Skip to main content

प्रारब्ध

Published on सोमवार, 10/12/2012
सकाळच्या वेळी चहा पिता पिता दिवसभरचे प्लान्स करत होतो. तेव्हढ्यात बेल वाजली. शेजारच्या नवलेकाकु आत आल्या... "बातमी कळली का?" "कसली बातमी" "अरे ते चौथ्या मजल्यावरचे जोशीकाका वारलेत ना सकाळी सात वाजता" "अच्छा" अच्छा हा उद्गगारवाचक शब्द कुठेही मुर्खासारखा वापरतो आणि मग ओशाळल्यासारखे होते. तशी आमची बिल्डिंग नवीनच होती आणि सगळी नवीन कुटुंबच होती त्यामुळे एकमेकांशी फ़ारशी ओळख नव्हतीच. आम्ही तर दिवसभर ऑफ़िसमधे चकाट्या पिटणारी लोकं आम्हाला तर नावावरुन चेहरा लक्षात येण्याची शक्यताच नव्हती. जोशीकाकांना कधी पाहिले असावे का असा विचार मी करुन लागलो. पण काही चेहरा लक्षात येत नव्हताच. "काय झालं होतं त्यांना? आजारी वगैरे होते का?" "नाही रे...सकाळी पाच वाजता रोज मॉर्निंग वॉकला जायचे. आजही गेले होते. तसं काही फ़ारसं वय नव्हतं. सत्तर-बहात्तर वर्षाचे..धडधाकट होते. चार मजले चढुन घरी आले. घरी आल्यावर दरदरुन घाम फ़ुटला त्यांना. अस्वस्थ वाटायला लागलं...श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. घरी मुलगा-सुन दोघंही झोपली होती. त्यांना उठवलं. मुलाने त्याच्या इनोव्हा मधुन तात्काळ त्यांना हॉस्पिटल मधे नेले. पण काही उपयोग नाही झाला. त्यांना तिथे गेल्यावर एक सिव्हियर हार्ट अ‍ॅटॅक आला आणि काही वेळातच त्यांनी प्राण सोडले." घटनेच्या एक-दिड तासातच काकुंनी बरीच माहिती जमवली होती. अशा वेळा काय करायचं ते मला सुचत नव्हतं. मी म्हटलं "मग अजुन डेड-बॉडी हॉस्पिटलमधेच आहे की घरी आणली?" "अजुन हॉस्पिटलमधेच आहेत. त्यांच्या मुलाचा फ़ोन आला होता...त्यांच्या सुनेला आमचे हे हॉस्पिटलमधे घेऊन गेलेत. त्यांच्याकडुन माहिती मिळाली." "अच्छा" पुन्हा अच्छा...मला स्वत:ची चीड येते कधी कधी. "अरे...शेजारधर्म म्हणुन मदतीला जायला पाहिजे. तु आमच्या ह्यांना फ़ोन करुन विचार आणि काही मदत हवी असल्यास बघ." "बरं. मी फ़ोन करतो" मी नवलेकाकांना फ़ोन केला. काय परिस्थिती आहे त्यांना विचारले. ते म्हणाले तासाभरात सगळे सोपस्कार पुर्ण होतील आणि बॉडी ताब्यात मिळेल. जोशींच्या मुलाने सगळ्या नातेवाईकांना फ़ोन केलेला आहे. त्यांचे नातेवाईक सगळे आसपासचेच असतील. घरी पोहोचलेच असतील एव्हाना. पण घराला कुलप आहे. त्यामुळे त्यांना तुझ्या घरी बसवुन ठेव. मी खाली चौथ्या मजल्यावर गेलो. तिथे दरवाज्यावरच उभा राहिलो. जो येईल त्याला माझ्या घरी पाठवत होतो. दिड तास मी तिथेच उभा होतो. जवळपास तीस चाळीस नातलग पोहोचले होते. माझं घर तसं ऐसपैस होतं..मी एकटाच राहणारा...घरात काही फ़ारसं सामान नाही. त्यामुळे सतरंजी अंथरुन आरामात सगळ्यांच्या बसायची सोय झाली होती. शेवटी त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाने मला घरी जायला सांगितलं आणि तो दरवाजावर उभा राहिला. दहा वाजुन गेले होते. मी ऑफ़िसला फ़ोन करुन दुपारी उशिरा येईल असं कळवलं. आणि जमलेल्यांना काय हवं नको ते पहायला लागलो. मंडळी गप्पा मारत बसली होती. काहीकाही गोष्टी कानावर येत होत्या. जोशीकाका बऱ्यापैकी विद्वान असले पाहिजेत याची कल्पना मंडळींच्या गप्पावरुन येत होती. मी चुपचाप ऐकत