Skip to main content

आठवणीचे छोटे छोटे तुकडे -मालेगाव क्याम्प .!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 05/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
घर नं -. ३३ सोनार गल्ली मटण मार्केट जवळ मालेगाव क्याम्प ,मालेगाव जिल्हा ;-नासिक पत्ता अजून पाठ आहे. आता आम्ही मोठे झालो होतो. पाचवीत गेलो होतो. मिरजे वरून सरळ मालेगावात आमचा तंबू पडला होता. ट्रकमध्ये सामान नि आम्ही आख्खे कुटुंब.सोनार गल्लीत घर घेतले होते. एकदम जुने नि अंधारलेले. आम्ही म्हणालो - बाबा किती अंधार आहे ..? छी... कसले हे घर....!! गल्लीत एक घर बांधून तयार होते. माडीचे. चौकशी केली. घर मालक आले. विचारले. मालक घर भाड्याने द्यायचे म्हणाला. भाडे ठरले. पसंत पडले. नि आमचे सामान सरळ त्या नव्या घरात उतरविले गेले . खाली तीन रूम होत्या मागे छोटासा चौक .पुढे व्हरांडा नि वर तीन रूम. भला मोठा लाकडी माळा पुढे छोटीशी ग्यालरी. घर छान होते. आता आम्ही पाचवीला गेलो होतो. भवरा फिरवण्याचा प्रयत्न करीत होतो भवरा फिरवता येऊ लागला . मग तळहातावर कसा घ्यायचा हे पण शिकू लागलो . त्यासाठी उलटा पंजा बराच खरचटवून घेतला , आम्ही आता तरबेज होत होतो. अधून मधून क्रिकेट खेळत होतो . फळीची ब्याट नि सायकलच्या रबरी ट्युबचा बॉल तयार करून क्रिकेट खेळत होतो . विजेचे खांब आमचे स्टंप असत . मी तीनदां औट तर फक्त एकदा औट असा आमचा नियम होता . कारण मी सगळ्यात लहान होतो. त्याचा फायदा मी घेत होतो तेव्हाच घरात जी.ई.सी.चा रेडीयो आला. कपाळावर एक छोटीसी आयताकृती खिडकी होती . रेडीयो ऑन केला की एक निळसर प्रकाशाचा पडदा छान सरकताना दिसायचा . नि ते बघायला मोठी मजा वाटत असे. मी सारखा रेडीयो बंद नि चालू करायचो. नि ती निळी निळी जादू बघत बसायचो. अगदी डोळ्यात ,काळजात साठवून घ्यायचो. रेडीयोवर हिंदी गाणी लागत . कोणी गायले तरी आम्हाला गाणारा किशीर कुमारच वाटायचा . कारण आम्ही त्याचा चलतीका नाम गाडी हा सिनेमा बघितला होता दर बुधवरी सिलोन रेडीयोवर बिनाका गीतमाला लागत होती. रात्रीच्या वेळी पानाच्या टपरीवर ही sssगर्दी असायची. मला तर काहीच समजत नव्हते .अमीन सयानिचा जादूभरा आवाज ऐकताना कोठेतरी मन हरवून जायचे. कधीतरी क्रिकेट म्याच लागायची . मामा आला नि त्याने एक दिवशी म्याच लावली.नि आम्हाला क्रिकेटची अनोखी दुनिया माहित झाली. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू आसू हे सगळे बघून आम्ही क्रिकेट प्रेमी झालो. मला चांगले आठवतेय की आम्ही पेपरमधले क्रिकेटचे फोटो कातरून त्याचा छान अल्बम बनविला होता. नाना जोशीने हनीफ महम्मदचा क्याच सोडतानाचा फोटो कितीतरी दिवस माझ्या वहीत होता. तो काळच जादू भरलेला काळ होता. . आम्हाला प्रथमच रंगीत सिनेमा बघावयास मिळत होता. शम्मी कपूरचा जानवर सिनेमा बघून आम्हीतर हरखून गेलो होतो. त्या काळी सगळे हिरो स्वेटर घालीत असत. मग आम्ही पण स्वेटर घातला की आम्हाला देखील अगदी हिरो असल्या सारखे वाटत राही. मालेगावात थंडीत खूप थंडी नि उन्हाळ्यात खूप गर्मी . मी सायकल चालवायला शिकलो होतो.आमची चोवीस इंची सायकल होती.मी मध्येच पाय टाकून सायकल चालवू लागलो. मग मला वाटते थोडे वरच्या वर्गात गेल्यावर दांडीवर बसून फदक फदक पायडल पायाने मारून गाडी चालवू लागलो . नि एखादे हिंदी गाणे म्हणू लागलो . जरा सामने तो आओ छालिये छूप छुप चलनेमे क्या राज है. यू छुपणा सकेगां परमात्मा मेरी आत्माकी ये आवाज है... आणि का कुणास ठाऊक हे गाणे मला खूप आवडून गेले.नि ते गाणे अजून पाठ आहेच की ...!! पाचवीत आम्हाला प्रथमच हिंदी होते. आम्ही मग हिंदी बोलू लागलो. हिंदीत निबंध लिहू लागलो. एक निबंध गायीवर होता. सोपा .