Skip to main content

कावळे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 22/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कावळे मला आवडतात . काळ्या रंगाचे दिमाखदार कावळे खरेच सुंदर शुभ्र वाटतात . पहाटे पहाटे कावळ्यांची कावकाव मला ऐकू येते नि माझी झोप उघडते. खूप छान प्रसन्न वाटते. कधीतरी कोंबड्याची बांग पण ऐकू येते . कोठे कोंबडा असतो किंवा नसतो पण कावळा मात्र सतत असतो .मनाच्या फांदीवर बसलेला असतो. कोठेही जा कोणत्याही गावी जा.कावळा दिसत नाही असे कधी होत नाही . कावळा दिसला की आपल्याला खरेच खूप बरे वाटते. कावळे दिसावयास सारखेच असतात त्यांचा आवाज एक असतो. त्यांचा रुबाब सारखाच असतो. परक्या गावात कावळा दिसला की आपल्याला कोठेतरी अगदी आपलेपण भेटून जाते आणि मग ते गाव आपल्याला आपलेसे वाटू लागते माझ्या गावी मी खूप वर्षांनी गेलो. कावळे चिमण्या अगदी मला आपल्या वाटल्या. ज्या गुलमोहराच्या झाडावर कावळा बसला होता. तो तिरपी मान करून माझ्याकडे बघत होता. केवढेतरी कुतूहल नि आपुलकी त्याच्या डोळ्यात मला दिसत होती. माझी माणसे देखील मला परकी परकी वाटून गेली त्यांच्या त्यांच्या नजरेतील परकेपण मला डसून गेले ...का गेले कुणास ठाऊक. ..? मला ह्या कावळ्याची जाणीव झाली ती बाहेर परदेशी असताना . त्या थंड प्रदेशात मला कधी कावळ्या चिमणीचा आवाज नाही ऐकू.आला. त्यामुळे मला विलक्षण चुकल्या चुकल्या सारखे नि उदास उदास वाटत होते . मग मला निरनिराळ्या रूपातील कावळे आठवू लागले , जाणवू लागले .दिसू लागले. त्यांच्या विरहामुळे मला त्यांचे सौंदर्य जाणवू लागले कधी कधी छान पाउस पडून जातो .सकाळची वेळ असते . पाण्याची छोटी छोटी तळी साचलेली असतात . त्या पाण्याच्या भिंगात आभाळ उतरलेले असते. दोन-चार कावळे.डबक्याभोवती मस्त झुलत असतात . कोवळ्या प्रकाशात अगदी छान दिसत असतात. असे छान चित्र माझ्या डोळ्यासमोर सतत येत असते . ते दृश्य बघून,आठवून मला खूप छान वाटत असते . कावळे म्हणजे कबुतरे किंवा पारवे नव्हेत.कबुतरे तरी आपली होऊन जातात पण पारवे कधीच आपली होत नाहीत. कावळ्यांचा तसा मुळीच काही त्रास नसतो. बाहेरच्या बाहेर ती कावकाव करीत असतात पारवे मात्र सरळ घरात घुसतात.माळ्यावर घरटी बनवतात त्यात अंडी घालतात. दिवसभर तुमचा जीव नकोनकोसा करून तुम्हाला हैराण करून सोडतात कधी हॉलमध्ये फिरणार्या पंख्याला थडकतात .जखमी होतात .कधीकधी मरून जातात. नि तुमचे मन उदास करून टाकतात सभ्य आणि सुसंस्कृत असतात कावळे. ते कधीही तुमच्या घरात घुसत नाहीत. स्वतः अतिशय मेहनत करून काडी काडी गोळा करून आपले घर बांधतात .अंडी घालतात. अंडी घातली की मात्र ती फार आक्रमक होतात. तुम्ही त्यांच्या घरट्या जवळून गेलात तर ती प्रचंड कावकाव करतात मग ते झडप देखील मारून तुम्हाला सळो की पळो करून सोडतात विणीच्या हंगामात फार आक्रमक बनतात ही मंडळी एवढे मात्र खरे आहे स्वताच्या घरट्याला,अंड्याला झेड सुरक्षा प्रदान करतात कावळ्यांची घरटी बघणे म्हणजे एक संशोधनाचाच विषय आहे. घरट्यासाठी काय काय गोळा करतात हे बघणे म्हणजे आपण थक्क नि थक्क होऊन जातो . झाडावर काड्यांनी घरे बांधतात. हे समजू शकतो. परंतु कोठून कोठून लोखंडी तारा गोळा करून अगदी मजबूत घरटी बनवलेली पण मी बघितली आहेत कधी कधी मी धान्य गोदामाच्या फलाटावरून सहज फिरत असायचो तेव्हा फलाटावरच्या छतावर पत्र्याला ज्या लोखंडी पट्ट्यांनी आधार दिलेला असतो त्या पट्ट्यांच्या बेचक्यात कावळ्यांनी लोखंडी तारांनी जी घरे बनवलेली असतात ती म्हणजे मोठी मजबूत किल्लेच वाटत असतात ह्या लोखंडी तारा कोठून आणतात ह्याचे मला खूप नवल वाटत राही.मग लक्षात आले की जवळच स्टील यार्ड होते तेथून ही कावळे मंडळी तारा गोळा करून त्याची भक्कम घरटी बनवतात. घरट्या नि अंड्याबाबत कावळे एवढी संवेदनशील का असतात हे मात्र मला खरेच कधी समजलेले नाही. कावळ्यांना कोणी मारीत नाहीत . खाणे तर फार दूरची गोष्ट आहे.