मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदी व मराठी सुगम संगीतात तालांचे वैविध्य

प्रदीप · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'आर. डी. मल्हार' ह्या लेखात धागाप्रवर्तकाने ".....असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही" असे एक धाडसी व विषयावरील पुरेशी माहिती न घेताच विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देतांना चौकटराजांनी लिहीले .."[आर. डीं]. नीकिती वाद्ये , किती ताल वापरले याला गणतीच नाही". माझ्या माहितीप्रमाणे आर. डी. ने नेहमीचे केहेरवा, दादरा, खेमटा वगैरे तीन चार तालच वापरले आहेत, 'घर आजा, घिर आये' ह्या त्याच्या पहिल्याच गाण्यात रूपकचा सुंदर वापर आहे. तेव्हा अगणित ताल त्याने वापरलेले नाहीत. बहुधा चौकटराजांना ठेक्यातील अगणित वैविध्ये, अगणित व्हेरिएशन्स म्हणायची असावीत. वास्तविक कुठल्याही संगीतकाराने किती ताल वापरले ह्यावरून त्याच्या संगीत कारकीर्दीविषयी काहीही बरेवाईट म्हणता येत नाही. निव्वळ वैविध्य आणण्यासाठी कुणी अनेक ताल वापरेल, तर दुसरा कुणी ठराविक एकाददोन तालांतही बहार आणू शकेल. तेव्हा निरनिराळ्य तालांच्या वापरावरून काहीच अनुमाने आपण काढू नयेत. पण मग ह्यावरून मी सहज विचार करू लागलो--आपण ऐकलेल्या हिंदी व मराठी चित्रपट व इतर सुगम संगीतात विवीध तालांचा कितपत वापर केला गेला आहे? इथे मी ठुमरी, कजरी, होरी, टप्पा इत्यादी उपशास्त्रीय संगीताचा समावेश करत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे केहेरवा, दादरा हेच ताल प्रामुख्याने वापरले गेले आहेत. त्याव्यतिरीक्त एकताल, आध्धा (सितारखानी), तीनताल हे 'प्रमुख ताल' आहेतच. तसेच अधूनमधून रूपक, खेमटा, १४ मात्रांची दीपचंदी हेही ऐकू येतात. शंकर जयकिशन व दत्ताराम सोडून झपताल अन्यत्र फारसा कुठे ऐकू मला आलेला नाही. काहीकाही संगीतकारांचे काही विशीष्ट ताल आवडीचे होते-- जसे नौशाद - दादरा, मदन मोहन- रूपक. संगीतकार प्यारेलाल (लक्ष्मीकांत-प्यारेलाल द्वयींमधील) ह्यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आपण ११ मात्रांचा वापर एका गीताच्या अंतर्‍यात केला आहे, असे विधान केले होते. 'पलकों की छावों मे' चित्रपटातील 'कोई मेरे माथे पे' हे लताने गायिलेले गीत त्यांना अभिप्रेत होते. गीताचा मुखडा ५ मात्रांत आहे, आणि अंतराही ५ मात्रांतच फिरतो आहे असे मलातरी जाणवते. अंतर्‍याची बांधणी अत्यंत अवघड आहे, हे मात्र निश्चीत. असे गीत देणार्‍या, ते वाजवणार्‍या व गाणार्‍या सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच. पण तरीही तिथे ५.५ (अथवा ११) मात्रा नाहीत असे मला दिसते. तेव्हा ११ मात्रांचा दावा चुकिचा आहे. तेव्हा वर उल्लेखिलेल्या तालांव्यतिरीक्त अजूनही इतर तालांतील गाणी कुणाला माहिती असली, तर इथे कृपया त्यांविषयी लिहावे.

