संवाद-३ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]
लेखनप्रकार
संवाद-१
संवाद-२
---------------------------------------------------------------------------------------
संवाद-३
"पण म्हणून मी का त्यांच्यासाठी काही करावं?" तो तावातावाने मला विचारत होता.
"कारण तुझी तेवढी क्षमता आहे" मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो.
"क्षमता? महिना २० हजाराला तू क्षमता म्हणतोस?"
"of course, निदान माझ्यापेक्षातरी नक्कीच जास्त आहे. मी जर १२ हजारातही त्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी काही करु शकतोय तर तू का नाही?"
"कारण मलाच माझे वीस हजार पुरत नाहीत"
"कारण तु तुझ्या गरजा वाढवुन ठेवल्या आहेस"
"हे तु कोण ठरवणार? मी कसं जगायचं हे मी ठरवणार. मला जर २ हजाराच्या चपला घालाव्याश्या वाटल्या तर मी घालणार, १५ हजाराचा मोबाईल आवडतोय तर तो घेणार, घरी ए.सी. असावा असं वाटतंय तर बसवणार. यात चूक ती काय? आणि मी माझ्या पैशांनी हे करतोय, चोरी किंवा उधारी तर करत नाही ना?"
"हे बघ, तू जरा शांतपणे विचार केलास तर तुझं तुलाच पटेल की वर्षाकाठी ४-५ हजार ते सुद्धा एका विधायक कार्यासाठी खर्च करण तुला सहज शक्य आहे."
"अरे पण मला करायचंच नाहीये ना ते."
"पण का? आपल्या आजुबाजुला लोक हालाखी च्या परिस्थितीत जगत असताना तू ऐषोआरामात कसा काय जगु शकतोस? ईतक्या कश्या तुझ्या जाणिवा बोथट झाल्या आहेत? त्या झोपडपट्टीतल्या त्या माणसांना रोजचं जगण म्हणजे लढाई झाली आहे. समाजाच्या तळागाळातली ही लोकं तिथे खितपत पडलीयेत, त्यांना त्या परिस्थितीतून वर येण्यासाठी मदत करणं तुझं कर्तव्य नाही बनत?"
"पहिली गोष्ट म्हणजे मी ऐषोआरामात वगैरे काही जगत नाहीये, आणि तुझ्या त्या तळागाळातल्या लोकांना कुणी मनाई नाही केली कष्ट करून वर यायला. पण आयतं खायची सवयच लागलीये यांना.तुम्ही मारे त्यांना मदत करत आहात पण उपयोग होणार आहे का त्याचा? दिवसाखेरीस दारु ढोसून हे परत आपापल्या बायकापोरांना मारझोड करणार, पोरांची शिक्षणं बंद करून त्यांना कुठंतरी कामाला लावणार, लहान मुलं बापाचं हे वागणं बघून मोठेपणी तसच वागणार. हे एक दुष्टचक्र आहे रे, असंच चालू राहणरं. परिस्थिती नाही म्हणुन काही करता येत नाही, आणि काही करत नाही म्हणुन परिस्थिती बदलत नाही"
"हो ना, मग त्यांची परिस्थिती बदलायला आपण त्यांना मदत का करू नये"
"काही फरक पडणार नाहीये"
"प्रयत्न न करताच हे बोलतो आहेस? आणि हे बघ, सगळेच तु म्हणतोस तसे ऐतखाऊ नसतात. त्यांच्यातही काही लोक असे असतात की ज्यांची कष्ट करायची तयारी असते. त्यांना गरज असते फक्त थोड्या मदतीची. अरे शून्यातुन सगळं उभ करायच म्हणजे काही सोपं नसतं. तुझ्या माझ्या सारख्याला नशिबाने सगळ मिळालंय म्हणून त्याची धग जाणवत नाही. आणि मी तुला या कामासाठी वाहुन वगैरे घे असं थोडी म्हणतोय. त्यासाठी समाजात ईतर लोक आधीपासुनच कार्यरत आहेत. सामाजिक संस्था आहेत, सरकारी प्रकल्प आहेत. सुरुवात कोणीतरी केलेली आहेच रे; आपण फक्त हातभार लावायचाय.आणि राग नको मानूस पण तू कितीही कारणं द्यायचा प्रयत्न केलास तरी तुझ्यासारख्याला वर्षाकाठी ४-५ हजार बाजुला काढणं काहीच अशक्य नाही."
"अरे पण हे ५ हजार मी माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी का खर्च करू नयेत? त्यांच्या वाटचा आनंद काढुन दुसर्याला देणं का कुठला न्याय? आणि काही सामाजिक जाणीवा वगैरे बोथट झालेल्या नाहीत. च्यायला वर्षाकाठी ईमानेइतबारे सरकारला टॅक्स भरतोय, सगळे नियम वगैरे पाळतो, अगदी ट्रॅफिकचे सुध्दा, कुणालाही त्रास देत नाही. आता तू म्हणशील यात काय मोठसं पण मला सांग सरळमार्गी आयुष्य जगणं याला काहीच किंमत नाही का? आणि आपण शहरात राहतो म्हणजे काय आपल्याला प्रॉब्लेम्स नसतातच का? की प्रॉब्लेम्स फक्त खेडेगावच्या लोकांना आणि गोरगरीबांनाच ? त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणून आपण श्रीमंत?हां अगदी बेसिक नीड्स साठी आपल्याला धडपड नाही करायला लागत पण म्हणून यापेक्षा पुढे जायचंच नाही का? समाधान जसं मानण्यावर असतं तस न मानण्यावरही असलं पाहीजे ना? जे आहे त्यात नेहमीच समाधान का मानायचं? तू कदाचित मानत असशीलही, पण मी नाही. हे बघ मला असं वाटतं की हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तूला सामाजिक कार्य वगैरे करावसं वाटत, मला नाही वाटत. पण म्हणून काय मी माणुसकी सोडली आहे अस नाही. मला फक्त सध्याच्या परिस्थितीत दुसर्याच्या अपलिफ्ट्मेंट पेक्षा स्वतःची अपलिफ्ट्मेंट आवश्यक वाटते. आणि मी म्हणतो मजबूत कष्ट करून भरपूर पैसे मिळवण्यात काय गैर आहे? 'अपवर्डली मोबाईल' असण म्हणजे हावरट किंवा लोभी असण नाही. किंवा मी त्यांच्या विकासाच्या आडही येत नाही. पण त्यांच्या विकासासाठी हातभार लाव म्हणत म्हणशील तर ते सद्द्यस्थितीत तरी मला शक्य नाही. दिवसभर कष्ट करून मिळवलेले पैसे मी माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या आनंदासाठी खर्च केले तर त्यात काय चूक आहे? "
मला त्याला कसं समजवावं तेच कळे ना. निदान त्यावेळी तरी माझ्याकडे त्याच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती.
वाचन
4353
प्रतिक्रिया
9