत नाही.
सुरक्षीत लाख असतील हो पण रिक्षासाठी पैके कुठून आणायचे हा प्रश्न आहे.
सुरक्षित आणि असुरक्षिततेच म्हणाला तर माझा प्रतिसाद वाचतात वाचता सुद्धा तुमच्या गचकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)(At its best, life is completely unpredictable.Christopher Walken )
प्रतिसादात क्वोट्स आणि कुठल्या कुठल्या लेख/बातम्यांच्या लिंका देतोस त्याबद्दल तुझ्या व्यासंगाचं मला नेहमीच कौतुक वाटतं.
पण काही घडु न देण्याचा प्रयत्न करण्यासाठी योग्य पर्याय निवडणे हे सहज शक्य असते.
म्हणजे कधितरी विपरीत घडण्याची शक्यता असते पण त्यासाठी नेहमी किती पैसे खर्च करणार?
हेल्मेट वापरल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत हे आपणाला ठावुक असेल असे समजतो.
दुचाकी वरून जाणार्‍या आणि हेल्मेट घातलेल्या/न-घातलेल्यांचे जीव चारचाकी असती तर वाचले नसते का? मी जिथं रहातोय तिथं लहान मुलांच्या बग्गीसुद्धा TÜV सर्टीफाईड असतात. लहान मुलांसाठी कार मध्ये चाइल्ड सीट असणं बंधनकारक असतं. अशा असंख्य 'सुरक्षित' गोष्टी आहेत. याचा अर्थ असा नाही की भारतातल्या लोकांनी मुलं जन्मालाच घालायची नाहीत. उलटपक्षी त्यामुळेच तर आपला 'लेबर फोर्स' जास्त आहे. झोपडपट्ट्यात रहाणार्‍या कुंटुंबामध्ये तर ७-८ मुलं असतात. ती 'असुरक्षित' वातावरणात राहून आठ-दहा वर्षांची झाली की कमवायला लागतात आणि कुटुंबाला तेव्हडाच हातभार लागतो.

In reply to by मदनबाण

भुकंपात बिल्डिंग कोसळुन अनेकजण मॄत्यूमुखी पडतात,तरी सुद्धा त्यात काही लोक जिवंत राहतात त्यात अगदी नवजात बालकाचा देखील समावेश असु शकतो. काय घडेल ते आपल्या हातात कधीच नसते,पण काही घडु न देण्याचा प्रयत्न करण्यासाठी योग्य पर्याय निवडणे हे सहज शक्य असते. हेल्मेट वापरल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत हे आपणाला ठावुक असेल असे समजतो.
कै च्या कै लेखन. हे सगळं कार्यकारणभावानूसार (कॉज अँड इफेक्ट) घडत असतं. प्रत्येक माणसाच्या खात्यात त्याने या जन्मी तसेच मागच्या जन्मी केलेली बरी वाईट कामे पूर्वसंचित म्हणून जमा असतात. आणि या बर्‍या वाईट पूर्वसंचिताचा हिशोब चुकता करण्यासाठी घटना घडत असतात. जे अपघातात वाचतात त्यांच्या खात्यात चांगल्या संचिताची शिल्लक असते. जे गचकतात, त्यांच्या नसते.

In reply to by शिल्पा ब

अग्गो... खापर पणजे ! काय पण तू @ धन्या असे लिहुन तरी प्रतिसाद लिहायचे कष्ट तरी घ्यायचे ना ! माझ्या प्रतिसादा खाली लिहल्यावर तो मलाच दिला असे वाटणार ना ! भलतीच आळशी की तू ;)

In reply to by मदनबाण

मग आपण बोलू. एकदा बाप झालास ना की कळेल आपसूक काय ते. लेकरु जन्माला यायच्या दिवसापर्यंतचा तुझ्या दुचाकीच्या 'स्पिडोमिटरचा' काटा अन लेकरु झाल्यानंतर देवाला पेढा ठेवायला जातानाचा काटा नोंद करुन ठेव. आणि मग मला सांग बेट्या. :) अरे राजा, तू म्हणतोयस ती आदर्श परिस्थिती, आणि आदर्श परिस्थिती ही नेहमी दुर्मिळच असते हे तुला मी का सांगायचं?