होतो. त्यातला एकही माणुस माझा परिचयातला नव्हता. पण आज ते सगळे माझ्या घरी होते. हे माझ्या वास्तुचे प्रारब्ध असावे किंवा आणखी काही. अशा अनेक घटना आयुष्यात अनपेक्षित असतात. आणि त्यांना सामोरे जात रहाणे एव्हढेच आपल्या हाती असते. सकाळी दिवसभराचे जे काही प्लान्स केले होते ते सगळे वाया गेले होते. पण त्याबद्दल चरफ़ड होत नव्हती कारण अशा प्रसंगी मदतीला उभे राहिलो नसतो तर ते मनाला कायम बोचत राहिलं असतं. जोशीकाकांच्या मुला्शी कधीही नजर मिळवु शकलो नसतो. संपुर्ण दिवस मी अगदी मनापासुन जे शक्य असेल ती मदत करत होतो. त्यांच्यातलाच एक झालो होतो. पुढले तेरा दिवस माझे घर त्यांच्या पाहुणेमंडळींसाठी खुलं होतं. तेराव्याच्या जेवणाच्या पंक्तीही माझ्याच घरी उठल्या. ह्या तेरा दिवसात कुणाल, जोशीकाकांचा मुलगा, माझ्या चांगल्याच परिचयाचा झाला. त्याला आधीही बऱ्याचदा पाहिलं होतं, पण ओळख अशी नव्हती. कुणाल आणि त्याची बायको अस्मिता एकत्रच ऑफ़िसला जायचे सकाळी. माझा ऑफ़िसचा टाईमही जवळपास तोच होता, त्यामुळे पार्किंगमधे नेहेमीच भेट व्हायची. हळुहळु परिचयातुन खुप चांगली मैत्री झाली. खुपच प्रेमळ कुटुंब होतं ते. आपुलकीने चौकशी करायचे ते माझी. माझ्यापेक्षा तीनचार वर्षाने दोघंही मोठी होती, करिअरमधे वेल-सेटल्ड होती. मीही नोकरीत चाललो होतो. कर्जावर का असेना स्वत:च थ्री-बेडरुमचं घर घेतलं होतं. स्वत:ची ह्युंडाई सॅंट्रो होती. आई-वडील गावाकडुन कधीमधी चक्कर टाकायचे. दहा-पंधरा दिवस रहायचे. एकुलता एकच होतो. पण शेतीवाडी बघायची असल्याने आई-बाबा गावीच राहत. अजुन पन्नाशीतच होते ते. प्रकृतीही अगदी ठणठणीत. पण जोशीकाका गेल्यापासुन एक अनामिक काळजी मला आई-बाबांबद्दल वाटायला लागली. गावाकडुन अवेळी फ़ोन आला की छातीत धस्स व्हायचं. शेती दुसऱ्याला कसायला देऊन आई-बाबांना पुण्याला माझ्याजवळ कायमचे बोलावुन घ्यायचा विचार मी करायला लागलो. पण बाबा ऐकणाऱ्यातले नव्हतेच. तरी मी प्रयत्न चालुच ठेवला. दर दोन दिवसांनी मी त्यांना शहरात येऊन आराम करा असा सल्ला द्यायचो. तर त्यावर ते तुमच्या पुण्याला कसला आलाय आराम...शुद्ध हवा तरी मिळते का तिथे म्हणुन उलट प्रश्न करायचे. एकदा कुणालने संध्याकाळी चहाला बोलावलं. मी गेलो. आणि गप्पा मारता जोशीकाकांचा विषय निघाला. त्यादिवशी मंडळी काकांबद्दल जे काही बोलत होती त्याचाच धागा घेऊन मी जोशीकाकांबद्दल सहज माहिती विचारु लागलो. असं कळलं की भौतिकशास्त्राचे विद्वान म्हणुन त्यांची ख्याती होती. पण गेले तीस वर्ष ते विज्ञानकथा लिहित असत. त्या सगळ्या कथा मुलाकडे पडुन होत्या. कधी प्रकाशित कराव्यात असं त्यांनाही वाटलं नाही. मला विज्ञानकथांची आवड होती. त्यामुळे ती हस्तलिखिते मी वाचायला मागुन घेतली. अगदी चार-पाच पानांच्या कथा होत्या पण अचंबित करणाऱ्या वैज्ञानिक संकल्पनांची सांगड धार्मिक संकल्पनांशी घालुन कल्पनाविलासाच्या जोरावर इतक्या सुंदर कथा लिहिल्या होत्या की मी एका दमात सगळं हस्तलिखित वाचुन काढलं. काकांच्या प्रतिभाशक्तीने अगदी भारावुन गेलो होतो, त्यापेक्षाही अधिक अचंबा मला याचा होता की ह्या कथा आजवर प्रकाशित कशा नाही झाल्या. मराठी साहित्याचा मैलाचा दगड म्हणुन ह्या कथा गाजतील