Skip to main content

सी- सॅट..!!

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 16/11/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये "सी- सॅट" आणि "डी- सॅट" हे नेहमीच्या वापरातले शब्द. थोडक्यात सांगायचं झालं तर, "डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )" आणि "सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)" प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते. जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला फक्त ते संवादाच्या माध्यमातून परदेशात पोचवायचे असते आणि आपली तांत्रिक हुशारी बरोब्बर ठिकाणी वापरायची असते. पण एका झटक्यात ऐकणारे ते च्यामारिकन कुठले, त्यांच्यासमोर किती डोकं फोडा, जोपर्यंत ती लोकं त्यांचा मेंदू वापरणे बंद करत नाही, तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला बांधता येतो तो फक्त अंदाज, तिथे ते काय करतायत याचा..त्यांना प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी हळूहळू आणि पटवून द्यावी लागते. आता ह्यात त्यांची काही चुकी नाही म्हणा, तिथल्या प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा ह्यासाठी कारणीभूत आहे... एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don't you think its odd? काय बोलावं आता? :D :D आता माझं जे नवीन प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन सांभाळतो. खास करून दुर्गम, खेड्यापाड्यातील लोकांसाठी ही सुविधा एक वरदान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शहरात जितकी कंपनीची ग्राहकसंख्या आहे, त्याहून अधिक ग्राहकसंख्या दुर्गम भागात आढळते. कारण त्यांना त्याची जास्त गरज असते. तिथेही आयुष्याची ३५-४० वर्ष शहरात पैसे कमावतात ऐशो आराम करतात आणि मग उरलेला पैसा घेऊन कुठेतरी गावात, जंगलात, वाळवंटात राहायला जातात मन:शांतीसाठी. तिथे ना त्यांना फोन नेटवर्क मिळत, ना इंटरनेट. मग त्यांच्याकडे सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे एकच उपलब्ध माध्यम असतं जगाशी जोडण्याचे. म्हणूनचं सॅटेलाईट कम्युनिकेशनला लगेच आणि जास्त प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे लष्कर आणि जगभरातील सगळ्या ATM मशीन्सचं नेटवर्क, हे आमच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर करूनचं जोडलेले आहेत. हे नेटवर्क त्यातल्यात्यात कमी खर्चात सेटअप होतं, पण त्याचा मेंटेनन्स खुपंच जास्त आहे. हे नेटवर्क खुपच नाजूक आहे. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या नेटवर्कला खूप वेळा (नेहमीच) धक्का लागतो आणि तो धक्का आम्हाला सहन करावा लागतो. मग आम्हाला फोनाफोनी, शिव्याशाप सुरु...त्यातल्या अश्याच एका धक्क्याची कहाणी इथे देतोय :) (संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय...) (ट्रिंग ट्रिंग !!) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला... मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती.. स्टिफन:- युवर कंपनी सक्स... मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन. मी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन? स्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत... मी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन... स्टिफन:- मदत...नको मला तुझी मदत... मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..!! मी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून) स्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास...मला?? मी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला) स्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय? माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स...!! मी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही) स्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय.... मी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता) स्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात.. मी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता... मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का? स्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे? मी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा? स्टिफन:- काही नाही.. सगळं एकदम सुरळीत सुरु आहे !! मी:- क्काय...(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास? स्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या... मी:- मग... नक्की झालंय काय? मी तुला काही मदत करू शकतो काय? स्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं... स्वतःला मोकळं करायचं होतं... माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन...मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली... आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय... माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं? तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट मी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून !! स्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते... काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील...पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही... आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय. मी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं... ख्रिसमसची तयारी सुरु झाली का? (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे) स्टिफन:- हा हा हा हा... विषय बदलतोयस...ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम...!! मी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो.. स्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होत... तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर !! मी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं...मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती....पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल....सॉरी !! स्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे !!! मी:- नक्की... काळजी घे.. Bye !! ======================================================= अमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. :( मी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला... "सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लिये, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं...!! :) " मी नुसताच हसलो... आणि बाहेर पडलो !! पूर्वप्रकाशित - मीमराठी दिवाळी अंक २०११ -- सुझे !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7574
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

