Skip to main content

माझ्या कुतुहलाची दीनगाथा!

लेखक आनन्दिता यांनी मंगळवार, 22/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'!!: :) तर मला म्हणायचय काय, की कुतुहलापोटी केलेल्या कुठल्याही कामाचा चांगला परिणाम होऊ शकतो ही गोष्ट तद्दन खोटी आहे असा माझा दावा आहे. कित्ती ही नाही म्हटलं तरी ऐन वेळी माझं भाबडं मन त्या कजाग कुतूहलाच्या कचाट्यात सापडतच बघा.आता परवाचीच गोष्ट घ्या, "तुम्ही स्वतः हसरे, प्रेमळ, आणि सकारात्मक झालात कि समोरचाही आपोआप तसा होतो" असं मी कुठल्याशा अध्यात्मिक कार्यक्रमात ऐकलं होतं. आता ते खरच तसं होत असेल का याच कुतूहल मला लागून राहील होतं.मानगुटीवर येउन बसलेल्या सकारात्म्कते च्या कुतूहलाला शमवण्यासाठी, चिडून अमाप खळखळ करणाऱ्या म्यानेजरणी कडे मी शांत मंद हसत पाहून बघितलं.पण त्याच्या बदल्यात मिळालं काय ?? तर , " आधी चुका करता आणि वर निर्लज्जपणे दात काढता" ही दात !! हे आप्लं दाद!! आता या मेलीलाच हसरी बनवण्यासाठी केलं न मी हे? पण तिने त्याची भलतीच पोचपावती दिलीन.. तर असा हा सगळा माझा खटाटोप वाया गेला असला तरी एक गोष्ट मात्र मला पक्की कळलिये , की 'हे अध्यात्म वगैरे माणसांवर परिणाम करतात. "हिडींबा राक्षसणिवर" नाही!!. या कुतूहलाविषयी माझ्या आईच हि तितकसं चांगलं मत नसावं बहुतेक. कारण लहानपणापासून च्या माझ्या सर्व कुतुहलांना तिने 'आगाऊपणा' हे एकमेव संबोधन बहाल केलय!. फक्त आईचंच नाही सरकारी कॉलनीत राहणाऱ्या आम्हा मुलांबद्दल गावातल्या एकुनेक माणसाचं हेच मत होतं. "कुतूहल ही विज्ञानाची जननी आहे" हा सुविचार भल्या मोठ्या अक्षरात आमच्या शाळेच्या प्रयोगशाळेवर लिहिला होता. पण त्याचा अर्थ आमच्या पालकांच्या (आणि शिक्षकांच्या ही) टकुर्यात काही शिरत नव्हता. आणि हेच आम्हा सर्व निरागस, अजाण बालकांचं दुखः होतं. त्यामुळे हा कुतुहलचं काही 'फळ' मिळो ना मिळो पण अंगावर 'वळ' मात्र जरूर उठायचे!!. या कुतुहलापायी लहानपणी असंख्यवेळा मी मार खात खाता वाचले आहे.... (अन तेवढयाच वेळा खाल्ला ही आहे!!) उगाच कशाला खोटं बोला. शेजारच्या फरांदे काकुंच्या पेरूचे पेरू कसे लागत असतील बरे याच कुतूहल मला त्यांच्या कंपाउंडवर चढवून गेलं.. शिंदेकाकांनी फेकून दिलेल्या अर्धवट सिगारेटी गोळा करून नाकातून धूर काढायचा सामुहिक कार्यक्रम आम्ही सर्व पोरांनी मोठ्या उत्साहाने केला होता. नंतर लागलेल्या ठसक्यांनी अख्खी कॉलनी दणाणून गेली हे सांगायला नकोच. सदानकदा रांगत इकडेतिकडे हिंडणारं बोरकरांचं बाळ त्याच्या पायाला रिबीन बांधून खांबाला बांधल्यास एका जागी शांत बसतं का?? वगैरे वगैरे.. बाबांच्या कलापाने देशमुखांच्या पामेरियन 'चिनू' चे पण केस रंगवले जातात का याची एकदा हळूच चाचणी घेणं चालू होतं.तेवढ्यात आत्तापर्यंत शांतपणे हे सगळं बघत असणारा बुलडॉग 'दिग्या' अचानक भो भो करीत आमच्या अंगावर आला. आपल्या दोस्ताच्या देखण्या रुपाची वाट लावली जात आहे हे त्याला कळल्यावर त्याला आमचा फार राग आला... दिग्या च्या बांधलेल्या साखळीच्या परिघाबाहेर कसंतरी भिंतीला चिटकून उभ्या असलेल्या मला या कुतूहलाने, भेदरून ए 'कुतु' 'हल' ना असे म्हणायला लावले!! घाबरून बेहाल झाल्यावर कशीतरी जीव वाचवून घरात पोचले. पाणी पिऊन जरा निश्वास टाकणार इतक्यात बाबांना 'कलापाच्या ब्रश मध्ये कुत्र्याचे केस सापडल्याने' घरात हलकल्लोळ माजला. पुढचे काही दिवस मात्र