ह्याची मला खात्री होती. मी कुणालकडे गेलो आणि त्याला विचारलं. "तु वाचल्या आहेत ह्या कथा?" "अर्थात. बाबा सगळ्यात आधी मला द्यायचे वाचायला" "अरे मग तुला कधी वाटलं नाही ह्या प्रकाशित कराव्याशा" "वाटायचं रे. लहानपणी वाटायचं की माझ्या बाबांचीही पुस्तकं असावीत, मी त्यांच्या खुप मागे लागायचो. सुरुवातीला ते माझ्या प्रश्नांना बगल द्यायचे. पण पुढे मी मोठा झाल्यावर एकदा ह्याबद्दल ते माझ्याशी बोलले. ते म्हणाले की ह्या कथांमधे काही दम नाही. त्या वैज्ञानिक कथाही नाहीत. नुसत्याच चमत्कृतीपुर्ण आहेत. खरंतर बाळबोध आहेत. ज्यांना विज्ञान आणि अध्यात्म खरंच कळतं तेच ह्यांच खरं मुल्यमापन करु शकतील." "मग?" "मी विचारलं मग त्यांना...की असं आहे तर तुम्ही लिहिलंच का हे सगळं? तर ते म्हणाले की मनातल्या चुकीच्या संकल्पना पुसुन टाकण्यासाठी. एकदा कागदावर उतरवुन चार-पाच वेळा त्या वाचल्या की त्यातला मुर्खपणा कळायला लागतो. मनात राहिल्या तर त्याच भावविश्वात रमून जायला होतं. त्यांच्यापासुन सुटका होत नाही आणि अभ्यासातील तटस्थता संपते. भौतिकशास्त्रात एका निरपेक्षदृष्टीने अभ्यास करायचा असतो." "अच्छा" "मला फ़ारसं काही पटलं नाही त्यांच मत, पण त्या क्षेत्रातले ते जाणकार होते. आणि त्यामुळे त्यांच्यापुढे ह्या विषयावर मी पुढे कधी बोललोच नाही." "हम्मम..अरे पण मीही भौतिकशास्त्रामधेच संशोधन करतोय. मला विषय कळतो बऱ्यापैकी. मी खात्रीने सांगु शकतो. ह्या कथा बाळबोध नाहीत." "मलाही जाणवतं रे ते..पण बाबांची इच्छा होती..म्हणुन मी त्या कथा आता प्रकाशित करणार नाही" "प्रकाशित केल्यास तर मराठी साहित्यावर फ़ार उपकार होतील तुझे" "जाऊ दे रे...काय उपकार वगैरे घेऊन बसलायेस...मी ह्या विषयावर विचार करणेच बंद केलेय. प्लिज मला ह्यात पुन्हा गुंतवू नकोस" बरं.. असं म्हणुन मीही पुढे त्याच्याशी त्यावर चर्चा केली नाही. पण त्या कथा माझ्या डोक्यात सतत गोंधळ निर्माण करत असत. भौतिकशास्त्रीय दृष्ट्या त्यात चुकीचं असं काहीही वाटत नव्हतं. मग जोशीकाकांनी कुणालला असं का सांगितलं असावं ह्याचा विचार मी करत असे. भौतिकातुन आध्यात्माकडे त्यांच्या कथा इतक्या बेमालूमपणे जात असंत वाचणाऱ्याला त्या विज्ञानकथा आहेत ह्याचा विसर पडावा. त्यांच्या प्रत्येक कथेत एक साम्य मात्र होतं. सापेक्षतावादाच्या जनरल थिअरीत ज्याप्रमाणे काळ-अवकाश-वस्तुमान ह्यांची सांगड घालुन गुरुत्वाकर्षणाचा उगम सिद्ध केला आहे त्या नियमाचा आधार प्रत्येक ठिकाणी होत असे. समजा तुम्ही एक जाळी जमीनीपासुन काही अंतरावर, पण जमीनीला समांतर अशी बांधली चारही कोपऱ्यांना. त्या जाळीवर काही वस्तु ठेवली..तर ती वस्तु त्या जाळीला वाकवते. तसेच दोन वस्तुमान असलेल्या वस्तु काळ-अवकाशाच्या जाळीदार वस्त्रावर ठेवल्यास त्या वस्तुंच्या वस्तुमानाने् ती जाळी खाली वाकेल आणि त्यातुन त्या वस्तु घरंळुन एकमेकांजवळ यायचा प्रयत्न करतील आणि ह्यालाच गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. मनुष्याच्या इंद्रियांच्या मर्यादा काळ ही मिती पाहुच शकत नाही. अवकाश त्याला समजते. पण काळ समजत नाही. त्यामुळे काळ-अवकाशाची जाळी त्याला दिसत नाही. आध्यात्मिक शक्तींच्या जोरावर