मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बंक्या आणि भयकथा !

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कै.श्री. नारायण धारप यांची क्षमा मागुन...... ********* "भयकथा लिहीणं म्हणजे एक विकॄतीच असते हं" दबक्या सुरात बंक्या म्हणाला. बंक्या म्हणजे आपला खास दोस्त. कॉलेजात असताना लेक्चर्स बंक करायचा म्हणुन आम्ही त्याला बंक्या म्हणत असु. आता ते नाव त्याला कायमचंच चिकटलय. दबक्या सुरात अश्यासाठी की जनरली यानंतर मी त्याला त्याचे थोबाड सांभाळण्याची सुचना देण्याची शक्यता होती पण आज आपला मुड चांगला होता म्हणुन आपलं विचारुन टाकलं " का बरं ? असं काय विकृत असतं भयकथांमधे?" " नाही कसं ? भयकथा नाSSSSSSSS त्या म्हणजेSSSSS एकदम हॉरर असतात" नाकावरचा अवजड चष्मा बोटाने सावरत बंक्या म्हणाला. एव्हाना माझा पाच फुट आकरा इंचाचा आणि सत्याहत्तर किलो वजनाचा देह चिडला नाही पाहून त्याला अवसान आलंच होतं. " बंक्या लेका, तु काय बोलतोयस ते तुला तरी कळतयं का ?" "मला कशाला कळायला पाहीजे? तुम्हालाच कळायला हवं." "काय कळायला हवं" "अरे ! अश्या भयकथा लिहुन तुम्ही लोकांना टरकवता म्हणजे काय?" " लेका, लोकांना असं टरकायला आवडत असावं म्हणुन तर वाचतात ना ते !" "असेल, असेल पण त्यातला कोण तश्या जागी गेला म्हणजे?" " तश्या? तश्या म्हणजे कश्या?" याचं बोलणं बोलण्यात नसतं. " तश्या म्हणजे तुम्हीलोक भयकथांमधे लिहीता तश्या." " भयकथेतल्या जागा अस्तित्वात नसतातच मुळी, त्या काल्पनिक असतात." " असतील हो असतील, पण हे तुम्हाला माहीताय आम्हाला कुठे माहीताय?" " आम्हाला म्हणजे कुणाला? बाकी वाचकांना तर माहीत असतं." "आम्हाला म्हणजे माझ्यासारख्यांना." " हो क्काSS? आता कळलं ना ? आता बाकी सगळ्यांना सांग बरं." " मी का म्हणुन सांगु ? आणि झाड ही काय काल्पनीक वस्तु आहे?" "मुळीच नाही" मी आपला बोलुन गेलो. " मागे तुझी ती `झाड' कथा वाचली आणि बागेतल्या झाडांना पाणी घालायला जाताना बायकोमुलाचा निरोप घेउन निघायचो." " इतकं घाबरण्यासारखं काय होतं त्यात ?" मी चकीत. " वा ! म्हणे इतकं घाबरण्यासारखं काय होतं, एकदा बागेत असताना गुलमोहोराची फांदी वरुन तुटून पडली तर ताप आला होता मला. त्यातच मेलो असतो म्हणजे?" " मरो तुझे दुष्मन, पण लेका असा घाबरतोस मग वाचतोस कशाला असल्या कथा?" पॉइंट नोट किया जाय. " अरे पण तुझ्या कथा वाचाव्या लागतात ना ! " " मी काय गुळ खोबरं दिलय तुला? तु नको वाचत जाउस ना ! " " मग कोण वाचणार?" हा सिरीयसली बोलतोय की फिरकी घेतोय हे न कळल्याने मी आ वासुन त्याच्याकडे पहात राहीलो. " आता बोल की , तोंड का मिटलं? मित्राचं साहीत्य वाचणं हे मित्रकर्तव्य आहे की नाही?" आता त्याच्या बोलण्याचा रोख कळला. " बंक्या, एकतर माझं तोंड मिटलेलं नव्हतं आणि तु जर असाच मित्रकर्तव्य पार पाडत राहीलास तर लवकरच ढगात जाशील." " अरे पण मित्र म्हणजे काही आहे की नाही? तुझी ती ही....... कथा वाचली आणि रात्री ह्याला पण जायची भिती वाटत होती." यातला पहीला ही नावं न आठवल्याने होता तर दुसर्‍या ह्या ला त्याने करंगळी उंचावली होती. " ते सगळं खोटं असतं रे " " अरे ? म्हणुन काहीही लिहायचं? तुझी ती टेलिफोनवाली कथा वाचल्यावर फोन उचलायची भिती वाटायला लागलेली, पलिकडच्या माणसाला मी आधी `राम' म्हणायला लावायचो त्याशिवाय मी बोलायचोच नाही." भरकटत जाऊन आपण भलतं सलतं बोलतोय