वाचने 9686 वाचनखूण प्रतिक्रिया 21

मनोज श्रीनिवास जोशी 22/07/2012 - 12:33
'आर. डी. मल्हार' ह्या लेखात धागाप्रवर्तकाने ".....असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही" हया विधानामध्ये मला विविध वाद्यांचा मेळ कोणाला जमला नाही असे म्हणायचे आहे- हे माझे वैयक्तिक मत आहे . मत भेद असणारच . चर्चा झाडू दे ! त्यामधून तुमच्या हया लेखा प्रमाणेच चांगले काही हाती लागेल. हया विधानाचा पुढचा भाग " कोणाला जमणार नाही " हे मात्र आपण म्हणता तसा धाडसी विधान ! हे मान्य करतो. बाकी आपला लेख आवडला. माझे ताल ज्ञान अत्यल्प आहे. पण मराठी सुगम संगीतामध्ये , नाट्यसंगीता मध्ये आणि भक्ती संगीतामध्ये धुमाळी हया ठेक्याचा वापर खूपच आहे.

चौकटराजा 22/07/2012 - 16:20
ताल म्हणताना केवळ हिंदुस्थानी तालांचाच विचार करून चालणार नाही . तालात वजन , निरनिराळे ठेके यांचाही विचार करायला पाहिजे . नाहीतर तीन एकक वाला दादरा व चार एकक वाला कहरवा सोडून आहे काय ?" असेच म्हणावे लागेल. मागे या तालांचा सोपेपणा हे त्याना सुगम संगीतात मानाचे स्थान मिळण्यास पात्र करतो अशा अर्थाचे विधान पं कुमार गंधर्वानीच एका मुलाखतीत केले होते. " तो गुण झपताल व रूपक या तालात नाही. " ( हे माझे अभ्यासकाचा आव आणून केलेले विधान आहे ) म्हणून हिंदी चित्रपट संगीतात आवाज देके व आसू भरी है येथपर्यंतच झपतालाची मजल गेली. रूपक ताल कधी ना कधीतरी श़ंकर जय, रवि, मदन मोहन एस डी बर्मन ,कल्या- आनं , एल पी , नय्यर यानीही वापरल्याचे स्मरतेय. काही संगीतकारांचे विशिष्ट ताल आवडीचे असे काही नसावे तर त्यानी जो बाज आपल्या संगीतासाठी स्विकारला त्याचा तो परिपाक आहे . उदा. ट्विस्ट- एस जे, मार्च - नय्यर, एल पी कहरवा, मदनमोहन रूपक ( गजलेसाठी खास ) .बाकी नय्यर नीही तीन ताल वापरला, तसा एस जे नी ही. एकताल ( दादर्‍याचा चुलत भाउ)एस जे नी वापरला तसा एस डी नी ही ! नुसत्या मात्रा म्हणजे ताल असा दृष्टीकोन माझा नसल्याने आर डी ला मी एक नंबर या बाबतीत दिला. त्यानी एकताल मात्र वापरल्याचे उदाहरण मला आठवत नाही .

In reply to by चौकटराजा

लॉरी टांगटूंगकर 23/07/2012 - 22:53
तालात वजन , निरनिराळे ठेके यांचाही विचार करायला पाहिजे . +1 http://www.misalpav.com/node/15337 ; http://www.manogat.com/node/20256 इथे अत्मत्रूप्त ने तबल्याबद्दल बरच लिहिलय,तात्या पण या विषयावर बरच लिहू शकतात,दोघांच्या पण लिहिण्याची वाट बघतोय......

In reply to by पैसा

जे.पी.मॉर्गन 23/07/2012 - 12:21
मिपावरच्या संगीतज्ञांनी ह्यात भर घालावी. काही शिंतोडे आमच्या अंगावर उडाले तरी पावन होऊ ! वाचतोय! जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