In reply to by अन्या दातार

हेच म्हणतो. तुम्हाला आमच्याकडुन वी-सॅट रेटिंग ( बाकी पार्टीसाठी आमंत्रण तुम्ही देतालच ;) ) - छोटा डॉन

In reply to by अन्या दातार

झक्कास लेख. आवडला.आपल्याकडून तुम्हाला वी-सॅट (वाचक सॅटीस्फाईड) असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

लेख मस्त. खरं सांगु का? त्याने निर्णय घेण्यापुर्वी बायकोला सांगितलं नसेल तर इथे ती त्याला सोडायचा निर्णय घेते हे ठीकच म्हणजे सतत भांडण - तंटा, वादावादी, तणाव यापेक्षा बरं..पण एकीकडे त्याला असं एकटं टाकुन जाउ नये असंही वाटलं.

मस्त लिहलं आहेस रे... मला सुद्धा असे अनेक अनुभव आले आहेत... फरक फक्त इतकाच की माझ्या डेस्कवर येणारा फोन हा कुठल्या देशातुन आहे ते कळायचे नाही,कारण जगात जिथे जिथे माझ्या क्लायंटचे नेटवर्क सर्व्हर्स होते,त्या ठिकाणाहुन एक फोन फिरवला की कॉल माझ्या इथे यायचा... फोन आला की माझे काम सुरु... प्रत्येक येणारा फोन हा निराळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी...त्यामुळे समोरच्याशी बोलुन त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात्,मदतीला क्लायंटचा डेटाबेस होता,पण त्या पेक्षा स्वतःच्या अनुभवाने प्रश्न सोडण्यावर भिस्त जास्त... आत्ता पर्यंत जगभरातल्या लोकांशी बोलुन झाल्यावर मी केलेली वर्गवारी :-- १)ऑस्ट्रेलियन कॉलर :--- सगळ्यात जास्त उद्धट्,धमकणारे,योग्य सोल्यशन देउन सुद्धा मागुन काड्या सारणारे,तुम्ही झाडुवाले आहात आणि ते रावसाहेब आहेत हा बोलताना होणारा व्यक्त होणारा भाव ! २)ब्रिटीशः--- आम्ही जगावर राज्य केलयं त्याची धुंदी अजुन सुद्धा उतरली नाही यांची... आत्ताच्या आत्ता झाले पाहिजे, मला तुमच्यामुळे जास्त वेळ काम करायला लागते अशी मुक्ताफळे उधळ्यात पटाईत. ३)अमेरिकन :--- सगळ्या जगासाठी नियम आम्हीच करतो,ते आम्हाला मात्र लागु होत नाहीत्...महासत्ता असल्याची गु र्मी जाणवते...पण निदान आय ऐप्रीशिएट म्हणण्याचे कष्ट कधी मधी घेतात. ४)युरोपियन :--- माझे सगळ्यात आवडते,तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कष्ट घेत आहात याची त्यांना जाणीव असते,तो त्याक्षणी सॉल्व्ह झाला पाहिजे याचा अट्टहास नसतो...बोलण्यातुन माणुसकी जाणवते,तरी पूर्णपणे प्रोफेशनल ! ५)जपानी :--- यांचे इंग्रजी समजण्याचे वांदे ! बॉसला फोन करावा तर तो सेक्रेटरीला बोलवतो आणि ती तोडक्या मोडक्या इंग्रजीत्/कधी कधी उत्तम सुद्धा त्याचे सर्व डिटेल्स सांगते. बोलण्यातुनच विनम्रता जाणावते. ६) चीनी:--- अग्म्य अशा इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करता... त्यांच्या पहिल्या नावात इंग्रजी तर आडनाव चायनीज असते...उदा. डॅनियल यू. जॉन ली इ. बोलणे झेपत नसल्याने चॅटवर धरुन प्रॉब्लेम सांगण्यात अग्रक्रमी... एक कॉलः--- जॉन (अमेरिकेतुन) :---- फक फक फक ! मी :--- (मनात :--- आयचा घो तुझ्या !) बोल जॉन,व्हॉट्स राँग ? जॉन :--- हॉटेल मधे आहे,पण लॉपटॉप मधुन व्हीपीएन चालत नाही ! फक फक फ्क मी :--- मी सेंटींग्स सांगतो तसे चेंज कर... जॉन :--- फक ओक्के. टेल मी. मी :-- इकडे जा, तिकडे हे दिसेल्...त्यावर क्लीक कर्,मग २ ऑप्शन दिसतील त्यातला दुसरा सिलेक्ट कर मग ओक्के वर क्लिक कर. जॉन :--- फक फक फक... डन ! मी --- इज इट वर्कींग नाउ ? जॉनः--- येप्...थॅक्स मॅन... अ‍ॅड सॉरी फॉर दॅट फक थिंग... थीस व्हिपीएन रिअली सक्स्स्स ! बाय. मी:--- वेलकम. इफ यु फेस एनी प्रॉब्लेम्.प्लीज डु कॉल अस...वी वुड लाईक टु हेल्प यु. जॉनः--- शुअर... बाय. असे अनेक किस्से आहेत... सांगत बसलो तर दिवस पुरणार नाही.

