आंतरराष्ट्रीय पातळीवर तबलावादनाच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान मिळवूनही अत्यंत शालीन, विनम्र असणार्या उस्ताद झाकिर हुसेन यांचा हा एक किस्सा. कलाक्षेत्रावरच्या (चेन्नई) त्यांच्या अप्रतिम तबलावादनने भारावून गेलेल्या रूक्मिणीदेवींनी त्यांना विचारलं, "झाकिर, बेटा तुला दहाच बोटं आहेत की शंभर?" उस्तादजींनी हात जोडत एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, "माझ्याजवळ दहा बोटं आणि आपले आशिर्वाद आहेत".
उस्तादजी पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्नियामधे राहतात. अमेरिकेतल्या दोन मैफिलींमधल्या प्रवासात गौरी रामनारायण यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तिचा हा सारांश. ही मुलाखत साधारणपणे १५ ते २० वर्षापूर्वीची आहे.
प्रश्नः पॉप, जॅझ आणि फ्यूजन संगीतात आंतरराष्ट्रीय पातळीवर 'स्टार' झाल्यानंतरही आपण हिंदुस्थानी अभिजात संगीतातली आपली पारंपारिक 'प्रतिमा' कशी जपता?
उ. झाकिर हुसेनः (असे प्रश्न) मला असे वाटतं की घाईगडबडीने काढलेले निष्कर्ष, चुकीच्या धारणा आणि पूर्वग्रहांमधून जन्माला येतात. नको त्या गोष्टींना फाजिल महत्व देण्याची लोकांची वाईट खोड आहे. त्यांना वाटतं की ह माणूस नको त्या गोष्टींमागे लागला आहे. माझ्या बाबतीत बोलायचं तर मी सर्वप्रथम एक 'संगतकार' आहे. कार्यक्रम उ. अली अकबर यांचा असो की उ. विलायत खाँ यांचा, मी त्यांना साथ करतो. त्यातून बरंच शिकतो.
माझे जॅझचे कार्यक्रम आता मर्यादित प्रमाणात होतात. दोन वर्षातून एखादा महिनाच मी 'फ्यूजन'साठी देतो. मी आज अशा स्थितीत आहे की मला नेमकं काय करायचं आहे, ते किती प्रमाणात करायचं आहे हे मी ठरवू शकतो. माझ्या संगीतासाठी योग्य पार्श्वभूमी नाही अशा ठिकाणी मी जात नाही. मी मंचावर चकचकीत जॅकेट किंवा गुडघ्यापर्यंत बूट वगैरे घालून 'रॉक स्टार'सारखाही कधीच जात नाही. माझ्या कार्यक्रमांपैकी ९५ टक्के तरी कार्यक्रम भारतीय शास्त्रीय संगीताचेच असतात. गेली २५ वर्षे मी व्यावसायिक संगीतकार म्हणून सातत्याने जगभर प्रवास करतो आहे. त्यात न चुकता दरवर्षी चार महिने तरी हिंदुस्थानात येतो आणि इथल्या कलाकारांची संगत करतो. काही कलाकार कदाचित असे करत नसतील.
प्रश्नः इतक्या धावपळीच्या नित्यक्रमामुळे तुमच्या रियाझावर परिणाम होतो का?
उ. झाकिर हुसेनः असं घडून चालणार नाही. वर्षाला जवळजवळ दीडशे कार्यक्रम म्हणजे सततचा प्रवास ठरलेलाच आहे. हॉटेलमधे जायचं, संध्याकाळी कार्यक्रम करायचा, परत येउन हॉटेलमधून मुक्काम हलवायचा आणि हेच चक्र पुढच्या दिवशी दुसर्या शहरात चालू ठेवायचं. तरीही मी सतत रियाझ करतो. आज सकाळी मृदंगमबरोबरचा कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळे पं. बिरजू महाराजजींच्या नियोजीत कार्यक्रमासाठी मी तबला सभागृहातच ठेवला, पण इथे (हॉटेल) परत आल्यावर त्या समोरच्या टेबलवर ठेवला आहे तो 'खंजिरा' घेउन मी नेहेमीसारखाच रियाझ केला.
सततचा रियाझ हा (कलाकाराच्या आयुष्यातला) फार महत्वाचा घटक आहे. निव्वळ हाताची तयारीच नव्हे, तर तुमचं तुमच्या मूळ स्त्रोताशी, परंपरेच्या गंगोत्रीशी सतत संलग्न राहणं महत्वाचं आहे. मला आपल्याला मिळालेल्या वारशाचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या सतत सान्निध्यात राहण्यातच आनंद आहे, या गुरूपरंपरेवर माझी नितांत श्रद्धा आहे. तिची अमर्याद शक्ती मला वेळोवेळी जाणवलेली आहे. हे स्पष्टपणे सांगताना मी बिचकत नाही, की ही भावनिक गुंतवणूक, हे तादात्म्यच मला श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत सहज घेउन जातं.
प्रश्नः इतरांपेक्षा तुमचं वेगळेपण तुमच्या वादनातील सहजस्फूर्तता ('ओरिजिनॅलिटी')हेच आहे. तुम्ही पुढच्या क्षणी काय वाजवाल याचा अंदाज बांधता येत नाही. हा गुण उपजत लाभलेला आहे की त्यावर तुम्ही मेहनत घेतलेली आहे?