मात्र तो स्वत:च्या शरीरापासुन स्वत:ला दुर घेऊन जाऊ शकतो आणि निरपेक्षरित्या विश्व पाहु शकतो असा त्यांच्या कथांचा सूर असायचा. पण जगात निरपेक्ष असं काहीच नसतं हेच तर आईनस्टाईनने सांगितलं होतं. कदाचित ह्यामुळेच जोशीकाकांना त्यांचे संशोधन चुकीचे वाटत असावे अशी समजुत मी करुन घेतली. पण मग ते दर वेळा त्याच सुत्रावर कथा का लिहित ह्याबद्दलचे कोडे मला उलगडत नव्हते. माणुस स्वत:ला त्याच्या शरीरापासुन दूर घेऊन कसा जाऊ शकत असावा ह्याबद्दल वाचु लागलो. Astral Projection म्हणजेच सुक्ष्मजीवाला स्वत:च्या शरीरापासुन दुर घेऊन जायची विद्या ह्यावर खुप माहीती मिळाली. अनेक भारतीय आध्यात्मिक गुरुंना astral projection करता येते हेही तेव्हाच कळलं. एकदा सहज कुणालबरोबर गप्पा मारतांना कळाले की जोशीकाकांची आध्यात्मिक साधनाही जबरदस्त होती. सकाळी मॉर्निंग वॉकला ते जायचे एका टेकडीवर आणि तिथे रोज एक तास साधना करायचे. मी कुणालला विचारले "आध्यात्मिक साधना करायचे म्हणजे नक्की काय करायचे ते?" "मला नीटसं माहित नाही. पण मला वाटतं ध्यानधारणा वगैरे करत असतील." "तु त्यांना कधी विचारलं नाहीस?" "विचारलं..पण त्यांनी सांगितलं की तुला अजुन कळणार नाही अध्यात्म म्हणजे काय ते. मलाही फ़ारसा कधी इंटरेस्ट नव्हताच त्यात" "अच्छा...त्यांचा कोणी गुरु होता?" "होता ना...म्हणजे आहे ना..पुण्यातच असतात ते. त्यांचे नाव अरविंद अत्रेय. बरंच वय आहे त्यांच आता. नव्वदी पार केली असावी त्यांनी. त्यांचा आश्रम आहे सिंहगडाच्या पायथ्याशी. बाबा आम्हाला नेहेमीच त्या आश्रमात घेऊन जायचे. इतकं शांत आणि छान वातावरण असायचं तिथे. मन अगदी प्रसन्न होऊन जायचं. बरेच दिवस झालेत तिथे जाऊन. जाऊया आपण तिथे कधी" "नक्कीच..तु जाशील तेव्हा मला नक्की बोलव." पुढच्याच आठवड्यात तिथे जायचा योग आला. अरविंद बाबांना मी भेटलो. इतकं तेजस्वी व्यक्तिमत्व होतं त्यांच. त्याच तेजाबरोबर एक प्रकारची शांती त्यांच्या चेहऱ्यावर होती. त्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली. मी देखील भौतिकशास्त्रात संशोधन करतोय म्हटल्यावर त्यांना जोशीकाकांची आठवण झाली. "प्रा. जोशी देखील भौतिकशास्त्रात संशोधन करीत, नेहेमी मला अनेक प्रश्न विचारीत. कधी मी त्यांची समाधानकारक उत्तरं देऊ शकलो का हे मला अजुनही कळालेलं नाही" "आम्ही भौतिकशास्त्राचे अभ्यासक मुळातच अश्रद्ध असतो. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आम्हाला एका थिअरीत बसवायचे असते. एकतर ती थिअरी चुकीची आहे हे सिद्ध करा नाहीतर आम्हाला समाधानकारक उत्तर द्या असाच आमचा खाक्या असतो" मी गंमतीत म्हणालो. "पण थिअरी चुकीची आहे की बरोबर ह्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं? आम्ही आध्यात्माचा अभ्यास करतो. मन:शक्तीच्या जोरावर आत्म्याला शारिरिक बंधनांपासुन-लालसांपासुन दुर ठेवणे..त्याची सुचिर्भुतता कायम ठेवणे हेच आमचे काम." बाबा बोलले. "थिअरी बरोबर की चुक हे खुप महत्वाचं आहे बाबा. आज इतकी शास्त्रीय प्रगती झाली त्याच्या मुळाशी ह्या थिअरीज आहेत" "शास्त्रीय नाही..