In reply to by मदनबाण

हे चित्र बघूनच टाटांनी नॅनो कार काढली अश्या लोकांसाठी. पण हे लोक टी घेतच नाहीत. लहानग्यांना जीव धोक्यात घालून घेऊन जातील, पण नॅनो घेणार नाहीत.

घरी येणारे लोक मुलांना एक प्रश्न हमखास विचारतात, "तूझं नाव काय ?" अहो एवढच नाही. कितव्या यत्तेत, कितवा नंबर, पहिला नंबर का नाही आला, गीतेचा १८वा अध्याय, गिताई म्हणता येते का, (मी अंगकाठीने अगदी सडपातळ असल्याने) आईबाबा काही खायला देतात की नाही, की स्वत:च खाऊन टाकतात, या वर्षीच्या ग्यादरींग मधला नाच करून दाखव, (त्या वयाला अवघड गणित तोंडी सोडवायला लावून) आयुष्यात काहे खरे नाही हिचे, लवकर उजवून टाका, (घरच्या लोकांसमोरच) तुमच्याकडे भाऊबंदकी आहे का? मला यातील बर्‍याच गोष्टींचे अर्थ कधीच समजले नाहीत. बरे, येणारा जाणारा गोतावळा इतका होता की विचारायला नको. अजूनही बर्‍याच गोष्टी हे अचरट लोक विचारतात पण मूर्ख आहेत असे म्हणून सोडून देण्याशिवाय पर्याय रहात नाही. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे/न देणे/ गोंधळणे असे प्रकार करून तिथेच उभी रहायचे पण माझे भाऊ पळून जात. मला का नाही सुचले हे असे वाटते.

In reply to by इनिगोय

त्यांची आवडती वस्तू घेऊ का? असे विचारल्यावर त्यांचा चेहेरा अगदी कळवळलेला, तर कधी स्पष्ट 'नको' तर आपल्याबद्दल आतापर्यंत जे बरे मत असेल ते एकदम शून्यावर आलेले असते. माझ्या दोन मैत्रिणींच्या दोन मुलींना "मी इथून दुसरीकडे रहायला चाललीये तर तुम्हाला माझी आठवण येईल का?" असे विचारले त्यातल्या चार वर्षाच्या मुलीने "कदाचित आठवण येईल." असे तर साडेतीन वर्षाच्या मुलीने एका क्षणाचा विलंब न लावता "मला नाही असं वाटत (की आठवण येईल.)" अशी प्रामाणिक उत्तरे दिल्याने मला आनंद झाला होता. ;)

In reply to by इनिगोय

घरात ३-४ वर्षाचा मुलगा/मुलगी असेल आणि त्याला/तिला लहानसा भाऊ/ बहिण असेल तर येणारे पाहूणे त्या लहान पोराला म्हणतात "तुमचं छोटं बाळ देतो का आम्हाला” किंवा "तुमचं छोटं बाळ नेऊ का आमच्या घरी?” की लागलीच त्या पोराने भोकांड पसरायला सुरूवात केलेली असते.

उपयुक्त माहिति दिल्या-बद्द्ल !!!!

बाकी खरेच पोरांना कसे सांभाळावे हा क्लास घेण्याचाच विषय आहे.. नंतर फुरसतीत काही सुचले तर मी देखील भर घालेन..

नात्यामध्ये/मित्रमंडळींमध्ये कोणाला मूल झालं, की हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या तान्हुल्याला पहायची एक पद्धत आहे. बाळाला हॉस्पिटलमध्ये जाऊन जो पहातो तो जवळचा मित्र/नातेवाईक असतो - अशी काहीतरी खुळचट कल्पना लोकांच्या डोक्यात असते. एवढुसा जीव तो. आपण गावभर फिरून जी घाण/जंतूंची कमाई केली आहे, ती त्या बाळाला कशाला द्यायची? त्यामुळे शक्यतो हॉस्पिटलमध्ये जाऊच नये. गेलातच तर "बाळकावीळ" होऊन गेली आहे ना, याची चौकशी करूनच जावं. जाण्याच्या आधी मेडिकलच्या दुकानातून हँड सॅनिटायझर घेऊनच जावं. किमानपक्षी बाळाच्या खोलीत जाण्याआधी हात, तोंड तरी साबण लावून स्वच्छ धुवावं. मिपावरील डॉक्टर लोक यावर अधिक प्रकाश टाकू शकतील...

