"लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा...!"
चिपळ्या-एकतारीच्या साथीने तुकोबा गात बसले आहेत. 'जगत्गुरू संत तुकाराम महाराज!' या पदवीला पोहोचलेले तुकोबा. ज्यांच्या ओव्या म्हणजे केवळ अमृतसंचय! ज्यांची एकेक ओवी अभ्यासताना आयुष्य कमी पडावं असे तुकोबा. ज्यांच्या ओव्यांवर भल्याभल्यांनी बी ए, एम ए, डॉक्टरेट करावी असे तुकोबा. पण एवढं होऊनदेखील शेवटी तुकोबा देवाकडे मागतात काय? तर लहानपण, बालपण!
आहाहा.. कुमारांनी किती हळवेपणाने हे गाणं गायलं आहे! कुमारांसारखा एक दिग्गज गवई, भल्याभल्यांनी ज्यांच्याकडून सूर शिकावा, लय शिकावी असे कुमार! कबीर-मिराबाई-सूरदासाची भजनं-विराण्या गाऊन लोकांना गाण्याच्या निर्गुणतेचे दर्शन घडवणारे कुमार! धनबसंती, सहेली तोडी, सोहनी-भटियार यासारख्या सकस निर्मिती करून श्रोत्यांना स्वत:च्या विलक्षण प्रतिभेने थक्क करून सोडणारे कुमार! परंतु हेच कुमार 'लहानपण देगा देवा..' किती हळवेपणाने गाताहेत पाहा. त्यांचा तो स्वर ऐकून असं वाटतं की कुमारांची गाण्यातली सगळी विद्वत्ता गळून पडली आहे आणि तेही तुकोबांसारखेच देवाकडे लहानपण मागताहेत. अगदी लहान होऊन! ही जादू आहे तुकोबांच्या शब्दांची!
वास्तविक देवाने तुकोबांना काय, कुमारांना काय, किंवा तुम्हाआम्हाला काय, बरंच काही दिलं आहे. यपुढेही देईल. नांव देईल, पैसा देईल, विद्वत्ता देईल, मानसन्मान देईल. पण बालपणीच्या त्या निरागसतेची सर कशालाच नाही. उद्या मी भले भारतभर, जगभर प्रवास करून एकापेक्षा एक अश्या उत्तमोत्तम पाकृ खाईन पण आईने ताटात कालवलेल्या वरणभाताच्या काऊच्या अन् चिऊच्या घासाची सर कशालाच नाही!
"ऐरावती रत्ब थोर
त्यासी अंकुशाचा मार!"
बोला, तुम्हाला काय परवडणार आहे? इंद्राच्या ऐरावतासारखा थाटमाट हवा आहे का तुम्हाला? :)
अहो काय तो ऐरावत अन् काय त्याच्या त्या अंबारीचा थाट! तुमचेआमचे तर डोळेच दिपतात. एखादा सार्वभौम राजा अंबारीत बसून रस्त्याच्या दुतर्फा माणिकमोती उधळीत चालला आहे हे वाक्य कसं वाटतं वाचायला? :)
हो, पण त्या ऐरावताच्या अंकुश्याच्या टोचणीचं काय? 'ती सहन करायची तयारी आहे का तुमची?' असंच तुकोबा विचारताहेत!
'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण!'
अंकुशाच्या टोचणीच्या त्या यातना किती समर्थ शब्दात तुकोबांनी मांडल्या आहेत!
आणि ऐरावताच्या अंकुशाचं रुपक वाचताना दुसराही एक अवांतर विचार मनात येतो की त्यांच्या नजरेला ऐरावताची ती झगमगती अंबारी दिसली नाही, तो अंकुश मात्र बरोब्बर दिसला. अहो साहजिकच आहे, साक्षात तुकोबांची दृष्टी ती! थोरल्या आबासाहेबांनी सोन्यानाण्याची अन् माणिकमोत्याची भरभरून ताटं पाठवली होती तेव्हादेखील माणिकमोत्यांचा तो चमचमाट त्यांना भुरळ घालू शकला नाही. 'हे आम्हास मृत्तिकेसमान..' असं म्हणून सगळा माल महाराजांकडे साभार परत!
