Skip to main content

माझ्या कुतुहलाची दीनगाथा!

लेखक आनन्दिता यांनी मंगळवार, 22/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'!!: :) तर मला म्हणायचय काय, की कुतुहलापोटी केलेल्या कुठल्याही कामाचा चांगला परिणाम होऊ शकतो ही गोष्ट तद्दन खोटी आहे असा माझा दावा आहे. कित्ती ही नाही म्हटलं तरी ऐन वेळी माझं भाबडं मन त्या कजाग कुतूहलाच्या कचाट्यात सापडतच बघा.आता परवाचीच गोष्ट घ्या, "तुम्ही स्वतः हसरे, प्रेमळ, आणि सकारात्मक झालात कि समोरचाही आपोआप तसा होतो" असं मी कुठल्याशा अध्यात्मिक कार्यक्रमात ऐकलं होतं. आता ते खरच तसं होत असेल का याच कुतूहल मला लागून राहील होतं.मानगुटीवर येउन बसलेल्या सकारात्म्कते च्या कुतूहलाला शमवण्यासाठी, चिडून अमाप खळखळ करणाऱ्या म्यानेजरणी कडे मी शांत मंद हसत पाहून बघितलं.पण त्याच्या बदल्यात मिळालं काय ?? तर , " आधी चुका करता आणि वर निर्लज्जपणे दात काढता" ही दात !! हे आप्लं दाद!! आता या मेलीलाच हसरी बनवण्यासाठी केलं न मी हे? पण तिने त्याची भलतीच पोचपावती दिलीन.. तर असा हा सगळा माझा खटाटोप वाया गेला असला तरी एक गोष्ट मात्र मला पक्की कळलिये , की 'हे अध्यात्म वगैरे माणसांवर परिणाम करतात. "हिडींबा राक्षसणिवर" नाही!!. या कुतूहलाविषयी माझ्या आईच हि तितकसं चांगलं मत नसावं बहुतेक. कारण लहानपणापासून च्या माझ्या सर्व कुतुहलांना तिने 'आगाऊपणा' हे एकमेव संबोधन बहाल केलय!. फक्त आईचंच नाही सरकारी कॉलनीत राहणाऱ्या आम्हा मुलांबद्दल गावातल्या एकुनेक माणसाचं हेच मत होतं. "कुतूहल ही विज्ञानाची जननी आहे" हा सुविचार भल्या मोठ्या अक्षरात आमच्या शाळेच्या प्रयोगशाळेवर लिहिला होता. पण त्याचा अर्थ आमच्या पालकांच्या (आणि शिक्षकांच्या ही) टकुर्यात काही शिरत नव्हता. आणि हेच आम्हा सर्व निरागस, अजाण बालकांचं दुखः होतं. त्यामुळे हा कुतुहलचं काही 'फळ' मिळो ना मिळो पण अंगावर 'वळ' मात्र जरूर उठायचे!!. या कुतुहलापायी लहानपणी असंख्यवेळा मी मार खात खाता वाचले आहे.... (अन तेवढयाच वेळा खाल्ला ही आहे!!) उगाच कशाला खोटं बोला. शेजारच्या फरांदे काकुंच्या पेरूचे पेरू कसे लागत असतील बरे याच कुतूहल मला त्यांच्या कंपाउंडवर चढवून गेलं.. शिंदेकाकांनी फेकून दिलेल्या अर्धवट सिगारेटी गोळा करून नाकातून धूर काढायचा सामुहिक कार्यक्रम आम्ही सर्व पोरांनी मोठ्या उत्साहाने केला होता. नंतर लागलेल्या ठसक्यांनी अख्खी कॉलनी दणाणून गेली हे सांगायला नकोच. सदानकदा रांगत इकडेतिकडे हिंडणारं बोरकरांचं बाळ त्याच्या पायाला रिबीन बांधून खांबाला बांधल्यास एका जागी शांत बसतं का?? वगैरे वगैरे.. बाबांच्या कलापाने देशमुखांच्या पामेरियन 'चिनू' चे पण केस रंगवले जातात का याची एकदा हळूच चाचणी घेणं चालू होतं.तेवढ्यात आत्तापर्यंत शांतपणे हे सगळं बघत असणारा बुलडॉग 'दिग्या' अचानक भो भो करीत आमच्या अंगावर आला. आपल्या दोस्ताच्या देखण्या रुपाची वाट लावली जात आहे हे त्याला कळल्यावर त्याला आमचा फार राग आला... दिग्या च्या बांधलेल्या साखळीच्या परिघाबाहेर कसंतरी भिंतीला चिटकून उभ्या असलेल्या मला या कुतूहलाने, भेदरून ए 'कुतु' 'हल' ना असे म्हणायला लावले!! घाबरून बेहाल झाल्यावर कशीतरी जीव वाचवून घरात पोचले. पाणी पिऊन जरा निश्वास टाकणार इतक्यात बाबांना 'कलापाच्या ब्रश मध्ये कुत्र्याचे केस सापडल्याने' घरात हलकल्लोळ माजला. पुढचे काही दिवस मात्र