In reply to by सुहास झेले

अरे वरचा प्रतिसाद भलत्याच घाईत लिहला गेला आहे,त्यामुळे बर्‍याच टंकन चुका झाला आहेत रे... इथे हापिसातुन टायपताना ४ टाळकी बघतात ना ! सध्या लिहण्याचे पण वांदे बघ ! ;)

In reply to by मदनबाण

अहो साहेब, फक्त असे ग्राहकच नै तर तुमच्यासारखे सेवा देणारे पण कै कमी नसतात...माझाच एक अनुभव घ्या : दुपारचं जेवून खावून मस्तपैकी वामकुक्षी घेत पडले होते तेवढ्यात फोन टनानला. शिव्या देव उचलला तर दुसरीकडून satellite डिश वाले त्यांची झैरात करत त्याच्या सुविधा सांगायला लागले... तिकडून : हेलो, तुम्ही डिश घेण्याबद्दल विचार केलाय का? आमच्या अशा तशा ऑफर आहेत.. मी : आमच्याकडे केबल आहे अन आम्हाला डिशमध्ये इंटरेस्ट नाही. धन्यवाद. तिकडून : पण म्याडम धमक्या तमक्या ऑफरमध्ये तुम्हाला तमके पैसे कमी होतील. मी : मला अज्जिबात इंटरेस्ट नाही. धन्यवाद. फोन ठेऊन दिला. दुसर्या दिवशी परत हेच अन त्याच वेळी. यावेळी वैतागून मी : तुमच्या म्यानेजरला बोलवा. तिकडून: डिश नेटवर्क असं तसं..तमक्या ऑफर चालूच. मी : हे पहा मला अज्जिबात इंटरेस्ट नाही..काल फोन केला होतात तेव्हाही मी हेच सांगितलं होतं, माझं नाव तुमच्या लिस्टमधून काढून टाका. मी फोन कट केला. तिसर्या दिवशी हेच अन त्याच वेळी..आणि मी : आता पुन्हा फोन केलात तर मग मी तुमच्याविरुद्ध इथे अधिकार्यांकडे तक्रार करेन कि फोन करून त्रास देताहेत म्हणून.. तिकडून : ओके, ओके, ओके. फोन कट. गम्मत म्हणजे तिकडून फोन करणारा भारतीयच होता. यावर कडी म्हणजे एकदा असाच कोणत्यातरी कंपनीकडून फोन आला...अर्थातच त्या बाजूने भारतातील call center मधून कोणीतरी बोलत होते. काय तर म्हणे त्यांना घरातील मुख्य व्यक्तीशी बोलायचे होते. तिकडून : अमुक तमुक घरी आहेत का? मी : नाही पण मी त्यांची पत्नी आहे तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तिकडून : त्यांच्याशीच बोलायचं या स्कीमबद्दल. घरच्या मुख्य व्यक्तीशीच बोलायचय. मी : (तुझ्याला तुझ्या मी काय मोलकरीण ए काय? सागितलं न बायकोच बोलतेय!!) ते इथे नाहीत माझ्याशी बोलू शकता..मी त्यांची पत्नीच आहे. तिकडून : नाही मी नंतर फोन करते. अन ठेऊन दिला. समोर असती तर मेलीची सालं काढली असती.

