खलील जिब्रान यांच्या "नाईट" या लेखातील एका उतार्याचे स्वैर रुपांतर -
जिने हाती भीतीरुपी तलवार धारण केलेली आहे, मस्तकी चंद्र ल्यालेला आहे आणि नीरव शांततेची वस्त्रे जिने परिधान केलेली आहेत अशी जीवनाच्या गूढर्भी लाखो नेत्रांनी पहाणारी रजनी, नि:शब्द मौनात हजारो कर्णांनी मृत्यूचे भयगीत ऐकते.
हे रजनी समस्त कवी, प्रेमिक, गायकांचे विश्रामधाम अशी तू , तुझ्या गर्भात काळोख्या , गूढ सावल्या, आत्मे आणि चित्रविचित्र भासाभासांचा निवास आहे. लालगुलाबी, खुजे सायंकाळचे ढग आणि उषारुपी प्रसन्न वधू यांच्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या हे काळोख्या रात्री तुझ्या श्वासामध्ये आम्हा चराचर जीवसृष्टीच्या स्मृती, आकांक्षा, इच्छा, कामना उमलून येतात.
हे मखमली निशे, तुझ्या अंधःकारामुळेच आम्हाला स्वर्गातील दिव्य प्रकाशाचे घडते. गर्वोन्नत प्रकाशमयरुपी दिवसाच्या तेजामुळे दीपून आंधळ्या झालेल्या मर्त्यसृष्टीतील आम्हा जीवसृष्टीला आपल्या अनंत, अगणित तारकदळांच्या भव्य मिरवणूकीच्या रुपाने अंतरात्म्यातील ज्योतीचे दर्शन तू घडवितेस. तुझ्या गर्भातील शांती अतिशय मनःशांतीदायक असून, तुझे मौन अनंताची गूढगुपीते खुली करण्याचे सामर्थ्य राखते. दिवसभराच्या वादळी महत्त्वाकांक्षा आणि सततच्या इच्छांच्या वेगवान , भरधाव टापांखाली चिरडल्या गेलेल्या मनावर मलमपट्टी करणारी तू, हे रजनी, अतिशय शांतीप्रदायक आहेस.
सर्व दीनदुबळ्या लोकांची दिवसभर उधळलेली स्वप्ने, आणि आकांक्षारुपी खिल्लारे गोळा करणारी जणू तू गोपस्त्रीच आहेस. तुझ्या जादूभर्या, कोमल अंगुलीस्पर्शाने , शीणलेल्या भागलेल्या लोकांचे नेत्र झाकून त्यांच्या हृदयाकाषात स्वप्नरुपी आनंदाचे नंदनवन फुलविणारी कल्पवृक्षच तू आहेस. तुझ्या काळ्या मखमली वस्त्रप्रावरणांच्या घडींत प्रेमिकांना मदनाचे धनुष्य सापडते तर दवबिंदूंनी चिंब झालेल्या तुझ्या पावलांपाशी कित्येक एकाकी हृदये मूकपणे अश्रू ढाळतात. अनंत प्रेमिकांच्या प्रेमाची साक्षी, एकाकी हृदयांची मैत्रिण तर बेघरांची आश्रयदाती तू आहेस.
तुझ्या चंदण्या, मखमली अंधारामध्ये कवींच्या प्रतिभेस पूर येतो तर तत्त्ववेत्त्यांची हृदये उचंबळून येतात. तुझ्या गर्भातच अनेक कल्पनाविलास जन्मास येतात.
वाचने
3069
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम...
सुंदर !!!
सुंदर!
आभार
सुरेख अनुवाद ! जी. एं.च्या
भाषांतर मस्तच उतरले आहे. पण
सुंदर.
@स्नेहांकिता,कुठे जी एंचे
छान अनुवाद!
सुंदर
प्र.का.टा.आ.
@दाको - धन्यवाद @राही - होय