तुम्हीआम्ही असतो तर 'हा सगळा माल कुठे लपवू', 'ह्यातलं कुणाला किती देऊ', सालं वील करून ठेवलंय ते आता बदललं पाहिजे!', 'ह्यातले काही दागिने बँकेच्या लॉकरात ठेवावेत की काय?', 'आयटीवाल्यांची धाड पडली तर कशी काय मांडवली करायची?' हाच सगळा विचार करत बसलो असतो. पण तुकोबांनी 'हे सर्व आम्हा विषसमान!' असं म्हणून पुढच्या सर्व संभावित प्रश्नांची क्षणात बोळवण केली होती! हां हां मंडळी, थांबा जरा, लगेच मनातल्या मनात मांडे रचायला लागू नका. महाराजांची सोन्यानाण्याच्या ताटांची ती ऑफर तुकोबांना होती, तुम्हाआम्हाला नाही! :)
असो, हे जरा काही अवांतर विचार झाले, फारसे सिरियसली घेऊ नका बरं! सोन्याचांदीचा भाव खाली येणारे म्हणे, खरेदी करायचा विचार करून ठेवा! :)
"तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहून लहान"
आहाहा! या ओळी ऐकतांना काय वाटतात हो! मन भरून येतं अगदी! 'बरवे जाण' मधील शुद्ध गंधारावरचा न्यास किती हळवा आहे! आणि हो, तसाही आमचा शुद्ध गंधार म्हणजे देखील अगदी बरवा सूर बरं का! अत्यंत शहाणा, चौकस परंतु तेवढाच हळवादेखील! :)
'जाण' या शब्दावरची कुमारांनी घेतलेली जागा ऐका. जीव एवढासा होतो!
'व्हावे ल्हानाहून ल्हान!'
खल्लास ओळ! तुकोबांना ल्हानाहून ल्हान व्हायची इच्छा आहे! हा थोर संतकवी किती साधं परंतु जिवाला चटका लावणारं लिहून गेला आहे! त्यांना नको आहे तो मोठेपणा, नको आहे ते जाणतेपण, काही काही नको आहे त्यांना! अहो तुकोबांनी देवाकडे तुमच्याआमच्या मनातलंच मागणं मागितलं आहे. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं हे बडबडगीत, तो मऊ गुरगुट्या वरणभात, आज्जीने हातावर ठेवलेली बेसनाची वडी, सर्दीपडसं झाल्यावर सुंठ उगाळून त्याचा अंमळ कढत लेप नाका-कपाळावर थापणारी ती प्रेमळ आई!, आज्जी, आत्या, काकू, मावशी, आईने घेतलेला तो गोड पापा! हेच सगळं हवं आहे ना आपल्याला?
मंडळी, एखाद्या वरवर अगदी साध्या वाटणार्या गाण्यातदेखील काय विलक्षण ताकद असू शकते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. भलामोठ्ठा वाद्यवृंद नाही, रॉप-झाझ-पॉपचा थाट नाही, आयटम नंबरचा नागवेपणा नाही, की आमच्या दरबारी-मुलतानीचा रुबाब नाही! परंतु तरीही हे गाणं ऐकताना मन बेचैन होतं, हातातली सगळी कामं टाकून अगदी ऐकत रहावसं वाटतं, आणि मन पुन्हा एकदा आज्जीने दुधाच्या पातेल्यातील काढलेल्या सायसाखरेच्या खरवडीत बुडतं!
आणि आपण पुन्हा पुन्हा गुणगुणू लागतो,
लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा!
-- तात्या अभ्यंकर.
महापूरे झाडे जाती
किती
वाह तात्या ....
व्वा.....
निरुपण आवडले!
कुमारांचे हे गाणे फार आवडते..
निरुपण आवडले.
In reply to निरुपण आवडले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
रसग्रहण
सहीच!!
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम by नंदन
हेच म्हणतो
मस्त निरुपण तात्या!
उच्च.... कुमा
तुकोबा
ह.भ. प. तात्यामहाराज,
साजुक तुपातला शिरा
In reply to साजुक तुपातला शिरा by सहज
+१
मस्त निरूपण
उत्तम
वाचनाचा
वा वा
असेच!
अप्रतिम...
वा
व्वा!
आभार/उत्तरे...