In reply to by शिल्पा ब

सेल्स आणि टेक्निकल सपोर्टमध्ये जमीनअस्मानाचे अंतर हाये शिल्पा तै... त्यांना टार्गेट्स लोकांना कॉल करून, त्यांना पिडून, सेल करायचा अशी असतात... :)

In reply to by सुहास झेले

सेल्स आणि टेक्निकल सपोर्टमध्ये जमीनअस्मानाचे अंतर हाये शिल्पा तै... बराबर सांग्या तू... ;) त्यांना टार्गेट्स लोकांना कॉल करून, त्यांना पिडून, सेल करायचा अशी असतात... बरुबर... टेक्निकल सपोर्ट मधे मेंदुचा पार भुगा पडतो रे... आता लिहण्याची खाज वाढली आहे म्हणुन लिहतो... एकदा जपान (टोकियो) मधला लोटस नोट्स सर्व्हर डाउन झाला ! माझी पाचावर धारण बसली ! सगळ्या शक्यता पडताळुन पाहिल्या ! दुनिया भर फोन करुन झाले, शेवटी जपान मधे चौकशी केली, तेव्ह्या आयटी हेड ऑफ जपान लाईनवर होता,त्याला विचारले सर्व्हर बद्धल... तो म्हणाला मेंटेनंन्स साठी डाउन केला आहे,माझी सटकली ना ! त्याला म्हटंलं प्रोसिजरनुसार तू मला कळवायला हवे होते,मी उगाच युरोपातील मंडळींना जागे करुन बसलो. असा झाड झाड झाडला ! त्या नंतर दरवेळी मला कळवायला विसरला नाही तो. (कधी कधी दुसर्‍यांना योग्य कारणासाठी झाडायची संधी मिळाली तर मी ती सोडत नाही ! ;) ')

झेल्या हापण लेख सही आणि मीपण याच इंडस्ट्रीमधला. फक्त फोनशी जास्त संबंध येत नाही आणि मेलशी जास्त संबंध येतो. बाकी सी-सॅट आणि डी-सॅट हे एक मोठे झंझट आहे. - पिंगू

In reply to by पिंगू

सी-सॅट आणि डी-सॅट हे एक मोठे झंझट आहे. एसएलए त्यापेक्षा जास्त तापदायक रे !!! ;)

In reply to by सुहास झेले

साला एसएलए तर कंबर वाकडी करतो आणि त्यावरुन मॅनेजरची बोलणी पण खावी लागते.. :( - पिंगू

मदनबाण म्हणतोय तसं युरोपिअन कस्टमर सर्वात छान असतात असं आयटीतले मित्र म्हणत असतात खरं!

In reply to by दादा कोंडके

हो ते आहेचं... बहुतांश भारतीय लोकं आहेत तिथे.. अमेरिकेच्या लोकांना अमेरिकन असल्याचा प्रचंड गर्व असतो, पण च्यामारिकेतसुद्धा चांगले चांगले अनुभव येतात.. अडोबीमध्ये असताना पिक्सरच मोठ्ठ कॉन्ट्रक्ट मिळालं होतं. ते काम करताना फुल्टू धम्माल आली होती.. माझ्या टीमला ५-६ तास लागले होते ते काम करताना, पण ती लोकं बिंधास्त होती. :)