उ. झाकिर हुसेनः सुदैवाने माझी जडणघडण होत असताना मी उ. अली अकबर खाँ यांच्यासमवेत मी कित्येक वर्षे राहिलो. कला सादर करण्यासाठी लागणारा कच्चा आराखडा ('ब्लू प्रिंट') करून त्यांचं समाधान होत नसे. उ. विलायत खाँसाहेब आणि पं. रविशंकरजीही त्याच पठडीतले. पारंपारिक वादनशैलीत ते कमालीचे निष्णात आहेतच, त्यांचं तांत्रिक गोष्टींवर इतकं अफलातून प्रभुत्व आहे, की ते कधीही त्या समृद्ध भांडवलाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू शकतात.
पण मी त्यांना नेहेमीच चाकोरीबाहेरच्या नित्यनूतन गोष्टींच्या शोधात असलेलं पाहिलं आहे. मी त्यांना धोके पत्करताना पाहिलं आहे. प्रयोग हा कलेचा एक अविभाज्य घटकच आहे. प्रयोग आणि प्रयत्न करत राहणं महत्वाचं. कित्येक वेळा ते व्यर्थ जातील, पण शेवटी यशच मिळेल अशी ठाम श्रद्धा हवी. कारकिर्दीच्या सुरूवातीला माझीही वादनाची ठराविक पद्धत होती. पण साथसंगत करताना उ. अली अकबर खाँसाहेबांकडे पाहून मला खात्री वाटायला लागली, की काही धोके पत्करत उपज अंगाने वादन केले तर त्यात काही चूक नाही.
प्रयोग करा आणि त्याचा परिणाम काय होतो हे नीट पडताळून पहा. मंचावर अशा वृत्तीने वाजवू नका, की मला खूप माहिती आहे, तेव्हा मी 'हेच' वाजवणार. मला बाकी गोष्टींशी देणंघेणं नाही! आता १५ वर्षांनंतर साचेबद्ध पद्धतीने मी मुळीच वाजवत नाही. प्रत्येक क्षणाला मी 'जिवंत' प्रतिसाद देतो. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचा दृष्टीकोन असाच होता आणि त्याचं त्यांना काय फळ मिळालं हे मी समक्ष पाहिलं आणि अनुभवलं. तरीही, मला आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकारांची साथ करताना स्वतःचं कठोर परीक्षण करायची सवय लागली. एका प्रकारे माझ्यातला समीक्षकच माझा आधारवड ठरला.
पुढील कालखंडात एक फार मोठा फायदा मला अगदी विनासायास मिळाला. माझा आत्मविश्वास वाढलेला होता आणि मला आणखी चार पावले पुढे जायची आंतरिक उर्मी होती. तेव्हा असे दोन दिग्गज संगीतकार मला भेटले, ज्यांनी मला आश्वस्त केले, "झाकिर, मनमोकळेपणानी वाजव, आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहोत". पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसियांनी मला त्यांच्याबरोबर वादन करत असताना संपूर्ण स्वातंत्र्य तर दिलंच त्या जोडीला सतत प्रोत्साहनही दिलं. कुठलीही आडकाठी न ठेवता ते माझ्याबरोबर मुक्तपणे सांगितीक संवाद साधण्यासाठी पुढे आले. शिवजींच्या विलोभनीय स्मितहास्यातूनच आणि एखाद्या बोलक्या कटाक्षातूनच मला त्यांची संमती आणि आनंद स्पष्टपणे दिसून यायचा!
प्रश्नः हे तसं अद्भुतच आहे, कारण हे दोन्ही दिग्गज वादक तशी 'नाजूक' वाद्यं वाजवतात आणि आक्रमक तबलावादनामुळे त्यांच्या वादनात रसहानी होण्याचीच शक्यता जास्त असं वाटतं.
उ. झाकिर हुसेनः अगदी बरोबर! मला वाटतं असं काही झालं नसावं, कारण हे दोघे महान कलावंत आहेत (त्यांनी विचारपूर्वकच संमती दिली असणार). माझ्या मते एकांतात कलावंताची वाढ होत नाही, नव्हे ते अशक्यच आहे म्हणा ना! आपल्या सहकार्यांकडून मिळणारं प्रोत्साहन, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांनी पुढ्यात उभे केलेले आव्हान या सगळ्या गोष्टी आपली गुणवत्ता वाढण्यासाठी, परिपक्वता येण्यासाठी आणि समाधान मिळण्यासाठी अनिवार्यच आहेत. मला या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांकडून या गोष्टी अगदी भरभरून मिळत आलेल्या आहेत.
वाचने
7385
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम !
मागच्याच महिन्यात उस्तादजी ना
In reply to अप्रतिम ! by तर्री
टु-गेदर .
In reply to मागच्याच महिन्यात उस्तादजी ना by किसन शिंदे
अप्रतिम लेख असेच म्हणते.
अप्रतिम लेख..
+१
फार छान मुलाखत! अतिशय विनम्र
मूळ मुलाखत कुठे वाचायला मिळेल
हूजूर वाह ! मुवा ! बोलो
लई भारी लिहिलंय, असंच अजुन
+१०००००.
In reply to लई भारी लिहिलंय, असंच अजुन by ५० फक्त
छान लिहिलंय
अप्रतिम लेखन..
बर्याच वर्षांपूर्वी
वाह उस्ताद!!!
काल वाचल्यानंतर प्रतिसादासाठी
वा...
अतिशय उमद्या
वाह उस्ताद !!!
वाह ताज कहिये !
अमोद दांडगे- नक्की बघा
अप्रतिम!