देश्मुखांनी घरी छोटा 'झेब्रा' आणलाय अशी अफवा गावात पसरली. बाकी वर उल्लिखलेल्या शिंदे काकांच्या श्रीमती हि एक ढालगज बाई होती. त्यांच्या घरातून काकुंच गुरकावणं आदळआपटीच्या कोरस मध्ये ऐकू आल की दुसऱ्या मिनिटाला शिंदे काका घराबाहेर येउन तावातावाने फकाफक सिगरेटी ओढत बसणार हे आम्ह्या प्रत्येक पोराला माहित होतं. एकदा काका जोरदार सिगारेटी ओढत असताना आमच्या टोळक्याने त्यांना, "अशा टारगट काकूशी तुम्ही का बरे लग्न केले? हि शंका विचारली" होती. काकांनी आमच्या तोंडावरून मायेने हात फिरवल्याचं अंधुकसं आठवतंय. पुढे कधीतरी काकांनी गोडीत येऊन (किंवा भांडणात हि असू शकेल) काकुना हे सांगितलं असावं बहुतेक. कारण एके दिवशी " दारातून धडधडत पळालात तर तंगडी मोडीन" असा फतवा काकूंकडून उगाचच्या उगाचच जारी करण्यात आला. आमच्या इथे घोरपडे नावच कुटुंब राहत असे. त्यातले आजोबा रोज दुपारी सामाईक व्हरांड्यात 'घोरत पडत' असत. एकदा त्यांची वामकुक्षी चालली असताना लयीत वरखाली होणारं त्यांचं भलंमोठ्ठ पोट त्यावर सगळ्यानी मिळुन एखादी जड वस्तू(दिन्याच्या घरातला खलबत्ता!)ठेवल्यास हलायचं बंद होतं का हे प्रयोग करून पाहिल्यामुळे जागे झालेल्या त्या म्हाताऱ्याने आमच्या पाठीत मारेलेले गुद्दे अजूनही आठवले की दुखतात. माझ्या दोन्ही शेंड्या धरून "अगं पोरगी आहेस कि अवदसा" असं म्हणत त्यांनी मला गदागदा हलवलं होतं. त्यांच्या हातून शेंड्या कशाबशा सोडवून आम्ही सगळे धावत सुटलो ते "पूढच्या वेळी खलबत्ता ठेवायचा नाही तर 'आपटायचा' हे ठरवूनच. त्या संध्याकाळी ( म्हणजे सगळे बाबा लोक घरी आल्यावर) थोड्या थोड्या वेळच्या अंतराने आजूबाजूच्या घरांमधून भोकाड पसरल्याचे आवाज येऊ लागले. माझे दोस्त आता या वेळी 'असले राग' का आळवत आहेत हे मला लगेच कळाले. नाहीतरी त्या घोरपडे आजोबांना चहाड्या करायची फार सवय.!! त्यामुळे त्यांच्या पावलांना माझ्या घराचा रस्ता दिसायच्या आधीच ताटातलं गबागबा खाऊन मी तीराच्या वेगाने बिछाना गाठला. आणि तोंडावर पांघरून गुरफटून घेऊन झोपी(?) गेले!! नाहीतर लोकांच्या पोटांवर मी खलबत्ता वगैरे ठेवते असं ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनी मला नक्कीच कुटलं असतं. आमच्या कॉलनीत मैदानाच्या नावाखाली रिकाम्या जागेचा एक तुकडा होता. पण तिथे खेळायची संधी आम्हाला फार क्वचितच मिळे. याचं कारण म्हणजे 'मिसाळ काकू'.. याचा अर्थ मिसाळकाकू त्या मैदानात कुस्तीचा सराव वगैरे करत असं नाही. पण त्या बाईला सदानकदा काहीतरी वाळत घालायची फार सवय. धान्य-धुन्य, कुरड्या, पापड, मिरच्या, मसाले असले काहीतरी मैदानात नेहमी वाळवलंच पाहिजे असा काहीसा नियम त्यांनी स्वत:ला घालून घेतला होता. अगदीच काही मिळाल नाही तर घरातले रग काढून त्या वाळवत असत. वाळवण घातल्यावर आम्हा पोरांना त्या तिकडे फिरकू ही देत नसत. लांब कोपऱ्यात खेळलो तरी त्यांना राग येई. बऱ्याचदा चिडून जाऊन त्या काठी घेऊन आमच्या मागे ही लागत. पण असल्या अवजड भोपळ्याला थोडेच आम्ही हातात घावायला. त्यांचं वाळवण कधी निघतंय याची वाट बघण्यात आमचा बराच वेळ खर्ची पडलाय. दुपारची झोप काढून उशिरा त्या ते सगळं उचलून नेत असत. भलामोठा देह , विस्कटलेले केस, लाल भडक डोळे, असं वामकुक्षी नंतरच 'तेजस्वी' रूप घेऊन त्याना पाहिलं कि आम्हाला त्राटिका आठवत असे. त्यावेळी जर देवाने एखादा वर दिला असता तर आमच्यापैकी प्रत्येकाने "मिसाळ काकूंच्या पापडात थयाथया नाचायचीच इच्छा'"पूर्ण करून घेतली असती. काकूं पेक्षा आकाराने निम्मे असणारे मिसाळकाका बिचारे खूप चांगले होते. या काकू रोज वाळवण्यासाठी वस्तू पैदा करतात तरी कुठून हे आम्हा सर्वांच्याच कुतूहलाचा भाग होता. एकदा मला मैदानाजवळ काकू भेटल्या. मी सहजच त्यांना "काय काकू आज काय वाळवताय ?? असं विचारलं. :) अन काय सांगू तुम्हाला माझा तो प्रश्न ऐकून काकू भडकल्याच. माझा कान करकचून ओढून त्या बरच काही बडबडायला लागल्या.माझं सगळं लक्ष त्यांच्या हातातल्या माझ्या कानाकडे केंद्रित झाल्यामुळे मला काही ऐकूच येत नव्हतं, आज काकू माझा कान उपटूनच टाकतायत की काय या विचाराने घाबरून जाऊन मी, कान सोडवायचा शेवटचा उपाय म्हणून काकूंच्या दुसऱ्या हातावर कडकडून "दंतास्त्र" सोडलं. आता काहीतरी दुखायची पाळी काकुंवर आल्यावर मात्र एका झटक्यात त्यांनी माझा कान सोडला. जीवाच्या आकांताने धावत मी घरी पोचले. आणि मला माझी घोडचूक कळाली ( काकूंना चावण्याची नव्हे!) तर चावून घरी धावत यायची... माझ्या मागे काही सेकंदातच मिसाळ काकू उल्केसारख्या आमच्या घरात घुसल्या आणि आईसमोर चावका हात नाचवत धुमाकूळ घालू लागल्या. "आम्ही आमच्या घरचे वाळवतो, तुमच्या घरी मागायला येत नाही , कोणाच्या बापाला हक्क नाही विचारायचा". इकडे आईचे डोळे रागाने गरगर फिरू लागले. विनाकारण ही बाई भांडतेय म्हणून नव्हे तर आपल्या लेकीने 'चावण्याचा' पराक्रम करून बोलायला जागा न ठेवल्यामुळे.. . बराच वेळ काकूंचा थयथयाट चालू होता. इतक्यात आईचे लक्ष माझ्या लाल भडक कानाकडे गेले. तिला काय कळायचं ते कळालं. भांडण परतवायला इतका भारी मुद्दा मिळाल्यावर आई सोडते का काय? " अहो एवढ्याशा कारणासाठी एवढ्याशा पोरीचा कान उपटणार होतात की काय?? बघा तरी कसा लाल लाल झालाय" वगैरे सुरु झालं . बचाव आता आक्रमणात बदलला. माझ्या कानाचा उल्लेख होताच तो पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनी दुखू लागला. अन मी बेंबीच्या देठापासून भोंगा पसरला. आता मात्र मिसाळ काकूनी काढता पाय घेतला. मग आईचा मोर्चा माझ्याकडे वळला. ती थोडीच बधतेय माझ्या रडण्याला!! असला आचरटपणा परत करशील तर फोडून काढीन म्हणून ती गरजली. एरवी तिने मला खरच फोडून काढलं असतं पण 'लालग्या कानाने' वाचवले बघा. तर मंडळी तुम्हाला समजलं असेलंच की, या कुतुहलाने माझ्यासारख्या साध्या, सरळ मुलीच्या आयुष्यात कसले कसले प्रसंग उभे केलेत. लहानपणी प्रत्येकवेळी कपाळमोक्षच पदरी पडल्याने मोठ झ्याल्यावर मी नाकासमोरच चालण्याची सवय अंगी बाणवायचा प्रयत्न करते आहे.तरीही 'कुतूहलराक्षस' अधून मधून माझ्या बुद्धीवर झडप घालतोच. आणि त्याला जसं हवय तसं माझ्याकडून करून घेतो. त्याच्या नादात नेहमी आगीतून फुफाट्यात ....अन फुफाट्यातून ...... आईबाबां समोर (त्यापेक्षा फुफाटा बरा !!!) या सगळ्या गर्तेत मी सापडलेय आणि एक नवंच कुतूहल बरेच दिवस मनात कुचीपुडी करू लागलय. "हे सगळ माझ्याच बाबतीत होतं का?. की तुम्हा सर्वांची ही अशीच अवस्था आहे?. त्या न्यूटनला कुतुहलाने शोध वगैरे लागतात. अन आमच्या नशिबी मात्र वर गेलेला चेंडू सरळ रेषेत खाली न येता फळीवरची सगळी भांडी खाली घेऊन येतो.!! शी... याला काय जीणं म्हणायचं? तुम्हीच सांगा..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19435
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