एकदम .लिहून टाकला आमचे काही मित्र मुसलमान पण होते. अली होता. हैदर होता. सुलेमान होता. तेथे काही बोलताना बे बोलायचे हे पण शिकलो. उदा. किधर जाता है बे क्या करता है बे. सलाम वालेकुम ,वालेकुम सलाम .असे किती तरी शब्द घरातल्या घरात मोहरमचे आम्ही वाघ होत असू. आमच्या घरी शफी नावाचे बाबांचे मित्र येत .त्याना आम्ही शफी मामा म्हणत असू. आमच्या गल्लीत काही मुसलमान कुटुंब होतेच.आम्हा पोराची त्यांच्याशी छान संबंध होते. रोजे सुरु झालेकी एखादा मुल्ला पहाटे पहाटे हातात काठी नि कंदील घेऊन -उठो भाईओ जागो करीत सगळ्या मुसलमान कुटुंबाला उठवीत असे.कधीतरी ते आम्हाला दिसे. आणि खूप बरे वाटे. कोणी मुस्लीम घरातील कोणी वारला तर पुन्हा असाच कोणी येऊन गल्लीत चलो भाई करीत पुकारा देत असे . हे सगळे आज आठवताना ते जुने दिवस आठवून जातात. नि मालेगाव दिसू लागते मालेगावचे दिवस मस्त रेंगाळत सरकत होते.एक एक दिवस रंगीत रंगीत वाटत होता. घरात आनंद नि आनंद होता. बाबांची फिरती चालूच होती. बाबा घरी नसले की मग आम्ही वासरासारखे वांड होऊन उंडारून जात होतो . क्रिकेट चालूच होता. मग पावसाळ्यात गोटया घरात आल्या. रंगी बेरंगी गोटया मग एखादी निव्वळ निळी निळी तिची अपूर्वाई तर खूप निराळीच वाटत होती. .ही निळी गोटी मला खूप आवडून गेली. ती फक्त माझ्या कपाटात असावयाची .तिने कधी खेळलोच नाही .मग कधीतरी गोटीच्या आकारचा छर्रा आला.स्टीलचा चमकदार .नुसता चमचमता .त्यात तुमचा डोळा पण दिसू शकेल ईतका आरशासारखा .मग निळी गोटी बाहेर आली. ह्या गोट्यांनी आमचे लहानपण मस्त केले . मग भवरे आले. रंगीत रंगीत भवरे.त्याची ती मस्त दोरी. मग लोहाराकडे जाऊन आरी बसवणे. श्रावणात मस्त हवेत ह्या गोष्टीत मोठी मजा वाटायची . भवरा फिरविण्यास शिकलो होतो .तो आता तळहातावर घेऊ लागलो. आता भवरा वरच्यावर हातावर घेणे शिकत होतो. दादा वरच्यावर भवरा घेऊ लागला. आणि भाव खाऊ लागला. मग मीपण शिकलो. मला बराच वेळ लागला. एकदा भवरा हातावर आला की दुसर्या वेळी भवरा हातावर नाही यायचा . शेवटी नशीब काहीतरी आहे असे वाटून जायचे .. नि मन खट्टू होऊन जायचे .. मग गणपतीचे दिवस आले. मला वाटते आमच्या घरी आम्ही प्रथमच गणपती बसवीत होतो. अगदी ११ दिवसाचा .त्यासाठी पुढची अर्धी रूम आम्ही आमच्या ताब्यात घेत असू मग मातीचे डोंगर करणे दोन डोंगरामध्ये गणपती बसवणे .डोंगरावर जाण्यासाठी रस्ते तयार करणे. रस्त्यावर खडूने मैलाचे दगड बनविणे.डोंगरावर हरळी पेरणे. कारंजा तयार करणे. दादा कार्ड बोर्डाच्या ईमारती तयार करीत असे नि छोट्या छोट्या झोपड्या बनवीत असे . कारण झोपड्या बनविणे सोपे असे. त्याना आम्ही नावपण देत असू -- आनंद नगर ,राजीव नगर ईत्यादी ईत्यादी . गणपतीत ११ दिवस मस्त मजा असायची. आमच्या गल्लीच्या टोकाशी एक न्हाव्याचे दुकान होते. भगवान न्हावी. अगदी उमदा .उंच पुरा. दिसायला राजेद्र कुमार. गणपतीत नाटक बसविले होते. नाव -वासुदेव बळवंत. वासुदेव बळवंतची भूमिका भगवान न्हावी करीत होता. आणि आमच्या मागे एक खप्पड गालाचे फडके नावाचे गृहस्त राहत होते.आम्हाला ते वयस्कर वाटत होते. काय करीत होते कुणास ठाऊक. त्यांनी पण त्या नाटकात इंग्रज साहेबाची भूमिका स्वीकारली होती. गल्लीत नाटकाचे नाव होत होते. चर्चा होत होत्या. आम्ही फक्त ऐकत होतो. आम्ही कधी नाटक बघितले नाही . केस कापावयास गेलो की आम्हाला भगवान न्हावी वासुदेव बळवंत सारखा भासे. केस कापता कापता भगवान न्हावी छान शिटीवर गाणी म्हणत असे. त्या शिटीच्या थंड हवेने आम्हास खूप मजा येई मला चांगले आठवतेय माझ्या पायला कुरूप झाले होते नि मी जरासा लंगडत चालत होतो. केस कापावयास गेल्यावर त्याला हे दिसले. म्हणाला -" थांब कुरूप आपण कापून टाकूया ". त्या दुकानासमोर दोन घराच्या मध्ये मोकळी जागा होती तेथे कोणीतरी पत्रे घालून हॉटेल टाकले होते. मातीची मोठीच मोठी चूल. सकाळी सकाळी त्या चुलीची हॉटेलवाला पूजा करीत असे. रोज फुलाचा हार घालून चुली भोवती रांगोळी घालीत असे. नि कढईत तेल ओतून गरमागरम भजी काढीत असे. खोल डिशमध्ये भजी भरून त्यावर दोन मिरच्या तलवारीसारख्या ठेवून तो गिर्हाईकाला देत असे. भजी म्हणजे माझातर जीव की प्राण परंतु हॉटेलमध्ये जाणे त्या काळी बिलकुल शक्य नसे माझी भज्यावरची नजर भगवान न्हाव्याने ओळखली होती . मला म्हणाला बघू तुझा पाय नि त्याने तळपाय हातात घेतला नि मला म्हणाल-"आता त्या भज्याकडे बघत बस." मग मी त्या भज्याकडे बघत बसलो . ती पिवळी धमक भजी कढईत मस्त दिसत होती. मी त्या भज्याकडे बघत होतो नि भगवान न्हाव्याने माझ्या टाचेचे सालटे कधी काढले हे समजले देखील नाही .नि माझे कुरूप बरे झाले. मालेगावची आठवण आली की मला भगवान न्हावी नि ती भजी आठवू लागतात अजून एक आठवण म्हणजे दर शुक्रवारी एक फकीर मोराचा पिसारा घेऊन गल्लीतून धावत धावत जात असे. त्याच्या धावण्याच्या अगोदर त्याच्या पुढ्यात जाऊन त्याला आटा वगैरे देऊन त्याच्या पाया पडले की, तो मोर पिसारा आपल्या डोक्यावर आपटून.रोग निदान करे. नि शामको आकर काला धागा लेकर जावो असे सांगे . ही गंमत आम्ही दर शुक्रवारी बघत असू. असे एक एक मस्त दिवस येत नि जात होते. गणपती नंतर दिवाळी यायची. तेव्हा घरीच आकाश कंदील बनवायचो.विमान चांदणी असे काही काही. दररोज दोर्याच्या रीळने आकाश दिवा खाली घ्यायचा नि त्यात पणती लावून परत तो वर असे करताना नि बघताना खूप छान वाटायचे. दिवाळीत काय काय फटाके उडवीत असू. लवंगी फटाके ,सुरसुर्या ,भुई नळे आम्ही फुसके फटाके सुद्धा गोळा करून त्याच्या सुरसुर्या बनवीत असू. मे महिन्यात सर्कस यायची .मालेगावात. क्याम्प ते मालेगाव जवळ जवळ ४ ते ५ किलोमीटरचे अंतर होते. मालेगाव मैदानावर सर्कस उतरे. रात्री आम्ही गर्मीमुळे माळवदावर झोपत असू .रात्री त्या सर्कसचा हिरवा प्रकाश झोत गोल गोल फिरताना दिसे. तो झोत गादीवर पडल्या पडल्या बघण्यात मोठी मजा वाटे . आपणास कधी सर्कस बघावयास मिळेल ह्याची मोठी उस्तुकता वाटत राही .सर्कशीतील काही हत्ती घोडे रस्त्यावरून जाहिरात करीत फिरत . उंच बांबूवर जोकर मस्त चालत जाहिरात करीत. त्यांचे विदुषकी चाळे बघून आम्ही अगदी खूष होत असू .नि सर्कस बघावयाची म्हणून बाबांजवळ हट्ट करीत बसू . सर्कशीचा उंच तंबू .ती दिव्यांची रोशनाई बघून आम्ही थक्क होऊन जात असू. सभोवती दाट काळोख असे नि त्या काळोखात लखलखता दिव्यांच्या माळेने तो तांबु म्हणजे इंद्राचा ऐरावत वाटे. सर्कस बघून झाल्यावर सर्कशीतले प्रयोग घरच्या घरी करण्यात खूप मजा वाटे. उदा.कोलंत उद्या खाणे जोकरसारखे एकमेकाला चिकटून चालणे. लोखंडी काम्बिला मध्येच अंगठ्याने पकडून चालण्याचा प्रयत्न करणे आम्हाला सर्कसमध्ये जाऊन असा काही खेळ करून दाखवण्याची आतून खूप ईच्चा होत असे. मग कधीतरी बाबांच्या हातचा पाठीत रपाटा खाल्ला की आमची सर्कस बंद पडे. पण असे दिवस थांबतात कोठे...? मुठीतून कोठेतरी सांडून जातात नि शोधू लागलो तर अशा आठवणीच्या रूपाने समोर येतात . नि मी अगदी लहान होऊन माझ्या गल्लीत गोटया ,भवरे , ते सर्कशीतील हत्ती ,घोडे ,ते जोकर तो सर्च लाईट नि त्या पान-टपरी जवळची तरुण पोरांची झुंबड मी अगदी आतल्या डोळ्याने बघू लागतो नि हलकेच डोळ्यात आलेला एखाद्या अश्रूचा एखादा थेंब उलट्यां मनगटाने पुसून टाकतो ....!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5266
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