भौतिक प्रगती म्हणा. शास्त्रीय प्रगती हा खुप मोठा शब्द आहे. शास्त्र नक्की काय आहे ह्याचा अजुन उलगडा व्हायचाय" "म्हणजे?" "बघा ही सृष्टी काही नियमांनी बांधील आहे असा तुमच्या वैज्ञानिकांचा समज आहे. त्यालाच तुम्ही शास्त्र म्हणतात. पण ते नियम म्हणजे शास्त्र नाही. मुळात नियम अस्तित्वात असणं गरजेचे आहे का? काही काही गोष्टींमधे नियम असतीलही. पण खरंतर ते नियम नसुन पॅटर्नस आहेत. बघा विशाल महासागरात लाटांचे काही काही पॅटर्नस दिसुन येतात. पण ते पॅटर्न्स संपुर्ण महासागराचे नियम नाहीत. महासागराची उत्पत्ती, त्याची शांतता, त्याच्यातील जीवसृष्टी, त्यातील विवरं अशा असंख्य आस्पेक्ट्स असतात महासागराकडे बघण्याच्या. विश्वाचंही तसंच आहे. त्याच्या दृश्य वास्तवांचे नियम शोधत असतात तुम्ही मंडळी" "मग आध्यात्मिक मंडळी काय करतात?" खरंतर थोडा उद्धट प्रतिप्रश्न होता माझा. "आम्ही फ़क्त ह्या विश्वाला निरपेक्षपणे बघायचं काम करतो. सागरात राहुन तुम्हाला सागर किती मोठा आहे हे कळत नाही. त्यासाठी तुम्हाला अवकाशातुन त्याचा पसारा पहावा लागतो. तसंच हे आहे. विश्व काय आहे हे बघणे विश्वात राहुन शक्य नाही. आईनस्टाईनचे बरोबर आहे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने. तुम्ही ह्या विश्वात राहुन निरपेक्षपणे काहीही अनुभवु शकणार नाही. आणि जोवर ह्या विश्वाचं कोडं उलगडत नाही तोवर मानवी मनाला शांतता लाभणं शक्य नाही. मानवी मन ह्याच भौतिक शरीरात तोवर अडकलेलं राहिल. शरीराच्या वासना आत्म्याला चिकटुन राहतील आणि आत्मा शरीरापासुन विलग व्हायला धजावणार नाही." "आत्म्याचं इतकं महत्व काय आहे? आत्मा ही संकल्पना तरी खरी आहे का?" "आत्मा ही संकल्पना नाही. ते सत्य आहे. आत्मा हा परमात्म्याचाच छोटासा अंश..परमात्म्याने जेव्हा ह्या विश्वाची निर्मीती केली तेव्हा परमात्याचे काही अंश ह्या विश्वात अडकले आणि त्याचा संयोग जेव्हा विश्वातील कणांशी झाला तेव्हाच जीवसृष्टी निर्माण झाली. ह्या आत्म्याचं तसं ह्या विश्वात काहीही कार्य नाही. त्याचा मुळ उद्देश ह्या विश्वातुन मुक्तता करुन घ्यायचं आणि परमात्म्यात विलीन होऊन जायचं. त्यालाच निर्वाण असं म्हणतात" "पण ही सुद्धा एक थिअरीच वाटते. ह्याला आधार काहीही नाही" "बरोबर आहे. ही एक थिअरीच आहे. अशा अनेक थिअऱ्या आहेत. आम्ही आध्यात्मिक जगात ह्यांचाच विचार करत असतो. तेच आमचे क्षेत्र आहे. आम्ही प्रयोग करतो आणि बघतो की थिअरी योग्य आहे की नाही ते." "प्रयोगाचे उदाहरण म्हणजे astral projection?" मी विचारले "हो..तोही एक प्रयोगच आहे." बाबा म्हणाले. "जोशी देखील मला ह्याबद्दल खुप विचारायचे" "अच्छा." मी बाबांच्या एकुणच ज्ञानाने प्रभावित झालो होतो. "मला सांगा हे astral projection करणं तुम्हाला शक्य आहे?" "हो. मला ते करता येतं. त्यासाठी खुप साधना लागते. एक त्रयस्थपणा अंगी बाणवावा लागतो. स्वत:च्या कुठल्याही गोष्टीत जीव अडकवायचा नाही. त्राटकसाधना करायची. शरीराचं आज्ञाचक्र विकसित करायचं. आपलं अस्तित्वच आज्ञाचक्रात मिसळुन टाकायचं. मग सोपं होतं शरीरापासुन दुर व्हायला" "पण मग पुन्हा शरीरात कसं येतात तुम्ही?" "एकदा आपला सुक्ष्मजीव शरीराच्या बाहेर गेला की खऱ्या सृष्टीचं दर्शन होतं. तिथे इंद्रियांच्या मर्यादा आड येत नाहीत. अर्थात माझ्यासारखे लोकं त्या अवस्थेत