In reply to by आदूबाळ

बाळ साहेब, आपण म्हणता त्याला मी एकदम सहमत आहे.मुंबईत एशियन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये काम करीत असताना बायपास सर्जरी झालेल्या रुग्णाला पाहण्यासाठी रीघ लागत असे. पण रुग्णालयात फक्त ३ लोकांना एका दिवसात भेटण्याची परवानगी असे त्यामुळे फक्त कुटुंबातील व्यक्ती सोडून इतराना परवानगी नसे. माझे मित्र आप्त वगैरे अतिरिक्त पाससाठी वशिला लावण्यासाठी येत असत. परंतु मी त्यांना एवढाच सल्ला देत असे कि बाहेर एक मोठे रजिस्टर ठेवा आणि जे लोक आले त्यांची हजेरी लावा म्हणजे ते आले ते तुम्हाला कळेल आणि त्यांना सुद्धा हजेरी लावल्याचे समाधान. बायपास हे जीवावरचे दुखणे असते.लोकांच्या भावना अस्सल असतात पण उत्साहाच्या भरात रुग्णाच्या जीवावर बेतू शकते हे त्यांच्या ध्यानात येत नाही. रुग्णाच्या नातेवाईकांना त्यान कसे आवरावे ते कळत नाही. अशा वेळी घरच्या डॉक्टरने कठोर होणे हे आवश्यक आहे. माझ्या वडिलांची हर्निया ची शस्त्रक्रिया झाली तेंव्हा ते घरी येईपर्यंत मी आणि माझ्या भावाने आमच्या नातेवाईकांना कळवले सुद्धा नाही. ३ दिवसांनी ते हिंडूफिरू लागले तेंव्हा सर्वाना कळवले. हीच गोष्ट नवजात बालकास लागू होते.त्या बालकास कोणताही त्रास होऊ नये म्हणून नातेवाईकांना फक्त बारशाला बोलावण्याची मूळ पद्धत होती. तोवर मुलाचे सर्व काही स्थिरस्थावर झालेले असे.पण आता एक किंवा दोन मुले त्यातून पहिले नातवंड असेल तर नव्या आजी आजोबाना काय करू आणि काय नको असे होते आणि उत्साहाच्या भारत ते सर्वाना फोने करून इत्यंभूत बातमी देत असतात त्यामुळे रुग्णालयात गर्दी होते आणि त्याचा बाळास त्रासच होतो.माझे तरी असे मत आहे कि बालास पाहण्यासाठी जवळच्या नातेवाईकांनी बारशाला आणि इतरांनी एक महिन्यानंतर जावे. शक्यतो बाळास हात लावू नये. माझ्या मुलीच्या बारशाला मी ती झोपलेली असता तिला घेऊन बसलो होतो आणि कोणालाही तिला झोपली आहे म्हणून हात लावू दिला नाही. वय वाढले तरी अक्कल न आलेली बरीच मोठी माणसे आपण पाहतो ती बाळाचा गाल ओढत राहतात.यात माझे नातेवाईक हि येतात. एवढुसा जीव तो. आपण गावभर फिरून जी घाण/जंतूंची कमाई केली आहे, ती त्या बाळाला कशाला द्यायची? त्यामुळे शक्यतो हॉस्पिटलमध्ये जाऊच नये. गेलातच तर "बाळकावीळ" होऊन गेली आहे ना, याची चौकशी करूनच जावं. जाण्याच्या आधी मेडिकलच्या दुकानातून हँड सॅनिटायझर घेऊनच जावं. किमानपक्षी बाळाच्या खोलीत जाण्याआधी हात, तोंड तरी साबण लावून स्वच्छ धुवावं. २००% सहमत

लहान मुलांशी काय काय बोलू नये ते बर्‍याच प्रतिसादात लिहिलेलं दिसतंय पण नक्की काय बोलावं (पाहुण्यांनी, घरातल्यांनी नव्हे) हे कुणी सांगितलेलं दिसत नाही. त्यांना नाव सांगून कंटाळा येतो हा निष्कर्श कसा काढला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. मुलांना प्रश्न न विचारता त्यांना बोलतं कसं करता येईल यावरही काही उजेड पाडल्यास आवडेल. (हे प्रश्न साधारण पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहेत). बाकीचे मुद्दे सामान्यज्ञान या गटात मोडतात फक्त दुचाकीचा मुद्दा बाद. त्याला वर कुणीतरी उत्तर दिलेलं आहेच.