देश्मुखांनी घरी छोटा 'झेब्रा' आणलाय अशी अफवा गावात पसरली. बाकी वर उल्लिखलेल्या शिंदे काकांच्या श्रीमती हि एक ढालगज बाई होती. त्यांच्या घरातून काकुंच गुरकावणं आदळआपटीच्या कोरस मध्ये ऐकू आल की दुसऱ्या मिनिटाला शिंदे काका घराबाहेर येउन तावातावाने फकाफक सिगरेटी ओढत बसणार हे आम्ह्या प्रत्येक पोराला माहित होतं. एकदा काका जोरदार सिगारेटी ओढत असताना आमच्या टोळक्याने त्यांना, "अशा टारगट काकूशी तुम्ही का बरे लग्न केले? हि शंका विचारली" होती. काकांनी आमच्या तोंडावरून मायेने हात फिरवल्याचं अंधुकसं आठवतंय. पुढे कधीतरी काकांनी गोडीत येऊन (किंवा भांडणात हि असू शकेल) काकुना हे सांगितलं असावं बहुतेक. कारण एके दिवशी " दारातून धडधडत पळालात तर तंगडी मोडीन" असा फतवा काकूंकडून उगाचच्या उगाचच जारी करण्यात आला. आमच्या इथे घोरपडे नावच कुटुंब राहत असे. त्यातले आजोबा रोज दुपारी सामाईक व्हरांड्यात 'घोरत पडत' असत. एकदा त्यांची वामकुक्षी चालली असताना लयीत वरखाली होणारं त्यांचं भलंमोठ्ठ पोट त्यावर सगळ्यानी मिळुन एखादी जड वस्तू(दिन्याच्या घरातला खलबत्ता!)ठेवल्यास हलायचं बंद होतं का हे प्रयोग करून पाहिल्यामुळे जागे झालेल्या त्या म्हाताऱ्याने आमच्या पाठीत मारेलेले गुद्दे अजूनही आठवले की दुखतात. माझ्या दोन्ही शेंड्या धरून "अगं पोरगी आहेस कि अवदसा" असं म्हणत त्यांनी मला गदागदा हलवलं होतं. त्यांच्या हातून शेंड्या कशाबशा सोडवून आम्ही सगळे धावत सुटलो ते "पूढच्या वेळी खलबत्ता ठेवायचा नाही तर 'आपटायचा' हे ठरवूनच. त्या संध्याकाळी ( म्हणजे सगळे बाबा लोक घरी आल्यावर) थोड्या थोड्या वेळच्या अंतराने आजूबाजूच्या घरांमधून भोकाड पसरल्याचे आवाज येऊ लागले. माझे दोस्त आता या वेळी 'असले राग' का आळवत आहेत हे मला लगेच कळाले. नाहीतरी त्या घोरपडे आजोबांना चहाड्या करायची फार सवय.!! त्यामुळे त्यांच्या पावलांना माझ्या घराचा रस्ता दिसायच्या आधीच ताटातलं गबागबा खाऊन मी तीराच्या वेगाने बिछाना गाठला. आणि तोंडावर पांघरून गुरफटून घेऊन झोपी(?) गेले!! नाहीतर लोकांच्या पोटांवर मी खलबत्ता वगैरे ठेवते असं ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनी मला नक्कीच कुटलं असतं. आमच्या कॉलनीत मैदानाच्या नावाखाली रिकाम्या जागेचा एक तुकडा होता. पण तिथे खेळायची संधी आम्हाला फार क्वचितच मिळे. याचं कारण म्हणजे 'मिसाळ काकू'.. याचा अर्थ मिसाळकाकू त्या मैदानात कुस्तीचा सराव वगैरे करत असं नाही. पण त्या बाईला सदानकदा काहीतरी वाळत घालायची फार सवय. धान्य-धुन्य, कुरड्या, पापड, मिरच्या, मसाले असले काहीतरी मैदानात नेहमी वाळवलंच पाहिजे असा काहीसा नियम त्यांनी स्वत:ला घालून घेतला होता. अगदीच काही मिळाल नाही तर घरातले रग काढून त्या वाळवत असत. वाळवण घातल्यावर आम्हा पोरांना त्या तिकडे फिरकू ही देत नसत. लांब कोपऱ्यात खेळलो तरी त्यांना राग येई. बऱ्याचदा चिडून जाऊन त्या काठी घेऊन आमच्या मागे ही लागत. पण असल्या अवजड भोपळ्याला थोडेच आम्ही हातात घावायला. त्यांचं वाळवण कधी निघतंय याची वाट बघण्यात आमचा बराच वेळ खर्ची पडलाय. दुपारची झोप काढून उशिरा त्या ते सगळं उचलून नेत असत. भलामोठा देह , विस्कटलेले केस, लाल भडक डोळे, असं वामकुक्षी नंतरच 'तेजस्वी' रूप घेऊन त्याना पाहिलं कि आम्हाला त्राटिका आठवत असे. त्यावेळी जर देवाने एखादा वर दिला असता तर आमच्यापैकी प्रत्येकाने "मिसाळ काकूंच्या पापडात थयाथया नाचायचीच इच्छा'"पूर्ण करून घेतली असती. काकूं पेक्षा आकाराने निम्मे असणारे मिसाळकाका बिचारे खूप चांगले होते. या काकू रोज वाळवण्यासाठी वस्तू पैदा करतात तरी कुठून हे आम्हा सर्वांच्याच कुतूहलाचा भाग होता. एकदा मला मैदानाजवळ काकू भेटल्या. मी सहजच त्यांना "काय काकू आज काय वाळवताय ?? असं विचारलं. :) अन काय सांगू तुम्हाला माझा तो प्रश्न ऐकून काकू भडकल्याच. माझा कान करकचून ओढून त्या बरच काही बडबडायला लागल्या.माझं सगळं लक्ष त्यांच्या हातातल्या माझ्या कानाकडे केंद्रित झाल्यामुळे मला काही ऐकूच येत नव्हतं, आज काकू माझा कान उपटूनच टाकतायत की काय या विचाराने घाबरून जाऊन मी, कान सोडवायचा शेवटचा उपाय म्हणून काकूंच्या दुसऱ्या हातावर कडकडून "दंतास्त्र" सोडलं. आता काहीतरी दुखायची पाळी काकुंवर आल्यावर मात्र एका झटक्यात त्यांनी माझा कान सोडला. जीवाच्या आकांताने धावत मी घरी पोचले. आणि मला माझी घोडचूक कळाली ( काकूंना चावण्याची नव्हे!) तर चावून घरी धावत यायची... माझ्या मागे काही सेकंदातच मिसाळ काकू उल्केसारख्या आमच्या घरात घुसल्या आणि आईसमोर चावका हात नाचवत धुमाकूळ घालू लागल्या. "आम्ही आमच्या घरचे वाळवतो, तुमच्या घरी मागायला येत नाही , कोणाच्या बापाला हक्क नाही विचारायचा". इकडे आईचे डोळे रागाने गरगर फिरू लागले. विनाकारण ही बाई भांडतेय म्हणून नव्हे तर आपल्या लेकीने 'चावण्याचा' पराक्रम करून बोलायला जागा न ठेवल्यामुळे.. . बराच वेळ काकूंचा थयथयाट चालू होता. इतक्यात आईचे लक्ष माझ्या लाल भडक कानाकडे गेले. तिला काय कळायचं ते कळालं. भांडण परतवायला इतका भारी मुद्दा मिळाल्यावर आई सोडते का काय? " अहो एवढ्याशा कारणासाठी एवढ्याशा पोरीचा कान उपटणार होतात की काय?? बघा तरी कसा लाल लाल झालाय" वगैरे सुरु झालं . बचाव आता आक्रमणात बदलला. माझ्या कानाचा उल्लेख होताच तो पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनी दुखू लागला. अन मी बेंबीच्या देठापासून भोंगा पसरला. आता मात्र मिसाळ काकूनी काढता पाय घेतला. मग आईचा मोर्चा माझ्याकडे वळला. ती थोडीच बधतेय माझ्या रडण्याला!! असला आचरटपणा परत करशील तर फोडून काढीन म्हणून ती गरजली. एरवी तिने मला खरच फोडून काढलं असतं पण 'लालग्या कानाने' वाचवले बघा. तर मंडळी तुम्हाला समजलं असेलंच की, या कुतुहलाने माझ्यासारख्या साध्या, सरळ मुलीच्या आयुष्यात कसले कसले प्रसंग उभे केलेत. लहानपणी प्रत्येकवेळी कपाळमोक्षच पदरी पडल्याने मोठ झ्याल्यावर मी नाकासमोरच चालण्याची सवय अंगी बाणवायचा प्रयत्न करते आहे.तरीही 'कुतूहलराक्षस' अधून मधून माझ्या बुद्धीवर झडप घालतोच. आणि त्याला जसं हवय तसं माझ्याकडून करून घेतो. त्याच्या नादात नेहमी आगीतून फुफाट्यात ....अन फुफाट्यातून ...... आईबाबां समोर (त्यापेक्षा फुफाटा बरा !!!) या सगळ्या गर्तेत मी सापडलेय आणि एक नवंच कुतूहल बरेच दिवस मनात कुचीपुडी करू लागलय. "हे सगळ माझ्याच बाबतीत होतं का?. की तुम्हा सर्वांची ही अशीच अवस्था आहे?. त्या न्यूटनला कुतुहलाने शोध वगैरे लागतात. अन आमच्या नशिबी मात्र वर गेलेला चेंडू सरळ रेषेत खाली न येता फळीवरची सगळी भांडी खाली घेऊन येतो.!! शी... याला काय जीणं म्हणायचं? तुम्हीच सांगा..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19435
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

