माझ्या बायकोचं फेसबुक खातं नाहीये. मी तिला एक-दोनवेळा म्हटलं की फेसबुकावर खातं उघड पण तिला अजिबात रस नाही. तिचा प्रश्नः "काय करू मी फेसबुकावर येऊन?"
"आपल्या शाळा-कॉलेजमधल्या मैत्रीणींशी आणि मित्रांशी कनेक्ट हो; फोटो शेअर कर...अजून काय? सगळेच करतात. आपण सगळ्यांच्या संपर्कात राहतो."
"तुझे २०० मित्र आहेत फेसबुकावर, कुणा-कुणाशी तू वरचेवर संपर्कात असतोस? नुसतीच यादी मोठी असते, असा यादी करून ठेवलेला संपर्क खरे म्हणजे हृद्य नसतोच; तो नुसताच आभास असतो. तुमचा कॉलेजचा गृप पुण्यातच आहे. तुम्ही महिन्याला एकदा तरी भेटता, सहलीला जाता. तुझ्या फेसबुकावरील मित्रांच्या यादीतील रँडमली सिलेक्ट केलेल्या १० मित्रांसोबत तू सहलीला जाऊ शकशील? सहल जाऊ दे, नुसतंच भेटायला म्हणून मुद्दाम वेळ काढून जाशील?"
मी थोडं इमॅजिन केलं. कॉलेजमधले माझे २ सहाध्यायी ज्यांच्याशी मी ४ वर्षात एकूण १० वाक्ये देखील बोललो नसेन, ऑफिसातले २ सहकारी ज्यांच्यामुळे माझं प्रमोशन अडकलं आहे, आमच्या इमारतीमध्ये राहणारे २ जण असे आम्ही ७ जणं सहलीला निघालोय. गाडीत आमची धमाल सुरु आहे. अगदी हसत-खिदळत आमचा प्रवास सुरु आहे. माझ्या एका सहाध्यायीने एक हसून-हसून पुरेवाट लावणारा किंवा पोटदुखी सुरु करणारा जोक ऐकवलाय...
"एक मुंगी आणि एक हत्ती दोघे लग्न करतात. पहिल्या रात्री मुंगी हत्तीसाठी बदामाचे दूध आणि मेवामिठाई घेऊन शय्यागृहात लाजत-लाजत अय्या इश्श करत शिरते. लग्नाची पहिलीच इतकी रोमँटिक रात्र असूनदेखील हत्ती काहीच करू शकत नाही. का? कारण मुंगीने आणलेल्या मिठाईला मुंग्या लागलेल्या असतात. हाहाहाहाहाहाहा..."
मग आम्ही जेवायला एका हॉटेलात थांबलोय. हास्यविनोदाची नुसती कारंजीच कारंजी उसळतायत. एक जण मध्येच अत्यंत सुरेल गिटार वाजवतोय, दुसरा अतिशय सुस्वर आवाजात 'तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...' गातोय; अजून एक जण तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार कसा आहे हे पटवून देतोय. चौथा 'तुला कडक रोटी सांगीतली होती ना आणायला? हे काय आणलंय मग? सांगीतलेलं कळत नाही का? काय बघतो रे तू? काय बघतो? देऊ का ठेवून एक च्यामायला...' अशा मखमली शब्दात वेटरची हजेरी घेतोय; एक जण ऑफिसातल्या एका 'माल'दार पार्टीबद्दल आणि त्या पार्टीच्या 'माल'मत्तेबद्दल विशेष ममत्वाने आणि हातचे काहीही न राखता बोलतोय; मी माझ्या घरातल्या कमोडच्या फ्लशचा फुटलेला पाईप किती हुशारीने घरीच दुरुस्त केला हे फ्लशचे पाणी ज्या उत्साहाने आरडा-ओरडा करत पळते त्याच उत्साहाने सांगतोय; अजून एक जण पानात असलेल्या बटर चिकनचे दुसर्या दिवशी सकाळी काय होणार आहे याचे रसभरीत वर्णन करतोय आणि ते ऐकून आम्हा सगळ्यांना दोन घास अंमळ जास्तच जातायेत...मी माझ्या कल्पनाशक्तीला आवर घातला आणि पुन्हा वर्तमानात आलो.
"अवघड आहे खरं पण अशक्य नाही. पण म्हणून त्यांच्या संपर्कातच राहू नये असं थोडीच आहे." इति मी.