In reply to by रामपुरी

चांगला प्रश्न आहे! माझ्या अनुभवातून सांगू शकतो, लहान मुलाला सगळ्यात काय हवं असत तर मैत्री.. आधी तुमच्या वयाचा मोठेपणा बाजूला ठेवून लहान होऊन समरसून मिसळलं मुलांत तर कितिही लहान्-मोठ्ठं मुलं असलं तरी त्याला आवडतच. त्याची कुठलीही गोष्ट मागायची नाही की हातात घ्यायची नाही, सुरुवातीला किंवा पहिल्या भेटीत. केवळ गप्पा मारत एकदा मोकळेपणा जाणवून दिला की मग आपोआप नविन दप्तर/ पुस्तक/ गाडी दाखवली जातेच. मुलांत त्यांच्या पातळीवर म्हणजे मातीत/ वाळूत/ लॉनवर बसून खेळण महत्त्वाचं. मी चिक्कार धावतो मुलाबरोबर त्याच्या मित्रांबरोबर. ३-४ वर्षांच्या मुलासारखा सगळा पोरकटपणा आम्ही करतो, धुडगुस घालतो. प्रसंगी भांडतो हमरीतुमरीवरुन येऊन, लोळवतो लाल मातीत, चोर् पोलिस खेळतो. मुलांचा विश्वास मिळवणं ही अनुभवायची गोष्ट आहे. त्याच्या इतकं लहान झाल्याशिवाय लांबून लांबून खेळताच येत नाही त्याच्याशी, तूर्तास इतकंच! :)

In reply to by उपास

कमी अधिक प्रमाणात माझाही हाच अनुभव आहे. # न. गो. - लेख मनापासून आवडला.

In reply to by उपास

अगदी परफेक्ट!! ते मूल त्यावेळी जे काही करत असेल, त्यात इंटरेस्ट दाखवला, प्रश्न विचारले की अक्षरशः खूष होतात पोरं, मग स्वतःचा सगळा खजिनाच दाखवून टाकतात. गमती सांगतात, वस्तू दाखवतात, खेळ शिकवतात. लहान मूल आहे, त्याला काय कळतंय.. असा विचार विशेषतः आजच्या मुलांच्या बाबतीत करणं म्हणजे खरंतर आपल्यालाच काहीही कळत नाही, हे जाहीर करण्यासारखं आहे.

माझ्या बाळाची डॉक्टर महान आहे. ती जे बोलते ते मी शब्दशः लिहीत आहे. मराठी भाषांतराचा कंटाळा आला आहे. " Seems that you do not take your child in sunlight. Do one thing. Go Home and grow a tomato plant. that is your project. What you need to grow that plant is what you need for your child (Food, Water, Sunlight!). We all are like tomato plants, that is my striking discovery of 2012. Do NOT fight with your child for eating. Let him sit if he just wants to sit. Respect Your Child."

In reply to by पिलीयन रायडर

हल्लीचे डॉक्टर असं म्हणतायत खरं. एका लेखात, मुलांना मुलाप्रमाणे वागवा. त्यांना मातीत खेळू द्या. त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू द्या. पडू द्या, हातपाय खर्चटू द्या मुलं तशीच नैसर्गिकपणे वाढतात. असं काहीसं लिहलं होतं. अशा डॉक्टरांमुळेच की काय पण कर्वेरोडला हुच्चभ्रू सोसायटीतले आजोबा आपल्या एक-दिड वर्षाच्या नातवाला समोरच्या मातीत खेळायला सोडून शांतपणे इकॉनॉमिक टाईम्स वाचत बसले होते. ते पोरगं सुद्धा अगदी मजेत लोकांनी गुटखा खाउन थुंकलेली लाल माती खात बसलं होतं. :)

माहितीचे चांगले संकलन. हॉस्पिटलमधे नवजात बाळाला किंवा कोणत्याही रुग्णाला भेटायला जाणे हे खरे तर बंदच करायला हवे.