खूप सुरेख लिहीत आहात, असेच लिहीत रहा. ते हातावर भोवरा फिरवण्याचे, आणि गोट्यांचे लिहीले आहे ते फार रुचले. नॉस्टाल्जिया वाईट म्हणून कोण म्हणते? आपले लहानपण, तरूणपण मधूनच असे समोर येत राहणे बरे असते.

जरा सामने तो आओ छालिये छूप छुप चलनेमे क्या राज है. यू छुपणा सकेगां परमात्मा मेरी आत्माकी ये आवाज है... हे गाणे मी १९८२-८३ ल पहिल्यांदा ऐकले. तेव्हापासुन आजपर्यंत त्यातली गोडी काही कमी झाली नाही. भोवरा, गोट्या ,सर्कस, सायकल शिकणे हे सर्व माझेच वर्णन करताय असे वाटले.

आयला तीनदा ह्या धाग्यावर आले ,पण प्रतिक्रिया द्यायला लॉग्गिन केले की कुणी ना कुणी तड्फड्तच होत मध्ये असो :) मस्त लिहित आहात ,चालु द्या पु.ले.शु.

फार सुरेख वर्णन. ह्यातील जवळ जवळ ८० टक्के गोष्टी/घटना माझ्याही बालपणाशी जुळतात त्यामुळे अर्थातच, पुन्हा एकदा बालपणीचे रम्य दिवस आठवले. अभिनंदन.