सर्विस इण्डस्ट्री मध्ये काम करत नसलो तरी मला आलेला एक अनुभव... अँथनी - मला डेटा फिल्टर (माहिती गाळायची) नवीन सिस्टीम आवडली नाही. आधीची कॉमा सेपरेटेड (स्वल्पविराम असलेले शब्द) असलेली पद्धत चांगली आहे. मी - पण अँथनी ह्या नव्या पद्धतीत तुम्हाला टाईप करता करता फिल्टर होते. फक्त कॉमाच्या ऐवजी पाईप ( | ) वापरा म्हणजे १२३, ३४५ ऐवजी १२३|३४५. अँथनी - पण ते किती क्लिष्ट वाटतं. मी - मान्य आहे. पण आपण युजर ना ट्रेन करणारच आहोत ना. शिवाय ह्याचा अ‍ॅडवाण्टेज हा आहे की इथे तुम्ही वाईल्डकार्ड कॅरेक्टर सारखी सर्च करता येते जसे आयडी = १२३|३*५ जर तुम्ही टाईप केले तर १२३ आणि ३ ने सुरू होणारी आणि ५ ने संपणारी कुटलीही आयडी असलेली माहिती जमा होईल. हे आधीच्या कॉमा फिल्टरींगमध्ये नव्हतं. अँथनी - पण मला आवडत नाही. मी - म्हणजे अजून काही प्रॉब्लेम आहे का? अँथनी - हाच की मला पाईप ( | ) कॅरेक्टर आवडत नाही. मी - (मी हसलो... अजून काय कप्पाळ बोलणार) :-) अँथनी - शिवाय हे कॅरेक्टर कसं टाईप करायचं हेच मला कळत नाही. मी - (आता कळलं खरा प्रॉब्लेम) ते सोपं आहे. कीबोर्ड वर शिफ्ट आणि "\" ची कळ दाब. पाईप "|" येईल. अँथनी - (बर्‍याच सेकंदांनंतर) ... पण हे खूप कोपर्‍यात आहे. मी - पण कॉमाच्या एक कळच तर वर आहे. अँथनी - तरी मला आवडत नाही. मी - (कंटाळून) ठिक आहे. बदलूया. पुढच्या खेपेस हा फिक्स करून मिळेल. अँथनी - (थोडं अवघडून) नको असूदे. मी पाईप चालवेन. (क्षीण निषेधात्मक) तरी कॉमा बरं होतं. मी - हो मलाही कॉमाच आवडायचं. पण नव्या पद्धती नवे विचार! अँथनी - हो जसं की माझ्या मुलाची विचार. मी - ? अँथनी - लग्न करतोय. विथ अ ब्लोक! मी - (च्यायल!!!!) ओह्के. अँथनी - याह. कॉमाच्या ऐवजी पाईपशी काम चालयाला लागेल आता. बिचार्‍या कोपर्‍यात सडणार्‍या पाईप कॅरेक्टरची वापरायची पाळी शेवटी आली पण येतायेता तो युअजर्सच्या नजरेत समलैंगिक झाला! लाईफ इज सो अनफेयर! :-)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

वा वा वा श्री श्री श्री टिंग्याजींची कॉमेन्ट बर्‍याच वर्षांच्या मौनानंतर वाचायल मिळाले

हेहेहे !!!! शॉटमारी लेख आणि प्रतिसादात हे वाचायचं राहून गेलं होतं. खरंच सगळ्यांचे किस्से जबरदस्त किस्से आहेत रे सुहास... च्यायला मी तर कॉलसेंटरवरच्या जमातीला इतकं पिडलं आहे की नक्कीच माझं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये असेल त्यांच्या.. मझा आला .. :)

सेंटी किस्सा! असलाच एका चॅमेरीकनचा किस्सा. आमचा आधीचा होस्टीग कस्टमर होताच तो. एखाददोन साईट असतील त्याच्या. तो चॅटवर आला. बहूदा टाकून आलेला असावा. फालतू अलाना फलाना प्लॅन काय कसा विचारायला लागला. म्हणाला, 'मी हे नविन डोमेन अन साईट का करतोय ते मला विचार'. विचारले. म्हणाला, 'आमच्या बाजूच्या बंगल्यात खुन झालाय अन त्यासाठी मी हे डोमेन अन साईट विकत घेतोय!'

In reply to by पाषाणभेद

मला आला होता एक फोन... मी माझ्या नवऱ्याचा खुन करणार आहे, सो मला त्याचं नाव बिलिंग अकाऊंटमधून काढायचं आहे. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

In reply to by सुहास झेले

हॅहॅहॅ.... मला पैसे दान करायचे आहेत ! कुठल्या अकाउंटवर करु ? असाही एका भ्रमिष्ठ माणसाचा कॉल आला होता ! या लोकांना आवरायचे म्हणजे लयं कठीण काम ! ;) माझ्या मते अमेरिकेत मनोविकार तज्ञांनी चांगली चलती असावी !

