Skip to main content

आजच्या राजकारण्यांचा महागुरू

लेखक शरद
Published on शनीवार, 26/05/2012
आजच्या राजकारण्यांचा महागुरू आजचा कोणीही राजकारणी पुढारी घ्या. तो काय करतो ? निवडणुका जवळ आल्या की मत मागावयास जनतेकडे जातो व भरपूर आष्वासने देतो. मते मिळून निवडून आल्यावर जनतेला विसरून जातो. त्याच्याकडे जाऊन " कामाचे काय झाले ? " विचारले की तो म्हणतो " पुढील वर्षी नक्की होणारच !" मग एकवचनी राहून हीच रेकॉर्ड परत परत लावतो व फारच अंगावर येते आहे असे वाटले तर दुसरे एखादे काम करून मुख्य विषय बाजूला सारतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे असेच का वागतात ? कारण त्यांचा महागुरू एकच आहे, हरिश्चंद्र. तुम्ही म्हणाल " ऑं, हे काय सांगता. आम्ही तर लहानपणापासून स्वप्नात दिलेले वचन खरे करणार्‍या हरिश्चंद्राची. गोष्ट ऐकत आलो आहोत. त्या करिता तो बायको-मुलगा यांना विकतो व स्वत: डोंबाकडे नोकरी पत्करतो. राजा रवीवर्मा यांचे सुरेख चित्र अजून डोळ्यासमोर आहे." बरोबर आहे, त्यावेळी तुम्ही लहान होता. आता मोठे झाला आहात ना ? मग ऐका तर "व्यवहारी" राजाची गोष्ट. राजा हरिश्चंद्राला मुल होत नव्हते. म्हणून त्याने वरुणाची प्रार्थना केली. वरुण म्हणाला "तुला मुलगा होईल पण तू मला त्याचा बळी दिला पाहिजेस." हरिश्चंद्राने विचार केला, मुल तर होऊ दे, मग बघू काय करावयाचे ते. त्याने कबूल केले व वरुणाच्या प्रसादाने त्याला मुलगा झाला. काही दिवस वाट बघून, बळी मिळत नाही असे पाहून वरुण आला व म्हणाला "काय झाले ?" राजा म्हणाला, "अजून मुलगा लहान आहे, दात येऊ देत, मग देतो की." "ठीक आहे" म्हणून वरुण गेला. काही दिवसांनी परत आला. अशाच काही सबबी काढून राजाने वेळ मारून नेली. बघता बघता मुलगा सोळा वर्षाचा झाला. हा इरसाल राजपुत्र बापाला म्हणाला " तुम्ही कोण मला बळी देणार ? मला नाही या घरांत रहावयाचे." तो घर सोडून गेला. वरुण आल्यावर राजा म्हणाला " काय करू, मुलगा घर सोडून गेला. त्याला कसे काय बळी देणार ?" वरुण भडकला. राजाला एक असाध्य रोग होण्याचा शाप देऊन निघून गेला. मुलगा घर सोडून गेला खरा पण त्याला राज्य सोडावयाचे नव्हते. त्याने विचार केला की आपल्या ऐवजी दुसरा एखादा पर्यायी बळी शोधू. चौकशी करता करता एक गरीब ब्राह्मण तिनशे गायी घेऊन आपल्या मुलाला विकावयाला तयार झाला. तो म्हणाला "मी मोठा मुलगा देणार नाही". त्याची बायको म्हणाली "धाकटे मुल आईला प्रिय असते. मी त्याला देणार नाही." मधला शुन:शेप म्हणाला "आपण निमुटपणे जावे हेच बरे". तो राजपुत्राला म्हणाला, "चल बाबा, मी येतो." त्याला घेऊन राजपुत्र राजधानीकडे निघाला. वाटेत एका मुक्कामात त्यांना विश्वामित्र भेटले. शुन:शेप रडत रडत त्यांच्या पाया पडला व म्हणाला " मला आईवदील नाहीत. त्यांनी मला विकून टाकले, आता तुम्हीच माझे वडील." विश्वामित्रांना दया आली. ते म्हणाले " या दोन ऋचा घे. बळी देण्याकरिता खांबाला बांधले की मग या म्हण." सगळे राजधानीत आले. राजपुत्राने बापाला सगळी हकिगत सांगितली. हरिश्चंद्राने वरुणाला बोलावून घेतले . म्हणाला "राजपुत्राऐवजी हा बळी घे." वरुणही म्हणाला, "ठीक आहे. मला क्षत्रीय बळी ऐवजी ब्राह्मण बळी चालेल." यज्ञाची तयारी झाली. शुन:शेपाला खांबाला बांधले. पण हा ब्राह्मण बळी द्यावयास कोणी तयार होईना. तेव्हा परत त्याच्याच बापाला बोलाविले व तोही आणखी तिनशे गायी घेऊन या कामालाही तयार झाला. पण यावेळी शुन:शेपाने विश्वामित्राने दिलेल्या दोन ऋचा म्हटल्या व त्याचे बंध गळून पडले. वरुणाने प्रसन्न होऊन त्याला सोडून दिले, राजाला रोगमुक्त केले व तो निघून गेला. शुन:शेपाचा बाप त्याला म्हणाला "चल आपल्या घरी, आपण आता श्रीमंत झालो आहोत." शुन:शेपाने नकार दिला व तो पुढे विश्वामित्रांचा मुलगा म्हणूनच ओळखला जाऊ लागला. बोला. हरिश्चंद्राने स्वताला व आपल्या मुलाला वाचवले की नाही ? त्या राजाचा कित्ताच आजचे राजकारणी गिरवतात, हो की नाही ? म्हणून मी हरिश्चंद्राला "महागुरू" म्हणतो. शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2674
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by JAGOMOHANPYARE

:) :) :) अजून काही उदाहणे दिलीत..राजकारण्यांशी नक्की कसा सम्बंध आहे.. ते कळेल.

हाहा :) दिलेल्या आश्वासनापासून पळ कसा काढावा याचा मूलमंत्र राजकारण्यांना हरिश्चंद्राने हजारो वर्षापूर्वीच दिला, असे म्हणावे काय ! :) अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

शरदजी, शुनःशेपाने बळी जाताना प्रजापतीचा धावा केला. प्रजापतीने त्याला अन्य देवतेचा धावा करण्यास सांगितले. असे करता करता अखेर उषादेवतेच्या प्रार्थनेनंतर त्याचे पाश गळून पडले व हरिश्चंद्राचा पोटशूळही बरा झाला. शुनःशेपाने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. विश्वामित्राने शुनःशेपाच्या हातून यज्ञ पूर्ण करुन घेतला. विश्वामित्राने शुनःशेपाचे नामकरण देवरात (देवांनी परत केलेला) असे केले. विश्वामित्राच्या ऋचांमुळे शुनःशेप मुक्त झालेला नाही. ही कथा ऋग्वेदात आहे.

मधल्याला दिले? एकुण मधल्या सार्‍याचीच अवस्था अशी असते का? मी पण मधलीच आहे. अन साधारण अनुभवही असाच काहीसा.