भौतिक नियमांचा अभ्यास करत नाहीत. आम्हाला त्याबद्दल फ़ारशी माहीतीही नसते आणि त्यामधे काही रसही नसतो. आम्ही आपले परमात्म्याच्या शोधात असतो. पण हे विश्व इतकं विशाल आहे की त्यात हरवुन जायला होतं आणि शेवटी शरीराची आठवणच आपल्याला परत घेऊन येते" "म्हणजे शरीराशी attachment हवीच, अन्यथा तुम्ही ह्या विश्वातच भटकत रहाल" "बरोबर" "पण मग ते विश्वात भटकत राहणे काय वाईट?" "हे विश्व एक मायाजाल आहे. तिथे भटकणं म्हणजे भरकटण. मानवी शरीरात येण्यापुर्णी आत्मा असाच भरकटत असतो. मानवी शरीराकडे मनाची शक्तीही असते. मानवी शरीर ही विश्वातील सर्वात प्रगत निर्मीती आहे. आत्म्याला ह्याच शक्तीचा उपयोग परमात्म्याशी मिलन करण्यास करुन घ्यायचा असतो. दुर्दैवाने ते तसे नेहेमीच होत नाही. बऱ्याचदा आत्मा शारिरिक - भौतिक गोष्टींमधेच अडकतो." "पण ह्या गोष्टी इतक्या खात्रीशीररित्या कशा सांगु शकतात तुम्ही? हे ज्ञान तुम्हाला मिळाले कुठुन..ते बरोबर की चुक ह्याची खात्री कशी करुन घेतली तुम्ही?" "तुम्ही मला सांगा..लहानपणी तुम्ही भौतिकशास्त्र शिकायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला खात्री होती का की तुम्ही जे शिकत आहात ते बरोबर आहे? तुम्ही त्यावर विश्वास ठेऊ लागलात. आणि आज तुम्ही इतक्या वरच्या पातळीवर पोहोचला आहात की तुम्ही त्यावर संशोधन करुन त्यातील थिअरीज बरोबर आहेत की चुकीच्या ह्या पडताळुन पाहतात. तसंच आमचंही आहे. आम्ही आता संशोधक बनलोत..आधी विद्यार्थी होतो.." बाबा म्हणाले. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं बाबांकडे उत्तर होतं. मलाही काहीसं पटत होतं त्यांच म्हणणं. ते त्यांच क्षेत्र होतं आणि त्यात एका निष्टेने त्यांनी वाहुन घेतलं होतं. पण त्यांच्या ह्या बोलण्याने माझ्या मनात जोशीकाकांबद्दल विचार घोंघावु लागले. "जोशीकाकांबद्दल तुम्ही काही सांगत होतात की तेही तुम्हाला ह्याबद्दल प्रश्न विचारायचे." "हो. जोशीही astral projection ची साधना करत होते. पण त्यांना कधी यश आले नाही. निदान तसे झालेले मला तरी माहित नाही" "त्यांचा मृत्यु तसा अचानकच झाला. ते सकाळच्या साधनेतुन परतले आणि त्यांना ह्र्दयविकाराचा झटका आला." "हो मला ही बातमी खुप नंतर मिळाली. त्यांचा मृत्यु झाला तेव्हा मी astral projection करत होतो. माझा सुक्ष्मजीव नव्हता जागेवर. माझं जोशींशी दोनच दिवसांपुर्वी बोलणं झालं होतं ह्याबद्दल" "अच्छा" मला बऱ्याच गोष्टी त्यादिवशी नव्याने समजल्या होत्या. एक प्रकारचं समाधान मनामधे भरुन होतं. मीही जोशीकाकांप्रमाणेच astral projection वर संशोधन करावसं मला वाटु लागलं. आणि मी त्यादृष्टीने तयारी करु लागलो. भारतभर फ़िरलो. अनेक योगींना भेटलो. खुप साधना केली. शेवटी एकेदिवशी त्याचं फ़ळ मिळालं. घरी मी साधना करत होतो. आणि आज्ञाचक्र उद्दिपित झालं. दोन्ही भुवयांच्या मधोमध एक तेजस्वी चक्र फ़िरतंय असं वाटु लागलं. त्याचं अस्तित्व अधिकच गडद होऊ लागलं आणि माझ अस्तित्व त्यात मिसळायला लागलं. हळहळु त्या चक्राने माझ्या शरीराबाहेर प्रवेश केला..