त्यांची अंडीपण कधी कोणी पळवतो हे पण कधी दिसलेले नाही. मग त्यांना असा का संशय यावा नि ती एवढी का भावूक होतात हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे . अतिशय रोखठोक असतात कावळे. जोड कावळा दिसला तर अगदी अपशकून मानतात . माझ्या एवढ्याशा चतकोर आयुष्यात असे दृश्य कधी नजरेस पडले नाही अतिशय स्वच्छता ठेवणारी ही जमात आहे. कधी कोठे उंदीर मेला तर त्याला मटकावून टाकतात. आणखीन काय काय करतात हे आपणच आठवून बघा. मग आपल्याला त्याचे महत्व समजेल. कावळे कसेबसे उडत असतात . उडायचे म्हणून उडत असतात . उडता उडता पडतील की काय असे सारखे वाटत असते. उडताना त्यांच्या अंगात नुसता आळस नि आळस भरलेला असतो. असे मला तरी वाटत असते. कावळे कधीच एकत्र उडत नाहीत. दोन-चार कावळे एकमेकाचा पाठलाग करीत उडत असतात . पाठलाग करतात की काय करतात हे मला न उलगडणारे कोडे वाटते. त्यांच्या उडण्यात लय नसते .कोणीतरी कागदाचा बोळा भिरकावा तसे त्यांचे उडणे वाटत असते. कावळे कुणावर तरी चाल करून जातात तेव्हा ते एक असतात . ते सावजावर नेटाने हल्ला चढवतात .त्याला जेरीस आणतात. जीव नकोसा करतात . कावळे एकत्र उडत नसले तरी त्यांच्या सभा बघाव्या. गोल राउंड करून कावळे कसे शांत उभे असतात. तेव्हा ते खरोखरच बघणीय असतात कावळे फांदीवर बसतात .खिडकीवर येऊन बसतात . कावकाव करीत राहतात. कसलातरी शकून देत राहतात . काऊ तोहे कोकताये शकून तोगे मागताये चल चल गे काऊ तुझे सोन्याने मढविन पाउ खुद्द ज्ञानेश्वरांनी कावळ्याचे कौतुक केले आहे. आपल्या शब्द रत्नात त्यांना अमर करून ठेवले आहे आपण मात्र पिंडदानाच्या वेळी त्याची आठवण काढतो. सतत कावळ्याच्या अस्तित्वाने कावळ्याची किंमत आपल्याला नगण्य वाटत असते ..? कावळा आपल्या खिजगणतीत नसतो . एवढे मात्र खरे कावळ्याची आठवण येते ते पिंडाच्या दिवशी. पिंडाला कावळा शिवावा म्हणून आपल्या जीवाचा आकांत होत असतो. . कधी कधी कावळा पिंडाला मुळीच शिवत नाही. तेव्हा धाय मोकलून रडणारी माणसे मी बघितली आहेत. शिळंधार पाऊस पडून गेला होता नाशिकला कोठावर आजोबांच्या दशक्रियेचा कार्यक्रम होता आम्ही सगळे तेथे हजर होतो. सकाळची वेळ. आभाळ गच्च भरून आलेले. पाउस कधीपण कोसळू शकतो असे वातावरण प्रकाशा ऐवजी काळोखच खाली सांडत होता एवढ्या आभाळ भरल्या आभाळातून कावळा कसा अवतरणार..? काहीच कळत नव्हते.अगदी अशक्य वाटत होते. कावळा कोठेपण नजरेस पडत नव्हता. परंतु मामा जसा पिंडाजवळ येऊ लागला तसा एक कावळा अचानक झाडाच्या खालच्या फांदीवर येऊन बसला .पिंड ठेवताच कावळा चटकन खाली झेपावला नि त्याने पिंडाला चोच मारली .सगळ्यांचे डोळे पाण्याने भरून आले. हे सगळे दृश्य मी ह्याची देही ह्याची डोळा बघितले आहे. नंतर मात्र तो कावळा गायब झाला नंतर एक छोटा मुलाने पिंड ठेवल्यावर मात्र कावळा मुळीच आला नाही. आजोबांनी खूप दिवस काढले होते. नि त्या छोट्या मुलाचे वडील अपघातात गेल्याचे समजले होते... कावळा पिंडाला शिवावा म्हणून हात जोडून प्रार्थना करणारी माणसे मी बघितली आहेत. दर्भाचा कावळा करून टोच मारून घेणारी बघितली आहेत. पहाटे पहाटे किंवा सकाळी एखादा माणूस कावळ्याला पोळीचे तुकडे देताना मी बघितला आहे .तो माणूस दिसला की कावळे कोठल्या तरी अदृश्य शक्तीने कोठूनतरी येऊन त्याच्या मागे उडत राहतात.असे वीस-वीस कावळे मी बघितले आहेत .त्याच्या भोवती हलके हलके उडत वरच्यावर तुकडा झेलीत तरंगत राहणारी ही कावळे मंडळी मी बघितली आहेत. त्याला काहीही त्रास न देता त्याची छत्री होऊन त्याच्यावर सावली होऊन उडताना मी बघितली आहेत .. हे दृश्य मी खूप दिवस बघतो आहे.आणि ह्या दृश्याने मी अगदी भारावून जात आहे. नि त्यांच्यासाठी ओंजळभर प्रार्थना करतो आहे....!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2203
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काऊ तोहे कोकताये शकून तोगे मागताये चल चल गे काऊ तुझे सोन्याने मढविन पाउ
पैल तो गे काऊ कोकताहे शकून गे माये सांगताहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ

चिऊ आणि काऊ दोघांचीही आठवण पाठोपाठ आली!