मस्त जमलाय लेख !!!!!

आनन्दिता, लेख खुसखुशीत झालाय. असे सहज विनोदी, मिश्किल लेख आणखी येऊ द्यात. :)

मस्तच आहेत तुमचे उपद्व्याप. छान लिहिलायत. ए 'कुतु' 'हल' ना ब्येस्ट एकदम.

लहानपणचे बरेच किस्से आठवले !! फर्मास लेख जमला आहे

बये! एव्हढ सगळ (कुतु)हलवुनही तू अजुन जीवंत कशी याच कुतुहल मला लागुन राह्यल्यं. पहिल्या विचारवंताच्या डोक्यापासुन ते घोरत पडलेले आजोबापर्यंत डोक्याला शॉट लागल्या सारखी हसतेय.

नावाप्रमाणे आनंदी लिखाण.. छान जमलय! काही कोट्या विशेषा उल्लेखनिय.

@ठक ,योप्र, अभिजीत, माउ, कपिल मुनी , रेवती, शुचि अपर्णातै, उपास... खुप खुप आभार.. खरंतर मिपावर च नाही तर आयुष्यातही पहिल्यांदा काहीतरी लिहायचा प्रयत्न म्हणजे हा लेख!! पण तुमच्यापैकी कोणीही " मलाही कुतुहलाचा वाइट अनुभव आलाय " असे न म्हटल्यामुळे, हा राक्षस फक्त मलाच पाताळ धुंडायला पाठवतो की काय? हा प्रश्न पडलाय ,!ं

In reply to by आनन्दिता

सांगतो .. गाडीच्या काळ्या काचेतुन आतला दिसता का ? हे कुतुहल एकदा वाटले होते..नंतर धमाल आली .. झोपलेल्या माणसाच्या उघड्या तोंडात पाणी घातले असता तो पितो का ? याची चाचणी घेतली होती .. बाबा मिशा कापतात म्हणून बोक्याच्या मिशा कापल्या आहेत..