आणि त्याबरोबर मीही बाहेर पडलो. एका विशाल विश्वाचे दर्शन मला होत होते. मी भारावुन गेलो होतो. प्रकाशाच्या वेगाने मी धावत होतो. एक भौतिक शास्त्रज्ञ म्हणुन अनेक गोष्टी मी टिपल्या. संपुर्ण विश्वातील ज्ञानातील भंडार आज माझ्यापुढे खुलं होतं. मी मनसोक्त भटकलो. पण शेवटी शरिराची ओढ कायम होती. मी परतायचं ठरवलं. माझं घरच मला सापडेना..पण शेवटी खुप प्रयत्नाने ते मला सापडलं. घरात प्रवेश करुन बघतो तर काय...माझ शरीर तिथे नव्हतं. तिथे नव्हतं तर ते कुठं होतं? मी खुप शोधायचा प्रयत्न केला. मला लोकं दिसत होती, पण त्यांच्याशी संवाद साधु शकत नव्हतो. शेवटी अरविंदा बाबांच्या आश्रमात जाऊन त्यांच्याशी काही संवाद होतो का ह्यासाठी गेलो. आश्रमात शिरताच पाहतो तर काय..तिथे माझं शरीर होतं. नुसतंच नव्हतं...तर जिवंत होतं. माझ्या शरीराभोवती एक प्रचंड तेज होतं आणि अरविंद बाबांनी माझ्या शरीराच्या पायाशी लोटांगण घातलं होतं. तो संवाद मी कधीही विसरु शकणार नाही. "माफ़ करा मला.." अरविंद बाबा म्हणत होते. "धोका दिलास तु मला..." माझ्या शरीरातुन तीक्ष्ण बाणाप्रमाणे शब्द बाहेर निघत होते. "मला जीवनाची तीव्र आसक्ती होती. मृत्युची कल्पनाच मला सहन होत नव्हती. म्हणुन मृत्यु होताच मी तुमच्या देहात प्रवेश केला..मला माफ़ करा बाबा" अरविंद बाबा असं काय म्हणत आहेत हे मला कळतच नव्हतं. "तुम्हाला प्रायश्चित ईश्वरच देईल जोशी" माझा देह वदला.. आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरविंद बाबांच्या देहात जोशीकाकांनी प्रवेश केला होता आणि माझ्या देहात अरविंद बाबांनी. मी हबकलो. तेव्हढ्यात माझ्याकडे पाहत माझा देह म्हणाला. "तुम्ही घाबरु नका..मी तुमच्या देहात फ़ार काळ राहणार नाही...माझे जीवन तसेही फ़ारसे उरले नव्हते. जोशींनी माझ्या देहात प्रवेश करुन फ़ार आयुष्य मिळवले अशातला भाग नाही. पण आज त्यांनी तुमच्या देहात प्रवेश करायचा प्रयत्न केला जो मी हाणुन पाडला...म्हणुनच मला तुमच्या शरीरात यावं लागलं अन्यथा जोशींसारख्या लोभी आत्म्याने ते बळकावलं असतं." "पण मग आता काय?" "आता माझ्यासाठी तरी काही पर्याय नाही...तुमच्या शरीरात राहुन मी astral projection जोवर पुन्हा शिकत नाही तोवर मी बाहेर येऊ शकणार नाही. तोवर तुम्ही अवतीभोवतीच रहा..माझ्या आध्यात्मिक बळाने मी तुमच्याशी संवाद साधु शकेलच" तेव्हढ्यात पिस्तुलाच्या गोळ्या माझ्या शरीरातुन आरपार झाल्या. अरविंद बाबांच्या देहातील जोशींनी माझ्या देहावर गोळ्या झाडल्या होत्या. माझा देह निष्प्राण होऊन पडतांना मी स्वत: पाहिले..आणि पाहिला अरविंद बाबांचा आत्मा...हो तिथुन निघाला आणि माझ्यादेखत अनंताच्या प्रवासाला निघाला. देह उरला नव्हता..निदान अरविंद बाबांच्या मागे गेलो तर परमात्मा मिळेल म्हणुन त्यांचा पाठलाग सुरु केला. पण ते फ़ार पुढे निघुन गेले होते. मी ह्याच विश्वात अडकलो. आजही नुसता भटकतोच आहे. हे भरकटणंच माझं प्रारब्ध होतं हे आता मला कळतंय. प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. अरविंद बाबांच्या देहातील जोशीकाकांनाही नाही चुकले. त्यांच्या देहाचा लवकरच मत्यु झाला आणि त्यांनाही परमात्मा लाभला नाही. तेही भटकत आहेत. पण त्यांनी केलेल्या चुका मला माहित आहेत. मी नक्की आयुष्यात असं काय केलं ज्याची मला सजा मिळतेय हे अजुनही मला उमगलेलं नाही.
लेखनविषय:

