निजेला लॅपटॉप
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही. आम्हाला डेक्कन एक्सप्रेस अशी रिकामी पाहण्याची खरे तर सवयच नव्हती. डब्यात इतस्ततः काही माणसे बसलेली होती. गाडी काय रिक्कामी आहे. भरपूर झोपायला जागा. असे म्हणतोय... तेवढ्यात जरा मागे वळून पाहिले तर एक तरुण मुलगा चक्क लॅपटॉप उशाला घेऊन निवांत झोपलेला. दृश्य पाहायला जरा अभूतपूर्व आणि विस्मयकारकच होते.
गाडीने लोणावळा पार केले. तेव्हा मुलगा लॅपटॉप उघडून काम करतांना दिसला. म्हणजे लॅपटॉप नादुरुस्त नव्हता. दिखाव्याचा नव्हता. त्या आकाराचा रिकामा डबा नव्हता. तर खराखुरा, कामाचा लॅपटॉप होता. मुलगा त्यावर काम करतांना दिसत होता. मग डोक्याखाली का बरे घेतला असावा? डोक्याखाली घेण्याचे दोन फायदे मग माझ्या लक्षात आले. एक म्हणजे झोप लागली असतांना लॅपटॉप चोरीला जाण्याची भीती नाही. आणि दुसरा म्हणजे गाडी रिकामी असली तरी उशाला काय हो? म्हणून तोच कामी आला. मला कदाचित लॅपटॉपला काही होईल. किमान तो बिघडेल अशी भीती तरी वाटली असती. तो मात्र झोपलेला असतांना निर्घोर होता. खरे तर निवांत घोरत होता.
डोक्यात विचारचक्र सुरू झाले. पूर्वी प्रवासात भूक नाही तरी शिदोरी असावी म्हणून शिदोरी बांधून घेत आणि वाट चालता चालता जर थकवा आला तर एखाद्या झाडाखाली विश्रांतीला आडवे होत. म्हणूनच “भुकेला कोंडा, आणि निजेला धोंडा” अशी म्हणही तयार झाली. पुढे एक टोपीविक्या टोप्यांचे गाठोडे डोक्याखाली घेऊन झोपलेला असतांना, गुपचुप त्याच्या गाठोड्यातील टोप्या माकडांनी पळवल्याचेही त्याच्या लक्षात आलेले होते. म्हणजे डोक्याखाली घेतलेली वस्तू सुरक्षित राहतेच ह्याचीही काही खात्री देता येत नाही. मात्र सदरहू तरूणास तसली भीतीच नव्हती. एकतर गाडीत माकडे नव्हती आणि गुपचुप काढून घेता येतील असे सुटे भागही त्या लॅपटॉपला दिसत नव्हते.
बरे लॅपटॉपव्यतिरिक्त कुठले इतर सामानही त्याचेपाशी नव्हते. मला आश्चर्य वाटले. ऑफिस बॅग, शबनम, कपडे, किमान पाण्याची बाटली तरी असतेच की हो. मात्र त्याच्याजवळ तसले काहीच नव्हते. त्याच्याजवळ असलेली एकमेव वस्तू म्हणजे लॅपटॉप. तोच उशाला घेतल्यावर, निवांत विश्रांती. विश्रांती झाल्यावर त्यावरच पोहोचल्यानंतर करावयाच्या कामाची तयारी. काय सुटसुटीत जीवनशैली होती त्याची. मला त्याच्याबद्दल हळूहळू आदर वाटायला लागला. आम्हाला तळेगावला उतरायचे होते. तळेगाव आले. आम्ही उतरलो. तेव्हा तरी तो गंभीरपणे लॅपटॉपवर काहीतरी करतांना दिसत होता.
आता आम्ही बाहेर पडून आपल्या कामाला लागणार. तेव्हा त्याचा विचार मनातून काढून टाकायलाच हवा. जाता जाता एवढेच जाणवले की ’निजेला धोंडा’ पासून तर ’निजेला लॅपटॉप’ पर्यंत माणसाची प्रगती झालेली आहे, नाही का. कालाय तस्मै नमः!
वाचने
3234
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
अहो गोळेसाहेब असे कोणा अनोळखी व्यक्तीचे फोटो त्या व्यक्तीच्या नकळत विनापरवानगी पब्लिक फोरमवर कसे टाकता हो तुम्ही? निदान फोटो तरी काढा.