बिपिन कार्यकर्ते 24/07/2012 - 16:38
+२

चित्रगुप्त 22/07/2012 - 21:15
खूपच सुंदर विषय आहे हा. लेख सुरु होता होताच संपला, आणखी मोठ्या लेखाची अपेक्षा आहे. एकेका तालाच्या गाण्यांची उदाहरणे द्यावीत, ही विनंती. तसेच त्या त्या तालाचे बोलही दिले तर उत्तम. ऐकून पुष्कळ ताल परिचित असतात, पण हा रुपक, हा दीपचंदी वगैरे माहित नसते, वा लक्षात नसते. ठेका वा तालाचे एकूणच संगीतात (सौदर्य शास्त्राचे दृष्टीकोणातून) काय महत्व वा स्थान आहे, तालाचे अभावी व तालासह असल्याने काय फरक पडतो, वगैरेवर प्रकाश टाकावा. मला बरेचदा प्रश्न पडतो, की पाश्चात्य संगीतात कधीकाळी (उदा. ऑपेरा) ताल जवळजवळ नसायचाच. तालवाद्याच्या नावाने फक्त चेलो काय ते दिसते. हल्ली अतिरेक म्हणावा, इतका ताल-वाद्यांचा उपयोग असतो. यामागे काय कारण असावे? (गॅलिलिओचे वडील संगीतज्ञ होते, ते काल मापनासाठी 'लंबक' वापरीत, म्हणजे संगीतात काल-मापन होते, पण उघड 'ठेका' नव्हता) शांतपणे पडून ऐकण्याचे संगीत, संयमित- रेखीव हालचाली असलेले वॉल्ट्झ सारखे नृत्य - संगीत, पिसाट धिंगाण्यासारखे आधुनिक नृत्य-संगीत, असा पाश्चात्य संगीत-नृत्याच्या झालेल्या प्रवासाची कारणे काय असावीत? असेही प्रश्न आहेत. यावर तज्ञांनी सांगावे, ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 24/07/2012 - 00:02
समर्पक प्रतिसाद,
एकेका तालाच्या गाण्यांची उदाहरणे द्यावीत, ही विनंती. तसेच त्या त्या तालाचे बोलही दिले तर उत्तम. ऐकून पुष्कळ ताल परि चित असतात, पण हा रुपक, हा दीपचंदी वगैरे माहित नसते, वा लक्षात नसते.
जसे तालाबद्दल तेच सुगम व शास्त्रीय कंठगायन, वाद्यसंगीतीतील काही जागा, हरकती, संगीतातील विविध ठिकाणे दाखवून ऐकणाऱ्यांची जाण वाढवावी.

चौकटराजा 24/07/2012 - 09:49
ताल व उदाहरणे खालील प्रमाणे तीन ताल मधुबनमे राधिका नाचे रे दादरा - दिलकी आवाज बी सुन रूपक- घर आजा घिर आये दीपचंदी - आज कोई प्यारसे एकताल - केतकी गुलाब जुही आधा त्रिताल- झनक झनक तोरे बाजे पायलिया झपताल- आवाज देके हमे तुम बुलाओ कहरवा प्रकार १ - टूटे हुवे ख्वाबोने कहरवा प्रकार २- काली घटा छायी प्रेम रूतू आयी कहरवा प्रकार ३ ( दत्ताराम ठेका) चांद खिला वो तारे हंसे कहरवा प्रकार ४- चली गोरी पिके मिलनको चली कहरवा प्रकार ५- टुकडे है मेरे दिलके कहरवा प्रकार ६ - इस मोडपे जाते है मार्च - लाखे है यहाँ दिलवाले स्विंग- पुकारता चला हूं मै बसानोव्हा - मै बम्बईका बाबू नाम मेरा अंजाना डिस्को- टिप टिप टिप टिप बारीश शुरू हो गयी ट्विस्ट- नैन मिलाकर चैन चुराना रॉक - दम मारो दम संबा- मेहबूबा मेहबूबा बुगी - जो भी प्यारसे मिला हम उसीके हो लिये खेमटा- मै तो भूल चली बाबुलका देस वॉल्टझ - दिलकी गिरह खोल दो भजनी ठेका ( धुमाळी) - प्रिय प्राणेश्वरी यात एक उदाहरण राहिले आहे ते म्हणजे कालिया या चितपटातील " जहॉ बसी तेरी नजर है " हा ब्राझील च्या कारनिव्हाल मधे वाजवला जाणारा ताल आहे पण त्याचे नाव माहित नाही.