एकदम फरडू झालाय लेख. एकदम खल्लास. मजा आली. लेखनशैलीही मस्त आहे. खलबरत्ताहा प्रकार सॉलीडच आहे, इन्नोवेटीव !!

हसून हसून वेड लागेल! काय भन्नाट किस्से आहेत! :)

खिक्क्कुशा! एकसो एक किस्से. मुख्य म्हणजे त्यातला निरागसपणा नि लिमिटेड डांबरटपणा... नो छक्के पंजे. बाबा पाटलांची किरण बेदी कम झाशीची राणी पण आवडली. (हा लेख मागच्या सुट्टीच्या काळातला दिसतोय. आम्ही 'माहेरी' असलो की मिपावर पडीक नसतो.)

परत वाचला. मजा आली

कुतूहलांनी भरलेलं लहानपण. झक्कास. मजा आली वाचताना.

बर्‍याच दिवसांनी मिसाळकाकूंनी वाळायला घातलेल्या पापडांसारखा कुरकुरीत लेख वाचला. खूप छान वाटले. लिहिण्याची शैली खूप मस्त आहे. ओढून्-ताणून जास्त विनोद न करता जे सहज जमतील असे विनोद पेरून लेखाला निखळ बनवले आहे. पुढील लिखाणास शुभेच्छा! आणि नक्कीच लिहित रहा. :-)

@ मधुरा, तथास्तु, राही कौतुकाबद्दल आभार!! @ मन्द्या, समीरसूर लिहायचा प्रयत्न नक्की करेन!! आभार!!

भन्नाट लेख. ट्रेनिंग रूममधे झोप येत होती म्हणून मिपा उघडलं आणि हा लेख दिसला..हहपुवा झालं आहे आणि माझ्या मॅनेजरचं कुतूहल जागं झालं आहे ;)

लय भारी. पोरं काय काय उचापती करतील काहे सांगता येत नाही. आम्ही एकदा वर्गाच्या दारात. दोन्ही दारे तिरपी लावुन त्यावर केरसुणी ठेवली होती.दार उघडल्याबरोबर डोक्यात पडावी म्हणून. केरसुणी बरोब्बर मास्तरांच्या डोक्यावर पडली. त्यानंतर मास्तरानी आख्खा वर्ग डोक्यावर घेतला. संध्याकाळी आम्ही सगले डोक्यावर पडल्यासारखे हसत होतो.