"बरोबर आहे; आपण बर्याच लोकांच्या नुसत्याच जुजबी संपर्कात असतो. नेहमी भाजी जिथून घेते ते भाजीवाले काका, किराणा दुकानाचा मालक, सातव्या मजल्यावर राहणारी सुनिता, जिममध्ये भेटणारी अनिता, दवाखान्यातली रिसेप्शनिस्ट संगीता, समोरच्या इमारतीत राहणारी वनिता, ब्युटी पार्लरमध्ये काम करणारी नमिता, माझे कपडे शिवून देणारी प्रणिता...अशी कितीतरी माणसे असतात ज्यांच्याशी आपण अगदी गरजेपुरत्या संपर्कात असतो. यातलं कुणी एक आपल्या आयुष्यातून वजा झालं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. समजा आपण उद्या दुसरीकडे रहायला गेलो तर यापैकी मला कुणीच कधीच भेटणार नाही कदाचित! माझ्या या भागातून दुसरीकडे जाण्याने यापैकी कुणालाच काहीच फरक पडत नाही. पण मी जिथे जाईन तिथे मला नवीन संगीता, सुनिता, नमिता, वनिता, प्रणिता भेटतील. माझ्या रुपात त्यांनाही अशी एखादी नवीन पण बिनचेहर्याची संगीता किंवा सुनिता मिळेल. फेसबुकावरचे बहुतांश मित्र असेच नसतात का? समज उद्या तू फेसबुकावरून तुझं खातं डिलीट केलंस तर तुझ्या मित्रांना काय फरक पडणार आहे?"
मी पुन्हा कल्पनादेवीच्या राज्यात गेलो. एकच हाहाकार उडालेला आहे. माझं फेसबुक खातं मी डिलीट केल्यानंतर मला माझा मोबाईल फोन अगदी अर्ध्या-अर्ध्या तासाला चार्ज करावा लागतोय, नंतर तर त्याला कायम चार्जिंगला ठेवूनच मला कॉल्स अटेंड करायला लागतायेत; माझ्यासोबत १० वी ड मध्ये असणारा...काय बरं त्याचं नाव...च्यायला...परवाच तर त्याने मला तोंड भरून बर्थडे विश केलं होतं...वर्गात पोरींच्या वह्या वगैरे चोरायचा आणि त्यात अभिरुचीसंपन्न अशा कथा-कल्पना लिहून तो पुन्हा त्या वह्या प्रामाणिकपणे परत करायचा...काय बरं नाव त्याचं...बरं जे काय असेल ते...त्याने तर कहरच केला. मला चक्क एसएमएस करून त्याने फेसबुक खातं पुनरुज्जीवित करण्याची नम्र विनंतीच केली! हे म्हणजे अतिच झालं! ऑफिसातल्या एका रुपवान मुलीने तर माझ्याशी अबोलाच धरला, ऑफिसात ती माझ्याशी खाणाखुणा करूनच संवाद साधू लागली, तिने अबोला धरल्यानंतर मी पहिल्यांदा तिच्या क्युबिकलमध्ये गेल्यावर तिने उजव्या हाताचे पहिले बोट (म्हणजे अंगठ्याजवळचे) वर करून मला जाण्याचा इशारा केला. मी गोंधळलो. म्हटलं हे काय नवीनच! हिला म्हणायचंय काय? ही मला एक नंबरला जायला सांगतेय? अरे पण का? मला लागलेली नाहीये. आणि हा माझा अतिवैयक्तिक निर्णय मी घेणार, ही कोण मला सांगणारी? की अजून काहीतरी म्हणतेय? काय? सोबत जाऊ म्हणतेय???? अरे देवा, काय या आजकालच्या पोरी!! माझा गोंधळ वाढतोय आणि मी भलतेच अर्थ काढतोय म्हटल्यावर तिच ओरडली "माझ्या क्युबिकलमधून 'पहिले' बाहेर हो! खुशाल फेसबुक खातं बंद करतोय! बेमुवर्तखोर कुठला! चल निघ बाहेर."
मी सुटकेचा नि:श्वास टाकला. अस्संय होय.
