Skip to main content

अंगणातल्या चिमण्या

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 05/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
खरं म्हणजे एक दिवसासाठी बेळगाव ते मुंबई असा प्रवास करायचे सुचित्राला अगदी जीवावर आले होते. नणंदेच्या सासूच्या भाचीचं लग्न. पण सासू सासरे नेमके चार धाम यात्रेला गेलेले. माहेरचं कुणी आलं नाही तर नणंदेचा रुसवा फुगवा काढायचं अवघड झालंच असतं, शिवाय सासूबाई परत आल्यावर त्यांचे टोमणे खावे लागले असते ते निराळेच. म्हणून तिने बेत केला, आदल्या दिवशी रात्री पुण्यात असलेल्या मावसबहिणीकडे, प्रियांकाकडे मुक्काम करायचा अन खूप दिवसांच्या तटलेल्या गप्पागोष्टी करून घ्यायच्या. अन मग दुसरे दिवशी सकाळी लवकर मुंबईसाठी निघायचं . साडेबाराचा मुहूर्त. अकरापर्यंत सहज पोचता येईल. सुचित्राचा फोन येताच प्रियांकाच्या उत्साहाला उधाण आलं 'अगं सु.ताई, किती दिवसांनी येतेयस ? आणि एकच दिवस मुक्काम ? ते काही नाही. तू आपली सरळ ४ दिवस सुट्टी टाक ऑफिसात. मस्त फिरू.’ 'नाही गं ! प्रणवची परिक्षा सुरु आहे ना. मेला, लग्नांचा अन परिक्षाचा सिझन नेमका एकदमच येतो.’’' सकाळी सहाच्या बसचं रिझर्वेशन केलेलं. जेवणाच्या वेळेपर्यंत सुचित्रा पुण्यात पोचली. प्रियांका चार चाकी घेऊन न्यायला आली होती. जेवण आवरल्यावर गप्पा रंगल्या. सहा वाजता अमित आल्यावर प्रियांका चहा टाकायला उठली. चहा घेऊन सुचित्रा पाय मोकळे करायला बाहेर पडली. परत येईपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले. प्रियांकाची, मुलगी ईशा आता दहावीत गेलेली. प्रियांका स्वयंपाक करता करता , मैत्रिणीकडे गेलेल्या ईशाची वाट पाहत होती. तिची अभ्यासाची वेळ झाली होती. साडेसात वाजले, पावणेआठ वाजले, ईशाचा पता नव्हता. प्रियांकाचा पारा चढत होता. अखेर आठला ईशा आली. झाले ! प्रियांकाने संतापाचा भडीमार तिच्यावर केला. मग तिची उलट उत्तरे, प्रियांकाचे पित्त खवळणे असा काही वेळ कल्लोळ झाला. ईशा चिडून वरच्या बेडरूममध्ये निघून गेली. सुचित्राने प्रियांकाला म्हटले, 'अगं, किती खवळशील ? तुझंच बीपी वाढेल बघ.’ 'ताई, तू पण असं म्हणावंस ? आपल्या लहानपणी, तरुणपणी आपण संध्याकाळी सातनंतर कधी राहत होतो का बाहेर ? अन अभ्यास चुकवून कधी तरी टवाळक्या केल्या होत्या का ?’ 'हो गं, पण आता जमाना बदललाय ! अशी कडक शिस्त आताच्या मुलांना नाही चालायची. अन इतकं संतापतेयस ते का ? विसरलीस तो अंगणातला प्रसंग ?’ प्रियांकाने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिची अन सुचित्राची नजरानजर झाली अन दोघींच्या नजरा एकदमच बैठकीच्या खोलीत लावलेल्या आबांच्या फोटोकडे गेल्या. जुन्या आठवणींचे तरंग दोघींच्या मनाच्या किनाऱ्याला धडाका देऊ लागले. पाहता पाहता प्रियांकाच्या मुद्रेवरचे भाव पालटून प्रथम ते सौम्य अन नंतर काहीसे हळवे झाले. ती सोफ्यावर सुचित्राशेजारी येऊन बसली अन तिने सोफ्यावरच्या तिच्या हातावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. 'कशी विसरेन, ताई ? अजूनही आबांचा फोटो पाहिल्यावर मला तीच आठवण प्रथम येते.’ ती हळुवारपणे म्हणाली. पाण्यात बुडालेली एखादी कमळकळी फुलून पुन्हा वर यावी तसा प्रियांकाचा गोरापान रेखीव चेहेरा आर्द्र-वत्सल झाला. आज इतक्या वर्षांनी तो प्रसंग पुन्हा दोघी बहिणींच्या चित्तावर उन्हाच्या कवडशासारखा तळपला. सुचित्राची आई वीणा, प्रियांकाची आई राधा, अन मानसीची आई सुलू तिघी सख्ख्या बहिणी. दरवर्षी दिवाळी अन मेच्या सुट्टीत या तिघी अन त्यांची एकूण सात मुले आजोळी महिनाभर राहायला जात. आजोबा खूप हौशी अन तितकेच कर्तृत्ववानही. सारे त्यांना 'आबा’ म्हणत. शिस्तीचे कठोर पण अंत:करणाचे खूप मायाळू. सुट्टीला आल्यावर सुचित्रा, प्रियांका अन सारी भावंडे बहुतांश वेळ इकडे तिकडे उंडारण्यात घालवत. टीव्ही नसायचा. त्यामुळे