Skip to main content

रजनी

लेखक शुचि
रविवार, 19/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
खलील जिब्रान यांच्या "नाईट" या लेखातील एका उतार्‍याचे स्वैर रुपांतर - जिने हाती भीतीरुपी तलवार धारण केलेली आहे, मस्तकी चंद्र ल्यालेला आहे आणि नीरव शांततेची वस्त्रे जिने परिधान केलेली आहेत अशी जीवनाच्या गूढर्भी लाखो नेत्रांनी पहाणारी रजनी, नि:शब्द मौनात हजारो कर्णांनी मृत्यूचे भयगीत ऐकते. हे रजनी समस्त कवी, प्रेमिक, गायकांचे विश्रामधाम अशी तू , तुझ्या गर्भात काळोख्या , गूढ सावल्या, आत्मे आणि चित्रविचित्र भासाभासांचा निवास आहे. लालगुलाबी, खुजे सायंकाळचे ढग आणि उषारुपी प्रसन्न वधू यांच्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या हे काळोख्या रात्री तुझ्या श्वासामध्ये आम्हा चराचर जीवसृष्टीच्या स्मृती, आकांक्षा, इच्छा, कामना उमलून येतात. हे मखमली निशे, तुझ्या अंधःकारामुळेच आम्हाला स्वर्गातील दिव्य प्रकाशाचे घडते. गर्वोन्नत प्रकाशमयरुपी दिवसाच्या तेजामुळे दीपून आंधळ्या झालेल्या मर्त्यसृष्टीतील आम्हा जीवसृष्टीला आपल्या अनंत, अगणित तारकदळांच्या भव्य मिरवणूकीच्या रुपाने अंतरात्म्यातील ज्योतीचे दर्शन तू घडवितेस. तुझ्या गर्भातील शांती अतिशय मनःशांतीदायक असून, तुझे मौन अनंताची गूढगुपीते खुली करण्याचे सामर्थ्य राखते. दिवसभराच्या वादळी महत्त्वाकांक्षा आणि सततच्या इच्छांच्या वेगवान , भरधाव टापांखाली चिरडल्या गेलेल्या मनावर मलमपट्टी करणारी तू, हे रजनी, अतिशय शांतीप्रदायक आहेस. सर्व दीनदुबळ्या लोकांची दिवसभर उधळलेली स्वप्ने, आणि आकांक्षारुपी खिल्लारे गोळा करणारी जणू तू गोपस्त्रीच आहेस. तुझ्या जादूभर्‍या, कोमल अंगुलीस्पर्शाने , शीणलेल्या भागलेल्या लोकांचे नेत्र झाकून त्यांच्या हृदयाकाषात स्वप्नरुपी आनंदाचे नंदनवन फुलविणारी कल्पवृक्षच तू आहेस. तुझ्या काळ्या मखमली वस्त्रप्रावरणांच्या घडींत प्रेमिकांना मदनाचे धनुष्य सापडते तर दवबिंदूंनी चिंब झालेल्या तुझ्या पावलांपाशी कित्येक एकाकी हृदये मूकपणे अश्रू ढाळतात. अनंत प्रेमिकांच्या प्रेमाची साक्षी, एकाकी हृदयांची मैत्रिण तर बेघरांची आश्रयदाती तू आहेस. तुझ्या चंदण्या, मखमली अंधारामध्ये कवींच्या प्रतिभेस पूर येतो तर तत्त्ववेत्त्यांची हृदये उचंबळून येतात. तुझ्या गर्भातच अनेक कल्पनाविलास जन्मास येतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3069
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अप्रतिम... आस्वाद घ्यावा असाच लेख.... !! मन प्रसन्न झाले..

अप्रतिम रूपांतर. कुठेही हे भाषांतर आहे असं जाणवत नाहीये. मस्त!

ज्ञानराम, सुहास झेले आणि पैसा तीघांचेही खूप धन्यवाद. पण शुद्धलेखनाच्या काही चूका झाल्या आहेत त्या माफ कराव्यात :( खलील जिब्रान यांनी उधृत केलेले एक फारच भेदक वाक्य वाचनात आले, या वाक्याचा गूढार्थ लक्षात आला तर जिब्रानच्या प्रज्ञेची कमाल वाटते. मला तरी आतापर्यंत सर्वात आवडलेले हे वाक्य - After all this is not a bad prison; but I do not like this wall between my cell and the next prisoner's cell. Yet I assure you that, I do not wish to reapproach the warden nor the builder of the prison.

सुरेख अनुवाद ! जी. एं.च्या 'ऑर्फियस आणि युरिडिसी'ची आठवण झाली. शब्द्सौंदर्य म्हणजे काय हे जी. एं.च्या लेखनातून समजते. अनुवादही त्यांनी बरेच केले आहेत. आणखी विस्तृत अनुवाद येऊद्यात.

सुरेख अनुवाद झाला आहे. और भी आने दो. -दिलीप बिरुटे
व्हेरी व्हेरी स्पेशल निवृत्त झाला आता सचिन कधी निवृत्त होणार.

@स्नेहांकिता, कुठे जी एंचे भाषा सौंदर्य आणि कुठे प्रत्येक शब्दाशब्दा साठी फाफलत मी केलेला अनुवाद :P ....... पण प्रत्यक्ष खलील जिब्रान यांचा लेख असल्याने भाषासौंदर्याचे जर कोठे स्फुल्लिंग जाणवत असेल तर त्याचे श्रेय मूळ लेखास जाते. @बॅटमॅन, बिरुटे सर आभारी आहे.

आणि वरच्या प्रतिसादात दाखवलेल्या विनयाबद्दल आभार्स. (धनुर्धारी) दादा

भाषांतर खूपच आवडले. फक्त गूढर्भी शब्द कळला नाही. तो गूढगर्भी असा असायला हवा होता का? खलील जिब्रान मुळातच आवडतो. आणि निशेची संकल्पनासुद्धा. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' या कुसुमाग्रजांच्या ओळीची आठवण झाली. आपल्याकडे उषेचे ऋग्वेदातील किंवा कालीदासासह इतर काही संस्कृत कवींनी केलेले वर्णन असेच काव्यमय आणि कल्पनारम्य आहे.

@दाको - धन्यवाद @राही - होय तो शब्द "गूढगर्भी" असाच आहे. हा लेख वाचते वेळी मला बायरनच्या खालील ओळी आठवल्या - And all that's best of dark and bright, Meet in her aspect and her eyes; Thus mellow'd to that tender light,Which heaven to gaudy day denies.