Skip to main content

वैष्णवेर क्रियामुद्रा....*

वैष्णवेर क्रियामुद्रा....*

Published on शुक्रवार, 16/12/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
भारताच्या ईशान्य भागातील त्रिपुरा प्रदेशामध्ये अनेक वर्ष राजेशाही होती. गेल्या शतकामध्ये तिथे श्रीवीरचन्द्र माणिक्य यांचं राज्य होतं. महाराज वीरचन्द्र हे एक निराळंच व्यक्तिमत्व होतं. महाराज आचार-विचाराने वैष्णव होते. त्यांच्या घराण्यामध्ये गौर संप्रदायी भक्तीची परंपरा होती. राजकार्य करत असूनही ते यथाशक्ति यथासंभव भगवत् भजन करायचे. त्यांच्या राज्यकारभारावरही वैष्णव पद्धतीचा पगडा होता. ते स्वतःला विष्णुंचा प्रतिनिधी मानून कारभार करायचे. प्रजेवर पुत्रवत् प्रेम करायचे आणि कायम तिच्या क्षेमकुशलाची चिंता वाहायचे. त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूप प्रेम करायची. यथा राजा तथा प्रजा या उक्तीनुसार त्या काळी त्रिपुरा प्रदेशच वैष्णव आचार-विचाराचं एक उत्तम केन्द्रच बनला होता. महाराज वीरचन्द्र वरचेवर मथुरा-वृंदावनात यात्रेसाठी फेरी टाकायचे. तिथे त्यांच्या राजवाड्यामध्ये राहून वैष्णवांच्या गाठीभेटींचा आनंद घ्यायचे. तिथे ब्रजवासी वरिष्ठ वैष्णव साधुंबरोबर त्यांच्या इष्टगोष्टी व्हायच्या, तिथे वैष्णवग्राह्य विषयांवर सिद्धान्तचर्चा व्हायच्या, तिथेच भागवत सप्ताह साजरे व्हायचे आणि तिथेच तासन् तास नामसंकीर्तन यज्ञ संपन्न व्हायचे. महाराज वीरचन्द्र आपल्या राज्यकारभाराच्या रुक्ष जीवनक्रमामधून जणु अशा प्रकाराने व्यतित केलेल्या वृन्दावनवासातून नवसंजीवनीच प्राप्त करायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की राजकारण आणि समाजकारण योग्य प्रकारे साधण्यासाठी हरिकथा आणि श्रीकृष्णाभिमुख वैष्णव परिचर्या हे अगदी सिद्धौषधी रसायनांचेच कार्य करतात. महाराज वीरचन्द्रांच्या अशाच एका वृन्दावन निवासाच्या दिवसांमध्ये ते आपल्या राजवाड्याच्या दुसर्‍या मजल्यावरील एका दालनामध्ये आपल्या काही मित्रांसह गप्पागोष्टी करत होते. महाराज नुकतेच वाड्यावर दाखल झालेले असल्यामुळे बाहेर व्हरांड्यात अजूनही काही सामान शिल्लक होतं जे सामानाच्या खोलीमध्ये ठेवणं बाकी होतं. त्या सामानामध्ये इतर पेटार्‍यांबरोबरच थैलीमध्ये एक मौल्यवान शाल होती. वृन्दावनामध्ये हजारोंच्या संखेने वानरं आहेत. अनेक घरांच्या आणि वाड्यांच्या छतांवरून - छज्ज्यांवरून वानरांच्या टोळ्या फिरत असतात. झुण्डीने चालणार्‍या मर्कटलीला तिथे अनेकदा बघायला मिळतात. तर अशाच एका वानराला नेमकी तीच शाल दिसली आणि प्रचंड वेगाने उड्या मारून त्याने त्या शालीवर झडप घातली. आजुबाजुच्या सेवेकर्‍यांच्या लक्षात येईपर्यंत ते वानर शाल घेऊन वाड्यासमोरच्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलं. सेवेकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी ते महाराजांचे खाजगी सचिव राधारमण घोष बाबूंना सांगितलं आणि त्याबरोबर सगळेच ती शाल परत मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. त्या झाडाखाली उभे राहून सेवेकरी वानराला भिववण्याचा प्रयत्न करत होते, त्याला वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे आमिष दाखवत होते पण ते वानर कशालाही भुलत नव्हतं आणि ती शालही सोडत नव्हतं. बाहेरचा आरडा ओरडा आणि गोंधळ ऐकून महाराज वीरचन्द्र स्वतः दुसर्‍या मजल्यावरच्या छज्ज्यावर आले. कर्मधर्मसंयोगाने महाराज आणि ते वानर दोघेही एकाच दृष्टीपातळीवर एकमेकांसमोर आले. महाराजांनी सगळी परीस्थिती पाहिली. त्या वानराची अन्नाच्या प्रलोभनाची मूळ प्रवृत्ती तेव्हा जणु लुप्तच झाली होती. सेवेकर्‍यांनी दाखवलेल्या आमिषांना न भुलता आणि वेगवेगळ्या दबावतंत्रांना न जुमानता शाल हातात घेऊन ते वानर एकदा महाराजांकडे बघायचे आणि दुसर्‍या क्षणाला आपल्या तीक्ष्ण दातांनी त्या शालीच्या चिंध्या करायचे. महाराजांनी ती मर्कटलीला शांत, निस्तब्ध आणि निरुद्विग्न भावाने पाहिली आणि पाहता पाहता त्यांच्या शांत, प्रेमळ चेहर्‍यावरून अश्रुधारा वाहू लागल्या. कर्मचारी वर्ग हे दृष्य पाहून चकितच झाले पण तेव्हा त्यासंबंधी महाराजांना काही विचारण्याचं त्यांच्यापैकी कुणाकडेच धैर्य नव्हतं. या प्रसंगाचा घोष बाबूंवर फार मोठा परीणाम झाला. त्यांच्या मनात महाराजांच्या त्या वेळेच्या भावावेशासंदर्भात अनेक प्रश्न उत्पन्न झाले. राधारमण घोष बाबू अगदी सज्जन, सत्यवादी आणि तीव्र बुद्धीमान असले तरी त्यांना वैष्णव आचार-विचारांची फारशी माहिती नव्हती. आंग्ल शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेतलेलं असल्याने त्याबद्दल मूळची रुचिही नव्हती. तरीही या घटनेमुळे त्यांच्या मनःपटलावर अनेक विचारांची गर्दी झालेली होती. महाराजांनाही घोष बाबू त्यांच्या आत्यंतिक सरळ स्वभावामुळे आणि तीक्ष्ण बुद्धिमुळे खूपच प्रिय होते. तेव्हा त्या दिवशी सायंकाळी योग्य वेळ बघून घोष बाबूंनी महाराजांना त्यांच्या या घटनेच्या वेळच्या प्रतिक्रियेविषयी प्रश्न विचारला आणि हे रहस्य उलगडण्याची विनंती केली. ते महाराजांना म्हणाले, "महाराज, आजच्या घटनेबद्दल आम्ही अत्यंत दिलगीर आहोत. आमच्या दुर्लक्षामुळे खूपच नुकसान झाले. पण तरीही एका शब्दाने तुम्ही आम्हाला काही बोलला नाहीत. त्या उलट त्यावेळी तुमच्या चेहर्‍यावर एक अपूर्व उत्कट भाव दिसत होता. डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. नेमकं काय होत होतं ते कृपा करून सांगू शकलात तर अनंत उपकार होतील." महाराज हसून त्यांना म्हणाले, "राधारमण, अरे ते वानर नव्हते, वानराच्या रुपातले एक महापुरुष होते. ते माझ्यावर कृपा करायला आले आणि मला एक मोठी शिकवण देऊन गेले. आपण आत्ता भगवान श्रीकृष्णांच्या वृन्दावनधामामध्ये आहोत. इथे भगवंतांनी त्यांच्या ब्रजलीला साकार केल्या आहेत. हे वैष्णवांचं सर्वात मोठं केन्द्र आहे. इथली झाडे, वेली, पशु, पक्षी सारेच भगवंतांचे सेवक आहेत आणि कोण कुठल्या रुपात येऊन आणि कोणत्या क्रिया करून भगवंतांचा संदेश देईल हे सांगता येत