In reply to निदान हे फोटो तरी काढा by पुण्याचे वटवाघूळ
पुण्याचे वटवाघुळ साहेब,
अहो गोळेसाहेब असे कोणा अनोळखी व्यक्तीचे फोटो त्या व्यक्तीच्या नकळत विनापरवानगी पब्लिक फोरमवर कसे टाकता हो तुम्ही?>>>>>
http://www.misalpav.com/node/21278 हा दुवा पाहा. अशा प्रकारे मी अनेकांचे फोटो टाकलेले आहेत. पूर्व-परवानगी न घेता. अशा सर्व प्रसंगी आपण हरकत घेणार का? काय म्हणून?
असे करण्यात मला तरी मी काही वावगे करतो आहे असे वाटत नाही आहे. माझा हेतू शुद्दध आहे.
निदान फोटो तरी काढा. >>>> तरीही, मी आपल्या भावनेचा आदर करतो. म्हणून तो फोटो काढून टाकलेला आहे.
काका, त्या मुलाचे फोटो काढण्यासाठी आणि इथे ते चिकटवण्यासाठी त्याची परवानगी घेतली आहे का?
In reply to परवानगी ? by धन्या
धन्याशेठ,
काका, त्या मुलाचे फोटो काढण्यासाठी आणि इथे ते चिकटवण्यासाठी त्याची परवानगी घेतली आहे का?>>>> नाही.
http://www.misalpav.com/node/21278 ह्या दुव्यावरही मी डॉ.ओकांचा फोटो प्रकाशित करण्याकरता पूर्व-अनुमती घेतलेली नाही. तिथेही आपण हरकत घ्याल काय?
तरीही आपल्या भावनांचा आदर करून मी तो फोटो काढून टाकलेला आहे.
मला व्यक्तीशः तसा फोटो प्रकाशित करण्यात काही वावगे वाटत नाही, कारण माझा हेतू कुठल्याही प्रकारे त्या मुलाप्रती अनादर व्यक्त करण्याचा नव्हता, नाही आहे आणि असणारही नाही.
In reply to आश्यकता वाटली नाही! by नरेंद्र गोळे
http://www.misalpav.com/node/21278 ह्या दुव्यावरही मी डॉ.ओकांचा फोटो प्रकाशित करण्याकरता पूर्व-अनुमती घेतलेली नाही. तिथेही आपण हरकत घ्याल काय?तुम्ही असा लेख लिहिताना त्या व्यक्तीची लेखासाठी आणि फोटोसाठी परवानगी घेतली असेल तर उत्तमच. नसेल तरीही आक्षेप घेण्याचे काही कारण दिसत नाही. तो लेख डॉ. ओकांचे व्यक्तीचित्र आहे. डॉ. ओकांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे हा तो लेख लिहिण्याचा उद्देश आहे.
तरीही आपल्या भावनांचा आदर करून मी तो फोटो काढून टाकलेला आहे.यात माझ्या भावनांचा काय संबंध? परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते एका सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे हे चुक आहे हे माझे मत कुणालाही पटेल. उदया तुमच्या मुला-मुलींचे फोटो असे झोपलेले असताना वगैरे काढून नंतर त्यावर तत्वज्ञान मांडलं तर ते तुम्हाला आवडेल का?
मला व्यक्तीशः तसा फोटो प्रकाशित करण्यात काही वावगे वाटत नाही, कारण माझा हेतू कुठल्याही प्रकारे त्या मुलाप्रती अनादर व्यक्त करण्याचा नव्हता, नाही आहे आणि असणारही नाही.काही हेतू असो वा नसो, परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढून ते सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे चुक आहे आहे हो काका. :)
In reply to http://www.misalpav.com/node/ by धन्या
धन्याशेठ,
यात माझ्या भावनांचा काय संबंध? >>> तुम्हाला काही वावगे वाटल्याशिवाय का तुम्ही तो प्रतिसाद दिलात?
परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते एका सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे हे चुक आहे हे माझे मत कुणालाही पटेल. >>>> हे तुमचे मत आहे. मला ते पटलेले नाही.
उदया तुमच्या मुला-मुलींचे फोटो असे झोपलेले असताना वगैरे काढून नंतर त्यावर तत्वज्ञान मांडलं तर ते तुम्हाला आवडेल का?>>> ह्या लेखासंदर्भात बोलायचे झाले तर तो मुलगा माझाच असता तरी त्यात मला काही वावगे वाटले नसते. मात्र प्रत्येक लिखाणाबाबत असा निष्कर्ष सहज काढता येत नाही. सर्रास असे कुठले विधानही करता येणार नाही. निंदाव्यंजक आणि सरळसाधे वर्णनात्मक साहित्य यातील सीमा रेषा, दुर्दैवाने कित्येकदा काळ्या दगडावरील पांढ र्या रेषे इतकी स्पष्ट नसते.