हे बंक्याच्या गावीही नव्हते. " च्यायला, डायरेक्ट `राम' ?" " मग ? भुतं रामाचं नाव घेत नाहीत." " अरे पण ईतकं होतं तर भयकथा वाचु नकोस की" " पण, तु त्या लिहूच नकोस ना !" " अरे पण, मला तश्याच कथा लिहीता येतात ना !" " मग तु पण विकृत मेंदुचा आहेस " आईशपथ टाळकच सणकलं. " बंक्या लाफा मारेन हं !" मी शाब्दीक पातळीवरुन थेट शाररीक पातळीवर उतरल्याने बंक्या बिचकला " आणखी लेका विकृत म्हणजे काय नेमकं? आणि मी `पण' म्हणजे आणखी कुणाकुणाला तु हे विषेषण लावतोयस?" बिचकलेला बंक्या प्रश्नांच्या भडीमाराने चक्रावला. " विकृत म्हणजे असल्या भयानक जागी जाणारे आणि असले भयानक प्रकार बघणारे तुम्ही." " पण, मघाशी सांगितल नां, सगळं काल्पनिक असतं म्हणुन," " असं कसं, असं कसं मग तुम्ही इतकी व्यवस्थित वर्णनं कशी करु शकता?" " कल्पनाशक्तीने, आणि लेका तुला कुणी सांगितलं वर्णन केलेल्या ठिकाणी गेलं असलंच पाहीजे म्हणुन?" " वा रे वा ! आम्ही काय प्रवासवर्णनं वाचत नाही की काय?" बंक्याने कुठला विषय कुठे नेउन ठेवला. " अरे तो वेगळा साहीत्यप्रकार हा वेगळा " " शेवटी साहीत्यच ना ? वेगळं कसं असणार ?" " मग तुझ्या मते सगळ्या विज्ञानकथा लेखकांनी आकाशगंगा पालथी घातली असेल ना ?" " असेलही, इथे कोण लेकाचा कुणाला सांगुन जातोय" माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बंक्या म्हणाला. यावर जास्त न बोलणेच शहाणपणाचे होते म्हणुन मी दुसरा प्रश्न विचारला " मघाशी तु म्हणालास तु `पण' यात माझ्याबरोबर आणखी कुणाला गोवले होतेस?" " जगातल्या सगळ्या भयकथा लेखकांना." "म्हणजे नारायण धारप सुध्दा?" मी मुद्दाम त्यांचेच नाव घेतले त्यांच्या कथांना हा जाम टरकतो. " हो, ते सुध्दा, मी काही घाबरत नाही कुणाला" आपल्याच बोलण्याशी विसंगत वाक्य बंक्या बोलुन गेला. " अरे पण, त्यांना असं बोलणं शोभतं का तुला ?" " का नाही शोभणार? मी वाचक आहे आणि वाचक काहीही बोलु शकतो." वास्तविक याने नारायण धारपांचे अर्धेच पुस्तक वाचलेय आणि त्यानंतरही हा दोन दिवस पांघरुणाबाहेर पडला नव्हता. " पण, तुझं असं बोलणं त्यांना नाही आवडणार." " नाही आवडणार तर नको आवडू देत, ते कुठे जाईल ऐकायला ?" " जाईल रे ऐकायला, ते इथे आले तर," बंक्याच्या मागे दुर कुठेतरी पहात मी म्हणालो. " इथे कशाला येतायत ते ? ते तिकडे पुण्यात.." याचा अर्थ हा प्राणी पुस्तकं मुखपॄष्ठापासुन वाचत असावा कारण लेखकाचा पत्ता जनरली पहील्या पानाच्या समोर डाव्या बाजुला असतो. " पण समजा आलेच तर?" " आले तर आले, मी माझ्या मित्राशी बोलतोय" बंक्याने थेट राजकारणी पवित्रा घेतला. " आले तर आले, नाही बंक्या ते काही वर्षांपुर्वीच स्वर्गवासी झालेयत आणि आत्ता या क्षणी ते तुझ्या मागे उभे आहेत" नेमका त्याच क्षणी मघापासुन बंक्याच्या मागे उभ्या असलेल्या शल्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आपल्यामागे नक्की कोण आहे हे पहाण्याचीही तसदी न घेता किंकाळी फोडून बंक्या बेशुध्द पडला, मग त्याला शुध्दीवर आणुन घरी पोचवेस्तोवर माझ्या आणि शल्याच्या तोंडाला फेस आला. आता यापुढे मी ठरवुन टाकलेय एकतर भयकथांवर विचार करणार नाही, केलाच तर त्या लिहीणार नाही, लिहील्याच तर त्या प्रसिध्द करणार नाही, केल्याच प्रसिध्द तर त्या टोपणनावाने करेन आणि जरी माझ्याच नावाने केल्या तर बंक्याच्या हाती न लागु देण्याची अट मी घालत जाईन. ( काल्पनिक )