नाही. यासाठी आपल्यालाच सतर्क राहून ज्ञान ग्रहण करावं लागतं. अशा या वृन्दावन धामामध्ये येताना निष्कांचन भावात येणंच श्रेयस्कर आहे. पण मी आलो राजाच्या थाटात आणि ते ही सगळ्या प्रकारच्या विषयतृप्तीच्या साधनांसकट! आज त्या वानराने माझ्यासमोर माझ्या मौल्यवान शालीच्या चिंध्या चिंध्या करून या संदर्भात मला एक सावधानतेचा इशाराच दिलेला आहे. तेव्हा आता मी राजसी द्रव्ये आणि राजेपणाचा अभिमान घेऊन कधीही वृन्दावनामध्ये पाऊल ठेवणार नाही. वानराने दिलेल्या या शिकवणीमुळे माझं हृदय अपार आनंदाने भरून गेलं आणि त्या वानररुपी महापुरुषाचे आभार मानण्याच्या योगाने माझ्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले." हे ऐकून घोष बाबू अवाक् झाले. वैष्णव आचार-विचारांचा एक निराळाच पैलू महाराजांनी त्यांच्या समोर उलगडला होता, जो यापूर्वी कधीच त्यांना समजलेला नव्हता. हे ऐकून त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांच्या हृदयात अपूर्व अशा भावनांचा उदय झाला. ते पाहून महाराज त्यांना पुढे म्हणाले, "प्राकृत वैष्णव होणं फार कठीण गोष्ट आहे, राधारमण! दीनता हा वैष्णव आचार-विचारांचा प्राण आहे आणि या दीनतेचे मूर्तीमंत अवतार आहेत श्री गौरांग महाप्रभु! पावसाचं पाणी जसं उताराकडेच वाहून सखल भागामध्ये साठून राहतं तशीच गौरांग महाप्रभुंची कृपा हीन-दीन लोकांवरच अधिक होते. पण मी पडलो, राजा! पक्का दांभिक आणि विषयी! माझ्यावर कधी होईल त्यांची कृपा?" असं म्हणत असताना महाराजांच्या गालांवरून पुन्हा अश्रु ओघळू लागले. घोष बाबू काहीच बोलू शकले नाहीत. ते नि:शब्दपणे तिथून निघाले आणि एकांत जागी जाऊन विचार करू लागले. जे आचरण मनुष्याला इतक्या उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकतं, हृदयाला फुलासारखं कोमल बनवू शकतं तेच सर्वश्रेष्ठ आहे. मीही तसंच आचरण ठेवून श्रीगौरांग महाप्रभुंची उपासना करेन. अशाप्रकारे वृंदावनासारखे भगवत् धाम आणि त्रिपुराधिपति महाराज श्रीवीरचन्द्र माणिक्यांसारखा भक्त या दोहोंच्या संयोगाचा परीणाम म्हणून भक्तीमध्ये रुचि नसणार्‍या राधारमण घोष बाबूंसारख्या व्यक्तिमध्येही रुचिपालट घडून त्यांचं रुपांतर एका उत्कृष्ट वैष्णवामध्ये झालं. ------------------------------------------------------------------------------------------ *वैष्णवेर क्रियामुद्रा विज्ञे न बुझाय। अर्थात वैष्णवांच्या कोणत्याही कृति आणि त्यामागचा विचार सहज समजून येत नाहीत.
लेखनप्रकार

याद्या 2409
प्रतिक्रिया 10

छान लिहिलीय की ही गोष्ट! पण यात शब्द फारच जड जड वापरता आहात बुवा! जरा सोपं मराठी लिहिलंत तर कथावाचनाचा जास्त आनंद मिळेल असं वाटतं. म्हणजे तशी एक सूचना, बरं का! पुलेशु :-)

...कृपा हीन-दीन लोकांवरच अधिक होते.
The meek shall inherit the earth का?

अति उत्तम कथा !!!!!! भगवंताच्या अवीट भक्तीचा हा झरा असाच वाहत राहू द्या !!!!!!!! धन्यवाद गुरुदेव !!!!!!!!!!

जय श्रीकृष्णा :) (पु. ल. कीत ) अर्धवटराव