एक नंबर लेख…हसून हसून वाट लागली…आमच्या लहानपणी आम्ही उद्योग करत असू त्यातील काही खाली देत आहे १. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मिथुनचा ब्रेक डान्स प्रसिद्ध होता. आणि बरेच कोलेज कुमार त्याचे फ्यान होते. तसाच एक फ्यान आमच्या पेठेत राहत होता. नाव श्रीकांत आमच्या साठी शिक्या. डोल्यावर ९ नंबरचा चष्मा. त्यामुळे मोठे लोक त्याला लॉइड म्हणायचे. तेव्हा आमच्या कोणाच्या घरी टेपरेकोर्डेर न्हवता जो फक्त त्याच्याच घरी होता. कुठला हि मिथुनचा चित्रपट पहिला कि त्याच्या अंगात मिथुन संचारत असे. शाळा सुटली कि आम्ही त्याच्या घरी एका खोलीत खेळायला जमत असू. तेव्हा तो सगळ्या दारे खिडक्या बंद करून घेत असे. फक्त झिरोचा बल्ब चालू. त्याच्या बटनावर बोट ठेवून एकाला थांबावे लागे. नंतर मोठ्या आवाजात मिथुनची "डान्स डान्स" मधली गाणी लावत असे. आम्हाला सांगायचा कि हा डान्स क्लब आहे. तिकडे असेच असते. जो लाईटच्या बटनावर बोट ठेवून थांबत असे त्याने गाण्याच्या चालीवर बल्ब बंद चालू करायचा. आम्ही आम्ही सगळे त्याच्या वर नाचत असू. ह्या नाच कामामुळे बर्याच वेळा मार मिळाला आहे. २. शिक्याला असले बरेच उद्योग लागत. तेव्हा कोणाच्या घरी फोन नसत. त्याच्या घरी हि नव्हता. पण त्याच्या काकांचे कपड्याचे दुकान होते तिथे फोन होता. दुपारचे काका झोपत असत. ते झोपले कि आमचे उद्योग चालू. आम्हाला शाळेत जाताना एक महाराष्ट्र बँकेची शाखा लागत असे. त्याच्या बोर्डावर त्याचं फोन नंबर लिहिला होता. काका झोपले कि तो त्या बँकेच्या नंबरवर फोन करत असे. आणि मोठ्या माणसाचा आवाज काढून त्यांना संगे कि " आज रात्री तुमच्या बँकेवर दरोडा पडणार आहे तेव्हा सांभाळून राहा" आणि जोरजोरात आम्ही पण हसत असू. जसे आम्ही त्याचे साथीदार. ह्याची आम्हाला फार गम्मत वाटत असे. ३. घराजवळ एक पोस्त पेटी होती दुपार झाली कि रस्तावर जास्त गर्दी नसे. आम्ही लहान असल्याने त्या मध्ये आमचा हाथ जात असे. आम्ही त्यातून पत्र(फक्त पोस्त कार्ड) काढत असू. ती काढली कि ती शिक्याला आणून द्यायची. शिक्या त्यावरच मनाचे काही हि लिहत असे. समाज कोणी लिहिले असे कि "बाबांची तब्येत ठीक आहे काळजी नसावी" तर शिक्या त्यात लाएन टाकणार "बाबांची तब्येत ठीक आहे. कधी हि जातील. तेराव्याला या. काळजी नसावी". नंतर आम्ही ती पत्र परत पेटीत टाकत असू. त्यांचे पुढे काय होत असे हे समजले नाही. ४ . अजून असाच फेकू होता त्याचे नाव मुन्ना. माझ्या लहानपणी स्पाईडर म्यान सेरियल जोरात चालू होती. आणि त्यामुळे आम्हाला स्पाईडर म्यान बनण्याची इच्छा होती. एक दिवस सिरिअल संपल्यानंतर मुन्ना म्हणाला तुम्हाला जर स्पाईडर म्यान बनायचे असेल तर एक काम करावे लागेल. आम्ही विचारले काय ? तर म्हणाला एक खास गवत असते त्याचा रस करायचा आणि हाताला एक खिळा ठोकून एक भोक पडायचे आणि त्यात तो रस ओतायचा. आणि तळहातावर एक लाईटचे बटन लावायचे. बटन दाबले कि लगेच त्या गवताच्या रसामुळे दोर्या निघतात. आणि आपण जगात कुठे हि जावू शकतो ते पण ढगातून. पण लाईटचे साधे बटन नाही लावायचे डोर बेल ला जे बटन असते ते लावायचे. कारण झोपेत जर चुकून लाईटचे बटन दाबले कि इतक्या दोर्या निघतात कि आपणच अडकून बसतो. आम्ही त्यानुसार ते गवत उपटून आणले(काही वर्षाने कळले कि त्याला कोन्ग्रेसचे गवत म्हणतात) घरच्यांनी विचारले कि हे घाणरडे गवत कश्या साठी आणले. आम्ही आमचा प्लान सागितलं आणि वडिलांना म्हणालो कि तुम्ही पण हाताला भोक पाडून स्पाईडर म्यान व्हा. जी धुलाई झाली म्हणून सांगू .....असो ५ जेव्हा सुपर म्यान पहिला तेव्हा आमच्या अंगामध्ये सुपरम्यान चे भूत संचारले. वडिलांचा टॉवेल गळ्याला बांधायचा आणि उडण्याची पोज घ्यायची आणि पळत सुटायचे. एकदा असेच आम्ही सुपरम्यान सुपरम्यान खेळत होता पण माझ्या चुलत भावाकडे टॉवेल नव्हता. पण त्याने तो १० मिनिटात कुठून तरी मिळवला. आमचे तासाभराने खेळून झाले आणि आम्ही घरी आलो. तर शेजारचे आजोबा येवून बसले आणि माझ्या काकांशी काही तरी बोलत होते. त्यांना बघितल्या वर भावू घाबरला. मला काहीच माहित नव्हते. नंतर कळले कि त्याने शेजारचे आजोबा अंघोळीला गेल्यावर टॉवेल बाहेरच्या दोरीवर ठेवत असत. माझ्या भावाने घरात टॉवेल न मिळाल्यामुळे त्यांच्या बाथ रूमची बाहेरून कडी लावली आणि टॉवेल घेवून आमच्याबरोबर आला. ते आजोबा १५ मिनिट आतून बोम्बलत होते तेव्हा कोणी तरी दार उघडले. बिचारे आजोबा आणि बिचारा माझा भावू. असे अजून बरेच किस्से आहेत ....आठवले कि छान वाटते