५० फक्त 24/07/2012 - 10:02
लई लई भारी धागा, फार जवळचा पण नीट मांडता न आलेला विषय. मला नाट्यगीतं आवडायला लागली ती केवळ आणि केवळ सोबतच्या तबल्याच्या साथीमुळं, माझ्याकडं ' प्रभु अजि गमला, मनी तोषिला' याचं एक व्हर्जन आहे, निव्वळ आणि निव्वळ सुंदर तबला आहे त्यात, मला तर ब-याच नाट्यगितांमध्ये तबला आणि सारंगी / हार्मोनियय यांच्या एकत्र आवाजातुन शब्द ऐकु येतात, नशा चढवणारी गोष्ट आहे ही माझ्यासाठी तरी.

चैतन्य दीक्षित 24/07/2012 - 10:14
छान विषय आणि चौकटराजा यांचा सोदाहरण प्रतिसादही आवडेश. मराठी सुगमसंगीताची उदाहरणे द्यायचा प्रयत्न करतो- एकताल- ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा/ मी राधिका/ घन रानी साजणा (बरीच आहेत) (बोल- धिं धिं धागे त्रक तुं ना, कत् तिं धागे त्रक धिं ना. १२ मात्रा त्रक च्या ऐवजी तिरकिटसुद्धा वापरतात. एका मात्रेच्या वेळेत वाजवणे महत्वाचे, इतकेच.) तीनताल- आज कुणि तरी यावे (बोल- धाधिंधिंधा, धाधिंधिंधा, धातिंतिंता, ताधिंधिंधा १६ मात्रा) दादरा- केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली (बोल- धाधीना, धातीना ६ मात्रा) अद्धा त्रिताल- माझिया मना जरा थांब ना/ ना मानोगो तो दोगी तोहे गारी (खरं तर हे मराठी नाहिये) (बोल- त्रितालाचं वजन थोडं वेगळं येतं. मला बोल नीट लिहिता येत नाहियेत, जाणकारांनी लिहावेत. १६ मात्रा) रूपक- राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे (बोल- तीतीना धीनाधीना- ७ मात्रा) झपताल- घेई छंद मकरंद (अभिषेकी बुवांनी गायलेली चाल) (बोल- धीनाधीधीना, तीनाधीधीना १० मात्रा) दीपचंदी- तुला पाहिले मी नदीच्या किनारी (?- थोडी शंका आहे की हा दीपचंदी म्हणता येईल का?) (बोल- धाधिं~धागेतिट, तातिं~धागेतिट- १४ मात्रा) श्रीधर फडकेंनी गायलेल्या 'मन मनास उमगत नाही' या गाण्याचा ताल केहरवा समजावा काय?

In reply to by चैतन्य दीक्षित

चौकटराजा 24/07/2012 - 12:26
कहरवा हा ताल अफाट बेफाट आहे. तो एकूण ५० ते साठ प्रकारच्या वजनानी वाजवता येतो. असे ऐकिवात आहे. मार्च या तालाचे अचाट मिश्रण मेरे सनम मधील " जाईये आप कहा " मधे आहे. तर सावन आये या ना आये यात तीनताल व कहरव्याचे .पंजाब व मह्राराष्ञीय लोकसंगीताचा कणाच कहरवा हा ताल आहे. उदा पोवाडा व भांगडा यांचे ताल पहा. सहज गंमत - मन मनास गातातना श्रीधर फडके ज्या प्रमाणे वर खाली होतात त्यातूनच केरव्याचे प्रकटीकरण होते.

