मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन (१/२)

मूकवाचक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आंतरराष्ट्रीय पातळीवर तबलावादनाच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान मिळवूनही अत्यंत शालीन, विनम्र असणार्‍या उस्ताद झाकिर हुसेन यांचा हा एक किस्सा. कलाक्षेत्रावरच्या (चेन्नई) त्यांच्या अप्रतिम तबलावादनने भारावून गेलेल्या रूक्मिणीदेवींनी त्यांना विचारलं, "झाकिर, बेटा तुला दहाच बोटं आहेत की शंभर?" उस्तादजींनी हात जोडत एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, "माझ्याजवळ दहा बोटं आणि आपले आशिर्वाद आहेत". उस्तादजी पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्नियामधे राहतात. अमेरिकेतल्या दोन मैफिलींमधल्या प्रवासात गौरी रामनारायण यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तिचा हा सारांश. ही मुलाखत साधारणपणे १५ ते २० वर्षापूर्वीची आहे. प्रश्नः पॉप, जॅझ आणि फ्यूजन संगीतात आंतरराष्ट्रीय पातळीवर 'स्टार' झाल्यानंतरही आपण हिंदुस्थानी अभिजात संगीतातली आपली पारंपारिक 'प्रतिमा' कशी जपता? उ. झाकिर हुसेनः (असे प्रश्न) मला असे वाटतं की घाईगडबडीने काढलेले निष्कर्ष, चुकीच्या धारणा आणि पूर्वग्रहांमधून जन्माला येतात. नको त्या गोष्टींना फाजिल महत्व देण्याची लोकांची वाईट खोड आहे. त्यांना वाटतं की ह माणूस नको त्या गोष्टींमागे लागला आहे. माझ्या बाबतीत बोलायचं तर मी सर्वप्रथम एक 'संगतकार' आहे. कार्यक्रम उ. अली अकबर यांचा असो की उ. विलायत खाँ यांचा, मी त्यांना साथ करतो. त्यातून बरंच शिकतो. माझे जॅझचे कार्यक्रम आता मर्यादित प्रमाणात होतात. दोन वर्षातून एखादा महिनाच मी 'फ्यूजन'साठी देतो. मी आज अशा स्थितीत आहे की मला नेमकं काय करायचं आहे, ते किती प्रमाणात करायचं आहे हे मी ठरवू शकतो. माझ्या संगीतासाठी योग्य पार्श्वभूमी नाही अशा ठिकाणी मी जात नाही. मी मंचावर चकचकीत जॅकेट किंवा गुडघ्यापर्यंत बूट वगैरे घालून 'रॉक स्टार'सारखाही कधीच जात नाही. माझ्या कार्यक्रमांपैकी ९५ टक्के तरी कार्यक्रम भारतीय शास्त्रीय संगीताचेच असतात. गेली २५ वर्षे मी व्यावसायिक संगीतकार म्हणून सातत्याने जगभर प्रवास करतो आहे. त्यात न चुकता दरवर्षी चार महिने तरी हिंदुस्थानात येतो आणि इथल्या कलाकारांची संगत करतो. काही कलाकार कदाचित असे करत नसतील. प्रश्नः इतक्या धावपळीच्या नित्यक्रमामुळे तुमच्या रियाझावर परिणाम होतो का? उ. झाकिर हुसेनः असं घडून चालणार नाही. वर्षाला जवळजवळ दीडशे कार्यक्रम म्हणजे सततचा प्रवास ठरलेलाच आहे. हॉटेलमधे जायचं, संध्याकाळी कार्यक्रम करायचा, परत येउन हॉटेलमधून मुक्काम हलवायचा आणि हेच चक्र पुढच्या दिवशी दुसर्‍या शहरात चालू ठेवायचं. तरीही मी सतत रियाझ करतो. आज सकाळी मृदंगमबरोबरचा कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळे पं. बिरजू महाराजजींच्या नियोजीत कार्यक्रमासाठी मी तबला सभागृहातच ठेवला, पण इथे (हॉटेल) परत आल्यावर त्या समोरच्या टेबलवर ठेवला आहे तो 'खंजिरा' घेउन मी नेहेमीसारखाच रियाझ केला. सततचा रियाझ हा (कलाकाराच्या आयुष्यातला) फार महत्वाचा घटक आहे. निव्वळ हाताची तयारीच नव्हे, तर तुमचं तुमच्या मूळ स्त्रोताशी, परंपरेच्या गंगोत्रीशी सतत संलग्न राहणं महत्वाचं आहे. मला आपल्याला मिळालेल्या वारशाचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या सतत सान्निध्यात राहण्यातच आनंद आहे, या गुरूपरंपरेवर माझी नितांत श्रद्धा आहे. तिची अमर्याद शक्ती मला वेळोवेळी जाणवलेली आहे. हे स्पष्टपणे सांगताना मी बिचकत नाही, की ही भावनिक गुंतवणूक, हे तादात्म्यच मला श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत सहज घेउन जातं. प्रश्नः इतरांपेक्षा तुमचं वेगळेपण तुमच्या वादनातील सहजस्फूर्तता ('ओरिजिनॅलिटी')हेच आहे. तुम्ही पुढच्या क्षणी काय वाजवाल याचा अंदाज बांधता येत नाही. हा गुण उपजत लाभलेला आहे की त्यावर तुम्ही मेहनत घेतलेली आहे? उ. झाकिर हुसेनः सुदैवाने माझी जडणघडण होत असताना मी उ. अली अकबर खाँ यांच्यासमवेत मी कित्येक वर्षे राहिलो. कला सादर करण्यासाठी लागणारा कच्चा आराखडा ('ब्लू प्रिंट') करून त्यांचं समाधान होत नसे. उ. विलायत खाँसाहेब आणि पं. रविशंकरजीही त्याच पठडीतले. पारंपारिक वादनशैलीत ते कमालीचे निष्णात आहेतच, त्यांचं तांत्रिक गोष्टींवर इतकं अफलातून प्रभुत्व आहे, की ते कधीही त्या समृद्ध भांडवलाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू शकतात. पण मी त्यांना नेहेमीच चाकोरीबाहेरच्या नित्यनूतन गोष्टींच्या शोधात असलेलं पाहिलं आहे. मी त्यांना धोके पत्करताना पाहिलं आहे. प्रयोग हा कलेचा एक अविभाज्य घटकच आहे. प्रयोग आणि प्रयत्न करत राहणं महत्वाचं. कित्येक वेळा ते व्यर्थ जातील, पण शेवटी यशच मिळेल अशी ठाम श्रद्धा हवी. कारकिर्दीच्या सुरूवातीला माझीही वादनाची ठराविक पद्धत होती. पण साथसंगत करताना उ. अली अकबर खाँसाहेबांकडे पाहून मला खात्री वाटायला लागली, की काही धोके पत्करत उपज अंगाने वादन केले तर त्यात काही चूक नाही. प्रयोग करा आणि त्याचा परिणाम काय होतो हे नीट पडताळून पहा. मंचावर अशा वृत्तीने वाजवू नका, की मला खूप माहिती आहे, तेव्हा मी 'हेच' वाजवणार. मला बाकी गोष्टींशी देणंघेणं नाही! आता १५ वर्षांनंतर साचेबद्ध पद्धतीने मी मुळीच वाजवत नाही. प्रत्येक क्षणाला मी 'जिवंत' प्रतिसाद देतो. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचा दृष्टीकोन असाच होता आणि त्याचं त्यांना काय फळ मिळालं हे मी समक्ष पाहिलं आणि अनुभवलं. तरीही, मला आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकारांची साथ करताना स्वतःचं कठोर परीक्षण करायची सवय लागली. एका प्रकारे माझ्यातला समीक्षकच माझा आधारवड ठरला. पुढील कालखंडात एक फार मोठा फायदा मला अगदी विनासायास मिळाला. माझा आत्मविश्वास वाढलेला होता आणि मला आणखी चार पावले पुढे जायची आंतरिक उर्मी होती. तेव्हा असे दोन दिग्गज संगीतकार मला भेटले, ज्यांनी मला आश्वस्त केले, "झाकिर, मनमोकळेपणानी वाजव, आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहोत". पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसियांनी मला त्यांच्याबरोबर वादन करत असताना संपूर्ण स्वातंत्र्य तर दिलंच त्या जोडीला सतत प्रोत्साहनही दिलं. कुठलीही आडकाठी न ठेवता ते माझ्याबरोबर मुक्तपणे सांगितीक संवाद साधण्यासाठी पुढे आले. शिवजींच्या विलोभनीय स्मितहास्यातूनच आणि एखाद्या बोलक्या कटाक्षातूनच मला त्यांची संमती आणि आनंद स्पष्टपणे दिसून यायचा! प्रश्नः हे तसं अद्भुतच आहे, कारण हे दोन्ही दिग्गज वादक तशी 'नाजूक' वाद्यं वाजवतात आणि आक्रमक तबलावादनामुळे त्यांच्या वादनात रसहानी होण्याचीच शक्यता जास्त असं वाटतं. उ. झाकिर हुसेनः अगदी बरोबर! मला वाटतं असं काही झालं नसावं, कारण हे दोघे महान कलावंत आहेत (त्यांनी विचारपूर्वकच संमती दिली असणार). माझ्या मते एकांतात कलावंताची वाढ होत नाही, नव्हे ते अशक्यच आहे म्हणा ना! आपल्या सहकार्‍यांकडून मिळणारं प्रोत्साहन, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांनी पुढ्यात उभे केलेले आव्हान या सगळ्या गोष्टी आपली गुणवत्ता वाढण्यासाठी, परिपक्वता येण्यासाठी आणि समाधान मिळण्यासाठी अनिवार्यच आहेत. मला या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांकडून या गोष्टी अगदी भरभरून मिळत आलेल्या आहेत.