@एक गोष्ट मात्र मला पक्की कळलिये , की 'हे अध्यात्म वगैरे माणसांवर परिणाम करतात. "हिडींबा राक्षसणिवर" नाही!!. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif @ए कुतु हल! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif दुत्त दुत्त खोड्याळ आ..नंदिता!

कं लिवलंय!कं लिवलंय!सहीच!! कुतुहलात आम्हीही मागे नव्हतो आंदोबा.त्यावेळी रंगीबेरंगी प्लॅस्टिकची मुठ असणार्या कात्र्या नविनच आल्या होत्या.मी आणि भावाने ती कात्री पाहिल्यावर तिने काय कापले जाते या कुतुहलाने फक्त कुतुहलाने आमच्या लहान चुलतबहिणीचे केस तुला परत चिकटवुन देऊ सांगुन बारीक कापले,अगदी न्हाव्यासारखा कंगवा बिंगवा घेऊन ऐटीत.ते कमी वाटल्याने तिच्या भुवयापण जमतील तिथे कात्रीने कापल्या.बाकी काहीच केलं नाही खरं तर.पण त्या चुलत बहिणीला घरी आल्यावर तिचा अवतार पाहुन हे कोणी केलं कसं केलं,विचारल्यावर आमची नावं त्या येडीने सांगीतलीच.मग पुढे नीटच मार खाल्ला.त्यामुळे चिडुन जाऊन मी आणि भाऊ रायगडावर पळुन जाणार होतो कारण तिथे नुकतंच जाऊन आलेलो.पण आमचं नक्की होईपर्यंत आईने साबुदाणा पापडीचं वाळवण घातलं.त्या कच्च्या वाळलेल्या खाऊन जाऊ म्हणून राहिलं पळुन जायचं=))

कहर केलाय. वाह! शब्दांवर एवढी पकड येण्यासाठी तुम्हाला लहानपनी काय (मार सोडून) खायला घालत होते ह्याचं कुतुहल वाटलं :)

१०० :)

अजूनही हे असं होतं का अधूनमधून? नाही म्हणजे सहज आपलं कुतुहलापोटी विचारलं हां! ;-)

लेखनशैली एकदम खुमासदार आहे.कुतुहलाची गाथा आवडली. पाच वर्षांचा असताना मी देखील वरच्या मजल्यावर राहणार्‍या काकांनी फेकलेले सिगारेटचे थोटूक ओठांत धरले होते.

मिपावरच्या माझ्या पहिल्या वहिल्या लेखाला दरवर्षी थोडं थोडं ढकलत प्रतिसादांची शंभरी पार करुन दिल्याबद्दल, सर्व प्रतिसादकांचे दणकुन आभार.

कित्ती गं गरीब बिचारी तू,आणि तुझे कुतुहुल. कुण्णा कुण्णाला पर्वाच नाही त्याची.