माझं खातं बंद झाल्यावर मला माझे ईमेल्स चेक करता-करता नाकी नऊ येऊ लागले आहेत. एकदा १०० ईमेल्स चेक करून हातावेगळे करत नाही तोच नवीन १००-१५० ईमेल्सचा तुफान मारा होतोय. सात-आठ जणांनी तर चक्क सुट्टी टाकून माझ्या घरी माझे मन वळवण्यासाठी ठिय्या आंदोलन पुकारले आहे. घरातली बिस्किटे, खारी, मोदक, करंज्या, लाडू, फरसाण, चिवडा, चॉकलेटे, सफरचंदे अशा नाशिवंत पदार्थांचा नाईलाजाने फडशा पाडत त्यांनी माझी मनधरणी सुरु ठेवलेली आहे. एका सुंदर मुलीने तर तिच्या आर्त डोळ्यांद्वारे मला स्मार्त...सॉरी...स्मार्ट अशी हाक मारून माझे हार्ट घायाळ करून माझे खाते पुन्हा सुरु करण्याविषयी कळकळीचे आव्हान केले आहे. तोबा तोबा...काही विचारू नका. कल्पनादेवीचे हे अविष्कार सहन न झाल्याने मी तिच्या राज्यातून वास्तवराजाच्या राज्यात पुन्हा प्रवेश करता झालो.
"अगदी असंच नाही पण बाकी बर्याच गोष्टी असतात. कुणाचं काय चालंलय ते कळतं, नवीन माहिती मिळते..." पुन्हा मी.
"त्याने काय फरक पडतो? समजा तुझ्या एखाद्या दूरच्या मित्राला मुलगा झाला. तू काय करशील? लाईक करशील आणि एखाद्या गोड स्मायलीची टोपी (किंवा चड्डी) घालून 'अभिनंदन' असे टंकून मोकळा होशील. व्हॉट नेक्स्ट? ते तर मी आता अधिक जास्त चांगल्या पद्धतीने आणि जास्त मनापासून करतेच की. मागे एकदा मी दवाखान्यात गेले होते; तिथे संगीताला भेटले तेव्हा तिने सांगीतले की ती प्रेग्नंट आहे म्हणून. मी तिचे हात हातात घेऊन 'अभिनंदन' म्हटले. तिला काळजी घ्यायला सांगीतले. संपर्कात राहण्याचा उद्देश जास्त चांगल्या पद्धतीने साध्य झाला असे वाटत नाही तुला? समजा तुझ्या कुठल्यातरी एका दूरच्या मित्राच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो तू लाईक करण्याचे विसरलास तर काय फरक पडणार आहे? तुझ्या त्या मित्राला भयंकर वाईट-बिईट वाटेल असे तुला वाटतेय का?"
मी पुन्हा असा एक प्रसंग कल्पू लागलो. एका मित्राने त्याच्या मुलीचे सोसायटीतल्या गणेशोत्सवात घेतलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेतले बंजारनच्या वेशातले फक्त ७३ फोटो फेसबुकावर टाकले आहेत. मला वेळ नसल्याने मला त्यापैकी एकही फोटो लाईक करता आला नाही. काय होईल? अहो भूकंप व्हायचा बाकी राहील. तो मित्र माझ्याशी असलेले सगळे संबंध मोडीत काढेल. माझ्या एकाही फोटोला लाईक न करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेऊन तो मला वाळीत (दोरीवर नव्हे) टाकेल. माझ्या या अतिभयंकर अपराधाची शिक्षा म्हणून त्याच्या मुलीचे झोपाळ्यावरचे ३४, त्याच्या बायकोचे नऊवारी लुगडे घालून काढलेले २७, त्याच्या बायकोने राब-राबून केलेल्या कच्च्या टमाट्याच्या कोशींबिरीचे ४३, त्याने डोंगरावर जाऊन गॉगल चढवून काढलेले १७ फोटो तो ऑफिसातून १.५ दिवस सुट्टी घेऊन फेसबुकावर चढवेल आणि माझ्या तोंडाला फेस आणेल. इतकेच नव्हे तर मला त्याच्या मित्रांच्या यादीतून हद्दपार करण्याचा सज्जड दम देऊन तो माझ्या मुसक्या आवळून मला त्याने चढवलेला एखादा तरी फोटो लाईक करायलाच लावेल. कपाळावर डबडबून आलेला घाम पुसतच मी पुन्हा वर्तमानात आलो.
"पण प्रत्यक्ष भेटून तू सगळ्यांच्याच संपर्कात राहू शकत नाहीस ना! फेसबुकावर तू अगदी सगळ्यांच्या संपर्कात राहू शकतेस आणि ते ही अगदी विनासायास आणि मोफत! ही एक सोयच नाही का? शिवाय उदाहरणार्थ तू जर चित्रकार किंवा फॅशन डिझायनर किंवा इंटेरियर डेकोरेटर असशील तर तुझे फोटो, तुझं काम, तुझी स्केचेस असं सगळं तू फेसबुकद्वारे इतरांना दाखवू शकतेस. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतेस. त्यातून कदाचित तुला नेहमीपेक्षा जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो. तुझं काम आवडल्यास तुझा आत्मविश्वास द्विगुणित होऊ शकतो आणि तू जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतेस..."