वाचने 7376 वाचनखूण प्रतिक्रिया 22

तर्री 12/02/2013 - 21:08
लेख अप्रतिम - २/२ च्या प्रतीक्षेत. मागच्याच महिन्यात उस्तादजी ना ठाण्यात ऐकले. मादक आणि शालीन कलेचा नजराणा होता तो.

In reply to by तर्री

किसन शिंदे 13/02/2013 - 07:49
मागच्याच महिन्यात उस्तादजी ना ठाण्यात ऐकले. मादक आणि शालीन कलेचा नजराणा होता तो.
डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहातला शंकर महादेवनच्या सोबतीने केलेला त्यांचा हा कार्यक्रम थोडक्यात हुकला माझा. :(

In reply to by किसन शिंदे

तर्री 13/02/2013 - 08:35
किसन - तुम्ही हा प्रोग्राम ऐकायला हवा होतात. गझल ते लावणी , अभंग ते उपशास्त्रीय अशी मेजवानी झाली. डी.के.जी.एन अर्थातच हाउस फुल्ल होते. पण खंत नसावी. उस्तादजी आजकाल खूप प्रोग्राम घेतात. परत संधी मिळेल ही आशा .

कवितानागेश 13/02/2013 - 01:01
:)

चौकटराजा 13/02/2013 - 08:21
मुवा , उदबोधक मुलाखत. जाकिर हुसेन राजा कलावंत व राजा माणूस आहेतच ! ते विचारप्रवण असल्यानेच त्यानी तबला वादनात स्वत: चा खास ठसा उमटवला आहे. नाजुक हाताचा .

५० फक्त 13/02/2013 - 08:26
लई भारी लिहिलंय, असंच अजुन येउद्या, आम्ही आपले चोरलेल्या / कॉपलेल्या एमपी३ ऐकुन स्वताला लई भारी समजणारे.

अक्षया 13/02/2013 - 09:59
३ -४ कार्यक्रमात त्यांचा सहवास लाभला आहे. एक कलाकार म्हणुन तर ते ग्रेट आहेतच तसेच एक माणुस म्हणुनही. आठवणींना उजाळा मिळाला. :) भावानुवाद आणि मुलाखतीचा सारांश मस्तच.

नानबा 13/02/2013 - 10:11
बर्‍याच वर्षांपूर्वी डोंबिवलीत झाकीरजी आणि पं. जसराज यांचा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रम त्या वेळी नवीनच झालेल्या स्टेडियम वर होता, आणि तरीही हाऊसफुल होता. त्या वेळी माझं शास्त्रीय संगीत शिक्षण सुरू असल्यामुळे मला माझ्या गुरूंसोबत तो कार्यक्रम याचि देहि याचि डोळा पाहण्याची संधी लाभली होती. आज इतकी वर्षं झाली, तरीही त्या वेळी झाकिरजींनी वाजवलेला तबला डोक्यात घर करून आहे. आणि जसराजजी आणि झाकिरजींची जुगलबंदी तर वाह! क्या बात है, या एकाच प्रतिक्रियेत सांगता येईल. ही माणसं आणि यांची जडणघडणच निराळी. हा धागा टाकून जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

Dhananjay Borgaonkar 13/02/2013 - 12:28
वाह उस्ताद!!! :) मस्त चालु आहे लेखमाला. पुढचा भाग लौकर येऊदेत. तौफिक कुरेशीवरपण लिहा एक लेख.

कवितानागेश 13/02/2013 - 12:41
काल वाचल्यानंतर प्रतिसादासाठी शब्द सुचत नव्हते. पण उस्तादांचे शब्द तेंव्हापासून सतत डोक्यात घोळत आहेत. 'फलभारानी वाकलेला आम्रवृक्ष' वगरै उपमा देतात ना, तसे व्यक्तिमत्त्व आहे. ज्ञानी आणि गोड. :)

स्वाती दिनेश 13/02/2013 - 13:09
मुलाखतीचा भावानुवाद आवडला, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. स्वाती

इनिगोय 13/02/2013 - 14:58
अतिशय उमद्या व्यक्तिमत्त्वावरचा लेख. प्रत्येक क्षणाला मी 'जिवंत' प्रतिसाद देतो.. हेच कदाचित त्यांच्या अभंग प्रसन्नतेचं गमक असावं.

प्रसाद१९७१ 14/02/2013 - 11:11
जरा विषयांतर करतोय. थोड्या दिवसापूर्वी www.shadjamadhyam.com वर अमोद दांडगे ह्यांचे एक session बघायला आणि ऐकायला मिळाले. ज्यांना बघायचे असेल त्यांनी इथे बघावे http://www.shadjamadhyam.com/non_expandable_compositions_in_farukhabad_gharana_by_amod_dandage त्यांचे ज्ञान आणि तयारी बघुन मी चकीत झालो आणि मला हे नाव ही माहिती नसावे ह्याचे वाइट वाटले. सध्याच्या media management च्या जगात चांगली लोक कशी प्रसिद्ध होत नाहीत ह्याचे हे उदाहरण

क्रान्ति 14/02/2013 - 11:15
जगात अजूनही ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं अशी काही व्यक्तिमत्वं आहेत, त्यांपैकी उस्ताद हे एक. या धाग्याबद्द्ल द्यावे तितके धन्यवाद कमीच!