In reply to by आनन्दिता

मलासुद्धा असल्या उपदव्यापांचा 'प्रसाद' मिळाला आहे. जमदग्नी,आजोबांशेजारी बसून जेवताना, मला एकदा पुरणात हिरवे तिखट कालवले तर कसे लागते याचे कुतुहल उत्पन्न झाले. प्रयोगांती, 'गाढवाला गुळाची चव काय" अशी संभावना झाली. रांगता असताना, पेटलेला स्टोव्ह म्हणजे निळे फूल आहे असे मला वाटले. कुतुहल शमवण्यासाठी मी त्यालाच हात घातला! नंतर १५ दिवस ते दुखणे पुरले म्हणे! (जुन्या जमान्यात आणि चाळीत ओटा हा प्रकार नव्हता.) गोगलगाय म्हणजे चिक्कुची फोड आहे असे या रांगत्या बाळाला वाटले, हातात घेऊन चोखून पहात असता आईच्या लक्षांत आले, त्यामुळे लहानपणीच नॉन-व्हेजिटेरीयन झालो नाही.

In reply to by तिमा

"गोगलगाय म्हणजे चिक्कुची फोड आहे असे या रांगत्या बाळाला वाटले, हातात घेऊन चोखून पहात असता आईच्या लक्षांत आले" :D =))

In reply to by तिमा

गोगलगाय म्हणजे चिक्कुची फोड आहे असे या रांगत्या बाळाला वाटले, हातात घेऊन चोखून पहात असता आईच्या लक्षांत आले, त्यामुळे लहानपणीच नॉन-व्हेजिटेरीयन झालो ना

In reply to by तिमा

गोगलगाय म्हणजे चिक्कुची फोड आहे असे या रांगत्या बाळाला वाटले, हातात घेऊन चोखून पहात असता आईच्या लक्षांत आले, त्यामुळे लहानपणीच नॉन-व्हेजिटेरीयन झालो नाही.
रांगता असताना, पेटलेला स्टोव्ह म्हणजे निळे फूल आहे असे मला वाटले. कुतुहल शमवण्यासाठी मी त्यालाच हात घातला! नंतर १५ दिवस ते दुखणे पुरले म्हणे! (जुन्या जमान्यात आणि चाळीत ओटा हा प्रकार नव्हता.)
हे अत्यंत जबरी किस्से आहेत! बाकी खाद्यकुतूहलाचे किस्से अस्मादिकांनीही केलेत पण गोगलगायीचा किस्सा मात्र केवळ अप्रतिम!

In reply to by आनन्दिता

हा राक्षस फक्त मलाच पाताळ धुंडायला पाठवतो की काय? नाही नाही. असं नाही. आईची शाळेतली मैत्रिण अचानक भेटली, गप्पा वगैरे झाल्या. त्यांच्या बोलण्यात एकदोनदा आलं की त्या बोरं आणि चिंचा घरमालकांच्या नकळत झाडावरून काढून खात. आता चिंचा, बोरं विकत घेऊन खाण्यात मजा नाही. मलाही समोर राहणार्‍यांची बाग खुणावत होती. काटेरी कुंपण होतेच. एक झेंडूचे फूल चोरून बघावे या हेतूने कशीबशी आत गेले. एक फूल तोडताच बागमालकांच्या लक्षात आले म्हणून घाईघाईने बाहेर येताना फ्रॉक फाटला, फूल कुस्करले गेले. आई रागावली की असले कसले भिकेचे डोहाळे की कायसे. फूल हवे होते पण नवा फ्रॉक मिळाला. जे हवे ते मिळतेच असे नाही. ;) एकंदरीतच माझा स्वभाव कुतुहल मनातच ठेवण्याचा असल्याने कोणाला फारसा त्रास दिला नसावा. ;)

भारी :)

बर्याच दिवसांनी इतका मुळापासून हसलो. भारीच खूप मज आली वाचताना :)
अशा टारगट काकूशी तुम्ही का बरे लग्न केले? हि शंका विचारली" होती. काकांनी आमच्या तोंडावरून मायेने हात फिरवल्याचं अंधुकसं आठवतंय. काय काकू आज काय वाळवताय ?? असं विचारलं. ए 'कुतु' 'हल' ना !
फारच गोड लिखाण ! बाकी आमच्या कुतूहलांचे किस्से मोठा झाल्यावरही कोणाला सांगू नकोस असा घरून सज्जड दम भरण्यात आल्याने आमचा पास ;)

स्वाल्लिड लेख .... स्नेहांकिता च्या जोडीला आता आनन्दिता .... :) आवडला .