मस्त कलंदर 24/07/2012 - 10:27
सही चाललंय... हे असंही काही असतं हे फक्त त्याचं अस्तित्व इतकंच माहिती होतं... माझ्यासारख्या कानसेनाला यात गम्य नसलं तरी वाचायला मजा येतेय आणि त्यानिमित्तानं खूप दिवसांत न ऐकलेली गाणे पुन्हा आठवताहेत हे ही छानच. वरच्या प्रतिक्रियांवरून तबल्याच्या जाणकारांना यात विशेष गती असावी असं वाटतंय.

चौकटराजा 24/07/2012 - 12:41
सुगम संगीतात लयीला पण फार महत्व आहे . उदा " अर्थशून्य भासे मज हा " हे गाणे घ्या . ते वैयर्थ व्यक्त करणारे आहे . माणूस खुषीत असतानाच जास्त लयीला जवळ करतो. ( उदा तारीफ करू क्या उसकी चा शेवट) .यात अभिषेकी बुवानी लय संथ करून तो हेतू साध्य केला आहे तीच गोष्ट चैन से हमको कमी या गीताची . ( संथ लय ) . नौशाद मियानी हे गीत केले- दो हंसोक जोडा बिछड गयो रे . हे गीत अर्थाने दु:खाचे आहे पण मध्य लय वापरल्याने त्यावर पिटातलं पब्लिक मस्त टाळयांचा ठेका पकडून गीत एन्जॉय करते. ( नौशाद मिया फेल ) यशोदा या मराठी चित्रपटात " घुमला गगनी नाद हा " हे गीत आहे. त्यात सुमारे पाच सहा कडवी आहेत व प्रत्येक कड्व्याचा ताल व राग वेगगेगळा आहे.

चैतन्य दीक्षित 24/07/2012 - 13:02
या गाण्याचा ताल कोणता? यूट्यूबवरच्या कुठल्याशा दुव्यात त्याचं नाव 'नादवेध' असं वाचल्याचं स्मरतंय. दादराच वेगळ्या वजनात वाजवलाय असं वाटतं पण पखवाजावर वाजवला असल्याने नीत समजत नाही. डोर सिनेमातल्या 'केसरिया बालम' चंही तसंच काहीसं. तो एकताल आहे (मात्रांच्या हिशोबात) पण वाद्य वेगळं, वजन वेगळं असल्याने लवकर समजत नाही.