वाचने 10058 वाचनखूण प्रतिक्रिया 28

मदनबाण 28/11/2011 - 11:33
खी खी खी ! "भयकथा लिहीणं म्हणजे एक विकॄतीच असते हं" दबक्या सुरात बंक्या म्हणाला. ख्याक ख्या ख्या ख्यिक ! ;) (प्रेम कथा प्रेमी) ;)

sagarpdy 28/11/2011 - 11:44
वसतिगृहात राहत होतो तेव्हा आमच्या शेजारच्या खोलीत एक बंक्या राहायचा. तो धारपांची पुस्तकं पूर्ण तर करायचा, पण नंतर फुलपाखरू जरी बाजूने उडलं तरी व्हायच याचं 'राम राम' सुरु :)

चाफा 28/11/2011 - 13:21
धन्स मित्रहो, @ मदनबाण : ते वाक्य वाचुन भारीच उकळ्या फुटल्या की हो :)

In reply to by चाफा

मदनबाण 28/11/2011 - 13:32
@ मदनबाण : ते वाक्य वाचुन भारीच उकळ्या फुटल्या की हो हो... मग काय ! च्यामारी मी तर काही भय कथा विनोदी कथा म्हणुन सुद्धा वाचतो ! ;) पण काही भय कथा खरचं मनाची सुंदर पकड घेणार्‍या असतात...

सोत्रि 28/11/2011 - 20:39
आता यापुढे मी ठरवुन टाकलेय एकतर भयकथांवर विचार करणार नाही, केलाच तर त्या लिहीणार नाही, लिहील्याच तर त्या प्रसिध्द करणार नाही, केल्याच प्रसिध्द तर त्या टोपणनावाने करेन आणि जरी माझ्याच नावाने केल्या तर बंक्याच्या हाती न लागु देण्याची अट मी घालत जाईन.
मस्त ! - (काल्पनिक नसलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

चाफा 29/11/2011 - 15:27
सोकाजीराव जरी तसं लिहीलं असलं तरी भयकथा लिहीणं मी बरा सोडेन :)

In reply to by चाफा

सोत्रि 29/11/2011 - 15:44
घ्या तीच्यायला, तसं नव्हत म्हणायच मला. जाउदे आता आणखी काही लिहून घोळ नाही घालत .... :( - (घोळ घालणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

चाफा 29/11/2011 - 20:16
घ्या तीच्यायला, तसं नव्हत म्हणायच मला. >>>> नो टेंन्शन सोकाजीराव, मी गैरसमज करुन घेतलाच नव्हता :)

यकु 28/11/2011 - 21:22
मस्त! प्रसंग अगदी आटोपशीरपणे क्लायमॅक्सपर्यंत नेला आहे. आहट आणि श्श्श्श्श!!!! कोई है पाहून कधीकाळी मी एकट्याने लादणीत झोपण्याची साधना केली आहे ;-) त्यामुळं तुझ्या भयकथा वाचून आम्ही कै घाबरनार नैच. लिही. लिही लवकर एखादी जाम टरकवणारी भैकथा. ;-)

मृत्युन्जय 29/11/2011 - 15:36
सुंदर लिहिले आहे. भयकथा जितक्या उत्तम लिहिता तितकेच विनोदीही छान लिहिता याची प्रचिती आली. मिपाला अजुन एक चांगला लेखक लाभला आहे हे बघुन बरे वाटले.

पैसा 29/11/2011 - 20:37
ही भयकथा मला त्या झाडांच्या गोष्टीपेक्षा जास्त आवडली.

धमाल मुलगा 02/12/2011 - 19:45
आहेत, आहेत्...असे काही जीव चांगल्याच परिचयाचे आहेत. भूतामधला भू म्हणलं तरी लगेच "एऽऽ तू ग्यॅप नॅऽऽ....' वगैरे रड्क्या तोंडानं सुरु होतं. लै मज्जा येते अशा दोस्तांना टरकवायला. :D लहान होतो तेव्हा धारपांची पुस्तकं वाचायला तर आवडायचं, पण भिती फार वाटायची, म्हणून मग चार दोन मित्र एकत्र बसून वाचयचो. तेव्हा एकदा आमच्या गज्याला बळंबळंच धरुन आणला होता. ते नको नको म्हणत होतं, आणि पोरांनी त्याला हैय्याऽ म्हणून आणला उचलुन. मग काय म्हाराजा....गोष्ट ऐकता ऐकता एकदम उग्र वास यायला लागला. तंतरली ना भौ सगळ्यांची...इकडं तिकडं नीट पाहिलं तर ह्या गज्यानं चड्डीतच...... =)) =)) लै भारी रं चाफ्या. :) तू लढ यड्या. लय भारी लिहितंयस. आता एखादी सण्णसणीत टरकूफाईंग ष्टोरी येऊंदे बघ. :)