वाचन संख्या 3628
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

पण का कोण जाने यकु ची आठवण झाली ...
हो ..मलाही ! पण कथा खूपच सुंदर बेतली आहे.छींन्द्रान्वेषीपणा करायचाच झाल्यास, उच्च अध्यात्मिक साधना अथवा सिद्धी देहाची आसक्ती संपल्याशिवाय शक्यच नाही. इथे तर चक्क सिद्धीचा उपयोग करून देहाची लालसा वाढवली आहे. हे अशक्य आहे .. असो पण कथेत चालू शकेल. लिहित रहा .. उत्तम आणि उत्कंठावर्धक लिहिता तुम्ही ! पुलेशु

इत्का कि कथा सम्प्लिये कि नहि हे पण उमगत नहिये...

कथा वचतोय अस वतल्च नहि !! १दम रीयल वाट्ल !!

खूप दिवसांनी मिपा वर चांगली कथा वाचली. असेच नाहीतर अजून चांगले लिहित रहा.

फारच छान ! कथा प्रत्येक वळणावर सुसंगत आहे. अनेक शुभेच्छा ! - शेखर

चांगली आहे कथा. वेगळेच वळण दिलेत कथेला आणी त्याला अध्यात्माची जोड दिली आहे. जमली आहे कथा असे नक्की म्हणु शकतो. पुलेशु

उत्सुकता वाढवण्यात यश आलं आहे. पण शेवट त्यामानानं फारसा परिणामकारक वाटत नाही.

धारपांच्या 'चंद्रहास आणि इतर विलक्षण माणसे' आणि 'स्वप्न मोहिनी' ची आठवण झाली.

सुरवात आवडली. मध्यावर येताच ते आत्मा, अध्यात्म, ध्यान-धारणा, परकायाप्रवेश आदी गोष्टी माझ्या बत्थड टाळक्यात शिरत नसल्याने कंटाळवाणे वाटले. पुढली कथा केवळ चाळली.

In reply to by गणपा

मी पण सुरवात आणि शेवट वाचला....मध्ये कथा जरा रेंगाळल्यासारखी वाटली म्हणुन, पण खुप आवडली

निव्वळ कथा म्हणून छान आहे. कथेने शेवटी घेतलेले वळण आवडले. पण कथेतील मुख्य पात्राला ते astral projection थोड्याफार खटपटी केल्यावर (एकाच परिच्छेदात) अवगत झाल्याचे खटकले. बाकीही काही शंका आहेत पण भौतिकी आणि अध्यात्म या दोन्ही प्रकारात मला गती नसल्याने त्याचा विचार न करता कथेची मजा घेतली. पुढील लेखनास शुभेच्छा....

इथे तर चक्क सिद्धीचा उपयोग करून देहाची लालसा वाढवली आहे. हे अशक्य आहे .. असो पण कथेत चालू शकेल. जगांत काहीही अशक्य नाही , म्हणजे कोण कधी का कसा वागेल हे कोणीही सांगू शकत नाही, माणसाचा मेंदू हे एक अजब रसायन आहे. कथा जमली आहे. फक्त लेखकाला नम्र विनंती की ह्या विषयात स्वतःला जास्त गुंतवून घेऊ नका. कथा लिहिली व ती आम्हास आवडली , विषय संपला. नव्या विषयावर नवी कथा वाचायला आवडले. स्पष्ट मनातले विचार मांडले. आडन सल्ले देणे आपल्याला जमत नाही, दुध गरम लागल्यावर ताक देखील फुंकून पितात.

In reply to by निनाद मुक्काम …

मानवी देहाची गरज ह्यावर जास्त लिहिलेलं नाहीये..पण ओझरता उल्लेख आहे. देहविहिन जीव परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. मानवी देह हे सर्वात उत्क्रांत वाहन आहे आत्म्याचं परमात्म्यात विलीन होण्यासाठीच. मानवी शरीर लाभणं हिदेखील मोठी गोष्ट आहे. ते नसेल तर आत्मा विश्वात भरकटत राहिल. अशी एक कल्पना मांडायचा प्रयत्न केलाय.

छान कथा. --टुकुल