खेळ, खादी अन भटकंती हेच सुट्टीचे मुख्य उद्योग. फारसा कुणाचा अंकुशही नसायचा. एक राधामावशी सोडून. तिच्या सासरी एकत्र कुटुंब. मुले अन मोठी मिळून पन्नासेक माणसे. भलती कडक शिस्त. मुलांनी ठराविक वेळेत घरी यायचे, नेमक्या वेळी जेवण, मग अभ्यास अन ठराविक वेळेत अंथरून गाठायचे, असा सारा कारभार. सिनेमा-नाटक मोजून. अन तेही पूर्वपरवानगी शिवाय नाही. परवानगीशिवाय मुलांनी घर अन शाळेव्यतिरिक्त कुठे जायचे नाही. इ. इ. बंधने खूप होती. स्वत: राधामावशीसुद्धा पुष्कळ बंधने धाकाने पाळीत असे. आणि मुलांनाही पाळायला लावीत असे. अगदी आजोळी आल्यावरही. सुचित्रा सात मावसभावंडांमध्ये मोठी. ती खुपदा राधामावशी बरोबर वाद घाली. पण ती मुळीच लक्ष द्यायची नाही. त्या सुट्टीत मुलांना सिनेमा पाहायला जायचे होते. सिनेमा संध्याकाळी सहाचा. यायला नऊ वाजणार. राधामावशी प्रियांकाला परवानगी देईना. प्रियांका काही हट्ट सोडेना. अखेर राधामावशी उठली अन प्रियांकाच्या पाठीत एक धपाटा घातला. झाले ! प्रियांका रडत बसली. साऱ्यांचाच मूड गेला. हिरमुसले चेहेरे करून सारी मुले देवघरात जाऊन आजीपाशी बसली. आजीचा स्वभाव शांत. आपल्या मुलीलासुद्धा हुकुम करणार नाही कधी. ती म्हणाली 'थांबा, तुमचे आबा येतील आता. त्याना सांगा.’ आबा आले. मुले धावत त्यांच्याकडे गेली अन सारा प्रकार सांगितला. आबांनी साऱ्यांना आत जायला सांगितले अन हाक मारली 'राधा...’ राधामावशी पाण्याचा तांब्या घेऊन आली. मुले मधघरातच बसून हळूच बाहेर पाहत होती. पाणी पिऊन तांब्या तिच्या हातात देण्याऐवजी आबा खिडकीशी गेले अन त्यांनी राधाला खुणेनेच बोलावले. 'अंगणात पहा बरं जरा..’ राधामावशीने पाहिले. आजी अंगणात चिमूट चिमूट तांदळाच्या कण्या टाकत होती अन २५-३० चिमण्या ते दाणे टिपत तिच्या मागून निर्भयपणे फिरत होत्या. मधूनच आजीच्या हाताच्या दिशेने हवेत झेप घेऊन दाण्यांचा वेध घेत होत्या. एखादी थेट आजीच्या पदराशी लगट करत होती. आजी लटक्या रागाने तिला हाकी. राधामावशी कौतुकाने पाहत होती. इतक्यात आबांनी तांब्यातल्या पाण्याचा सपकारा अंगणात टाकला. त्यासरशी सगळ्या चिमण्या भुर्रकन उडून गेल्या. आजी गोंधळली. तिने पुन्हा कण्या टाकल्या अन ती चिमण्यांना बोलावू लागली. पण आता त्या येईनात. २-४ मिनिटे वाट पाहून आजी आपल्या कामाला निघून गेली. राधामावशीनं आबांकडे अचंब्याने पाहिले. आबा हसले. 'अगं, दारी आलेल्या चिमण्या त्या ! त्यांना रागावलं, धुत्कारलं तर परत येतील का बोलावलं तरी ? तशीच तु नि तुझ्या बहिणी ! मी नि तुझी आजी तुमचं मन कधी दुखावत नव्हतो, आठवतं का ? आणि आता आपापल्या घरट्यात गुंग झाला आहात. आता मी तुला राहा म्हटलं इथंच तर राहशील का आपलं घर सोडून माझ्यापाशी ? आणि तशीच तुझी पियू ,वीणाची सुचू अन सुलूची मानसी. अंगणातल्या चिमण्याच साऱ्या. नको गं दुखवू त्यांच्या मनाला ! एक दिवशी भुर्र उडून जाणारेत आपापल्या घरट्यात...!’ राधामावशी समजली. 'आबा...! ' म्हणून त्यांच्या कुशीत शिरताना तिच्या पापण्या ओल्या झाल्या. दुसऱ्या दिवशी प्रियांकाला अन सगळ्या मुलांना खुद्द आबा घेऊन गेले सिनेमाला. अन आज इतक्या वर्षांनी त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होत होती. पावसात मधूनच ऊन पडावं, तसं प्रियांकाच्या मुद्रेवर हसू उमललं. ती सुचित्राला म्हणाली, 'सु ताई, कळली बरं चूक ! पण आता तूच जा अन काढ बाई समजूत तुझ्या लाडक्या भाचीची !’ सुचित्रा हसत हसत वरती गेली. मुसमुसत पालथ्या पडलेल्या ईशाच्या पाठीवर एक चापट मारून ती म्हणाली, 'ए खुळाबाई, अंगणातल्या चिमणीची गोष्ट ऐकणार का ?’ 'गोष्ट’ म्हटल्यावर ईशाचा सारा रुसवा पळाला. चटकन उठून ती सुचीत्राला बिलगली. 'सांग ना गं मावशी...!’ ----xxx----
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6065
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