तुमचे लिखाण या आधी कधीच वाचले नव्हते .सहज धागा उघडला ... अन शेवटपर्यंत अधाशा सारखी वाचत राहीले तुम्ही आमच्या सगळ्यांनाच बालपणीचा सुवर्णकाळ आठविण्यास भाग पाडलेत अन पापण्यांच्या कडा भिजविल्यात. सर्कशीचे वेड मला ही खुप होते. आमचा एक चुलत भाऊ तर चक्क घरातून सर्कशीत काम करण्यासाठी पळून गेला होता . उलट्या सुलट्या तारेवरच्या कोलांट्या उड्या तो घरातही घ्यायला बघायचा पण जागा कमी पडायची. वाघ-हत्तींच्या आकर्षणापाई तो शाळेतून परस्पर पळून गेला होता अन मग दोन दिवसांनी त्यांच्या बिर्‍हाडात सापडला असला धपा -धप मार खाल्ला आहे, त्याने घरी सगळ्यांचाच कि विचारायची सोय नाही . त्याचे किस्से अजूनही गावी सगळे सांगतात अन आम्ही ही पोटभरुन हसून घेतो

पण असे दिवस थांबतात कोठे...? मुठीतून कोठेतरी सांडून जातात नि शोधू लागलो तर अशा आठवणीच्या रूपाने समोर येतात.
साधारण १-२ पीढीच अंतर असाव आपल्यात. पण यातल्या बर्‍याचश्या आठवणी आम्हीही उराशी बाळगुन आहोत. :)

मी तीनदां औट तर फक्त एकदा औट असा आमचा नियम होता.............. माझ्या भावाचापण असाच नियम असायचा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लेख खूपच छान.

आपण छान लिहिले आहे. पण ही सर्व गावे- मालेगाव ,मनमाड ,जामखेड अगदी रुक्श आहेत. एखाद्या सुन्दर गावावर लिहा.

In reply to by अशोक७०७

रुक्ष नाही, उन्हाळ्यात ही गावे थोडीफार रखरखीत होतात एवढे मात्र खरे. रुक्ष का म्हणावी? तिथली माण्से पाहा, बाजारहाट पहा, संध्याकाळी घरी परतणारे पक्षी, गुरे-ढोरे पाहा, नद्या, पाट, जत्रा, टपरी वरची चहा-भजी, रंगीत गोडी शेव आणि सणवारांचा उत्साह पाहा. शहरांशी तुलना करता 'तो' झगमगाट दिसणार नाही पण म्हणून ही गावे रुक्ष ठरत नाहीत. कोकणातल्या गावांच्या पदरात निसर्गाने डोंगर, पाऊस, नद्यांचे उजवे माप टाकले आहे. त्यामुळे हिरवाई, समुद्र किनारा, शेते आणि पावसाळ्यातील सुखकारक ओला वास आसमंतात भरून असतो. ते कमनिय सौंदर्य देशावर नाही. पण देशावर, उस आहे, ज्वारी-बाजरी आहे, द्राक्षाचे मळे आहेत, लावण्या-पोवाडे आहेत, कुस्त्यांचे फड आहेत असे एकूण रांगडे मर्दानी सौंदर्य देशावर अनेक ठिकाणी आहे. सुंदर गावांवर सगळेच लिहीतात. उपेक्षित गावांनाही थोडाफार न्याय मिळाला तर जास्त चांगले, नाही का?

In reply to by प्रभाकर पेठकर

हेच लिहायला आलो होतो. धन्यवाद पेठकरकाका. आपलं गाव हे आपलं गाव असतं. भले वाळवंटात का असेना. त्यालाही आपला चेहरा असतोच.

असेच आणखी लिहीत रहा. तुमच्या कवितांसारखीच तुमची छोटी छोटी वाक्य खूप काही सांगतात.

वाह..!! खुप बरे आणि छान वाट्ले......!!! वाचताना अगदी तुमच्या सहित फिरुन आलो तुमचा गाव... तुमच्या कवितांसारखेच खुप कहितरी आवडीचे वाचले ते सुद्धा मोफत..असा पुणेकर विचार मनात डोकावला..! !! तुमची लेखन शैली खरच खुप सुन्दर आहे... अवर्णणीय आहे...आणि विषेश म्हणजे अनमोल आहे..!!! मज्जा आली वाचून... ....आम्ही खुप काही मिस केले हे सुद्धा जाणवायला लागले..! मी बालपणी इथे पुण्यालाच होतो.. आजीचे गाव हडपसर .. :-) त्यामुळे तुमच्या इतके श्रीमंत अनुभव नाहित ..! :-) ....पण गोट्या, भोवरे आणि सायकल अगदी सेम टू सेम..! . मी सुद्धा तीनदा आउट तर एकदा आउट कारण..? (ब्याट माझी असायची.. आणि फील्डिंग साठी मी नेहमीच विकेट कीपर.. ) हेहेहे...!!!!! फक्त पहाटे येणारा वासुदेव आणि अस्वलाचे खेळ राहिले..!!