"हो हा फायदा असू शकेल कदाचित पण किती जण अशा फायद्यासाठी फेसबुकाचा खरा उपयोग करून घेतांना दिसतात? दिवसभर फेसबुकावर पडीक राहून फालतू टाईमपास करणार्यांचीच संख्या जास्त नाहीये का? कुठलेतरी पांचट फोटो, निर्जीव जोक्स वगैरे शेअर करण्यातच बहुतांश वेळ खर्ची पडत नाही का? आयुष्यातला कितीतरी मौल्यवान वेळ फेसबुकावर खर्च होतो याचा हिशेब ठेवतात का लोकं? मला सांग, तुझ्या मित्रांच्या यादीतील किती मित्र काहीतरी चांगल्या कारणासाठी फेसबुकाचा उपयोग करतात?"
थोडं अवघड जात होतं खरं तरी मी थोडा कल्पनाविलास करून बघितला. माझा एक इंटेरियर डेकोरेटर मित्र त्याने सुरु केलेल्या एका गटाचे व्यवस्थापन करतोय; नवनवीन कल्पनांची चर्चा घडवून आणतोय; नवनवीन डिझाईन्स चढवून ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय; त्याच्या कामावर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय; लोकंही सुंदर आणि गरम मुलींच्या फोटोंना लाईक करण्यापेक्षा या मित्राच्या डिझाईन्सवर दिवस-रात्र उपाशी-तापाशी राहून तर प्रसंगी जेवणात फक्त थोडे सुदाम्याचे पोहे खाऊन गहन आणि अर्थवाही ऊहापोह करत आहेत; सुंदर मुलींच्या सुंदर फोटोंचे अगदी कुरुप दिवस आलेले आहेत. मुलींचे शेकडो फोटो विनाप्रतिक्रिया आणि विनालाईक्स पडून आहेत. इतरांना उत्तान वाटणारे काही काही फोटो तर अगदी कोपर्यात मुटकुळं करून झोपलेल्या कुत्र्यासारखे जांभया देत लोळत पडलेले आहेत. हळू-हळू फेसबुकावर फक्त ज्ञानवर्धन, समाजप्रबोधन, निकोप व्यवसायवर्धन, कलासंवर्धन जपणार्या चर्चांचेच साम्राज्य आलेले आहे. इतरांना उत्तान वाटणारे सनी लिओन, शेरलीन चोप्रा, पूनम पांडे यासारख्या लमलमी ममनांचे...माफ करा मलमली ललनांचे फोटो, साथसंगत करू इच्छीणार्या (शास्त्रीय गायनाच्या बैठकीत किंवा देवळातल्या कीर्तनात नव्हे) निरागस मुलींचे फोटो, रेव्ह पार्ट्यांच्या आयोजनाच्या चर्चा, गुन्हे घडवून आणण्यास पोषक ठरणार्या अफवा, काही आंबट वाटणार्या चर्चा इत्यादी सगळे अडगळीत गेलेले आहे; त्यांच्यावर अगदी कुमार गौरवी कळा आलेली आहे.....
"हम्म, खरे आहे पण फेसबुकाचा चांगला उपयोग करून घेणारे खूप आहेत..." मी म्हणालो.
"तू फेसबुक का वापरतोस?" तिने डायरेक्टच प्रश्न केला.
"का म्हणजे, टच मध्ये राहण्यासाठी, सगळ्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी...."
"बस्स?"
"हो अजून कशासाठी वापरतील ना लोकं फेसबुक?" मी चाचरत विचारले.