मस्त लिहीले आहे, वाचुन लहानपणीचे काही धपाटेदार किस्से आठवले.

तुमच्या नावाप्रमाणे अगदी निखळ आनंद देणारा लेख. मजा आली. अर्धवटराव

भन्नाट आहेत तुमचे किस्से. लहानपणी सगळेच "उद्योगपती" असतात. लेख वाचून नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.

भेदरून ए 'कुतु' 'हल' ना असे म्हणायला लावले! =)) =)) परत एकदा .. मिपा मुळे .. हापिसात येड्या सारखा हसतोय .. आपल्या नावा सारखाच लेख .. बरंच काही आठवलं.. आणि शाळेतल्या एका "बाईंच" वाक्य पण आठवलं .. "parents meeting" मधलं .. your son is a devil Mrs. Marathe.. as much as that bloody innocent face.... please control him..

माझ्या लेकीला देखील असेच भयानक उद्योग पडलेले असतात त्यामुळे घरातली सगळी १० माणसे आणी दोन कुत्री तिच्यावर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवत असतात.....

अत्यंत सुरेख शैली आणि जीवनाकडे बघण्याचा मस्त नजरीया लाभलाय. अशीच लिहीत रहा.

छान लिहिले आहे..

बालपणीचे रम्य दिवस आठवले :) लेख वाचून हसु आवरेनासे झाले :)

असच काहीतरि लहानपणीच आठवल. असेच चाळीत रहात असताना आम्ही मुल खेळायला लागलो की चाळीतले एक काका आम्हाला ओरडायचे. असेच एकदा ते आम्हाला ओरडत असताना अस्मादिकांनी त्याना चिडुन सांगितले होते, ओ काका आमच्या खेळाकडे बघता कश्याला व ओरडता कश्याला? पुन्हा बघितल तर कानाखाली मारीन. त्या वेळी मी १ल्या इयत्तेत शिकत होतो. काका हा दम ऐकुन बराच काळ धक्क्यात होते. रात्री बाबांनी जबरद्स्त मार दिला अस्मादिकाना काकाना दम दिला म्हणुन तो वेगळाच.

In reply to by निश

पुन्हा बघितल तर कानाखाली मारीन. त्या वेळी मी १ल्या इयत्तेत शिकत होतो.
ऐला, भारीच!!

एकदम खुसखुशीत लेख, आवडला.. स्वाती

लई म्हंजे लईच भारी, हल्ली मला माझंच बालपण जास्त आवडायला लागलंय, प्रेमातच पडलोय त्याच्या, का माहित नाही, म्हणुनच की काय तुमचं लिखाण खुप खुप आवडलं. खुप खुप धन्यवाद.

तुमची लिखाणाची पद्धत अत्यंत नैसर्गिक आहे. आणि तुमच्या खट्याळ बालपणाचे धमाल किस्से वाचून मनमुराद हसलो. आम्ही एकदा मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या इमारती सह आमच्या गल्लीमधील आजूबाजूच्या ५ ते सहा इमारतींच्या घरांना एकाचवेळी कड्या लावल्या. ह्यामुळे काही तासात आमच्या गल्लीत गोंधळ सुरु झाला. एका इमारतीत कोणाकडे तरी दूरध्वनी असल्याने त्यांनी सदर प्रकार ही सामूहिक घरफोडी चे प्रकरण समजून चक्क पोलिसांना फोन लावला , गच्ची वरून आम्ही मुलांनी पोलिसांची गाडी पहिली व मग आमची हवा टाइ ट झाली, मग आम्ही हळूच खाली उतरलो व पोलिसांच्या गाडीसमोर जाऊन खरा प्रकार सांगितला. त्यांनतर आधी पोलिस मग घराच्या मंडळींनी आम्हाला कणिक तिंबावी तसे तिंबून काढले.