साधं, सोपं आणि प्रेमळ तत्वज्ञान. मन भरून आलं वाचताना. चांगली आहे कथा. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

.... हेच म्हणतो...........................

मस्तच आहे एकदम. हळुवार नाजुकशी

साधी आणि त्यामुळेच आवडली खूप.

"पाण्यात बुडालेली एखादी कमळकळी फुलून पुन्हा वर यावी तसा प्रियांकाचा गोरापान रेखीव चेहेरा आर्द्र-वत्सल झाला. " -- इथे काय अप्रतिम उपमा दिलीय. कथा आवडली. एकदम घरगुती बाजातली वेगळं भावविश्व उलगडून दाखवणारी. अजून लिहा.

कथा आवडली. मला आठवतंय तसं अगदी २००० सालापर्यंत 'सातच्या आत घरात' हि कंन्सेप्ट लागू होती. नंतर मात्र हळूहळू हि पध्दत लोप पावत गेली त्याची कारणंही तशी बरीचशी आहेत.

कथा छानच. पण... दहावीतली मुलगी गोष्ट म्ह्टल्यावर एकदम रुसवा सोडुन मावशीला बिलगेल असे वाटत नाही :). इशाला थोडी छोटी करा बरं. :)

In reply to by मृत्युन्जय

सूचनेबद्दल धन्यवाद, मृत्युंजयजी. यावरून एक आठवण अशी. बारावीनंतर मी वसतिगृहात असताना रोज रात्री जेवणानंतर बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा रंगायच्या. त्यात एक न चुकणारा आग्रही कार्यक्रम म्हणजे मी गोष्ट सांगणे. गोष्ट म्हणजे मी वाचलेल्या सुंदर कथा कादंबऱ्यांची कहाणी. ऐकणाऱ्या सगळ्या १७ वर्षापुढच्या अभियांत्रिकीच्या मुली. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय होता कि अजून जुन्या मैत्रिणी भेटल्या की मला 'गोष्ट सांग' म्हणतात. मलाही अजून गोष्टी ऐकायला आवडतात.