"फेसबुक हे वाहवा मिळवण्याची भूक भागवणारे एक अतिशय विलक्षण साधन आहे. तू आणि मी इतर काही दिवे लावत नाही. आपल्याला कुणी ओळखत नाही. आपण काही लेखक नाही, अभिनेता नाही, शास्त्रज्ञ नाही, राजकारणी नाही...थोडक्यात आपण सामान्य आहोत. रोजच्या जगण्यात कोण आपल्या पाठीवर थाप मारतं? कोण आपल्या मेहनतीला किंवा रोजच्या मरण्याला दाद देतं? सचिन तेंडुलकरला दाद देणारे १५० कोटी आहेत; सलमान खानला दाद देणारे १०० कोटी आहेत; ए पी जे अब्दुल कलामांचा आदर ठेवणारे कोट्यवधी आहेत. अपना क्या? आपल्याला दाद कशामुळे मिळेल? म्हणून मग फोटो, स्टेटस, जोक्स वगैरे टाकून आपली शाबासकीची आणि आपली एक ठराविक ओळख निर्माण करण्याची भूक भागवण्यासाठी फेसबुकची गरज निर्माण केली गेली. किती लाईक्स आलेत यावर आपली भूक शमते. दुसरी गोष्ट म्हणजे मुली किंवा मुले! आपल्या सोबत असणार्या मुली किंवा मुले आता काय करतायेत, कुठे आहेत हे जाणून घेण्याची खूप तीव्र भावना पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये असते. शिवाय सुंदर मुलींचे फोटो हा आकर्षणाचा मुद्दा असतोच. आणखी एक म्हणजे प्रत्येकाला दुसर्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवण्याची खोड असते. म्हणून मग इतरांच्या सहलीचे, वाढदिवसाचे, पार्ट्यांचे छान छान फोटो बघून अस्वस्थता वाढते. यांचं सगळंच कसं छान सुंदर असा प्रश्न पडतो. मग आमचं ही सगळं मस्त हे दाखवण्याची चढाओढ लागते आणि फेसबुकाचा वापर वाढत जातो. या अस्वस्थतेतून आत्महत्या देखील झालेल्या आहेत. म्हणून माणसाच्या भावनिक गरजांच्या आधारवर फेसबुक चालते असे मला वाटते."
"हम्म, विचार करायला लावणारी गोष्ट आहे."
"मग कर विचार. एखाद्याने जर फेसबुकावर टाईमपास करण्यापेक्षा वाचन केले किंवा लेखन केले किंवा एखादे नवीन कौशल्य शिकले तर ते त्याला जास्त उपयोगी पडेल की नाही? फेसबुकावर असणे यात काही गैर नाही पण त्याचा अतिरेकी वापर आणि त्यात अगदी बुडून जाणे धोकादायक असू शकते असे मला वाटते."
मी पुन्हा कल्पनाताईंचे बोट पकडून तिच्या घरी गेलो. मी माझ्याजवळ असलेली कौशल्ये ओळखून त्या कौशल्यांचा उपयोग करून काहीतरी चांगले घडवत आहे, माझ्या हातून एखादे छोटेखानी पुस्तक लिहून झाले आहे किंवा मी एखादे वाद्य शिकलो आहे. हा कल्पनाविलास खरंच चांगला वाटतोय. काही खटकत नाहीये यात. मग असे असून देखील फेसबुकच्या अमाप लोकप्रियतेचे उत्तर काय? अवघड आहे...जाऊ द्या, मी काल माझा एका तळ्याच्या बॅकग्राऊंडवर काढलेला फोटो फेसबुकावर चढवला होता. बघू या किती लाईक्स आलेत त्याला....
"हम्म्म...ठीक आहे...बरं मला जरा थोडा चहा देशील का? मी थोडे काम करतो तोपर्यंत."
आयला, काय सही फोटो आहे यार! टू गुड! बरीच बदललीये ही...आधी अगदीच ही होती; आता अगदी ही झालीय. चला, चटकन लाईक करून टाकू!! ;-)
वाचने
6032
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्लेषण अत्यंत योग्य आहे.
मस्तंय....
वेळ मिळत नाही.
काय मर्मावर
In reply to वेळ मिळत नाही. by प्रभाकर पेठकर
लेख निवांत वाचतो ..
आवड्या अप्रतिम
हा लेख भयानक लाइक केल्या
लेख मस्त ... सांगण्याची पद्धत
हे मात्र अगदी पटलं
आवडलं आणि पटलं!
नेहमीप्रमाणेच लेखन आवडले.
पटलं.फारच सुंदर.अप्रतिम.
मस्त.
उत्तम लेख.
विनोदी अंगाने मांडलेला
..
एरवी फेसबुक बंद करुन तरी आपण
In reply to .. by गवि
चटकदार
+१
In reply to चटकदार by परिकथेतील राजकुमार
मस्त लिखाण !!
आवडेश!
आवडले !
मस्त!
+१
In reply to मस्त! by पैसा
आवडेश
मस्त रे लई भारी लिहिलं आहेस,
'जगात कुंभार थोडे आणि गाढवेच
खुसखुशीत लेख आवडला.
धन्यवाद!
भारी
भारी