अलिकडे कसे माहीत नाही पण सुंदर तरुण मुली आणि लहान मुले यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना कॅडबरी देण्याची पद्धत रुढ झाली आहे.
;)

छान लिहिले आहे ......मुलांना campare करू नये हे मात्र खरे .......मला जुळे मुलं आहेत ....एकाची उंची जास्त आहे दुसऱ्यापेक्षा ...त्यामुळे घरातले सतत त्यांची तुलना करत असतात .....मला हजारो सूचना करत असतात त्याच्याकडे जास्त लक्ष दे,, उंची वाढण्याचे औषध दे ...... वगैरे वगैरे ....... आणि मीही त्यांना नेहमी सांगते कि ...जुळे आहेत म्हणून काय झाले ...तुलना करू नका .....प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये तरबेज असतो ...सगळ्यांनाच सगळं यायला हवे असे नाही ....... ...पण जुळ्या मुलांना सांभाळणे खरच खूप अवघड जाते ......कधी कधी ..... दिवसातले २४ तास कमी पडतात मला .......पण तितकीच मजा पण येते ...........वेळेचे optimum utilization करावे लागते ........ There are two to wash and two to dry,, There are two to laugh and two to cry , There are two to love and two to kiss …….. Biggest joy of our life is 'this'……….

बाळाला पहायला गेले कि हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे .. खर तर तान्ह बाळ फक्त बाळासारखंच दिसत असतं ..पण आई , बाबा आजोबा ,आजी यावर गेलाय / गेली आहे ..असा म्हणत बसतात

काही नाही हो! वय बदलले की प्रश्न आणि उद्गार बदलतात "अय्या कित्ती मोठ्ठा झाला नै! अमच्याच्या लग्नात (म्हंजे २०-२५ वर्षांपूर्वी) बघितला तेव्हा केवढास्सा होता" "काय रे कुठे नोकरी करतोस?" "म्हंजे आयटीत.. वा!वा! पण तुम्हा आयटी वाल्यांनी सगळी महागाई आणलीये बॉ! हॉ हॉ हॉ!!!!" वगैरे वगैरे शेवटी अखिल जगताचे 'काका/काकु'त्त्व हौसेने पत्करले असल्याने की सगळे जण लहानच दिसते काही लोकांना.. बाकी लहान मुलांना होणार्‍या प्रश्नांच्या त्रासाचे वाचले की पु.लं.चे 'दिनेश' आठवते.

In reply to by ऋषिकेश

ए दुक्कल...... संपूर्ण दिगंबरावस्थेत येउन सगळ्यांसमोर पु लं ना असे म्हणणारा तोच का तो दिनेश....

In reply to by मन१

होय होत तोच तोच! पाहुण्यांच्या "चिमनी कशी कल्ते" छाप प्रश्नांना "हाव हाव" अशी मुद्दाम चुकीची देणारा ;)

मुलांच्या आई-वडिलांना या गोष्टी सांगाव्या लागताहेत हे दुर्दैव.

आजकाल टीव्हीवर औषधांच्या जाहीरातींचा मारा मोठ्या प्रमाणावर सुरु असतो. त्यामुळे बाजारात मिळणार्‍या औषधांबाबतची साक्षरता(?) वाढली आहे. बाळाला काही होण्याचा अवकाश, त्याला हे सिरप दे, ती गोळी दे, बडोंका रब, बच्चोंका क्रोसीन अशा सुचना ऐकायला येऊ लागतात. पण डॉक्टरांना न विचारता लहान मुलांना औषध देण्यामधे काही गैर आहे हेच लक्षात घेतले जात नाही. कॅल्शियम कमी पडतय का मग ही गोळी दे, आयर्नसाठी ती गोळी दे असले ज्ञान दाखवून काही लोक आजूबाजूच्यांना थक्क करीत असतात.