In reply to by मदनबाण

मनोविकार तज्ञांपेक्शा वकील जमातीचे राज्य आहे... काही झालं तरी कंपनीला सू करायची भाषा असते ह्या लोकांची ;)

In reply to by सुहास झेले

काही झालं तरी कंपनीला सू करायची भाषा असते ह्या लोकांची हे पण आहेच, तिथे कायद्याची भिती /धाक अजुनही दिसुन येते ! आपल्याकडे तारीख पे तारीख... ;)

In reply to by सुहास झेले

काही झालं तरी कंपनीला सू करायची भाषा माझ्या नवर्‍याच्या क्युबीकलवरचा सिलिंगचा तुकडा तिरका झाला होता. त्याची तक्रार केल्यावर दुरुस्तीच्या लोकांनी दुसर्‍या दिवशीची वेळ कळवली व तेवढा वेळ कामासाठी पर्यायी जागाही सुचवली. हे सगळं पाहून हामेरिकन कलीग म्हणाला की कश्याला कळवलस? समजा तो तुकडा डोक्यात पडला असता तरी फार काही झालं नसतं तुला! शिवाय कंपनीला सू करता आलं असतं ते वेगळंच! चांगली संधी घालवलीस. त्यामुळे मला वाटतं त्या बुवाला नक्कीच ट्रीटमेंटची गरज आहे.;)

कडक लिहिलयेस जाम आवडला लेख एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don't you think its odd? काय बोलावं आता? हॅ हॅ हॅ हे तर लैच भारी

मस्त लेख.. आणि बाणाचे अनुभवही झकास. या क्षेत्राचा अनुभव किंवा माहिती नाही पण implementation मध्ये येणारे क्लायंटचे अनुभव आणि वर मदनबाणाने लिहिलेली खंड / देशांची वर्गवारी एकदम जुळते ! त्यामुळे सेवा क्षेत्र असो किंवा सल्ला मानसिकता आणि वागण्याचा अनुभव सारखाच आहे! अजून गमती काही असतील तर येऊ द्या ! भारतात एका उत्पादन कंपनीतला अनुभव -- जुनी लाला कंपनी ... सगळा भर प्रॉडक्शन / शॉप फ्लोअर आणि खुल्या बाजारातून उद्योग करुन स्वस्तात माल उचलणे आणि कागदोपत्री नुकसान दाखवून अबकारी कर आणि उत्पन्न करातून पैसा करणे यावर.. आय टी अगदी कमी उपयोग आणि लोकांचा शॉप फ्लोअर वर संगणकाचा वापर हा नोटीसा किंवा सॉलिटेअर च्या पलिकडे नसावा. ई आर पी तून रोजचा रिपोर्ट छापायचं काम सुद्धा प्रॉडक्शन मॅनेजरला इतकं अवघड वाटलं की त्या सरदाराने (काय योगायोग) विचारलं -- " ऐसा नहीं हो सकता के मैने वो उधर पासवर्ड डाला और प्रिंटर लगाया तो उसको समझे की ये रिपोर्ट चाहिये और वो अपने आप छप जाये? " आम्ही गार झालो होतो.. असाच दुसरा किस्सा याहून भारी.. डिझाईन ड्रॉइंग एका नॉन टेक्निकल (कॉम्प्युटर विशेष न वापरणार्‍या -- शॉप फ्लोअर मॅनेजरला लागायचं. त्याने खास शॉप मधून आय टी डिपार्टमेंटला येऊन ... त्यावर काम करणार्‍या आम्हाला शोधून अतिशय निरागसतेनं विचारलं की ते कॅड मधून काय मला जमत नाहि.. दर वेळी काही तरि घोळ होतो... असं नाही करता येणार का की मी फ्लॉपी घातली ड्राइव्ह मध्ये की तो आपो आप ड्रॉईंग छापेल :) तो काळ आता गेला अर्थात.. खूप मोठ्या सुधारणा झाल्या आहेत आणि लोक तांत्रिक गोष्टींना आणि रोजच्या वापरात सिस्टिम्स हाताळण्यामधे बरेच प्रवीण झाले आहेत...