सर्व वाचक व प्रतिसादक, ही जुनाट पद्धतीची साधी कथा खरं तर माझ्या बालपणीच्या आठवणींशी निगडीत आहे. या कथेचा जंतू जन्मला तो 'पुण्यात शाळकरी मुलांची चिल्लर पार्टी ' ही बातमी वाचून. बातमी वाचल्यावर, आम्ही शाळेत असतानाचं वातावरण, साधेपणा, संस्कार, एखादी गोष्ट अप्रत्यक्षपणे सांगण्याची मोठ्या माणसांची प्रेमळ पद्धत हे सगळं आठवलं अन त्यातून ही कथा जन्मली. खरं तर आजकालची मुलं आपल्यापेक्षा बुद्धिमान, सर्वग्राही, अन चाणाक्ष आहेत. तरीही ती अशी चंगळवादी, चारित्र्याविषयी बेफिकीर, भोगलोलूप का ? इतक्या लहान वयात त्यांची संवेदनक्षमता अशी दगड का बनली? कदाचित आम्हीच त्यांच्यापुढे काही दिशा, काही उदात्तता, नैतिकता, नैसर्गिक साधेपणाची गोडी, उच्च जीवनमार्ग किंवा दृढ धारणा ठेवण्यास असमर्थ ठरलो आहोत का ? अर्थात सर्वच मुले अशी असणार नाहीत. पण काही थोडी तरी अशी का व्हावीत ? आणि यात काही गैर आहे , असं त्यांना वाटतंय का? एक धक्कादायक शक्यता... यात काही गैर आहे , असं आम्हाला तरी वाटतंय का? माझी तरी विचारशक्ती इथेच खुंटली. मिपावरील विचारवंतानी आपले विचार द्यावे.

In reply to by सस्नेह

अतिशय सुरेख मांडणी. कथा अगदी सहज खुलत जाते. कमळकळीची उपमा तर स्वतः पाहिल्या शिवाय वापरायला जमण कठीण. स्नेहांकिता पुर्वीच्या माणसांना आजुबाजुच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला मुबलक वेळ होता. त्यामुळे त्यांच्या कडुन जी जडणघडण घडली ती अशी हळुवार होत गेली. अन बर्‍याचदा त्यांच स्वतःच वागणसुद्धा त्यांच्या सांगण्याशी मिळत जुळत असायच. आपण हल्ली एकतर जगतो ते घड्याळ्याच्या काट्याच्या तालावर. त्यात भर म्हणजे टीव्ही. खर सांगते, मी हल्ली जेंव्हा जेंव्हा भारतात आले मला प्रकर्षाने जाणवणारी अन खटकणारी गोष्ट म्हणजे टीव्ही. इतक वर्चस्व आहे आपल्या लोकांवर या टीव्हीच की काय सांगु? अगदी स्व्यंपाक राहिला तरी चालेल आणु बाहेरेउन पण सिरियल चुकली नाही पाहिजे. माझ्या सासरी तर कुणी असो नसो अगदी इनव्हर्टर लाउन टीवी सुरु असतो. सासर्‍यांच काय म्हणे बातम्या...अरे कितीदा ऐकायच्या त्याच त्याच चघळौन सांगितलेल्या बातम्या? पलिकडच्यागल्लीत काय स्वतःच्या गल्लीत काय घडतय पत्ता नाही, पण बातम्या. मग सासुबाईंच ..म;ला एक धड नाव आठवत नाही सिरियलसच्...पण त्या पहातात. काही दुसर नाहीच. कामवाली येउन रिक्वेस्ट करते, १२ वाजले ते ही मालिका लावा. सुरु झाली. एखादा पिक्चर बघायला जाण , एखाद नाटक पहाण, रोज पेपर वाचण एव्हढ पुरेस होत ना ? पण नाही या टीव्हीन २४ तास धिंगाणा सुरु केलाय.

काही वेळा असे म्हणुनच गप्प बसावे . प्रत्येकाला पुढची पिढी काहीतरी वेगळे चुकीचे करते आहे असे सतत वाटत असते. अर्थात यात काळजीचाच भाग जास्त असतो. पण आपण नेहमी बरोबर आणि पुढची पिढी चुक असे कधीच नसते. दोघेही आपापल्या जागी बरोबरच असतात. लहान पणी मिळणार्‍या सुविधांमुळे / वैचारीक स्वातंत्र्या मुळे पुढची प्रत्येकपिढी ही मागच्यांपेक्षा वेगळीच असते. माझ्या बाबांच्या काळचे मास्तर म्हणजे कर्दनकाळ होते. वर्गात बोललो प्रष्र्ण विचारले म्हणुन मीही फटके खाल्ले आहेत. पण आजकालचे विद्यार्थी कोणताही प्रष्र्ण कोठेही बिनधास्त विचारायला लाजत नाहीत. तेच कपड्यांचे. आपण घेतलेले कपडे नव्या पिढीला आवडत नाहीत. अशी अनेक उदाहरणे घेता येतील. आजकालच्या इंटरनेट आणि टिव्हीच्या जमान्यात मुल खुप गोष्टी आधिच शिकतात. मग त्या गोष्टी करुन बघायचे कुतुहल त्यांच्यात निर्माण होणे सहाजिक आहे. पालकांनी कितीही ठरवले तरी मुलांपासुन काही लपवणे अशक्य झाले आहे. याशीवाय हि पिढी मानसीक आधारासाठी, संस्कारांसाठी पालकांवर अवलंबुन नाही. इतर माध्यमांचा प्रभाव त्यांच्यावर पालकांपेक्षा जास्त आहे. साने गुरुजी, टिळक, गांधी किंवा शिवाजी त्यांच्या साठी आदर्श बनु शकत नाहीत. ह्यांच्या बद्दल फारशी माहीत नसलेली पण बराक ओबामा, मायकेल जॅक्सन (किंवा अशी बरीच नावे) यांची इत्यंभुत माहीती असलेले अनेक जण मला माहीत आहेत. या पिढीतले बरेच लोक लहान वयातच स्वतःचे निर्णय स्वतः घेताना दिसतात. ते कधीकधी चुकतातही. पण चंगळवाद, भोगलोलूपता या मधिल निरर्थकपणा त्यांचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचे तेच यामधुन काहीतरी मार्ग काढतील असा मला विश्वास वाटतो. फक्त ज्यावेळी आपल्या कडे ते काही सल्ला मागायला / आधार मागायला येतील (आले तर) तेव्हा त्यांना न झिडकारता त्यांना योग्य मर्गदर्शन करणे यात मात्र आपण कुठे कमी पडायचे नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