In reply to by नर्मदेतला गोटा

self medication लहानांबाबतच नव्हे तर मोठ्यांसाठीही बर्‍यापैकी घातक असू शकतं. शक्यतो टाळावच. साधी डिस्प्रिन ही सामान्यांच्या बर्‍यापैकी वापरातील गोळीही बर्‍यापैकी डेंजर असू शकते हे सामान्य ज्ञान मला काल परवापर्यंत नव्हतं. ती गोळी जशाला तशी घेतल्यास तुमच्या आतड्यांशी रिअ‍ॅक्ट होत त्यांना अधिकाधिक पातळ करीत जाते असे फार्मसिस्ट मित्राकडून प्रथम समजले तेव्हा आश्चर्यच वाटले. त्याचे म्हणणे :- "ही गोळी घ्यायचीच असेल तर पाण्यात विरघळवून आपण इनो घेतो तशी घ्यावी. कमी त्रासदायक ठरेल." फ्यामिली डॉक्टर "एवढ्याशासाठी कशाला आलात इकडे" असे म्हणत असले, तरी आम्ही जाणे सोडित नाही. horse mouth ऐकलेले बरे पडते.

आणखी लक्षात आलेली गोष्ट वीजेची बटणे, सॉकेटस दरवाजांच्या कड्या, लहान मुलांचे हात सहज पोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असावेत. सॉकेटमधे पिन वगैरे घालणे हा मुलांचा आवडता उद्योग असतो. दाराच्या कड्या लावणे उघडणे हा मुलांचा छंद असतो. यातून अनर्थ घडतात. कधी ती स्वतःला कधी इतरांना बंद करतात. हे अनुभव प्रत्येक घरी कधी ना कधी आलेले असतात. 

उत्तम. धन्यवाद. लोकाना कळत नाही हेच खरं. 'विवेक' हरवलाय

चांगलंय...! सतत असं काट्यावर राहून वागणं जमत नाही. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद...धागा वर आणणार्‍यालाही धन्यवाद...

In reply to by अत्रन्गि पाउस

खरंय तुमचं, टिव्हीवरच्या मराठी सिरीयल्स पाहणे आणि हाटेलात जाऊन मसालेदार चीजमिश्रित पावभाजी खाणे हे मोह पालक टाळू शकत नाहीत

छान!

दुचाकी हे फक्त दोन लोकांसाठी बनवलेले वाहन आहे, हे आता कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही.पण काही जण तिघे चौघे पण बसवतात. पाच जण एका बाईक वर बसलेले पण मी पाहिलेले आहे. पेट्रोल च्या टाकी वर एक 2 वर्षीय, मागे त्याची काळजीवाहू ताई(5 वर्षे) मग चालक, त्यामागे चालकाचा रिमोट कंट्रोल आणि त्यामागे शेवटचा प्रवासी म्हणजे मोठा मुलगा(वय 7/8). आपण केवढी मोठी रिस्क घेत आहोत हे ह्यांना कळतच नाही. दुर्दैवाने काही अपघात झाला तर अक्खे कुटुंब नष्ट होऊ शकते. असो. बाकी लहान मुलांशी संबंधित अजून काही उदाहरणे म्हणजे मस्त रांगत्या खेळत्या मुलाला दामटून मांडीवर घेणे ,गोष्ट/गाणी सांगत बसणे, त्याचा उत्साह घालवणे आणि मग "बघ कसा झोपेला आलाय" म्हणून जबरदस्तीने झोपवणे. मुलांबरोबर मूल होऊनच खेळले पाहिजे ह्याला अनुमोदन. बरेचदा मोठ्या माणसांना ही गोष्ट कळत नाही आणि मुलांना अशी माणसे अजिबात आवडत नाहीत. त्यांना आपले पद, प्रतिष्ठा विसरणे जमत नाही, आणि त्यामुळे मोकळेपणे मुलांमध्ये मिसळता येत नाही. ते एका चांगल्या आनंदाला मुकतात असे वाटते. अवांतर : जिव्हारी मस्ती करणारी मुले मला अजिबात आवडत नाहीत.