एकदम हलकं फुलकं लेखन आवडलं.

मस्त लेख. शेवटचा परिच्छेद म्हणजे एकदम सिक्सर.

आवडेश अजुन किस्से असतील ते पण सांगा :) लहानपणचे बरेच उद्योग आता आठवत पण नाहीत. लक्षात आले तर टंकेन.

बायको एकदा अ‍ॅक्टीवा वर तिच्या दवाखान्यात जात असताना,एक माणुस राँग साईडने एवुन तिच्या गाडीला धडकला,पिल्लु त्यावेळा माझ्या बरोबर माझ्या दवाखान्यात होत्,तिला स्टाफ कडे सोडुन मी फोन आल्यावर बायकोकडे गेलो,फारस लागल न्हवत व भांडत बसायला वेळही न्हवता त्यामुळे गाडी गॅरेजवाल्याकडे देउन तिला सरळ तिच्या ओपीडीत सोडल व परत माघारी आलो,दुपारी माझे पेशंट संपल्यावर बायकोला घ्यायला गेल्यावर गाडीत पिल्लाने विचारले,"पप्पा तु मघाशी कुठे गेलतास रे ?" त्यावर तिला सगळा किस्सा सांगितला व म्हटले एका वेड्या माणसाने मम्माच्या गाडीला धडक दिली पन मम्माला फारसे लागले नाही.पोरगी त्यावर शांत बसली त्यानंतर आईच्या क्लिनिकला पोहचल्या पोहचल्या पहिल्यांदा आईला विचारले मम्मा बघु दे कुठ लागलय ते,तिने ते थोडस नड्गीवर लागलेल पाहिल आणी साडेचार वर्षाची पोरगी डोळे गरागरा फिरवुन आणी इटुकल्या मुठी आवळुन त्याक्षणी म्हणाली,"पप्पा....,मला आत्ताच्या आता कपाटातली तलवार दे,तो कुठ राहतो,त्याच नाव सांग,बबलु काका,पप्पु काकाला ,जग्गु मामाला पहिला फोन करुन आत्ताचा आत्ता इथ बोलव,नाहीतर तुझी बंदुक तरी मला दे." आयच्या गावात,आम्हा दोघा नवराबायकोची दातखिळीच बसली,ओपीडीतले दोन तिन पेशंट देखिल आवाक.म्हटल हे आज अस आहे,अजुन शाळा कॉलेज सुरु व्हायची आहेत्,आता आपणच पहिले सुधरा....

In reply to by बाबा पाटील

मला आत्ताच्या आता कपाटातली तलवार दे,तो कुठ राहतो,त्याच नाव सांग,बबलु काका,पप्पु काकाला ,जग्गु मामाला पहिला फोन करुन आत्ताचा आत्ता इथ बोलव,नाहीतर तुझी बंदुक तरी मला दे
तुमच्याकडे इतकी साधनसामुग्री आहे? आता प्रतिसाद जरा जपूनच द्यायला हवेत.

In reply to by संजय क्षीरसागर

काळजी करु नका...तलवार दसर्‍याची पुजेची आहे(बिन धारेची),अन पिलस्तुलच लायसन्स मिळवताना आपल्या सगळ्या सरकारी खात्यांनी (महसुल्,पोलिस आणी फॉरेस्ट )एव्हडा जिव काढायला लावला की वेळ आल्यावर ही ते वापरायची हिंमत होईल का नाही काय माहिती!!!

In reply to by बाबा पाटील

पिल्लु पोटात असताना तुम्ही आणि काकुंनी नाना पाटेकरचे खुप सिनेमे बघितलेले दिसतायत बाबाकाका !!! संभाळा !!!!! बंदुक, तलवार आणि रीतसर कपाटात ठेवली असते हे साडेचार वर्षाच्या पिल्लाला माहिती असणे म्हंजे तुमचा 'जोडधंदा' जोरादार सुरू दिसतोय......!