+१ प्रत्येक पिढीत बंडखोर वगैरे मुलं असतातच. फक्त आपण ते वाहवत जाणार नाहीत अशी काळजी घ्यावी. तणतण करुन, शारीरीक / मानसिक शिक्षा करुन फक्त दुरावा वाढतो. मग आपण "म्हातार्‍या आई - वडीलांना वार्‍यावर सोडले " सारख्या चर्चा करायला मोकळे. असो. बाकी ते चिल्लर पार्टी काय भानगड आहे ? ई सकाळ वर पाहील तर काही विशेष असावं असं वाटलं नाही. कोणी तरी लिंक द्या जमलं तर.

छान साधीशीच पण मस्त शब्दांत मांडलेली कथा आवडली, शिवाय 'ज्ञानोबाचे पैजार ' ह्यांचा प्रतिसाद म्हणजे तर...अप्रतिम.

सरळ सोप्या शब्दात मांडलेली गोष्ट मनाला आवडून गेली :)

'समयोचित' आणि जमून आलेली कथा!

पैजारबुवांचा प्रतिसाद आवडला. मृत्युंजय, दहावीत असतानाच असे नाही तर आत्याकडून गोष्टी ऐकण्याची सवय लहानपणापासून आम्हा सगळ्यांना होती. अगदी सगळ्यांची लग्नं झाल्यावरही आम्ही सगळ्या चुलत, आतेबहिणींनी आत्यांला गोष्ट सांगायचा आग्रह केला होता आणि मन लावून ऐकलीही होती. त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र अश्या आलो नाही आणि आत्याही गेली. आता त्याच गोष्टी मी माझ्या भाचा आणि भाचीला फोनवर सांगत असते आणि त्यांना त्याची सवय झालिये. आमच्या समृद्ध लहानपणात आत्या, काकवा , मावशी, मामी यांचा सहभाग असल्याचे तेंव्हाच जाणवते जेंव्हा त्या त्यांचा ठसा उमटवून जातात. वय हा फारसा महत्वाचा मुद्दा रहात नाही. स्नेहांकिंता, पुण्यातल्या पार्टीची बातमी मलाही खूप अस्वस्थ करून गेली होती.

मृदू -हळुवार लेखनशैली आवडणारे इतके मिपाकर असतील अशी कल्पना नव्हती. पैजारबुवांचा प्रतिसाद म्हणजे बातमी वाचून क्षुब्ध झालेल्या चित्तावर शीतल चंदनलेप ! पटलं बरं पैजारबुवा. आपण किती जरी शहाणपणाचे रेडीमेड डोस दिले तरी ही मुलं ते नाकारून तारुण्याची वाटचाल स्वत: अनुभव घेऊन अन ठेचा खाउनच करणार ! यावरून स्व. किशोरकुमार यांच्या लोकप्रिय गीताच्या ओळी आठवल्या. 'तेरे लिये रस्में नही.. रस्मे नही कसमें नही.. तू किसीके बसमे नही.. जुदा सभी रस्मोंसे तेरा हर रिवाज है.. जवानी ओ दिवानी तू झिंदाबाद ! ’.......

कथा आवडली. साधी,सोपी अन मनाला स्पर्शुन जाणारी!