लिखाण एकतर "वाईट" असते किंवा "चांगले". माझे लिखाण तुम्हाला "वाईट" वाटले असेल, चांगल्या अभिरुचीला सोडून, निंदाव्यंजक वाटले असेल तर मात्र अवश्य सांगा. तसे नसावे असा माझा समज होता. इतरांच्या प्रतिसादांवरूनही मला तसे वाटले नाही.
काळ बदलला आहे. लॅपटॉपला इंटरनेट, भ्रमनध्वनीला इंटनेट जोडलेले असल्यावर काम असो वा टाइमपास, वेळ असा निघून जातो. आपल्या सोबत सहप्रवास करणार्याला महत्त्वाचे काम असेल किंवा नसेल निजेला काळानुरूप त्यानं योग्य साधन निवडलेलं आहे. लॅपटॉप सांभाळणे एक जिकरीचं काम मला वाटतं. टॅब्लेट वगैरे मला त्यापेक्षा चांगला पर्याय वाटतो. अर्थात वापरत नसल्यामुळे त्याचे फायदे तोटे माहिती नाहीत. लॅप्टॉप समोर बसल्यानंतर गालातल्या गालात हसणारे, खो-खो, धो-धो हसणारे, गंभीर होणारे, अस्वस्थ होणारे असे काही नमुने सतत आजूबाजूला कधीतरी दिसत असतात. बाकी, काही असो, प्रसंग मात्र चांगला चिमटीत पकडला आहे.
-दिलीप बिरुटे
शिवाय लॅपटॉप हा तसा कठीण आणि मानेला आधारासाठी आवश्य्क तेवढाच जाड असल्याने मान लचकण्याची वगैरे भीती नको. फक्त धन्या आणि वटवाघूळ म्हणतायत तसा तिर्हाईताचा फोटो इथे ठेवण्यापेक्षा फोटोची लिंक द्यावी का?
बिरुटे सर आणि पैसाताई आपल्या प्रतिसादांखातर मन:पूर्वक धन्यवाद!
In reply to प्रतिसादांखातर मन:पूर्वक धन्यवाद! by नरेंद्र गोळे
फक्त तुम्हाला चांगले वाटणारे प्रतिसाद देणार्यांचेच आभार मानता का? :)
In reply to फक्त तुम्हाला चांगले वाटणारे by धन्या
नाही. आभार प्रत्येकच प्रतिसादकांचे मानायला हवेत.
असेल कोणीतरी रात्रभर हापिसात काम करुन घरी चालेल्ला आय टी वाला. आता तरी इतरांना कळेल आय टी मध्ये काम करणे म्हणजे केवळ ए सी मध्ये बसुन टाईम पास करणे नाही. ;-)
In reply to असेल कोणीतरी by कुंदन
कुंदन, प्रतिसादाखातर धन्यवाद.
तुम्ही आय. टी. वाले नाही नं?
In reply to तुम्ही आय. टी. वाले नाही नं? by नरेंद्र गोळे
लॅपटॉपशिवाय काहीही सामान न घेता प्रवास करणारी व्यक्ति बघून आश्चर्य वाटले.
पब्लिक फोरमवर फोटो डकवण्याबद्दलः यात काहीही गैर नाही, जोवर एखाद्याची विनाकारण बदनामी होत नाही तोपर्यंत. बाकी चालूद्यात.
In reply to लॅपटॉपशिवाय काहीही सामान न by अन्या दातार
जोपर्यंत वाईट काही लिहिलं नाही तोपर्यंत त्याला प्रसिद्धी मिळतेय फुकटची ना!
In reply to हाहा! by पैसा
जोपर्यंत वाईट काही लिहिलं नाही तोपर्यंत त्याला प्रसिद्धी मिळतेय फुकटची ना!>>> नाही आता नाही मिळायची.
In reply to लॅपटॉपशिवाय काहीही सामान न by अन्या दातार
अन्या दातार, प्रतिसादाखातर धन्यवाद.
लॅपटॉपशिवाय काहीही सामान न घेता प्रवास करणारी व्यक्ति बघून आश्चर्य वाटले.>>> खरेच. मलाही वाटलेच होते.
पब्लिक फोरमवर फोटो डकवण्याबद्दलः यात काहीही गैर नाही, जोवर एखाद्याची विनाकारण बदनामी होत नाही तोपर्यंत. बाकी चालूद्यात.>>> मीही याच मताचा आहे.
अरे हा धागा लॅपटॉपचा आहे का धन्यवादांचा ?
निदान हे फोटो तरी काढा