प्रदीप 26/07/2012 - 19:15
एक किल्ष्ट विषय म्हणून तबला अथवा तत्सम र्हिदम वाद्यांशी संबंध नसलेले अथव दुरूनच असलेले वाचक बाद, आणि फिल्म संगीताची पाश्वभूमि-- म्हणून सोंवळ्यातले puritans बाद--- असे असूनही बराच उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या धाग्यास लाभला. त्याबद्द्दल सर्वांचे आभार. माझा चर्चाप्रस्ताव हिंदी व मराठी चित्रपट संगीत, व इतर सुगम संगीत ह्यांत केहेरवा, दादरा, आध्धा, तीनताल, दीपचंदी, खेमटा... ह्या रूळलेल्या भारतीय तालांव्यतिरीक्त इतर कुठले वापरले गेले आहेत, हा होता. अनेकांनी कुतुहूलाने तालांविषयी सोदाहरण माहिती देण्याची विनंती केली आहे, ती ह्या धाग्याच्या स्कोपबहेर असल्याने इथे तसे न देता त्यासाठी वेगळा धागा काढणे उचित ठरेल. चौकटराजांनी "नुसत्या मात्रा म्हणजे ताल असा दृष्टीकोन माझा नसल्याने..." असे सुनावले आहे. थोडाफार तबला सोलो मी अनेक वर्षे एका चांगल्या गुरूजींकडे शिकल्याने तबला माझ्या डोक्यात, हातात आहे, तेव्हा माझी तालाची समज अगदी खूप पक्की नसली तरी त्यातील वजन समजूच नये, व नुसताच मात्रांचा हिशेबच व्हावा, इतकी बाळबोधही नाही. माझा चर्चाप्रस्ताव पुन्हा वाचून पाहिल्यावरही मी तशा अर्थाचे काही लिहीयाचे मला जाणवले नाही. तरीही तसा कुणास त्यातून अर्थ निघत असेल तर तो माझा लिखाणदोष समजून सुधारून घ्यावा. चौकटराजांनी पाश्चिमात्य संगीतातील वॉल्त्झ इत्यादी तालांचा उल्लेख केला आहे तो पटला. वर उल्लेखिलेल्या संगीतात त्यांचाही वापर अनेकांनी केला आहेच. तसेच दादरा, केहेरवा अशा कमी मात्रांचे ताल लोकसंगीताशी निगडीत चित्रपट व तत्सम सुगम संगीतात प्रामुख्याने वापरले जाणार, हेही खरेच. रूपकचा वापर हिंदीमध्ये विशेषतः मदन मोहनने बराच केला आहे. हा एक, दादरा व केहेरवा ह्यांच्या मानाने कठीण, पण गुणी ताल. 'है इसी मे प्यार की आबरू' चा प्रील्यूड किती लयीशी खेळत गेला आहे, पहा! झपतालाचा वापर असलेली चौकटराजांनी सांगितलेली गीते आहेतच, पण अजूनही काही आहेतः 'भय भंजना' |बसंत बहार | शंकर जयकिशन 'घायल हिरनीया' | मुनिमजी | दादा बर्मन 'कहाँ जा रहा है" |सीमा | शंकर जयकिशन 'मासून चेहरा"| दिल तेरा दिवाना| शंकर जयकिशन 'सवेरे का सूरज तुम्हारे लिये है' |एक बार मुस्करा दो | ओ. पी. नय्यर 'शराबी शराबी ये सावन का मौसम' | नूर जहाँ | रोशन 'तुम्हे जिंद़गी के उजाले मुबारक' |पूर्णिमा | कल्याणजी- आनंदजी मात्र अशा तर्‍हेने --
तालात वजन , निरनिराळे ठेके यांचाही विचार करायला पाहिजे .
कहरवा हा ताल अफाट बेफाट आहे. तो एकूण ५० ते साठ प्रकारच्या वजनानी वाजवता येतो.
---ताल, ठेका व लग्गी ह्यांत गफलत करणे चुकिचे आहे. ह्यांविषयी थोडे शब्दांकन करण्याचा इथे प्रयत्न करतो-- ताल म्हणजे एक विशीष्ट संख्येच्या मात्रांत बसवलेल्या बोलांचे, स्वतःचे वजन असलेले आवर्तन होय. ह्या वजनात बोलांच्या पॅटर्नचा (उदा. दादरा ३-३ पॅटर्नचा आहे)विचार आहे, तसेच 'खाली- भरी'चाही आहे. ('भरी' म्हणजे दायाँप्रमाणे बायाँवरही वाजवलेले गेलेले बोलः--- भरलेले, भरीव बोल. उदा. धा, धीं, धाग् वगैरे. 