In reply to by सुधीर मुतालीक

बाय द वे,पिल्लाच टोपन नाव गुंडा पाटील आहे....

In reply to by बाबा पाटील

मला माझ पिल्लु खुप शिकल नाही तरी चालेल.पन तिने यशस्वी माणुस बनाव,पुस्तकी किडा बनु नये,आणी दुसरी गोष्ट तिला शाळेत(सिनियर के.जी.) घालताना पहिल्याच दिवशी सांगितल होत कुनाला स्वता:हुन त्रास द्यायचा नाही आणी कुणी त्रास दिला तर सहन करायचा .मला निश्चित खात्री आहे माझी पोरगी जेंव्हा मोठ्या शाळा,कॉलेज मध्ये जाईल तेंव्हा कुनी छेड काढली किंवा रॅगिंग घेतली म्हणुन रडत घरात येणार नाही तर जागेवरच समोरच्याचा कानफाटात देउन येईल...

In reply to by बाबा पाटील

माझी बहीण डॉक्टर आहे. तीचं ३ वर्षाचं पिल्लु देखिल बर्याचदा अशी कापाकापी ची भाषा करत असल्याने त्या उभयतांची ही अनेकदा दातखीळी बसण्याचा प्रसंग येतो. ऑपरेशन च्या वेळी पेशंट्च्या शरीराची अन् ऑपरेशन नंतर त्यांच्या खिशाची तुम्हा डॉक्टरांनी केलेली कापाकापी पुढे अशी 'फळाला ' येत असावी बहुतेक..:) :)

सुंदर चटपटीत लेख. लहान असताना आमच्या गल्लीत सगळी मुलं इतका हैदोस घालायची की शेजारचे महाजन भाऊ म्हणायचे 'ह्या पोरांनी प्रशांत नगर चं अशांत नगर करून टाकलंय!'. एकदा हॉटेल-हॉटेल खेळताना त्यांच्याच घराच्या नव्यानेच रंगवलेल्या भिंतीवर हॉटेलचा मेनू लिहून काढला होता.

हहपुवा :)). एकदम खुसखुशीत लेख. जगोजागी पेरलेल्या कोट्या वाचताना खूप मजा आली. अजून लेखन येवू द्यात.

शाळेतल्या एका गुर्जींवर आमचा विशेष राग असायचा कारण पी.टी. चा आणि खेळाचा तास रद्द करुन इतिहास-ना.शा. चा तास घ्यायची ह्या ग्रुहस्थाना वाईट खोड असे. आणि त्यातही वाईट म्हणजे ह्यांना पोरांना घुंगुरकाठीनी मारलं तरचं अक्कल येते असं वाटायचं. एक दिवस भर वर्गात ह्या मास्तुरेंनी पिताश्रींचा उद्धार आणि घुंगुरकाठीचा प्रयोग माझ्यावर करुन दाखवला. :( मग पुढचा आठवडा नं चुकता त्यांची सायकल पंक्चर व्हायची, किंवा मग शाळेच्या मागे खड्डा होता त्याच्यात सापडायची, सायकलचं सीटचं हातात यायचं. मग आमच्या वर्गातल्या एका "हुश्शार आणि चाटुगिरी करणार्या" मुलानी बिंग फोडल हे. मग आई-बाबांना बोलाऊन शाळेत धुलाईचा कार्यक्रम झाला. (घरी जाऊन इस्त्री पण झाली). :( (नंतर त्या मुलाच्या ग्रुहपाठाच्या वह्या "चुकुन" फाटल्या होत्या आणि चेहेर्याचे रंग बदलले गेले होते, ते पण आठ्वतं आहे.) :) :) ---=---

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्यासारख्या कल्पक माणसांच्या क्लुप्त्या पाकिस्तान आणि चीन सरहद्दीवर फार्फार उपयोगी पडतील ;)

मायो.. कसले उद्योग आहेत.. :) बादवे, तो धम्या कुठल्या गावची कणिक तिंबायला गेलाय कुणास ठाऊक.. त्याचे ते इरसाल किस्से वाचून पोट दुखेतोवर हसलेलो आहे.. तो धागा काही सापडत नाहीये आत्ता.. असो सापडला तर लिंकेन इथे..