'खाली' म्हणजे जे बोल फक्त दायाँवरच वाजवले जातात [-- सूक्ष्मार्थाने हे विधान संपूर्ण बरोबर नाही, ह्या खालीवर बायाँही वाजवला जातो, पण तो भरीव नव्हे]. उदा. ता, तीं, तिक वगैरे). प्रत्येक तालाचे बोल ठरीव आहेत, त्यात फारसे व्हेरिएशन नाही. सर्वसाधारणपणे कमी मात्रांचे ताल-- केहेरवा व दादरा-- मूळ बोलांबरहुकूम न वाजवता,त्याऐवजी तालाचे वजन (मुख्यत्वे पॅटर्न) तसेच ठेऊन त्याच्या अनुषंगाने काही बोलांची construct वाजवतात. हा झाला त्या तालाचा ठेका. उदा. केहेरवा ह्या तालाचे बोल आहेत " धागेनतिनाकधिन". पण हा ताल असाच्या असा क्वचितच वाजवला जातो. अनेकदा, ह्याचा ठेका "धीगीधित्ता नकधिना" अथवा "धा धींत् , नाक धीन" (आठवा: सावन का महिमा पवन करे शोर!) असा वाजवला जातो. ही केवळ दोन उदाहरणे दिली आहेत, असे अनेक ठेके केहेरव्याचे तसेच दादर्‍याचे आहेत. तालाचे तसेच त्यांच्या ठेक्यांचे बोल काही अंशी 'प्रमाणित' आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. ताल धरण्यासाठी तालाचा ठेका गाण्यामागे सतत वाजवला जातो. पण मग अधूनमधून, काही विशीष्ट जागांवर, कधीकधी संपूर्ण ओळी- दोन ओळींवर त्याची व्हेरिएशन्स केली जातात. ही असतात त्याची embellishments. ह्यांना लग्ग्या म्हणतात. केहेरव्याचे उदाहरण द्यायचे तर 'धा तीं ता क्ड, ता धीं धा धाग', "धा धीं धा धीं |धा तीं ता ता| ता तीं धा धीं| धा धीं धा धा", " धेत्ताधाग धेत्तानाग", " धेत्तागेधीं तेत्तागेधीं" " धा ती तित्त ता, ना ति ति त्ता"... अशी अनेकानेक. ह्या लग्ग्या अगदी impromptu सहज वाजवल्या जातात. (कधीतरी ह्याविषयी वेगळ्या धाग्यावर सोदाहरण लिहीन). तेव्हा तालाचे अनेक ठेके आहेत, त्यात अनेकनेक लग्य्ग्या बांधलेल्या आहेत म्हणून ह्यांना काही त्या 'तालाचे वेगळे प्रकार' समजले जात नाही. आविष्कार वेगळे, पंण (canonical) ताल एकच. म्हणून 'केहेरव्याचे पन्नास प्रकार' म्हणजे वेगवेगळे ताल हे बरोबर नाही. तसे म्हणायचे झाले तर तालवादक व संगीतकाराने त्यांना दिलेली मुभा ह्यांच्य मुळे, अनेकानेक गाण्यांत प्रत्येकी तीन- चार तरी 'ताल' आहेत असे म्हटले जावे! चैतन्य दिक्षीतांनी 'गगन सदन तेजोमय' चा उल्लेख केला आहे, तो छान व धागाविषयाशी संबंधित आहे. पखवाजावर जे काही वाजवले आहे, ते १२ मात्रांचे आवर्तन आहे असे मला वाटते. ( ३-३- १- ५) " धा धीं धा | धा तीं ता | S | कत तेटेकत गदिकन" ह्या तालाचे नाव ठाऊक नाही. का कोण जाणे, मला तर हे गाणे एकतालात असावयास हवे होते असे वाटते. पण ते तबल्यावर दादर्‍यात घेतले आहे, ते थोडे रसभंग करणारे आहे.
तुम्ही तालांचे इतके विविध प्रकार ठेक्यांच्या व्हेरिएशन्स सह दिलेले आहेत, यातील प्रत्येकाचं उदाहरण ध्वनिमुद्रित स्वरुपात इथेच देऊ शकाल का? आणि प्रत्येकाबरोबर उदाहरणार्थ एखादं हिंदी/ मराठी गाणं देऊन तो ठेका नेमका कुठे आहे हेही दाखवू शकलात तर दुधात साखर! या धाग्यातून खूप काही आनंददायक शिकायला मिळेल या अपेक्षेने रोज या धाग्यावर चक्कर मारतो, हळूहळू का होईना, पण प्रतिक्रियांमधून नवीन माहिती मिळते आहे, तेंव्हा धाग्याबद्दल तुम्हाला, आणि चौकटराजा, चैतन्य दिक्षीत, अन्या दातार वगैरे प्रतिसादकांना धन्यवाद! ('तालभास्कर' देखील कधीतरी चक्कर मारतील अशी आशा आहे.)